४३२. अंतर्मुखतेचं वळण!

कामपूर्तीच्या आशेनं ती दारात किती तरी काळ तिष्ठत ताटकळत उभी होती.

जग आपल्या मनाजोगतं होईल, जग आपल्याला सुख देईल, या आशेनं जीव तळमळत असतो. पण ही आशा नव्हे दुराशाच ठरते. कारण या जगातला प्रत्येक ‘मी’ हा स्वत:च्याच सुखाच्या ध्यासानं झपाटला आहे. या सुखात वाढ व्हावी किंवा या सुखाला कुणी नख लावू नये, एवढय़ापुरता तो जगाचा असतो. मग अशा जगात ‘मी’ सुखी व्हावं, जगानं माझ्याच मनाजोगतं व्हावं, ही आशा काय उपयोगाची? पिंगलेची आशाही अशीच ढासळत होती. अवधूत सांगतो की, ‘‘ऐसें दुराशा भरलें चित्त। निद्रा न लगे उद्वेगित। द्वारा धरोनि तिष्ठत। काम वांछित पुरुषासी।।१९८।। रिघों जाय घराभीतरीं। सांचल ऐकोनि रिघे बाहेरी। रिघता निघता येरझारीं। मध्यरात्रीं पैं झाली।।१९९।।’’ (‘एकनाथी भागवत’, अध्याय आठवा). म्हणजे दुराशेनं पिंगलेचं चित्त भरलं. तिला झोप येईना. कामपूर्तीच्या आशेनं ती दारात किती तरी काळ तिष्ठत ताटकळत उभी होती. कंटाळून अस्वस्थ मनानं ती घरात जाई. थोडी बाहेरची चाहूल जाणवली, आवाज कानावर पडल्याचा भास झाला की ती लगबगीनं बाहेर धाव घेत असे. अशा येरझारांत मध्यरात्र झाली! ‘‘सरली पुरुषाची वेळ। रात्र झाली जी प्रबळ। निद्रा व्यापिले लोक सकळ। पिंगला विव्हल ते काळी।।२००।।’’ पुरुष येण्याची वेळ सरली, गाढ रात्र झाली. अवघं जग निद्राधीन झालं, पण पिंगला मात्र एकटी जागी होती. विव्हल झाली होती. साधक जीवनातलं अंतर्मुखतेचं काय सुंदर वळण आहे पाहा! जगाकडून कामनापूर्ती होईलच, या दुराशेनं चित्त भरलं आहे. त्या कामपूर्तीच्या आशेनं पिंगला जशी दारी तिष्ठत होती तसं इंद्रियद्वारांशी प्राण गोळा होऊन जगाकडे डोळे लावून बसले आहेत. निराशेनं मग मन किंचित अंतर्मुख होतं खरं; पण आतही जगाची ओढच थैमान घालत असते. त्यामुळे तिथंही मन:शांती नसते. मग जगाच्या जवळकीची किंचित चाहूल जरी लागली तरी, सज्जेत धाव घेणाऱ्या पिंगलेप्रमाणे जीव लगेच बहिर्मुख होतो. जगाकडे धाव घेतो. मग पुन्हा निराश होऊन अंतर्मनात कुढू लागतो. या येरझारांत मध्यरात्र उलटते. अज्ञानमोहाच्या गाढ रात्रीत जग निद्रिस्त असताना पिंगला मात्र जागी आहे! ही वेळ खरं तर योग्यांच्या जागृतीची. जग झोपी गेलं की योगी जागा होतो ना? पण खरं तर जग झोपी गेल्यावरही तीन जण जागे असतात. योगी, रोगी आणि भोगी! रोग्याला त्याचा रोग तर भोग्याला त्याची भोगासक्ती जागं ठेवते, पण ही खरी जाग नसते. मोहस्पर्शित जाग असते. पिंगला भोगासक्त होती, पण आज त्या सुखभोगाला तडा गेल्यानं ती जागी आहे. तळमळत, विव्हळत आहे. काही म्हणा, योग्यांच्या जागृतीची ही वेळ विलक्षणच असते. अनंत शुभस्पंदनं आसमंतात व्याप्त असतात आणि दु:खानं का होईना, जो जागृत, अंतर्मुख होऊ लागला आहे त्याला बळ देतात, प्रेरणा देतात. दु:खानं तुम्ही पार खचता तेव्हा भगवंत अशी कृपा करतो की, त्या दु:खाकडेच तुम्ही तटस्थपणे पाहू लागता! आपणच आपल्या दु:खाकडे वात्सल्यानं न्याहाळून पाहू लागतो. अंत:करण अंतर्मुख होण्याचा हा सुवर्णक्षण असतो!

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta ekatmyog article 432 zws

ताज्या बातम्या