‘सीएनएन’मुळे बर्लिनची भिंत पडताना, तिआनमेन चौकात चिनी विद्यार्थी निदर्शने करताना आणि आखातात १९९१ मध्ये युद्ध प्रत्यक्ष घडताना जग थेट त्या क्षणी पाहू शकले.

जगाला दूरचित्रवाणी पडद्यावर अहोरात्र बातम्या दाखविण्याची सुरुवात करणारे टेड टर्नर नुकतेच निवर्तले. ते गेले, तेव्हा सध्याच्या शिरस्त्यानुसार आधी त्याची डिजिटल वृत्तमंचांवर ‘ब्रेकिंग न्यूज’ झाली. त्यांचे म्हणणे होतेच, ‘बातमी थांबता कामा नये. जेव्हा घडेल, तेव्हा आहे तशी ती दिली गेली पाहिजे.’ केबल न्यूज नेटवर्क अर्थात ‘सीएनएन’चा १९८० मध्ये झालेला जन्म याच ब्रीदवाक्याचे फलित.

बातम्यांच्या या दूरचित्रवाणीवरील अहोरात्र खेळाने सुरुवातीला उडवून दिलेली बहार, मौज आज अपरिहार्य दैनंदिनी – खरे तर रात्रंदिनी – झाली आहे. टर्नर यांनी ‘सीएनएन’ सुरू केले, जोडीने आणखी उद्योगांत यश मिळवले, जोखीम पत्करून व्यवसायात अनेक साहसे केली, ते बेफाम वगैरे जगले, ही झाली त्यांची वैयक्तिक माहिती. त्यांची या पलीकडे काही ओळख असेल, तर त्यांनी ‘सीएनएन’ला अहोरात्र बातम्या द्यायला लावून जगाचा बातम्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. म्हणून टर्नर यांचे जाणे ही निव्वळ बातमी नाही, त्या पलीकडेही बरेच आहे.

टर्नर यांचे व्यावसायिक म्हणून सर्वांत महत्त्वाचे अपत्य निर्विवादपणे सीएनएन. या वाहिनीने २४ तास बातम्या दाखवायला सुरुवात करून अमेरिकेतील इतर वृत्तवाहिन्यांनाही तसे करायला भाग पाडले. त्यानंतर मनोरंजन क्षेत्रातही त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारला. विस्तार सुबत्तेला चालना देतोच. पण, ती झाली वैयक्तिक बाब. टर्नर यांनी जे केले, त्यामुळे अमेरिकेला एक वेगळे सांस्कृतिक वळण लागले.

‘सीएनएन’चे अहोरात्र प्रसारण सुरू झाल्यावर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने त्यावर परिक्षण लिहिले होते. त्याचे शेवटचे वाक्य होते, ‘सीएनएन पाहिले जाते, ते काही त्यावर अप्रतिम प्रतिमा वगैरे दिसतात म्हणून नाही. एखादे श्वान त्याच्या मागच्या पायांवर चालताना दिसण्याइतकेच ते समोरचे ओंगळ दिसते, पण तरी ते श्वान तसे करू शकते, या अचंब्यात तुम्ही रमता, एवढे मात्र खरे.’ प्रेक्षकाला बातम्यांच्या जगात अहोरात्र रमविण्याचा, गुंगवण्याचा हा खेळ जगाच्या इतिहासातील महत्त्वाचाच क्षण होता.

टर्नर या कल्पनेपर्यंत कसे पोचले, त्याचा प्रवासही रंजक. टेड यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९३८ चा, सिनसिनाटीतला. त्यांचे वडील कामानिमित्त सहकुटुंब दक्षिणेकडे, जॉर्जियाला स्थलांतरित झाले. तेथे त्यांनी फलकांवरील जागा जाहिरातींना विकणारी कंपनी सुरू केली. टेड यांना वडिलांबद्दल प्रचंड आदर. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी टेड धडपडायचे. त्यांच्या वडिलांनी १९६३ मध्ये आत्महत्या केली, त्या वेळी २४ वर्षांच्या टेड यांना बसलेला मानसिक धक्का मोठा होता तो त्यामुळेच.

