समाज म्हणून आपण प्रत्येकाने नियमबाह्य वर्तन करायचे वा पळवाटा शोधायच्या; मग असलेले नियम पाळायला लावणारा कोणी अधिकारी आला की टाळ्या वाजवायच्या…

प्रबुद्ध, नियमाधारित व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा समाज होण्यापासून आपण किती योजने दूर आहोत याचे तुकाराम मुंढे हे प्रतीक. मुंढे तूर्त ‘अन्न औषध प्रशासन’ (एफडीए) या खात्याचे प्रमुख आहेत. कोणतेही पद मिळाले की हाती वॉशिंग्टनची कुर्‍हाड आल्यासारखे त्यांचे वर्तन असते आणि ते हाती आलेल्या अधिकाराची तलवार सपासप चालवत राहतात. त्यांच्या या कृत्यास टाळ्या पडतात. नियमाधारित व्यवस्था कशी असते याचा अनुभव नसलेला समाज मुंढे यांच्यासारख्या अधिकार्‍यांच्या कृतीने अधिकच बेफाम होतो. कारण आपल्या मूलत: निष्क्रिय, निस्तेज आणि निवांत समाजाला एखादा नायक हवा असतो. हा समाजास हवा असलेला नायक पुरवण्याची जबाबदारी आपल्याकडे आहे असा मुंढे यांचा समज आहे आणि त्यातून बाहेर येण्याची क्षमता नसल्याने ते असे समाजास हवे असलेले नायकत्व प्रत्येक पदावर पुरवत राहतात. आताही मुंबईतील अनेक हॉटेले, आस्थापना, खासगी क्लब इत्यादींवर ते कारवाईचा बडगा उचलत सुटले आहेत. लवकरच त्यांचे लक्ष औषध/रसायन कंपन्यांकडे जाईल. या पदावरील त्यांच्या वरिष्ठांसाठी पुरेशी डोकेदुखी ते निर्माण करत नाहीत तोपर्यंत त्यांस या पदावर ठेवले जाईल. मग बदली. काही काळ पदाविना घरी बसणे. मग नवे पद आणि नव्या कारवाया. नागरिकांचा पुन्हा त्यांच्या पाठिंब्याचा चीत्कार. म्हणजे हाच खेळ पुन्हा उद्या. यातून समाज म्हणून, एक व्यवस्था म्हणून आपण पुढे जातो का?

‘नाही’ असे या प्रश्नाचे ठाम उत्तर. असलेल्या नियमांची अंमलबजावणी कशी करायची हे दाखवून देणारे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांच्यापासून ते गो. रा. खैरनार यांच्यासारखे प्रसिद्धिलोलुप उथळ अधिकारी अशा अनेकांचे दाखले या संदर्भात देता येतील. या व्यक्ती त्या त्या पदावरून दूर झाल्यानंतर त्या त्या पदांचे काय भजे झाले हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याच वेळी राजकीय पटलावर महात्मा गांधी, स्वातंत्र्यानंतर जयप्रकाश नारायण ते अण्णा हजारे अशा अनेकांनी समाजाचे नेतृत्व केले. महात्मा गांधींच्या या देशात नंतर किती मूल्याधिष्ठित राजकारण झाले? गांधींच्याच भूमीत हिंसाचाराचा नंगा नाच या देशाने पाहिला. जयप्रकाशांचे वर्णन तर त्याकाळी ‘अंधेरे में एक प्रकाश’ असे केले गेले. आयुष्यभर अहिंसेची भलामण करणार्‍या गांधींच्या भूमीत रक्ताचे पाट वाहिले आणि जयप्रकाश यांच्यानंतर तर त्यांच्या अनुयायांनी अंधारच प्रसवला. हे दाखले या संदर्भात लक्षात घ्यावयाचे याचे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे या देशवासीयांच्या रक्तात मुरलेला व्यक्तिपूजेचा दोष. वस्तुत: हिंदू तत्त्वज्ञान हे व्यक्तीकडून समष्टीकडे जाण्याची गरज व्यक्त करते. मार्ग दाखवते. पण त्या धर्माचा अभिमान बाळगणारे व्यक्तिपूजेचा रक्तदोष हजारो वर्षांनंतरही दूर करू शकलेले नाहीत. या आजाराचे गंभीर लक्षण म्हणजे समाजास सतत कोणी ना कोणी नायक हवा असणे. मग तो क्रिकेटसारखा सांघिक खेळ असो वा राजकारण, समाजकारण असो. कोणीतरी पूजनीय हवा. त्याच्या पायावर डोके ठेवले, चार फुले वा गंधाक्षता वाहिल्या की आपण रिकामे हवे ते करण्यास, ही मनोवृत्ती. बाबा-बापूंचे प्रस्थ अशा समाजात वाढते तेही यामुळेच आणि फुटबॉलसारख्या सांघिक खेळात भारतीय प्रगती करूच शकत नाहीत, तेही याचमुळे. एका नायकाच्या खांद्यावर माना टाकल्या की आपले काम झाले! आम्ही नियमांस बगल देण्यास तयार.

