रशियाकडून तेल खरेदी करणार्‍या भारतावर १०० टक्के आयात शुल्क लावण्याचा अधिकार ट्रम्प यांना देण्यास या वेळी अमेरिकी लोकप्रतिनिधिगृहांतील रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा तर आहेच; पण विरोधी पक्षीय डेमॉक्रॅट्सदेखील अध्यक्षांच्या पाठीशी आहेत…

आपल्याला लागत असलेला तेलाचा तळतळाट काही कमी होताना दिसत नाही. यात ताजी आणि अत्यंत महत्त्वाची भर अमेरिकेची. जगातील या एकमेव महासत्तेच्या प्रमुखास, म्हणजे आपले जीवश्च मित्र जे की डोनाल्ड ट्रम्प यांस, त्या देशातील सत्ताधारी आणि विरोधी अशा उभय बाजूंनी एका विशेष कायद्यान्वये सर्वाधिकार बहाल केले असून त्याआधारे रशियाकडून तेल खरेदी करणार्‍या देशावर ते १०० टक्के आयात शुल्काचा बडगा उगारू शकतील. रशियास ही शिक्षा करण्यामागे अमेरिकेचा हेतू युक्रेनला मदत करणे हा आहे. जवळपास पाच वर्षे झाली; रशियाने युक्रेनवर युद्ध लादले. त्या युद्धाचा शेवट अजूनही दृष्टिपथात नसल्याने रशियाची अडचण करण्यासाठी हे पाऊल अमेरिकेकडून उचलले जात आहे. अमेरिकेच्या अशा प्रयत्नांची ही पहिलीच खेप नाही. याआधीही ट्रम्प यांनी अनेक देशांस अशा आयात शुल्काने धमकावण्याचा प्रयत्न केला. काहींच्या बाबत तो अमलातही आला. पण त्यात आणि आताच्या निर्णयात फरक आहे. तो असा की ट्रम्प यांना १०० टक्के आयात शुल्क लादण्याचा अधिकार देण्यास या वेळी त्यांच्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा तर आहेच; पण विरोधी पक्षीय डेमॉक्रॅट्सदेखील अध्यक्षांच्या पाठीशी आहेत. या मुद्द्यावर डेमॉक्रॅटिक पक्षात फूट पडली असून त्या पक्षातील ५८ सदस्यांस रशियाविरोधात अशी कारवाई हवी आहे. तथापि प्रश्न फक्त रशियाविरोधातील कारवाई हा आणि इतकाच नाही. त्या कारवाईचा बडगा प्रत्यक्षात रशियास किती आणि अन्य देशांस किती सहन करावा लागणार; हा यातील महत्त्वाचा मुद्दा. या ‘अन्य’ देशांत दोन देश महत्त्वाचे. एक चीन आणि दुसरे आपण. चीन हा रशियन तेलाचा पहिल्या क्रमांकाचा खरेदीदार.

आणि भारत दुसर्‍या. अलीकडच्या एकट्या जून महिन्यात आपण रशियाकडून जवळपास ५५० कोटी युरो इतक्या मूल्याचे तेल खरेदी केले. हे प्रमाण आपल्या एकूण गरजेच्या ३६ टक्के इतके आहे. आपल्यापेक्षा पुढे असलेला चीन जवळपास ५० टक्के खनिज तेल रशियाकडून घेतो. परिणामी या दोनही देशांतील आयातीवर १०० टक्के शुल्क ट्रम्प आता आकारू शकतात. म्हणजे शंभर रुपये किमतीच्या आपल्या निर्यातीवर तितक्याच रकमेचे आयात शुल्क अमेरिका लादू शकेल. त्यामुळे अर्थातच भारतीय उत्पादने अमेरिकेत अतिशय महाग होतील आणि किमतींच्या मुद्द्यावर अन्यदेशीय उत्पादनांपेक्षा ती मागे पडू शकतील. अमेरिकेच्या या संभाव्य कारवाईची पूर्वकल्पना असल्यामुळे किंवा काय, जून महिन्याच्या तुलनेत आपली रशियन तेल खरेदी ऑगस्ट महिन्यात लक्षणीयरीत्या कमी झाली. तेव्हा या ताज्या १०० टक्के आयात शुल्काच्या इशार्‍याचा काहीच परिणाम होणार नाही, असे नाही. सद्य:स्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार व्यवहारांत कमालीची असमानता आहे, असे ट्रम्प मानतात. म्हणजे आपण अमेरिकेकडून जितके काही घेतो त्यापेक्षा अधिक त्या देशास विकतो. आपल्या देशाची उलाढाल आहे ती फक्त ४१०० कोटी (४१ बिलियन) डॉलर्सची. यात सेवा क्षेत्रातील व्यवहार मूल्याची भर घातल्यास या व्यवहारात आणखी इतक्याच रकमेची वाढ होऊन तो ८००० कोटी (८० बिलियन) डॉलर्स इतका होईल. म्हणजे इतक्या रकमेच्या वस्तू आणि सेवा आपण अमेरिकेकडून घेतो. त्या तुलनेत यापेक्षा ६३०० कोटी डॉलर्स अधिक किमतीचा माल वा सेवा आपण अमेरिकेस विकतो. म्हणून ट्रम्प हे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारात ‘समानता’ आणू पाहतात. त्यांच्या या काहीशा हास्यास्पद मुद्द्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुचर्चित, बहुप्रतीक्षित व्यापार करार अद्यापही होऊ शकलेला नाही. गेल्याच आठवड्यात आपल्याकडून या कराराचे सर्व काही ठरले आहे; स्वाक्षर्‍या तेवढ्या राहिल्या आहेत असा आव आणला गेला. या कराराबाबत होणार-होणार, झाला-झाला अशा हाळ्या आपल्याकडून अनेकदा दिल्या गेल्या. त्या आवई ठरल्या. त्यात आता अमेरिकेच्या या १०० टक्के आयात शुल्काच्या पावलाचा खोडा.

