अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षास केवळ रोखणे नव्हे; तर त्यांचा दारुण पराभव होणे ही काळाची गरज होती. अमेरिकी नागरिकांनी ती अपेक्षेपेक्षाही अधिक पूर्ण केली. याबद्दल जगातील सारे लोकशाही प्रेमी त्या देशातील मतदारांचे मन:पूर्वक आभार मानतील. निवडणुकीत कोणी जिंकतो, कोणी हरतो… जय-पराजय हा नैमित्तिक असतो आणि त्याकडे ‘आज वर; उद्या खाली’ इतक्या सहजपणे पाहता येते. असे असले तरी काहींचे विजय हे व्यवस्थेस सडवून टाकणारे असतात. गेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन ट्रम्प यांचा विजय हा डेमोक्रॅटिक कमला हॅरिस यांच्या पराजयापेक्षा अधिक धोकादायक होता. या धोक्याची जाणीव अमेरिकी नागरिकांस फक्त दोन वर्षांत झाली. ट्रम्प यांस निवडून देऊन आपण काय करून बसलो हे त्या देशातील सुजाण मतदारांस लगेच उमगले आणि आपल्या चुकांची दुरुस्ती त्यांनी मध्यावधी निवडणुकांत तातडीने केली. इतकी की अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या दोन्ही सदनात ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची पार वाताहत झाली. दोन्ही सदनात डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत झाल्याने ट्रम्प यांस आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीची उर्वरित दोन वर्षे ‘लंगडे बदक’ (लेम डक) बनून व्यतीत करावी लागतील. अर्थात हा गृहस्थ स्वस्थ बसणारा नाही. पण तरीही त्याच्या नाकात अमेरिकी मतदारांनी चांगली जाडजूड वेसण घातली हे नक्की. या निवडणुकीत विजयासाठी ट्रम्प यांनी काय नाही केले, तितकेच मतदारांनी काय केले हेही महत्त्वाचे. ट्रम्प यांचे प्रत्येक प्रौढ अमेरिकी मतदाराला पाच हजार डॉलर्सचे (सुमारे ४.५ लाख रु.) आमिष मतदारांनी नाकारले. ट्रम्प यांचे ‘लाडके भाऊ/बहीण’ होणे मतदारांनी अमान्य केले. मतचोरी होऊ दिली नाही. निवडक मतदारांस वगळण्याचा प्रयत्न त्यांनी हाणून पाडला, इस्लामचे दैत्यीकरण अव्हेरले आणि सरतेशेवटी ट्रम्प यांच्या देशप्रेमाच्या आवाहनास केराची टोपली दाखवली. त्यातील लटकेपण त्यांनी ओळखले आणि चौखूर उधळणार्‍या ट्रम्प यांचा वारू ठाणबंद करण्याची हिंमत, पोक्तपणा आणि लोकशाहीशी प्रामाणिकपणा दाखवून दिला. आणि हे सर्व त्यांचा देश ‘लोकशाहीची जननी’ नसताना. म्हणून त्याचे आगळे महत्त्व. ते लक्षात घेऊन या निकालाने आपल्या आणि अर्थातच जगाच्याही पुढे काय वाढून ठेवले आहे याचा आढावा घ्यायला हवा. प्रथम जगाविषयी. पण त्याआधी या निवडणूक निकालाचे माहात्म्य लक्षात यावे म्हणून काही तपशील.

