हे चराचर मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नव्हे! नामदेव महाराजांनी एका अभंगात म्हटलं आहे की, ‘क्षणाचे हे सर्व खरे आहे’! जे डोळ्यांना दिसत आहे, कानांना ऐकू येत आहे, नाकानं गंधायमान होत आहे, त्वचेला स्पर्शानुभूत होत आहे; ते खोटं नाही. पण ते क्षणिक आहे. पुढच्या क्षणी ते तसंच राहील, असं नाही. नामदेव महाराज म्हणतात, ‘‘जळीं बुडबुडे देखतां देखतां। क्षण न लागता दिसेनाती॥ तसा हा संसार पाहतां पाहतां। अंत:काळी हाता काय नाही॥ गारुडय़ाचा खेळ दिसे क्षणभर। तसा हा संसार दिसे खरा॥ नामा म्हणे येथे काही नसे बरे। क्षणाचे हे सर्व खरे आहे॥’’ पाण्यात बुडबुडे उत्पन्न होतात आणि निमिषभरात फुटूनही जातात. पण बुडबुडे दिसले, ते खोटे नव्हते. पण बुडबुडय़ाला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्यामुळे ते शाश्वत नाहीत. त्या बुडबुडय़ाप्रमाणेच आपलं जगणं आहे. ते खोटं नाही, पण ते आहे त्याच स्थितीत कायम राहत नाही. पण तरीही याच अशाश्वत, नश्वर चराचरात शाश्वत ईश्वर व्याप्त आहे. त्यामुळे या अशाश्वत चराचरातल्या प्रत्येक गोष्टीतून शाश्वताचा बोध होऊ शकतो. कृष्णानं उद्धवाला राजा यदुचा अवधूताशी झालेला जो संवाद सांगितला आहे, तोही हेच सूचित करतो. मनाचे डोळे आणि हृदयाची दारं उघडी ठेवली, तर चराचरातील प्रत्येक गोष्ट सद्बुद्धीला परम बोधच कसा पोहोचवत असते, हे या संवादातून उघड होतं. अवधूताची निजानंदमग्न पण निíलप्त स्थिती पाहून यदु प्रभावित झाला होता. हा निजानंद कसा प्राप्त होतो, असा प्रश्न त्यानं विचारला. त्यावर आत्मज्ञानाशिवाय निजानंद प्राप्त होत नाही आणि आत्मज्ञान सद्गुरूशिवाय प्राप्त होत नाही, असं अवधूत म्हणाला. पण चराचरातच मला अनेक गुरूंची प्राप्ती झाली, असं नमूद करताना अवधूत म्हणाला, ‘‘निजबुद्धीच्या विवेकस्थितीं। बहुत गुरु म्यां केले असती। जे जे सद्गुण म्या देखिले भूतीं। ते ते स्थितीं तो गुरू॥३२४॥’’ निजबुद्धीत विवेक जागृत करून मी अनेक गुरू केले. जे जे सद्गुण मला व्यक्ती वा प्रकृतीत दिसले ते ते गुणच माझे गुरू झाले! इथं ‘निजबुद्धीच्या विवेकस्थिती’ला फार महत्त्व आहे. बुद्धीत विवेक नसेल, तर स्वीकारून आचरणात आणण्यासारखे कोणते गुण व्यक्ती वा प्रकृतीत आहेत, हे समजूच शकत नाही! मग अवधूत सांगतो, ‘‘बुद्धीनें अंगीकारिलें गुणा। निजधर्ये धरिली धारणा। तेणें मी मुक्त जालों जाणा। स्वेच्छा अटणा करीतसें॥३२५॥’’ म्हणजे, बुद्धीनं हे गुण स्वीकारले गेले, ते गुण हृदयात ठसवले, धर्यानं त्यांची धारणा आचरणातही बाणवली आणि त्यामुळे जगण्यात मुक्ती विलसू लागली, असं अवधूत सांगत आहे. पण जोवर सद्बुद्धी नाही तोवर ना इतरांमधील गुण दिसतात ना ते स्वीकारता येतात. संसारातून तरून जायचं असेल, तर सद्बुद्धीच आवश्यक आहे (संसारु तरावया। मुख्य सद्बुद्धि गा राया।). संसार म्हणजे जो सतत सरत असतो, सतत रंग-रूप पालटत असतो तो! या मायिक संसारात आसक्त भावानं जो रुततो तो हा भवसागर तरून जाऊ शकत नाही. अवधूत सांगतो, ‘‘सद्बुद्धि नाहीं ज्यापासीं। तो संसाराची आंदणी दासी। उसंत नाहीं अहíनशीं। दुखभोगासी अनंत॥३२७॥’’ ज्याच्याकडे सद्बुद्धी नाही त्याची परवड संसाराला आंदण दिलेल्या दासासारखी होते. त्याच्या वाटय़ाला सतत दुखभोग येत असतात. या दुखभोगानं गांजल्यानं आणि पिचल्यानं त्याची उरलीसुरली बुद्धीही काम करेनाशी होते! मग सद्बुद्धी नाही तर विवेक नाही आणि विवेक नाही, म्हणून भवसागर पार होणं नाही, या स्थितीत गटांगळ्या खात अनंत जन्म सरत असतात. – चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 19th Feb 2020 रोजी प्रकाशित
२८६. जगत्-गुरू!
पुढच्या क्षणी ते तसंच राहील, असं नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-02-2020 at 00:07 IST
मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article ektmyog akp