१४५. सत्य-मिथ्या : २

मनाच्या कल्पनांनीच चुकीचं चिंतन, चुकीचा विचार, चुकीची धारणा, चुकीचा निर्णय आणि चुकीची कृती घडते.

(संग्रहित छायाचित्र)

चैतन्य प्रेम

गाढ झोपेत माणसाला स्वप्न पडतं. तो ऐश्वर्यवंत आहे. घर म्हणजे जणू महाल आहे. नोकरचाकर आहेत. आलिशान गाडय़ा दिमतीला आहेत. रोज पंचपक्वान्नांचं जेवण आहे. त्या स्वप्नात तो सुखात असतो. मग जाग येते आणि त्याला दु:ख वाटतं की, ‘अरेरे! हे फक्त स्वप्नच होतं!’ कधी स्वप्नात दिसतं, की तो घोर संकटात सापडला आहे. अडचणींचा विळखा आहे. कोणीही मदतीला नसल्यानं तो असाहाय्य आहे. माणसं तर दुरावली आहेतच, पण जे गाठीशी आहे तेदेखील गमावलं जाण्याची भीती आहे. त्या स्वप्नात तो हादरलेला असतो. भयकंपित असतो. जाग येते आणि त्याला हायसं वाटतं की, ‘बरं झालं देवा! हे फक्त स्वप्नच होतं!!’ पण स्वप्न संपतं, जाग येते आणि स्वप्नात जे पाहिलं ते मिथ्या, आभासमात्र होतं; हे उमगतं. पण त्याच वेळी प्रत्यक्ष जगण्यात जे मिथ्यत्व आहे, भ्रम आहे, सत्याभास मात्र आहे, तो कळत नाही. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘असोनि निद्रावश दिसे स्वप्न। जो जागा होवोनि आपण। करूं बैसे मनोरथध्यान। तो नसतेंचि जन वन एकत्वीं देखे।। ५०९।।’’ झोपेच्या अधीन झाल्यावर स्वप्न दिसतं; पण मग जाग आल्यावर स्वप्न पाहण्याची सवय सुटते थोडीच? मग जागेपणी तो मनोरथांचं ध्यान करीत बसतो. मग सुखाच्या मनोरथांमध्ये गुंततो, तेव्हा वास्तवाचं भान कुठं उरतं? अगदी त्याचप्रमाणे सुखाचं मनोरथ रचत असतानाच त्या सुखात बाधा आली तर, या प्रश्नाचं नख लागतं आणि मग चिंतेच्या जाळ्यात माणूस अडकतो. झोपेतली स्वप्नं असोत की जागेपणची स्वप्नं असोत; त्यांना मनच चालना देतं आणि मनामुळेच सुखाचा मोह व दु:खाचं भय, या भवभयात माणूस अडकतो. खरं सुख आणि खरं दु:ख कशाला म्हणावं, हे तरी कुठं उमगत असतं? मग मधुमेह टोकाला गेला असतानाही मिठाई खाण्यात सुख वाटावं आणि अंगात त्राण नसल्यानं डॉक्टरांनी दिलेलं कडू औषध खाणं हे दु:खाचं वाटावं, अशी माणसाची स्थिती असते! मग खरं सुख कोणतं आणि खरं दु:ख कोणतं, हे मोह आणि भ्रमानं भारलेल्या मनाला का कळणार आहे? त्यासाठी या भ्रममोहापलीकडे जो आहे, अशाच सद्गुरूच्या बोधाची नितांत गरज असते. नाथ महाराज सांगतात, ‘‘भवभयाचें कारण। मन:कल्पना मुख्य जाण। त्या मनाचे करावया निरोधन। सद्गुरुवचन निजनिष्ठा।। ५१४ ।।’’ मनाच्या कल्पनांनीच चुकीचं चिंतन, चुकीचा विचार, चुकीची धारणा, चुकीचा निर्णय आणि चुकीची कृती घडते. त्यातूनच भवभय वाटय़ाला येत असतं. त्या मनाला जर वळण लावायचं असेल, योग्य दिशा द्यायची असेल तर सद्गुरू वचनावर निजनिष्ठा असावी लागते, आत्मीय श्रद्धा असावी लागते. सत्शिष्याला ते सहज साधू लागतं. (‘‘हें जाणोनि सच्छिष्य ज्ञाते। गुरुवाक्यें विश्वसयुक्तें। विवेकवैराग्याचेनि हातें। निजमनातें आकळिती।। ५१५।।’’) मग ते मनात येत असलेल्या प्रत्येक विचाराला ब्रह्मार्पण करू लागतात. म्हणजेच संकुचित विचार जरी उमटला तरी तात्काळ व्यापकाचं भान मनात जागवतात आणि संकुचिताचा आपोआप लय साधतात. मग नाथ म्हणतात की, ‘‘ऐसें भजनें मन नेमितां स्वयें। न रिघे कल्पांतकाळभये। भक्त होऊनियां निर्भयें। विचरती स्वयें नि:शंक।। ५२३।।’’ मनाला व्यापकत्वाची जोड नेमानं लागली, की कल्पांतकाळीही भय स्पर्श करू शकत नाही. असा भक्त मिथ्या जगातही वास्तविक निर्भयतेनं आणि नि:शंक वृत्तीनं वावरतो!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number 145 zws

ताज्या बातम्या