परमात्मा पूर्णरूप, आनंदस्वरूप आणि परमस्वतंत्र आहे. त्याचाच अंश असलेल्या जीवाला त्यामुळेच जगण्यातली अपूर्णता, दु:ख आणि बंधन रुचत नाही. जन्मापासून हा जीव देहबुद्धीनुसार जगत असतो आणि त्यामुळेच त्याच्या आकलनाचा, जाणिवांचा, आकांक्षांचा परीघ देह आणि मनापलीकडे विस्तारत नाही. देहभावात आणि मनोभावात जगत असल्यामुळे देहिक आणि मानसिक सुखातील अपूर्णतेलाच तो जगण्यातली अपूर्णता मानतो. देहदु:ख आणि मानसिक दु:खांनाच तो जीवनाचं दु:ख मानतो. या देह-मनाच्या सुखाआड येत असलेल्या अडथळ्यांनाच तो जगण्यातली बंधनं मानतो. त्यामुळे पिंजऱ्यातल्या पक्ष्यानं स्वातंत्र्याची कितीही कल्पना केली आणि तिथंच मनाजोगतं फडफडण्याला ‘स्वातंत्र्य’ मानून ते मिळवण्याची कितीही धडपड केली तरी तो मुक्त होत नाही. इतकंच नव्हे, तर पिंजऱ्याचं दार क्वचित उघडं राहिल्यानं तो बाहेर आला तरी त्याला पिंजऱ्यावाचून चैन पडत नाही, सुरक्षित वाटत नाही! तशी माणसाची गत आहे. तो स्वत:च निर्माण केलेल्या आसक्तीच्या पिंजऱ्यात अडकला आहे. ती आसक्ती कायम ठेवूनच त्याला समस्त बंधनातून मुक्त व्हायचं आहे! पिंजऱ्यातल्या पक्ष्याला पिंजरा न सोडता, त्यातच मुक्तपणे जगायची इच्छा असावी अशी ही गत आहे. आसक्तीच्या पिंजऱ्याचा दरवाजाही कधी कधी उघडतो! म्हणजेच ज्या व्यक्तीच्या आसक्तीत आपण अडकलेलो असतो, ती व्यक्तीच संबंध तोडते किंवा त्या व्यक्तीचं खरं रूप उघड होऊन आपल्याला दूर होण्याची संधीही मिळते. पण त्या घटनेला आपण एका बंधनाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची संधी मानत नाही! आपल्याला आसक्तीशिवाय चैन पडत नाही आणि आसक्तीच्या सवयीला आपण दुसरा आधार लगेच शोधतो! दुसऱ्या अपूर्ण जीवाच्या आधारानं जगण्यातली अपूर्णता संपत नाही, पूर्णत्व प्राप्त होत नाही. आता अर्धा ही स्वतंत्र संख्या नसली, तरीही गणितात अर्धा अधिक अर्धा यांची बेरीज एक होते; पण दोन अर्धवट माणसं एकत्र येऊन पूर्णत्व मिळत नाही! त्यासाठी त्या दोघांतला कुणी एक तरी पूर्णच असावा लागतो! अगदी त्याचप्रमाणे जो स्वत: अपूर्ण आहे, त्याचा आधार माझ्या जगण्याला पूर्णत्व देत नाही. मला पूर्णत्व, स्वातंत्र्य व शाश्वत आनंद हवा असेल तर जो परमपूर्ण, परम स्वतंत्र आणि शाश्वत आनंदस्वरूप आहे, त्याचाच आधार अनिवार्य आहे. त्यासाठी अपूर्ण जगाची भक्ती सोडून परमात्म्याची भक्ती साधावीच लागेल! एकनाथ महाराजही म्हणूनच विचारतात, ‘‘न करितां भक्ती, मुक्ति कैंची?’’ जो मुक्त आहे, त्याच्या भक्तीवाचून मुक्ती कुठली! ते म्हणतात, ‘‘जालिया ब्रह्मसदनप्राप्ती। न करितां भगवद्भक्ती। अतिशयें दुर्लभ मुक्ती। भक्तीपाशीं मुक्ती दासी जैसी॥१७९॥ न करितां भगवद्भजन। ब्रह्मयासीही मुक्ति नव्हे जाण। मा इतरांचा ज्ञानाभिमान। पुसे कोण परमार्थी॥१८०॥’’ (अध्याय ३). एक वेळ पुण्यकर्माच्या जोरावर ब्रह्मलोकातही स्थान मिळेल, पण मुक्ती नव्हे! जोवर भगवंताची भक्ती घडत नाही, तोवर ब्रह्मलोकातही मुक्ती दुर्लभ आहे. त्या ब्रह्मदेवालाही भजनाशिवाय मुक्ती नाही, तिथं इतरांची काय कथा! मुक्ती ही भक्तीची दासी आहे. मायिक जगाची भक्ती बंधनाच्या चिखलात अधिकाधिक रुतवते; पण परमात्म्याची भक्ती सर्व बंधनांतून मुक्त करते. एकनाथांनी प्रकाशमान केलेल्या त्या मुक्तीगामी भक्तिपंथावर नववर्षांत आपण पहिलं पाऊल ठेवत आहोत. – चैतन्य प्रेम