चैतन्य प्रेम
मनुष्य जन्माचा खरा हेतू परमेश्वराची, अर्थात आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती हाच आहे. अनंत जीवयोनींमध्ये आपण आजवर जन्म घेत, जगत आणि मरत आलो आहोत. त्या सर्व योनींमध्ये जीवरक्षण आणि प्रजोत्पादनापुरतं ज्ञान आवश्यक त्या वेळी प्रकट होतं. असं असलं तरी, आपल्या जीवनाचं परीक्षण करण्याचं, जीवनाचा अर्थ शोधण्याचं आणि जगण्याला निश्चित दिशा देण्याचं ज्ञान या योनींमध्ये नाही. ते मनुष्यामध्ये आहे. त्यामुळे पशुवत् जीवन न जगता माणसानं परमतत्त्वमय जीवन जगावं, यावर संतांचा भर आहे. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात, ‘‘नरदेहीं येऊनी करीं स्वार्थ। मुख्य साधीं परमार्थ।। नव्हतां ब्रह्म-ज्ञान। श्वान-सूकरां समान।। पशुवत् जिणें। वायां जेवीं लाजिरविणें।। एका जनार्दनी पामर। भोगिती अघोर यातना।।’’ परमार्थ साधणं हाच मनुष्य जन्माला येऊन साधण्यासारखा खरा स्वार्थ आहे. ते परमज्ञान नसेल, तर कुत्रा-डुकराचा जन्म वेगळा का आहे? वीतभर जमिनीच्या तुकडय़ावरदेखील हक्क नसलेला, पण तरीही ‘आपल्या’ भूक्षेत्राच्या ‘रक्षणा’साठी येईल-जाईल त्याच्यावर भुंकणारा कुत्रा आणि अशाश्वताला ‘मी’ आणि ‘माझे’च्या पकडीत धरून ठेवण्यासाठी धडपडणारा जीव; दोघे सारखेच. अगदी त्याचप्रमाणे मैला चरणारं डुक्कर आणि सदोदित अशाश्वत विषयमलाचंच सेवन करणारा माणूसही सारखेच, असा संत एकनाथ महाराजांचा रोख आहे. तर अनंत जन्मं पाहिलेत कुणी? माणसाचा जन्म मिळाला आहे आणि अनंत क्षमतांनी युक्त देह लाभला आहे, तर हा जन्म देहसुख भोगण्यासाठी, सुखप्राप्तीच्या धडपडीसाठीच का व्यतीत करू नये, असा सर्वसाधारण प्रश्न आहे! माणसाला सुखानं जगण्याचा अधिकार असला, तरी त्याची सुखाविषयीची कल्पनाच दु:खमूलक आहे, त्याचा सुखप्राप्तीचा मार्गच चुकीचा असल्यानं त्याचे प्रयत्नही चुकीचे आणि म्हणून अखेरीस दु:खाच्या पाशात अडकविणारे आहेत. खरं सुख केवळ परमात्मप्राप्तीतच आहे, असा संतांचा बोध आहे. तर परमात्मा दिसत नसताना त्याच्या प्राप्तीतच सुख आहे, असं मानून जगण्यापेक्षा; जो देह दिसत आहे आणि त्याद्वारे मिळणारं सुख अनुभवता येत आहे, ते सुखच भोगण्यात जन्म व्यतीत झाला, तर काय बिघडलं, असा सर्वसाधारण प्रश्न आहे. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, ‘‘देह हा काळाचा जाणार शेवटी। याची धरुनी मिठी गोडी काय।। प्रपंच काबाड एरंडाचे परी। रस-स्वाद तरी काही नाहीं।। नाशवंतासाठीं रडतोसी वायां। जनार्दनी शरण रिघें तूं पायां। एका जनार्दनी भेटी होतां संतांची। जन्म-मरणाची चिंता नाहीं।।’’ हा देह काळाच्या अधीन आहे. जन्मापासून या देहाला काळ ग्रासत आहे. त्या देहाला मोहभ्रमाची मिठी घालून काही लाभ नाही. एरंडाचा वृक्ष उंच वाढतो, पण त्याला गोडी काही नाही! तसा प्रपंचाचा पसारा कितीही वाढला तरी त्यात मनाला खरा विश्राम नाही, खरी तृप्ती नाही. अशा अशाश्वतासाठी रडण्यापेक्षा सद्गुरुबोधानुसार जगायचा निश्चय कर. खऱ्या संतांच्या संगतीत जन्म-मरणाची चिंता उरणार नाही. ती संगत साधून घे. पण माणसाला मरणाचं स्मरण नकोसं वाटतं. जन्माचा आनंद देहसुखाच्या जोरावर सतत भोगावासा वाटत असतो. म्हणूनच त्याच्या मनात प्रपंचावर टीका करणाऱ्या, प्रपंचाला नाकारणाऱ्या परमार्थाबद्दलच प्रश्न उत्पन्न होत असतात.