‘सत्य कवच’ वगैरे असण्याने पक्षाचे भले होत नाही किंवा व्यक्तीचे संरक्षणही. प्रियांका यांना राहुल यांचे कौतुकसोहळे करायचेच असतील, तर ते घरापुरते ठीक..

काँग्रेस पक्षाची दृश्यमानता वाढली असेल/ नसेल, पण राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’मुळे त्यांची स्वत:ची दृश्यमानता वाढली हे निश्चित. त्यांच्या यात्रेने आता शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. कन्याकुमारीपासून इतके सारे अंतर केवळ पायी कापणे हे येरागबाळय़ाचे काम नाही. भौगोलिक, वातावरणीय बदल आदींपासून स्वत:चे आरोग्य राखत हा खंडप्राय देश उभा-आडवा पायी चालून पाहण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची सुरुवातीला रेवडी उडवली गेली. यात्रा सुरू झाल्यावर राहुल यांनी घातलेला टीशर्ट कोणत्या कंपनीचा, किती किमतीचा यावर धुरळा उडवून दिला गेला. तरी बरे तो उडवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांस उंची वस्त्रप्रावरणांचे वावडे नाही. पण तरीही या हास्यास्पद मुद्दय़ांवर चर्चा घडवली गेली. त्याचा काहीही परिणाम न होऊन राहुल चालत राहिल्याने आणि त्यांच्या मागे अथवा बरोबर चालणाऱ्यांची संख्या वाढती राहिल्याने या फिजूल चर्चा थांबवल्या गेल्या. ते इकडे का गेले नाहीत, तिकडेच का गेले इत्यादी मुद्दय़ांवरही चर्वितचर्वण करून झाले. वास्तविक कोणत्या मार्गाने कसे जायचे हा त्या पथिकाचा प्रश्न. इतरांनी त्यास अमुक मार्ग का निवडला नाही, हे विचारण्याचे काहीच कारण नाही. पण तरीही हे सर्व झाले. मिळेल त्या मार्गाने ही यात्रा निष्फळ ठरवण्याचे झालेले प्रयत्न खरे तर हास्यास्पद होते. कारण त्यामुळे उलट त्या यात्रेस अधिक प्रसिद्धी मिळाली. शेवटच्या टप्प्याआधी करोनाचे निमित्त पुढे करून यात्रा विफल करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी करून पाहिला. पण त्यांना स्वपक्षीय नेत्यांनी आवरले असावे. अन्यथा यात्रेस अधिक प्रसिद्धी मिळती. ही यात्रा शेवटच्या टप्प्यासाठी मार्गस्थ होत असताना दिल्लीत राहुल यांच्या हातावर दही-साखर ठेवण्याचा सोहळा झाला. तो ठीक. पण त्यात राहुल यांच्या भगिनी प्रियांका गांधी यांनी जे तारे तोडले त्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते.

nitin gadkari congress marathi news, nagpur lok sabha nitin gadkari latest marathi news
नितीन गडकरी म्हणतात, “ज्यांना अटक होण्यापासून वाचवले तेच आज विरोधात…”
chhagan bujbal
“माझा निर्णय दिल्लीतून ठरला, मात्र…”; नाशिकच्या उमेदवारीबाबत छगन भुजबळांचे विधान
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
anand sharma latter to mallikarjun kharge
“बेरोजगारीसह सामान्यांच्या प्रश्नांवर जात जनगणना हा उपाय नाही”, काँग्रेस नेत्याचा पक्षाला घरचा अहेर

‘‘राहुल यांस सत्याचे कवच आहे. त्यामुळे खुद्द परमेश्वर त्यांस सुरक्षित ठेवेल,’’ अशा अर्थाचे एक बावळट विधान प्रियांका यांनी केले. यातील बावळट हे विशेषण अनेक अर्थानी लागू होते. एक म्हणजे परमेश्वर सत्याचे रक्षण करण्यासाठी एकेका व्यक्तीस सुरक्षित ठेवण्याइतका सक्षम आहे, याचा काही पुरावा नाही. तसा तो असता तर रामायण, महाभारतापासून आजच्या युक्रेन युद्धापर्यंत काही घडले नसते. तेव्हा उगाच काल्पनिक परमेश्वरास कामास लावण्याचे काही कारण नाही. आणि दुसरे असे की जिचे तीर्थरूप आणि आजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेले आहेत त्या व्यक्तीने तरी सत्य कवच वगैरे बकवास करू नये. सत्य, परमेश्वर वगैरे विधाने खरी मानली तर त्याचा अर्थ प्रियांकाताई आपले वडील आणि आजीस अप्रत्यक्षपणे असत्यवादी ठरवतात. आणखी एक मुद्दा असा की सत्य हे रक्षणकर्ते असते, तर गेल्या आठवडय़ात राहुल यांच्या सुरक्षेचा मुद्दा काँग्रेसजनांनी हाती घेण्याची काही गरज नव्हती. कशास हवे एसपीजी, एनएसजी कमांडो वगैरे.. सत्य कवच आहेच, असे प्रियांकाताई म्हणू शकल्या असत्या. राजकारण भावनेवर चालते हे खरेच. पण ही भावना सर्व नाही; तरी जास्तीत जास्त जणांस स्पर्श करणारी हवी. एक भाऊ म्हणून प्रियांका यांस बंधू राहुल यांचे कौतुक वाटणे योग्यच. पण हे असले नाते-संबंधाचे कौतुक सोहळे भय्यादूज किंवा रक्षाबंधनप्रसंगी घरात साजरे केले जावेत. राजकारणाच्या मोहिमेवर निघालेल्याभोवती या असल्या भावनांच्या ठिपक्यांची रांगोळी काढण्याची काही गरज नाही. ते बालिश आणि हास्यास्पद दिसते.