मुंढे यांच्या संदर्भात हेच होताना दिसते. वास्तविक ज्या कारवायांसाठी मुंढे यांस मूर्ख समाजाकडून डोक्यावर घेतले जात आहे ते फक्त व्यावसायिकांचेच नव्हे; तर सर्वांचेच कर्तव्य नाही काय? आपण जेथे काम करतो तो परिसर स्वच्छ असावा, खाद्यपदार्थांत भेसळ नसावी, मुदत संपलेले घटक वापरले जाऊ नयेत, इतरांच्या जिवास अपाय होईल असे कोणतेही कृत्य कोणीही करू नये इत्यादी इत्यादी नियमांच्या आग्रहात मुंढे यांनी दिवे लावावेत असे काय आहे? कोणत्याही शहाण्या घरात आणि अशा शहाण्या घरातील शहाण्या व्यक्तींकडून हे नियम पाळले जातातच. या किमान नियमांच्या अंमलबजावणीसाठी ‘अन्न-औषध प्रशासन’ आयुक्ताचे लक्ष कशासाठी हवे? पण या अशा किमान सभ्य नियमांच्या अंमलबजावणीसाठीही तो आपणास लागतो याचे कारण उठता-बसता ‘जय अमुक-तमुक’ करत आपली धार्मिकता दाखवणार्‍यांस सार्वजनिक ठिकाणी पान-मसाल्याच्या पिचकार्‍या मारण्याची शरम वाटत नाही; म्हणून. घरातील स्वच्छतेचे नियम बाहेर पाळावयाचे नसतात असा संदेश देणारे आपले वर्तन असते म्हणून. आपल्या मुला/ मुलीस शाळेत सोडायला जाणार्‍या बाप वा आई यांस उलट्या दिशेने वाहन दामटण्याची शरमच वाटत नाही म्हणून. आणि देवदर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून अधिक पैसे मोजण्याची वा ‘व्हीआयपी पास’साठी कोणास गळ घालण्याची लाजच आपल्यातील अनेकांस वाटत नाही म्हणूनही. समाज म्हणून आपण प्रत्येकाने नियमबाह्य वर्तन करायचे. नियमांस बगल कशी देता येईल याच्या चोरवाटा शोधायच्या. जमल्यास, शक्य असल्यास स्वत:ही ‘वरची’ कमाई करायची. आणि तरीही असलेले नियम पाळायला हवेत यासाठी सक्ती करणारा कोणी अधिकारी आला की टाळ्या वाजवून त्यास पाठिंबा द्यायचा. असा समाज कधीही प्रगती करूच शकत नाही. अशा समाजात मुंढे लोकप्रिय होतात. त्यांचा गंड सुखावतो. आपण बरेच काही केल्याचे त्यांस समाधान वाटते. कसे एकेकास सुतासारखे सरळ केले, हे मिरवता येते. पण व्यवस्थात्मक रचना, सुधारणा यांपेक्षा स्वत:स मोठ्या मानणार्‍या व्यक्ती त्या समाजाचे चिरकाल भले कधीही करू शकत नाहीत.

ही मर्यादा मुंढे यांची नाही. ती आपल्या सामाजिक व्यवस्थेची आहे. मुळात सामाजिक व्यवस्थाच अशी निरुपयोगी असल्याने मुंढे यांच्यासारख्या अधिकार्‍यांचे फावते. याचा अर्थ ते जे करत आहेत ते चूक आहे असा कदापिही नाही. ते व्हायलाच हवे. पण ते होण्यासाठी मुंढे वा अन्य कोणाही अधिकार्‍यांच्या असण्याची गरजच नाही. तरी आपणास ती गरज लागते. कारण प्रत्येकाच्या किमान कर्तव्यास आपण काही मोजक्यांच्या ठायी असेल असा विशेष गुण मानू लागलो आहोत. आपली भाषा आणि कृती पाहा. एखाद्या राजकारण्याचे वर्णन ‘सभ्य’ असे करणे, अपघाताविना बस चालवली म्हणून चालकाचा सत्कार करणे वा न्यायाधीशाचे कौतुक त्याच्या नि:स्पृहतेसाठी करणे इत्यादी. सभ्य असणे हे प्रत्येक व्यक्तीचे, अपघाताविना बस चालवणे हे प्रत्येक चालकाचे वा नि:स्पृह असणे हे प्रत्येक न्यायाधीशाचे किमान कर्तव्य असते याचे भान समाज म्हणून आपण हरवून बसलेले आहोत.

आणि त्यामुळे अशी समाजव्यवस्था निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे, हे आपले किमान कर्तव्य आहे हे सरकारही विसरून गेले आहे. नागरिकांनाच त्याची गरज वाटत नसेल तर असा समाज निर्मितीचा प्रयत्न करून सरकार स्वत:च्या पायावर कशास धोंडा पाडून घेईल? अशा समाजात एखादा शेषन, एखादा अशोक लवासा आणि हास्यास्पदतेच्या पातळीवरचे खैरनार वा मुंढे पैदा होत राहतील इतके औदार्य सरकार दाखवते. तसे झाल्यावर समाजासाठी आपण काही केल्याचे वाटून हे सर्व खूश होतात आणि नायक मिळाला म्हणून समाजही आनंदाने नाचूगाऊ लागतो. नंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या आहेच. हा मुंढे-मार्ग समाजानेच शोधलेला असल्याने त्याच्या मर्यादा समाजाला लक्षात येणार नाहीत तोपर्यंत या मनोरंजनावर(च) आपण समाधान मानून घ्यायचे, इतकेच.