‘वेदांत’ आणि ‘रव्वा ऑइल’ या कंपन्यांकडून भारत सरकारने मागितलेली भरपाई वारंवार अकारण आणि अमान्य ठरूनही सरकार वेळ दवडत राहते…
‘तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही’, ही भावना राजकीय विरोधक, पत्रकार अशा अनेकांनी सरकारबाबत व्यक्त केलेली असेल आणि सरकारनेही त्याकडे आपल्या यशस्वी शैलीनुसार दुर्लक्ष केले असेल. पण देशाचे सर्वोच्च न्यायालयच या शब्दांत केंद्र सरकारला खडसावते तेव्हा त्याची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. ती जशी सरकारने घ्यायला हवी तशीच, विवेक शाबूत असलेल्या नागरिकांनीही घ्यावयास हवी. त्यासाठी हे प्रकरण समजून घ्यायला हवे. आतापर्यंत विद्यमान सरकारला अनेकदा न्यायालयीन शब्दछडीचा प्रसाद मिळाला. मग मुद्दा ‘बुलडोझर न्याया’चा असेल अथवा ‘जामीन हा नियम, तुरुंगवास हा अपवाद’ हा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा घालून दिलेला नियम असेल. सरकारने विरोधक वा सव्यसाची पत्रकारांस द्यावी तशी वागणूक न्यायालयासही दिल्याचे अनेक प्रसंग घडले. परंतु न्यायालयाने सरकारला ‘तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही,’ अशा शब्दांत खडसावावे इतकी वेळ आली नव्हती. आता तेही झाले. देशाच्या आर्थिक राजधानीत, मुंबईत अर्थमंत्री निर्मला सीतारामन परदेशी गुंतवणूकदारांस आकृष्ट करण्याचे प्रयत्न करत असताना त्याच शहरातील उच्च न्यायालय शहराच्या महापौर आणि सत्ताधार्यांस नि:संदिग्ध शब्दांत ठणकावते आणि तिकडे राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालय सरकारच्या विश्वासार्हतेची अब्रू चव्हाट्यावर आणते. या दोन घटना सद्य:स्थितीचा आरसा ठरतात. सर्वोच्च न्यायालयातील मुद्दा वेदांत ही भारतीय आणि रव्वा ऑइल ही सिंगापूरमध्ये स्थापन झालेली कंपनी या दोन कंपन्या आणि भारत सरकार यातील मतभेदांचा आहे. तसाच तो त्या मतभेदांवर निघालेल्या न्यायालयीन तोडग्याकडे सरकार कसे दुर्लक्ष करत आले त्याचाही आहे. याचा परिणाम असा की गेली तब्बल २६ वर्षे हे प्रकरण सरकारच्या आडमुठेपणामुळे निकालात निघू शकलेले नाही. ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आले असता न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनमोहन यांनी सरकारला वरील शब्दांत खडसावले. यात भारताच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा प्रश्न असल्याने हे प्रकरण समजून घ्यायला हवे.
झाले असे की केंद्र सरकारने १९९४ सालच्या ऑक्टोबरात कृष्णा-गोदावरी खोर्यातील रव्वा येथे खनिज तेल क्षेत्र विकसित करण्यासाठी वर उल्लेखलेल्या कंपनी समूहाशी करार केला. हा करार तर झाला; पण त्यानुसार हाती लागलेल्या ऊर्जा स्रोतांच्या विक्रीतून नफा झाल्यास तो कसा वितरित करावयाचा याबाबत मतभेद झाले. त्यास सिंगापूर-स्थित कंपनीने मलेशियातील लवादासमोर आव्हान दिले. तशी तरतूद मूळ करारात होती आणि गुंतवणूकदार कंपनी सिंगापुरातील असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर दाद मागितली जाणे अनपेक्षित नव्हते. त्यावर २००४ सालच्या ऑक्टोबरात मलेशियन लवादाने अंतरिम निकाल दिला आणि त्यानंतर १२ वर्षांनी २०१६ साली ऑक्टोबरात अंतिम निकाल देऊन हे प्रकरण निकाली काढले गेले. केंद्र सरकारने या वादात सदर सिंगापुरी कंपनीकडून ९.९ कोटी डॉलरची नुकसानभरपाई मागितली होती. ती या लवादाने फेटाळली. त्यास मलेशियाच्या उच्च न्यायालयातही आव्हान दिले गेले. तेही त्या न्यायालयाने फेटाळले. उभयतांनी या कंपन्या भारताच्या ‘तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळा’स काहीही अधिक देणे लागत नाहीत, असा निवाडा दिला. त्यास केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानेही केंद्राची मागणी धुडकावून लावली. दिल्ली उच्च न्यायालयात सरकारने भलताच दावा केला. लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत संपुष्टात आल्याचे कारण सरकारने पुढे केले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्या. जसमित सिंग यांनी सरकारचा हा दावाही अमान्य केला. दरम्यान, २०१४ साली केंद्राने रव्वा ऑइल कंपनीकडे ६.४० कोटी डॉलर आणि त्यांची भागीदार कंपनी असलेल्या ‘वेदांत’कडे ९.९ कोटी डॉलर्स नुकसानभरपाई मागितली. ती अर्थातच अमान्य झाली.
