सुधारणा सुचवणार्‍याने त्यांच्या पालनाचा आग्रह धरायचा नसतो. शहाणपण कशात ते सांगायचे. समोरच्याने ऐकले तर ऐकले. नाही तर तो आणि त्याचे ‘नशीब’!

हे बापट फार रागावलेले दिसतात. सध्या उभ्या- आणि आडव्याही- महाराष्ट्रात दखल घ्यावी असे एकच एक बापट आहेत. इतिहासात ते सेनापती होते. इतिहासानंतर वर्तमानापर्यंतच्या बेचक्यात या बापटांचा वसंत फुलून त्यांनी कविता-बिविता लिहिल्या. वर्तमानात मात्र ते विद्यानंद बनून मूढ जनांस मार्गदर्शन वगैरे करू पाहतात. बापटांतील हा बदल महाराष्ट्रातील सामाजिक बदलती परिस्थिती दाखवतो. तो होणे अपरिहार्य. सर्वच बदलत असताना सामाजिक परिस्थितीही बदलणारच. हा बदल वर्तमानातील विद्यानंद बापटांनी लक्षात घेतलेला नसावा. तो घेतला असता तर ते असे त्रागा करते ना. जनसामान्यांच्या आरोग्यासाठी, स्वास्थ्यासाठी इतके मूलगामी विचार आपण मांडतो, त्यासाठी बहुमताचा रोष पत्करतो, लोकप्रिय भावभावनांविरोधात जाण्याचा धोका पत्करतो आणि तरीही ज्यांच्यासाठी हे आपण करतो त्यांना काही फिकीर नसावी हे पाहून बापटांच्या हृदयास घरे पडणे साहजिक. त्यामुळेच लोक किती अक्कलशून्य आहेत, सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक लावणार्‍यांचा मेंदू गुडघ्यातच काय, घोट्यातही नसतो इत्यादी शेलकी विशेषणे वाहून त्यांनी आपला सा्त्विवक संताप व्यक्त केला. तसे करण्याची गरज वाटणे नैसर्गिक. बुद्धिदात्या गणेशास ११ दिवस पुजल्यानंतरही काही फरक पडत नाही असे लक्षात आल्यानंतर त्यांचे विसर्जन करताना काही मंडळांनी बापटांची दृकश्राव्य माध्यमांतून जाहीर टिंगल केली. त्यामुळे बापटांस राग आला. या मंडळांवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा त्यामुळे ते देते झाले. अशा अब्रूनुकसानी दाव्यांचा दांडगा अनुभव असल्याने या बापटांस चार शब्द सुनावणे ‘लोकसत्ता’चे कर्तव्यच.

अहो बापट… हे जरा अतिच झाले म्हणायचे. शहाणपणाचा सल्ला देणे आणि तो संबंधितांकडून प्रत्यक्षात येणे या दोन भिन्न बाबी आहेत, हे आधी लक्षात घ्यायला हवे. हा असा सल्ला गंभीर आजारावरील औषधासारखा जीवनावश्यक नसतो. त्यामुळे डॉक्टरांकडून दिल्या जाणार्‍या गोळ्या-औषधांप्रमाणे तो लगेच घेतला जाईल आणि लगोलग गुण दिसेल, असे होण्याची शक्यता नाही. आणि अहो बापट, तुम्ही सल्ला तरी कोणता देताय? आणि कोणास? ज्या पुण्यात पेठापेठांतील नाक्यानाक्यांवर महामहोपाध्याय एका ‘कटिंग’वर ज्ञानाचा रतीब घालत असतात आणि तेथील अरुंद रस्त्यांवर या वाहत्या ज्ञानगंगेमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असतो त्या पुण्यात तुम्ही ‘आवाज कमी करा’ असे सांगताच कसे? तुम्ही पुणेकरांस सल्ला देण्याच्या फंदात पडलात आणि तिथेच उघडे पडलात. तोपर्यंत तुम्हास समस्त महाराष्ट्र पुणेकर मानत होता. तुमचे रूपही पुणेकर म्हणवून घेण्याजोगे. त्यात घारे डोळे. म्हणजे मिसळच्या (कमी तिखट) तर्रीवर तूपच जणू! असे पुणेकर म्हणवून घेण्यासाठी सर्व काही जेथल्या तेथे असताना तुम्ही पुणेकरांस सल्ला दिला आणि पुणेकर नाही हे सिद्ध करून बसलात. न्यूयॉर्कचे महापौर, रशियाचे अध्यक्ष, हार्वर्डचे कुलगुरू, ऑक्सफर्डचे रसायनशास्त्रप्रमुख इत्यादी इत्यादींस अनुक्रमे शहर नियोजन, साम्यवाद का फसला, पीएचडीचे प्रबंधलेखन, बेन्झीन रिंगांचा अमोनिया संयुगांवर होणारा परिणाम वगैरे वगैरे अनेक मुद्द्यांवर पुणेकर सल्ला देतील. मार्गदर्शनही करतील. पण पुणेकर कधीही स्वनगरबांधवांस कसलाही सल्ला देत नाहीत. तसे करणे किती अव्यापारेषु व्यापार हे त्यांस ठावकी असते. पण तुम्हांस ते कळले नाही. पुणेकरांस मार्गदर्शन करायला गेलात आणि स्वत:चे अ-पुणेपण दाखवून बसलात. असो. जे झाले ते झाले. पण त्यातून तुमची शोभा झाली.

