२७२. मनातीत!

देहभावात जगत असतानाही देहातीत असल्याची सूक्ष्म जाणीव त्याच्या बोलण्यातून प्रकट होते.

चैतन्य प्रेम

माणूस देहभावात जगत असला, तरी तो देहातीत आत्मतत्त्व असल्याचं सत्य त्याच्या बोलण्यात कित्येकदा, अगदी सहजतेनं प्रकट होत असतं. ‘एकनाथी भागवता’च्या दहाव्या अध्यायातील त्याचं विवरण आपण पाहत आहोत. त्यानुसार, पाय मोडल्यावर ‘मी मोडलो’ असं न म्हणता, ‘माझा पाय मोडला’ असं तो म्हणतो. अर्थात, ‘‘यापरी देहीं वर्ततां। प्रत्यक्ष सांगे देहातीतता। हे आपुली आपणां अवस्था। न कळे भ्रांता देहभ्रमें।।२५८।।’’ देहभावात जगत असतानाही देहातीत असल्याची सूक्ष्म जाणीव त्याच्या बोलण्यातून प्रकट होते. पण देहभ्रम असा विलक्षण असतो की, ती आपली खरी अवस्था त्यालाही समजत नाही! इतकंच नाही, तर माणूस मनाशी इतका एकरूप असला तरी, मनापासून काही तरी अलिप्त अशा तत्त्वाचा तो उद्गाता असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवतं. एकनाथ महाराज म्हणतात, ‘‘अकरा इंद्रियांमाजीं जाण। मन तेंही एक करण। करणत्वें त्या जडपण। आत्मा नव्हे जाण या हेतू॥२६२॥’’ पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियांबरोबरच मन हे अकरावं इंद्रियच आहे. त्यामुळेच त्याला जडत्वही आहे, पण जे चैतन्यतत्त्व वा आत्मतत्त्व आहे, त्याला हे जडत्व नाही. उलट माणसाला जी मनाची शक्ती वाटते, ती शक्ती खरं तर त्या चैतन्यतत्त्वातूनच आलेली असते. हे वास्तव उलगडताना एकनाथ महाराज विलक्षण रूपकं मांडतात. ते म्हणतात, ‘‘शस्त्रचेनि एकें घायें। छेदिले लोहार्गळसमुदाये। तें शस्त्रचें सामर्थ्य नोहे। बळ पाहें शूराचें॥२६४॥’’ म्हणजे, शस्त्रानं शत्रूला नेस्तनाबूत केल्याचं दिसतं खरं, पण ते सामर्थ्य शस्त्राचं नसतं तर ते धारण करणाऱ्या वीराचं असतं. अगदी त्याचप्रमाणे, ‘‘पाव्यामाजीं रागज्ञान। केल्या अतिमधुर गायन। तो पाव्याचा नव्हे गुण। कळा जाण गात्याची॥२६७॥’’ बासरीतून सुंदर स्वर उमटतात; पण त्यात बासरीचं काहीच श्रेय नसतं, ते कौशल्य बासरीवादकाचं असतं. नाथ महाराज सांगतात, ‘‘लोहाचा लोहगोळ। अग्निसंगें झाला इंगळ। धडधडां निघती ज्वाळ। तें नव्हे बळ लोहाचें॥२६५॥ त्या लोखंडाऐसें जड मन। त्यासी चित्प्रभा प्रकाशून। प्रकृतीमाजीं प्रवर्तन। करवी जाण श्रेष्ठत्वें॥२६६॥’’ लोखंडाचा गोळा आगीत असा तप्त होतो की, त्याला स्पर्श करील त्याचा हात भाजल्यावाचून राहात नाही! पण ते बळ लोखंडाचं नव्हे, आगीचं असतं. मनही त्या लोहगोलाप्रमाणे जड असतं. चित्प्रभा अर्थात चैतन्यशक्ती त्यात प्रकाशित होते आणि तिच्या बळानंच सर्व मनोव्यापार चालतात. नाथ महाराज सांगतात की, ‘‘प्रपंचीं मनाची दक्षता। तें मनपणेंचि नव्हे तत्त्वतां। जेवीं प्राणेंवीण नृपनाथा। न दिसे सर्वथा निजभाग्य॥२६३॥’’ प्रपंचाचे सर्व व्यवहार मन दक्षतेनं करताना दिसतं खरं, पण प्राणावाचून जसं अस्तित्वाचं भाग्य नाही, तसं चैतन्यावाचून मनालाही स्वत:चं बळ नाही. नाथ महाराज सांगतात की, ‘‘मन तें आत्म्याआधीन। आत्मा स्वाधीन आत्मत्वें॥’’ मन त्या चैतन्यतत्त्वाच्या, आत्मशक्तीच्या अधीन आहे; पण आत्मा आत्मत्वानं स्वाधीन आहे! तत्त्वज्ञानाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माणसाच्या बोलण्यातूनही- ‘मी म्हणजे देह नव्हे’ हे सत्य जसं नकळत प्रकट होतं, त्याचप्रमाणे ‘मी म्हणजे मन नव्हे’ हे सत्यही प्रकट होतं. म्हणून तर, ‘माझं मन दुखावलं’, ‘माझं मन आज आनंदात आहे’, ‘माझ्या मनाला धक्काच बसला’ अशी विधानं तो करतो. त्यातून मन माझं आहे, पण मी म्हणजे मन नव्हे, हेच सत्य झळकत असतं!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta ekatmyog article 272 zws

ताज्या बातम्या