१४१. ठकले ते मनुष्यगती!

एक परमेश्वरच सत्य आहे, त्या परम सत्याशी दृढ असलेला जो भाव आहे तोच खरा सद्भाव आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

अंतरंगात खरा शुद्ध सद्भाव नसताना, भक्तीचं ढोंग काय कामाचं? एखाद्या कोल्ह्य़ानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघाचं शौर्य त्याच्यात थोडंच उतरणार आहे? मग वेळ आली की वरकरणी वाघ दिसणारा कोल्हा हा कोल्ह्य़ासारखाच वागणार आणि फसणार! आपल्या सगळ्या लोककथाही आध्यात्मिक अर्थच सांगतात बरं का! आपल्याला तो ऐकता आला पाहिजे, वाचता आला पाहिजे. मग असे जे जगाला ठकवणारे ढोंगी भक्त असताता, त्यांची काय गत होते? तर, ‘‘ठकले ते मनुष्यगती। ठकले ते निजस्वार्थी। ठकले ते ब्रह्मप्राप्ती। दंभें हरिभक्ती कदा नुपजे।। ४९८।।’’ असे ढोंगी भक्त खरं तर मनुष्यत्वालाही मुकतात, या जन्माचा खरा स्वार्थ जो परमार्थ तो साधून देणाऱ्या आत्मत्वालाही मुकतात,  ब्रह्मप्राप्ती म्हणजे खऱ्या व्यापक परम तत्त्वाच्या प्राप्तीलाही मुकतात. दंभानं हरिची म्हणजे समस्त भवदु:खाचा निरास करणाऱ्या, हरण करणाऱ्या सद्गुरुंची भक्ती कधीच हृदयात निपजत नाही! किती सुंदर शब्दांत अधोगती दाखवली आहे पहा. जो भक्तीचं ढोंग करतो ना, तो भक्त तर होत नाहीच, पण माणूस म्हणूनही पात्र राहात नाही! माणुसकीपासूनही घसरतो. ज्याच्या अंतरंगात खरी भक्ती नाही त्याच्या अंतरंगात जगाचीच भक्ती असणार ना? मग त्याला संपत्तीचा मोह, नावलौकिकाचा मोह, शिष्यसंख्येचा मोह, राजमान्यतेचा मोह, असे अनेक मोह चिकटणार. मग त्या सर्व मोहपूर्तीसाठी पशुलाही लाजवेल असं वर्तन घडून ते माणूसपणालाही हीनत्व आणणार. जिथं मनुष्यपणाचाच संस्कार उरला नाही, तिथं माणसाचा जन्म कशासाठी मिळाला आहे, याचं भान तरी कुठून उरणार? अध्यात्म हा या देशाच्या मातीचा गंध आहे. श्वास आहे. या देशात जन्मूनही जर अंतरंगात श्रद्धा जागी होणार नसेल, तर काय उपयोग? या मातीनं अनेक पंथांना, धर्माना, विचारांना जन्म दिला आहे. आस्तिकालाही इथं मान आहे आणि नास्तिकालाही आहे. नास्तिकाची ईश्वर नसल्याच्या विचारावर जी श्रद्धा असते ती आस्तिकाची ईश्वर आहेच, या विचारावरही कधी कधी नसते! तेव्हा इथं कोणीच त्याज्ज्य नाही. कोणीच हीन नाही. शेवटी ही भूमीच तुम्हाला श्रद्धेच्या वाटेवर नेते आणि पालट घडवते. माणूसपणादेखील गमावल्यानं तो खरा लाभ या भूमीत साधता येत नाही. मग सद्गुरूची भक्ती आणि परम प्राप्ती कशी होणार? दंभानं हरिभक्ती उपजत नाही. अहो दंभानं व्यवहारदेखील नीट होत नाही, तर हरिभक्ती कशी होईल? नाथ सांगतात, ‘‘येथ भावेंवीण तत्त्वतां। परमार्थु न ये हाता। सकळ साधनांचे माथां। जाण तत्त्वतां सद्भावो।।४९९।।’’ येथे शुद्ध भावावाचून परमार्थ कधीच हाती येत नाही. सर्व साधनांच्या माथ्यावर सद्भाव विराजमान असणंच अनिवार्य आहे, इतकं सद्भावाचं महत्त्व आहे! सद्भाव नसेल, तर किती का साधना करा ना, त्या साधनेचा संस्कार चित्तावर होणार नाही. सद्भाव म्हणजे काय? तर सत्याशीच संलग्न असलेला भाव. एक परमेश्वरच सत्य आहे, त्या परम सत्याशी दृढ असलेला जो भाव आहे तोच खरा सद्भाव आहे. म्हणून त्या सत्याचं स्मरण हाच सर्व साधनांचा प्राण आहे, असं गोंदवलेकर महाराजही सांगत ना? तो सद्भाव अंतरंगात दृढ झाला पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number 141 zws

ताज्या बातम्या