…आणि काय हो बापट, पुण्यातील गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका ३०-३० तास चालतात म्हणून नाराजी कसली व्यक्त करता? या मिरवणुकांतील ध्वनिकल्लोळाने कासावीस काय होता? देशाचे भवितव्य वगैरे असलेला तरुण वर्ग या मिरवणुकांत वेळ वाया घालवतो म्हणून अस्वस्थ होताच कसे तुम्ही? या मिरवणुकांत नाचण्यात, बोंबलण्यात वेळ नाही घालवायचा तर मग उद्याच्या या भारतभाग्यविधात्यांनी करायचे तरी काय? आपले कुलदीपक/ दीपिका या मिरवणुकांत मंडळ-चरणी सेवा अर्पण करतात, स्थानिक नगरसेवकादी महानुभाव त्यांना त्यांच्या प्रतिमेच्या वस्त्रप्रावरणांनी (पक्षी: टीशर्ट) सन्मानित करतात हे पाहून त्यांच्या पालकांस काय धन्य धन्य वाटते याची बापट तुम्हास कल्पना नाही. एरवी गावचे (किंवा पेठेतील) उकिरडे फुंकत हिंडणारे आपले कार्टे/ कार्टी या निमित्ताने बर्‍या कपड्यांत काही करत असतील तर त्यांच्या पालकांचा ऊर अभिमानाने दाटून येत असेल. परत; दुसरे बरे आणि स्वत:चे काही दाखवण्यास ‘या ठिकाणी’ नसल्यामुळे ‘त्या ठिकाणी’ विसर्जन मिरवणुका थेट प्रक्षेपित थेट करणार्‍या वृत्तवाहिन्यांमुळे या आपल्या सुपुत्र/ सुपुत्रींचे नृत्यकौशल्य सर्वदूर जात असेल याचाही अभिमान या पालकांस असणार. हे तरुण/ तरुणी आपले बहुमूल्य ३०-४० तास या मिरवणुकांत खर्ची घालतात हेदेखील या बापट आणि अन्य तत्समांस अमान्य. या अशा लांबलेल्या मिरवणुकांमुळे शहरी व्यवस्थेवर म्हणे ताण येतो. बापट… तुम्ही अगदीच ‘हे’ आहात. अहो… हे तरुण/ तरुणी ३०-४० तास रस्त्यांवर असतात हे खरे, शहरी व्यवस्था ताणली जाते हेही खरे. पण अहो नंतर हे तरुण/ तरुणी यापेक्षाही अधिक काळ आराम फर्मावतात; त्यामुळे ते घराबाहेरच पडत नाही आणि पडले असले तर घरी परतत नाहीत, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक-गर्दी कमी होते त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. चंद्राचे चांदणे न पाहता त्यावरील डाग तेवढे पाहायचे हे शोभत नाही तुम्हांस बापट!
तुमच्यामुळे संस्कृतीचा अपमान होतो असे तुमचे टीकाकार म्हणतात. बरोबर आहे त्यांचे. अहो तुम्हास कळत कसे नाही… धर्म, देश, संस्कृती हे अभिमान मिरवणार्‍यांचे ‘लो हँगिंग फ्रूट्स’. म्हणजे बुटक्यांतील बुटक्यांससुद्धा तोडता येतील इतक्या ‘उंची’वर फळे लागतात ती झाडे. बापट तुम्ही बहुश्रुत आहात असे ‘हे जे आहेत’ ते वृत्तनिवेदक म्हणतात. अर्थात वृत्तनिवेदकांच्या प्रमाणपत्रांस किती गांभीर्याने घ्यावे हे तुम्हास कळत असेलच. त्यांनी तुम्हास दिलेल्या प्रमाणपत्रावर विसंबायचे तर आर्थर शोपनहॉअर या जर्मन तत्त्वचिंतकाबद्दल तुम्हास विचारायला हवे. तुम्हास तो माहीत असेलच. ‘‘इतरांस अभिमानाने दाखवावे असे स्वकर्तृत्वाने मिळवलेले ज्याच्या ठायी नसते ती व्यक्ती देशप्रेम इत्यादी मिरवते. कारण ते सगळ्यात स्वस्त असते’’, असे हा शोपनहॉअर म्हणून गेला. तेव्हा या असल्या गोंगाटात, दणदणाटात ‘गर्व से कहो…’ अभिमान बाळगणारे दुसरे काय करू शकणार? तेव्हा दुर्लक्ष करा त्यांच्याकडे बापट.

राहता राहिला मुद्दा अब्रूनुकसानीच्या दाव्याचा. तुमची बदनामी केली म्हणून काही मंडळांवर तुम्ही खटला भरणार आहात म्हणे. खरे की काय? हे खरे असले तर तुमच्या शहाणपणावर उगाच विश्वास ठेवला म्हणायचे! अहो बापट तुमची टिंगल करणारी ध्वनिचित्रफीत काय ती फक्त काही मंडळांनी दाखवली. पण याच पुण्यात साधारण १३५ वर्षांपूर्वी याच पुणेकरांनी गोपाळ गणेश आगरकर यांची त्यांच्या डोळ्यादेखत अंत्ययात्रा काढली होती, हा इतिहास आहे बापट. तुम्हास माहीत असेलच. त्या वेळी गोपाळरावांनी हे कृत्य करणार्‍यांकडे दुर्लक्ष केले. दावा वगैरे ठोकला नाही त्यांच्याविरोधात. गोपाळरावांना माहिती होते इतिहासात आपली नोंद होणार आहे, या प्रतिगाम्यांची नव्हे. तेव्हा तुम्ही या फंदात पडू नका. सुधारणा सुचवणार्‍याने त्यांच्या पालनाचा आग्रह धरायचा नसतो. शहाणपण कशात ते सांगायचे.

समोरच्याने ऐकले तर ऐकले. नाही तर तो आणि त्याचे ‘नशीब’. चांगले बदल बरवे असतात… ते सहज होत नाहीत बापट…!