टेक्सास हे रिपब्लिकनांचे गंडस्थळ. भारतात गुजरात राज्यात भाजपचे जे स्थान ते टेक्सासमध्ये रिपब्लिकनांचे. त्या राज्यात डेमोक्रॅटिक पक्षाचा १९८८ नंतर कधीही विजय झालेला नाही. तो यावेळी झाला. नंतर कन्सास येथे डेमोक्रॅट्स १९३९ नंतर यावेळी पहिल्यांदा जिंकले. साऊथ कॅरोलायनात रिपब्लिकन्स १९९८ नंतर पहिल्यांदा पराभूत झाले. मेन या ठिकाणी डेमोक्रॅट्सनी यावेळी पहिल्यांदा १९८८ नंतर विजय पाहिला. आयोवात असे गेल्या १८ वर्षांत पहिल्यांदा घडले. डॉ. अब्दुल सईद या डेमोक्रॅट उमेदवारास ट्रम्प यांनी त्याच्या धर्मामुळे ‘जिहादी’ ठरवले होते. मिशिगनमधून हे सईद निवडून आले. याच मिशिगनमधील डेमोक्रॅट नेत्यांस मतदानाच्या पूर्वसंध्येस फितवण्यात रिपब्लिकनांना यश आले होते. या पळवलेल्या डेमोक्रॅट नेत्याने स्वपक्षीय सईद यांच्या विरोधात रिपब्लिकन उमेदवारास पाठिंबा जाहीर केला. हे धक्कादायक होते. पण तरीही मतदारांनी डॉ. सईद यांची साथ सोडली नाही. ट्रम्प आणि रिपब्लिकनांच्या नाकावर टिच्चून त्यांना मिशिगनवासीयांनी निवडून दिले. ओहायोतील डेमोक्रॅट ॲमी ॲक्टन यांनी रिपब्लिकन विवेक रामस्वामी यांचा दणदणीत पराभव केला. हे उत्तम झाले. याचे कारण भारतीय वंशाच्या या रामस्वामीने सर्व विवेकास रजा देऊन प्रतिस्पर्धी ॲमी यांच्या बालपणातील काही घटनांविषयी अश्लाघ्य उद्गार काढून राजकीय स्पर्धा हीन पातळीवर नेऊन ठेवली होती. त्याचा त्यांना फटका बसणार हे उघड झाल्यावर मतदानाच्या आदल्या दिवशी अध्यक्ष ट्रम्प यांनी हा विवेक रामस्वामी किती महान इसम आहे ते सांगून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करून पाहिला. मतदारांनी रामस्वामी यांच्याबरोबर ट्रम्प यांनाही त्यांची जागा दाखवून दिली. दुसर्‍या ऐतिहासिक घटनेत डेमोक्रॅटिक पक्षाचे हकीम जेफ्री हे अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे सभापती होतील असे दिसते. तसे झाल्यास अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय व्यक्तीकडे हे पद जाईल. यावरून रिपब्लिकनांचा पराभव किती दारुण आहे हे अधोरेखित होते. ते केल्यानंतर आता या पराभवामुळे काय होऊ शकते त्या संभावनांचा वेध.
या निकालाची सर्वाधिक झळ बसेल ते इस्रायलचे नरसंहारी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना. ट्रम्प आणि त्यांचा ‘दशमग्रही’ जामात जेरेड कुशनेर या उभयतांनी पश्चिम आशियाच्या राजकारणाचा पार विचका करून टाकलेला आहे. स्वत:च्या आर्थिक लाभांसाठी या उभयतांनी नरसंहारी नेतान्याहू यांस मोकळे रान दिले. त्यामुळे जवळपास ७५ हजारांचे शिरकाण झाले. तरीही नेतान्याहू यांस रोखावे असे काही ट्रम्प यांस वाटले नाही. हे उभयता इतके निर्ढावलेले की आताच्या इस्रायली निवडणुकीत ट्रम्प यांनी नरसंहारी नेतान्याहू या आंतरराष्ट्रीय युद्ध गुन्हेगाराला पाठिंबा जाहीर केला. हे सगळे निवडणुकीत अंगाशी येईल याची जाणीव अमेरिकी अध्यक्षांस मतदानाच्या दिवशी झाली. त्यामुळे मतदान सुरू असताना अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलची आर्थिक रसद थांबवण्याची घोषणा केली. पण मतदारांवर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. इस्रायलवादी रिपब्लिकनांस अमेरिकी मतदारांनी शिकवायचा तो धडा शिकवला. आगामी काळात अमेरिकेस