त्यावर भारताची प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे, आणि अपेक्षेप्रमाणेही, अत्यंत सावध आहे. ‘‘देशातील १४० कोटी नागरिकांचे हित आमच्यासाठी अधिक महत्त्वाचे’’, अशा अर्थाचे विधान परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकी घडामोडींवर प्रतिक्रिया देताना केले. यात विशेष ते काय? देशातील नागरिकांच्या हिताचा विचार करणे हे आपल्या मायबाप सरकारचे कर्तव्य आहेच. ते सांगण्याची गरज नाही. पण त्या कर्तव्यपूर्तीच्या आड येणार्‍या अमेरिकेचे आपण काय करणार हा यातील खरा प्रश्न आहे. आपले राज्यकर्ते त्या प्रश्नास थेट भिडण्यास तयार नाहीत असे दिसते. किंवा तयार असले तरी ट्रम्प यांच्या हृदयास घरे पडतील असे काही भाष्य करण्यास ते तयार नसावेत. याआधी चीनवर असे १०० टक्के आयात शुल्क लादण्याचा इरादा ट्रम्प यांनी व्यक्त केल्या केल्या चीननेही तोडीस तोड उत्तर देत अमेरिकेवरही तितकेच आयात शुल्क जाहीर केले. आपण असे काही करण्याच्या मन:स्थितीत दिसत नाही. खरे तर ‘‘काय करायचे ते करा… आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार म्हणजे करणार’’, इतक्या स्पष्टपणे भूमिका घेण्यात आपणास कोण आडवे येते कळत नाही. एक सार्वभौम देश या नात्याने आपण कोणाकडून काय खरेदी करावे आणि कोणास काय विकावे हा आपला अधिकार. तो ट्रम्प यांच्या हाती दिला कोणी? तेव्हा स्पष्ट शब्दांत व्यक्त होण्यात भले आपल्या काही अडचणी असतील; पण आपण ट्रम्प म्हणतात म्हणून रशियन तेल खरेदीबाबत हात आखडता घेण्यास अजिबात तयार नाही; ही बाब पुरेशी स्पष्ट केली, ते महत्त्वाचे.

आता मुद्दा ट्रम्प यांनी खरोखरच असे आयात शुल्क आकारण्यास सुरुवात केल्यास त्यास तोंड कसे द्यावयाचे हा. आधीच माहिती तंत्रज्ञान उद्योगांतील कर्मचार्‍यांना ‘व्हिसा’ देण्यास अमेरिकेने हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे. या क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या जोडीदारांसही आतापर्यंत अमेरिकेत सहज वास्तव्य व चाकरी मिळत असे. त्यालाही ट्रम्प यांनी कात्री लावलेली आहे. त्यात आता ही नवी डोकेदुखी. आपली अडचण झाली आहे ती इराण-अमेरिका युद्धामुळे. आपले दुसरे एक जिगरदोस्त इस्रायलचे पंतप्रधान नरसंहारी नेतान्याहू यांनी इराणवर युद्ध लादले आणि त्यास प्रत्युत्तर म्हणून इराणने होर्मुझच्या खाडीची नाकेबंदी केली. म्हणजे आपल्या अडचणीस आपले शत्रू नव्हे; तर मित्र जबाबदार ठरतात. या दोन मित्रांच्या बरोबरीने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हेही आपले मित्र. आपले पहिले मित्र ट्रम्प हे दुसरे मित्र पुतिन यांस धडा शिकवू इच्छितात आणि फटका बसतो तो आपणास. यात आपला दोष अजिबातच नाही. पण हे असे कोणास मित्र वगैरे मानण्यातील पोकळपणा तेवढा त्यातून दिसतो.

तेव्हा आपण रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवावी. कोणा अमेरिकी अध्यक्षाच्या मनात आले आणि त्यास अन्य कोणास शिक्षा करावी असे वाटले तर त्याने तसे खुशाल करावे. पण आपला वापर आपण त्यासाठी होऊ देऊ नये. ‘ठकासी व्हावे ठक। उद्धटासी उद्धट। लौंदासी आणून भिडवावा। दुसरा लौंद।।’, असे समर्थ रामदास म्हणतात. त्याचे स्मरण ठेवावे, हे बरे. अमेरिकेच्या लौंदास भिडू शकेल अशा दुसर्‍या लौंदाचा शोध सुरू ठेवणे मात्र गरजेचे.