‘टाइम’ला दिलेल्या मुलाखतीत टर्नर म्हणाले होते, ‘एखाद्या कामात मी यशस्वी झालो वा नाही, हे ठरविण्यासाठी मी वडिलांच्या निर्णयावर इतका अवलंबून होतो, की त्यांच्या मृत्यूनंतर मी एकटा पडलो. त्याच्याच काही काळ आधी माझी धाकटी बहीण गेली. माझा सर्व धार्मिक श्रद्धांवरील विश्वास उडाला. पण, यातूनच मग मला बळ मिळाले, व्यवसायात प्रचंड यश मिळवण्याचे.’

टर्नर यांनी वडिलांची कंपनी चालूच ठेवून आधी नभोवाणी केंद्रे आणि मग १९७० मध्ये अटलांटा दूरचित्रवाणी स्थानक खरेदी केले. याचे नाव ठेवले डब्ल्यूटीसीजी. टर्नर कम्युनिकेशन्स समूहाची वाहिनी. नव्या वाहिनीची जाहिरात आपल्या ताब्यातील जाहिरात फलकांवर करता येईल, अशी कल्पनाही त्यांनी राबवली. पण, फारसे कार्यक्रम नसल्याने आणि जाहिरातींतून पैसा मिळत नसल्याने ही वाहिनी तोटा करत राहिली. १९७६ मध्ये ‘अटलांटा ब्रेव्ह्स’ हा त्या वेळी बेसबॉलमध्ये फारसा पराक्रम न गाजविलेला संघ विकत घेऊन टर्नर आणखी कर्जात बुडाले. पण, हा जुगार अयशस्वी ठरला नाही. टर्नर यांनी त्यांच्या वाहिनीवरून त्यांच्या संघाचे वर्षभरातील सर्वच्या सर्व १६२ सामने दाखवले आणि प्रेक्षकांनी ते पाहीले.

जाहिराती आल्या, रोकडतरलता सुधारली. पण, मिळालेल्या पैशांतून असलेले कर्ज फेडतील, ते टर्नर कसले! त्यांनी आणखी कर्ज घेतले आणि त्यांचा दूरचित्रवाणी वाहिनीचा व्यवसाय उपग्रह प्रक्षेपणाद्वारा विस्तारला. त्याला मदत झाली देशभरातील केबल जाळ्याची. आणि, टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टीमचा (टीबीएस) जन्म झाला. खेळाबरोबरच ती चित्रपटांचेही प्रसारण करू लागली. रांगत्या वयात असलेल्या अमेरिकेतील केबल उद्योगाला जाळे विस्तारण्यासाठी ग्राहक जोडणे आवश्यक असताना, त्यांना टर्नर यांच्या दूरचित्रवाणी स्थानकाने कार्यक्रम प्रसारणाची बाळगुटी दिली.

टर्नर यांच्या व्यावसायिक प्रवासाला त्यांच्या याटिंगवरील प्रेमाचे आणि साहसाचेही पदर आहेत. कर्जाच्या गर्तेत खोलवर बुडालेले टर्नर महिनोन् महिने नौकानयनात घालवत, याटिंग स्पर्धांत सहभागी होऊन बक्षिसेही मिळवत. १९७० आणि १९७३ मध्ये त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘याटमन ऑफ द इयर’ किताब मिळवला. १९७९ मध्ये आयरिश समुद्रात झालेल्या शर्यतीत खराब हवामानामुळे अनेक स्पर्धकांच्या नौका मोडल्या, काहींना प्राण गमवावे लागले.

टर्नर या स्पर्धेत विजेते ठरले. जिंकल्यावर म्हणाले, ‘खवळलेल्या समुद्रात स्पर्धा करणे हाच तर हा खेळ आहे. तुम्ही तरून जाणे महत्त्वाचे.’ नौकानायक म्हणून मिळविलेली सर्व प्रसिद्धी त्यांनी पणाला लावली आणि पुढच्याच वर्षी ‘सीएनएन’चा जन्म झाला. पारंपरिक वृत्तवाहिन्यांची मुख्यालये न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्ये असताना, अहोरात्र बातम्या दाखविणार्या ‘सीएनएन’ने दूर अटलांटात पाय रोवले. दर अर्ध्या तासाने नवी, ताजी घडामोड सांगणार्‍या ‘सीएनएन हेडलाइन्स न्यूज’चा जन्म पुढच्या दोनच वर्षांतला. त्यानंतर ‘सीएनएन इंटरनॅशनल’.