आपला इस्रायल प्रेमाचा हात आखडता घ्यावा लागेल. त्याचवेळीस अमेरिकेच्या एकूण परराष्ट्र संबंधांवर या निवडणूक निकालाचा ठोस परिणाम होईल. ट्रम्प यांच्या काळात त्यांचे आणि अर्थातच जामात कुशनेर यांचे वैयक्तिक हितसंबंध म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र धोरण असे समीकरण तयार झाले. यातूनच सौदी अरेबियाचा बेमुर्वतखोर राजपुत्र मोहम्मद बिन सलमान (एमबीएस) यास वाटेल ते करण्याची मुभा दिली गेली. डेमोक्रॅट्सच्या विजयामुळे त्याच्या ‘स्वातंत्र्या’वर निश्चित गदा येईल. त्याचबरोबर डेमोक्रॅट्स विजयाचा दुष्परिणाम रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही सहन करावा लागेल. डेमोक्रॅट्स हे युक्रेनच्या झेलेंस्की यांचे समर्थक आहेत. तिसरी बाब इराण युद्धाबाबत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या बराक हुसेन ओबामा यांनी इराणशी करार करून त्यास मुख्य आंतरराष्ट्रीय प्रवाहात आणले. जे जे डेमोक्रॅटिक ते ते त्याज्य मानणार्‍या ट्रम्प यांनी हा करार रद्द केला आणि पुन्हा इराणला दूर लोटले. डेमोक्रॅट्सचा विजय अमेरिकेस त्या देशाशी असलेल्या संबंधांचा नव्याने विचार करावयास भाग पाडेल. महत्त्वाचा फरक पडेल तो ट्रम्प यांच्या आयातशुल्क मनमानीस. ट्रम्प यांनी आयातशुल्काचा मुद्दा एखाद्या अस्त्रासारखा वापरला. ते आता तितके सहज करता येणार नाही.

आपल्याबाबत अमेरिकेच्या या निकालाची समाधानाची बाब हीच असेल. ट्रम्प यांना आवर घालणे आपल्यासाठी गरजेचे होते. त्यांनी आपल्या नाकी नऊ आणले होते. त्यामुळे आपल्या सरकारी पातळीवरही डेमोक्रॅट विजयाचे निदान या मुद्द्यापुरते तरी समाधान असेल. असे म्हणायचे कारण या विजयामुळे भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार लांबण्याची शक्यता आहे. दोन्ही सदनात डेमोक्रॅट्स विजयी झाल्याने त्यांच्याकडून या कराराच्या फेरआखणीची मागणी होऊ शकते.

त्यापेक्षाही आपली काळजी वाढवणारी बाब असेल ती ट्रम्प यांच्या काळातील सर्व ‘भ्रष्टाचारां’ची चौकशी करण्याचा विजयी डेमोक्रॅट्सचा मानस. तो पूर्णत्वास गेल्यास ट्रम्प यांच्या काळात भारतीय ‘अ’द्योगपतीच्या व्यवहारांकडे करण्यात आलेला काणाडोळा हा फेरचौकशीचा मुद्दा ठरू शकेल. अमेरिकी न्यायालयानेही ट्रम्प सरकारच्या या व्यवहाराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. ही जखम भरावयाच्या आत डेमोक्रॅट्स विजयी झाले. त्यामुळे ती खपली निघाल्यास या भारत-सरकार-रक्षित ‘अ’द्योगपतीच्या अडचणी वाढू शकतील. अर्थात डेमोक्रॅट्स विजयाने जे चांगले होणार आहे त्या तुलनेत ही बाब अगदी क्षुल्लक.

धार्मिक विद्वेषास स्वधर्मप्रेम, इतरांचा दुस्वास म्हणजे राष्ट्रभक्ती आणि ऋजुता म्हणजे नामर्दपणा मानण्याची प्रथा ट्रम्प यांच्यामुळे तयार झाली. तिचा प्रसार अन्य देशांतही झाला. ट्रम्प-बाधा जगातील अनेकांस झाली. ती झालेले हंगेरीचे व्हिक्टर ओर्बान, ब्राझीलचे बोल्सेनारो, सर्बीयाचे अलेक्झांडर वुचिच यांचा पराभव झाला आणि इस्रायलचे नरसंहारी नेतान्याहू जिंकू शकले नाहीत. आता खुद्द ट्रम्प यांनाच मतदारांनी अस्मान दाखवले. दीपावलीच्या पूर्वसंध्येस ट्रम्प-पतितांचे-ट्रम्पितांचे-तिमीर दूर होत असेल तर त्यातच उद्याच्या उजेडाची आशा दडलेली आहे, असे म्हणता येईल.