वास्तविक दिल्ली उच्च न्यायालयात फटका खाल्ल्यानंतर तरी केंद्र सरकारने झाले तितके पुरे असे म्हणत प्रकरण सोडून द्यायला हवे होते. पण असे थांबणे केंद्र सरकारला मंजूर नसावे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशास केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्याची काहीही गरज नाही, असा निवाडा त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि तेथे न्या. पारडीवाला आणि न्या. मनमोहन यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘‘उच्च न्यायालयाच्या निकालात कोणतीही त्रुटी नाही. कायद्यांचा अर्थ लावण्याबाबत तर अजिबातच काही चूक नाही’’ असे अत्यंत स्पष्टपणे नमूद करून न्यायमूर्तीद्वयांनी या कंपन्यांची देणी का तुम्ही लांबवत आहात असे सरकारला विचारले. ‘‘अंमलबजावणीच्या वेळेस तुम्ही निवाडा कसे मानत नाही’’, हा न्यायालयाचा सरकारला प्रश्न. तो विचारताना युक्तिवाद करून वेळ काय वाया घालवता, असेही सरकारला न्यायालयाने खडसावले. प्रश्न तेथे संपत नाहीत. भारत सरकारकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा उल्लेख करत न्यायाधीशांनी सरकारच्या धोरणांबाबत प्रश्न उपस्थित केले. ‘‘तुम्ही आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांस आम्ही यंव करू, त्यंव करू असे सांगता आणि प्रत्यक्षात वैकल्पिक लवादाच्या निकालाकडे दुर्लक्ष करता… तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही’’, इतक्या स्वच्छपणे सरकारची कानउघाडणी केली.
आता यानंतर तरी सरकार लवाद आणि न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करते किंवा काय हे दिसेलच. पण जे झाले त्यामुळे सरकारी दफ्तरदिरंगाई आणि आडमुठी नोकरशाही आपल्या विकासाच्या आड कशी येत असते ही बाबही पुन्हा उजेडात येते. सदरहू प्रकरण ३२ वर्षांपासून अनिर्णित आहे. त्यातील पहिल्या लवादाचा निवाडा येऊनही २२ वर्षे सरली. या प्रकरणी लवादाने अंतिम निवाडा दिला त्यासही १० वर्षे उलटून गेली. तरी प्रकरणाचे भिजत घोंगडे तसेच्या तसेच. या पार्श्वभूमीवर मलेशियन लवादाची तत्परता वाखाणण्याजोगी म्हणायची. या लवादासमोर हे प्रकरण २००४ सालच्या ऑगस्ट महिन्यात सादर झाले आणि १२ ऑक्टोबरला तेथे कंत्राटाबद्दलचा अंतरिम निवाडा लागलाही. त्यावरील अपिलावर मलेशियन न्यायालयानेही पाच वर्षांत अंतिम निर्णय दिला. त्यातूनही काही होत नाही असे दिसल्यावर या कंपन्यांनी पुन्हा लवादाचा दरवाजा ठोठावला. त्यासाठी नवीन लवाद स्थापन केला गेला. त्याचा निकाल २०१६ सालच्या ऑक्टोबरात आला. तरीही भारत सरकारने त्याची अंमलबजावणी करणे हे ना ते कारण पुढे करत टाळले. अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून ताजी चपराक खाण्याची वेळ केंद्रावर आली.
पण त्यानंतरही आपले सरकार सुधारेल अशी आशा बाळगण्याचे कारण नाही. देशातीलच काय; पण आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकाल, सार्वभौम हमी इत्यादींस नाकारणे इत्यादींसाठी आपला बदलौकिक आधीपासूनच आहे. एन्रॉन हे त्याचे ढळढळीत उदाहरण. देशांतर्गत राजकारणासाठी एन्रॉन प्रकरणात आपण आपल्याच सार्वभौम हमीचा अपमान केला. नंतर व्होडाफोन प्रकरणात पूर्वलक्ष्यी प्रभावाने कर आकारणी करून आपण आपले आणखी हसे करून घेतले. वास्तविक ते पाप काँग्रेसच्या प्रणब मुखर्जी यांचे. ते विद्यमान सत्ताधीशांनी आपल्या शिरावर घेतले आणि वर मुखर्जींच्या शिरावर ‘भारतरत्न’चा मुकुट चढवला. आता आपल्याच सर्वोच्च न्यायालयाने आपली लाज काढली. आग्रह न सोडण्याच्या तथाकथित बाण्यापायी आपण जगभरात बेभरवशाचे ठरतो आहोत हे शहाणपण सरकारला आता तरी येईल ही आशा.