१९८५ मध्ये त्यांनी एमजीएम स्टुडिओचा चित्रपटांचा संग्रह खरेदी करून टर्नर क्लासिक मूव्हीज सुरू केले, तर कार्टून नेटवर्क १९९६ मध्ये जन्मले. त्याच वर्षी टर्नर ब्रॉडकास्टिंग सिस्टीम टाइम वॉर्नर कंपनीत विलीन झाली. २००१ मध्ये टाइम वॉर्नर आणि एओएल या ऑनलाइन मंचाचे विलीनीकरण झाले. या हा‍तमिळवणीनंतर टर्नर यांनी स्थापन केलेल्या ‘सीएनएन’चे रूपडे पालटले आणि मग टर्नरही तेथे फार काळ रमले नाहीत.

टर्नर यांचे वैयक्तिक आयुष्य वादळी होते. तीन विवाह, त्यातील तिसरा ऑस्करविजेती अभिनेत्री जेन फोंडाशी. दारूचे व्यसन, बेफाम वर्तन, विवाहात असूनही बाहेर अनैतिक संबंध असे जवळपास उच्छृंखल आयुष्य. राजकीय भूमिकाही अनेकदा वादग्रस्त. एकीकडे रिपब्लिकन पक्ष आणि उजव्या विचारसरणीच्या व्यक्तींबरोबर सलोखा, तर दुसरीकडे क्युबाचे सर्वेसर्वा फिडेल कॅस्ट्रोंशी घरोबा आणि कम्युनिस्ट चिनी राजवटीचे समर्थन.

असे असले, तरी त्यांचे जनसंज्ञापन इतिहासातील सर्वांत प्रभावी व्यक्ती म्हणून असलेले मोल कमी नाही. अगदी त्यांचे हाडवैरी रूपर्ट मर्डोक यांनीही ते मान्य केलेले. या सगळ्या बेलगाम वाटेल अशा वृत्तीची दुसरी मानवी बाजू म्हणजे टर्नर यांनी संयुक्त राष्ट्रांना दिलेली अब्जावधी डॉलर्सची देणगी आणि पर्यावरण रक्षणासाठी केलेले काम. लाखो एकर रान, मळे विकत घेऊन ती जमीन निसर्ग संवर्धनासाठी देऊन टाकायची दानत ते राखून होते.

मेंदूच्या विकाराने आजारी असल्याचे आठ वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:च जाहीर केले होते. हळूहळू बळावत जाणार्‍या लुवी बॉडी डिमेन्शियाने ते त्रस्त होते. ते गेले, तेव्हा श्रद्धांजली वाहताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘विरोधा’तील ‘सीएनएन’वरील रोष व्यक्त करण्यासाठी मिठाचा खडा टाकण्याची संधी सोडली नाही.

श्रद्धांजली व्यक्त करून, त्यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’वर टिप्पणी केली, ‘सीएनएनच्या नव्या मालकांनी टर्नर यांच्या अपत्याला नामशेष करण्याचे काम केले. नवे ग्राहक आधीचे वैभव आणि विश्वासार्हता परत आणतील, ही आशा.’ यावर टीका झालीच आणि त्याची बातमीही; तीही लगेच! ‘बातमी तेव्हाच मिळायला हवी, जेव्हा ती घडेल. कुणा प्रसारणकर्त्याच्या सोयीने नव्हे,’ या टर्नर यांच्या अहोरात्र बातम्या दाखविण्यामागच्या तत्त्वज्ञानाला हे साजेसेच.

‘सीएनएन’मुळे बर्लिनची भिंत पडताना, तिआनमेन चौकात चिनी विद्यार्थी निदर्शने करताना आणि आखातात १९९१ मध्ये युद्ध प्रत्यक्ष घडताना जग थेट, त्या क्षणी पाहू शकले. टर्नर यांनी स्वत: तर इतिहास घडवलाच, पण जोडीने असे इतिहासाचे साक्षीदारही घडवले. एके काळी जगात काय चालले आहे ते समजण्यासाठी सकाळच्या वर्तमानपत्राची वाट बघणार्या माणसाला जगाच्या कानाकोपर्यात कुठेही खुट्ट झाले तरी क्षणार्धात समजण्याच्या ‘टर्निंग पॉइंट’वर घेऊन जाणार्‍या टेड टर्नर यांना ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे आदरांजली.