प्रियांकाताईंचा दुसरा मुद्दाही तितकाच, खरे तर त्याहून अधिक, हास्यास्पद ठरतो. ‘‘अदानी आणि अंबानी हे उद्योगपती माझ्या भावांस खरेदी करू शकले नाहीत,’’ असे प्रियांकाताई म्हणतात. त्याची गरजच काय, ही या विधानावर त्वरित उमटणारी प्रतिक्रिया. हे दोन उद्योगपती, प्रियांकाताई म्हणतात त्याप्रमाणे, देशातील प्रमुख नेत्यांची खरेदी करतात हे खरे मानले तर राहुल यांच्यावर त्यांनी का बोली लावावी? राहुल आणि त्यांचा काँग्रेस पक्ष यांनी असे कोणत्या निवडणुकांत कोणते दिवे लावले आहेत की ज्यांच्या तेजाने या उद्योगपतींचे सोडा, पण सामान्यजनांचे तरी डोळे दिपतील? काँग्रेस पक्ष पाताळापेक्षाही अधिक खोल गर्तेत गेल्यानंतर राहुल यांस या भारत जोडो यात्रेची बुद्धी झाली. तरीही ती यात्रा काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी आहे हे ते उघडपणे सांगत नाहीत. पक्षाच्या पुनरुज्जीवनाचा विचार नसेल तर देशाची भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक जीवन, महामार्गावरील थांबे इत्यादींच्या अभ्यासासाठी राहुल यांची ही पायपीट आहे काय? ते ज्या पक्षाविरोधात लढू पाहतात त्या पक्षाने राहुल आणि त्यांच्या काँग्रेस पक्षास पार भुईसपाट करून टाकले आहे. हे देशाचे जसे दुर्दैव तसेच ते काँग्रेस पक्षाचेही! अशा वेळी इतक्या रसातळास गेलेल्या काँग्रेस पक्षासाठी आणि त्या पक्षाच्या – तूर्त तरी – पडेल नेत्यासाठी या उद्योगपतींनी जिवाचा आटापिटा करावा अशी परिस्थिती अद्याप तरी नाही. आणि काँग्रेस पक्षाचे नेते अशा ‘उद्योगांसाठी’ काम करीतच नाहीत, असा त्यांचा इतिहास आहे असेही नाही. तो माहीत नसेल तर प्रियांकाताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यांस ‘भारतरत्न’ केले ते माजी अर्थमंत्री प्रणबबाबू मुखर्जी कोणासाठी काम करीत याची माहिती मनमोहन सिंग वा पी. चिदम्बरम यांच्याकडून घ्यावी. काही मोजके सन्माननीय अपवाद वगळले तर भारतीय उद्योगपतींच्या गायी सर्व राजकीय पक्षांच्या परडीत बांधलेल्या असतात आणि त्या दुधावर सर्वपक्षीयांचे पोषण होत असते. आता आपल्याकडील व्यवस्थेत सत्तेवर असलेल्या पक्षाच्या वाडग्यात जरा जास्त दूध दिले जात असेलही. पण ते ‘तळे राखील तो पाणी चाखील’ या उक्तीस साजेसे म्हणायचे. तेव्हा राहुल आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाने आधी स्वत:च्या अंगी ही सत्तातळी मिळवण्याची आणि नंतर राखण्याची क्षमता मिळवावी. उद्योगपतींकडून खरेदीचे मुद्दे वगैरे नंतर. आहे त्या अवस्थेत काँग्रेसचे हे निश्चेष्ट लोढणे कोण कशाला गळय़ात घेईल?

तेव्हा या असल्या व्यर्थ मुद्दय़ांवर भाष्य करून लक्ष वेधून घेण्याऐवजी पुढील महिन्यात यात्रा संपल्यानंतर काय याचा विचार आणि योजना राहुल यांनी करावी. तीन-चार महिन्यांच्या कष्टांनंतर सहा महिन्यांचा श्रमपरिहार असे व्हायला नको. राजकारण हा माध्यमांप्रमाणे ३६५ दिवस आणि २४ तास करावयाचा उद्योग आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षास सिद्ध करावे. हा मुद्दा आवर्जून नमूद करावा लागतो याचे कारण या यात्रेनंतर पुढे काय, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसजनांकडे नाही. राहुल यांच्याकडे ते असेल तर त्यांनी आपल्या पक्षनेत्यांस त्यात सहभागी करून त्याप्रमाणे काही एक कार्यक्रम सादर करायला हवा. सत्ताधीशांच्या चुकांची प्रतीक्षा हा विरोधकांचा पूर्णवेळ कार्यक्रम असू शकत नाही. तसा तो असता तर इतक्या प्रमादांनंतरही भाजप विजयी ठरता ना. तो ठरतो याचे कारण सशक्त पर्याय देण्यात काँग्रेस कमी पडतो. त्यामुळे निष्क्रिय भासणाऱ्या जोडीदाराऐवजी धाकदपटशा दाखवणाऱ्याचा हात लोकशाही धरत असेल तर तिचा बिचारीचा काय दोष? तेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेसने यात्रेतील हे हास्यास्पद युगलगान थांबवून यात्रेनंतर काय, याकडे अधिक लक्ष द्यावे. त्यांच्या पक्षास आणि लोकशाहीस त्याची अधिक गरज आहे.