डॉ. एस. डी. सानप
सध्या आपण दररोज टीव्ही, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियामधून “एल निनो” हा शब्द वारंवार ऐकत आहोत. “यंदा एल निनो सक्रिय होणार”, “मान्सूनवर त्याचा परिणाम होईल”, “पाऊस कमी पडू शकतो” अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. हवामान आणि मान्सून यांच्याशी संबंधित जवळपास प्रत्येक चर्चेत हा शब्द हमखास ऐकायला मिळतो. पण नेमका हा एल निनो आहे तरी काय? तो कसा तयार होतो? आणि भारताच्या मान्सूनवर त्याचा एवढा प्रभाव का पडतो? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट आधी सांगावीशी वाटते. अनेकजण “El Niño” चा उच्चार “अल निनो” असा करतात. प्रत्यक्षात योग्य उच्चार “एल निनो” असा आहे. “El Niño” म्हणजे “लहान मुलगा” किंवा “ख्रिस्त बालक” (The Little Boy). या शब्दामागची कहाणीही खूप रंजक आहे.

दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर, विशेषतः पेरूच्या आसपास, मासेमारी हा अनेक लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. सुमारे १६०० च्या दशकात तिथल्या मच्छीमारांना एक गोष्ट लक्षात येऊ लागली. दर काही वर्षांनी अचानक समुद्रातील माशांचे प्रमाण खूप कमी होत असे. मासेमारीत घट होत असे, समुद्री पक्ष्यांची संख्या कमी होत असे आणि किनाऱ्यावरील अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसे. तर काही वर्षी परिस्थिती अगदी उलट असायची- समुद्रात भरपूर मासे मिळायचे. विशेष म्हणजे हा बदल बहुतेक वेळा डिसेंबरमध्ये, म्हणजे ख्रिसमसच्या सुमारास जाणवत असे. स्थानिक लोक स्पॅनिश भाषा बोलत असल्यामुळे त्यांनी या उष्ण समुद्री परिस्थितीला “एल निनो” असे नाव दिले. तर ज्या वर्षी समुद्रातील परिस्थिती थंड आणि अनुकूल राहायची, त्या अवस्थेला पुढे “ला नीना” म्हणजे “लहान मुलगी” असे म्हणू लागले. आज जगभर प्रसिद्ध असलेले “एल निनो” आणि “ला नीना” हे शब्द कोणत्याही प्रयोगशाळेत जन्माला आले नाहीत, तर साध्या मच्छीमारांच्या अनुभवातून निर्माण झाले.

पुढे हळूहळू वैज्ञानिकांना लक्षात आले की ही फक्त समुद्रातील बदलाची गोष्ट नाही. तिचा जगभरातील हवामानावर परिणाम होतो. भारतातही या गोष्टीचे महत्त्व एका मोठ्या संकटानंतर समजले. १८७७ मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला. लाखो लोकांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यानंतर मान्सूनचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याची गरज प्रकर्षाने जाणवली. भारतीय हवामान विभागाचे पहिले मुख्य अहवालकर्ता सर एच. एफ. ब्लॅनफोर्ड यांनी हिमालयातील हिमवृष्टीच्या आधारे पावसाचा अंदाज देण्याचे प्रयत्न सुरू केले. १८८२ ते १८८५ दरम्यान त्यांनी प्राथमिक अंदाज जारी केले. त्या काळासाठी हे मोठे पाऊल होते. यानंतर भारतीय हवामान विभागाने दरवर्षी नियमित मान्सून अंदाज जाहीर करण्यास सुरुवात केली.

पुढे सर जॉन इलियट आणि विशेषतः सर गिल्बर्ट वॉकर यांनी या संशोधनाला अधिक वैज्ञानिक दिशा दिली. वॉकर यांनी जगभरातील हवेच्या दाबातील बदलांचा अभ्यास करताना “सदर्न ऑसिलेशन” या महत्त्वाच्या घटनेचा शोध लावला. पण खरी क्रांती १९६० च्या दशकात झाली. हवामान शास्त्रज्ञ जेकब जर्कनिस यांनी “एल निनो” आणि “सदर्न ऑसिलेशन” या दोन वेगळ्या मानल्या जाणाऱ्या घटनांमधील संबंध स्पष्ट केला. त्यांनी दाखवून दिले की पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान आणि वातावरणातील हवेच्या दाबातील बदल हे एकमेकांशी जोडलेले आहेत.

जेव्हा व्यापार वारे (Trade Winds) कमकुवत होतात, तेव्हा उष्ण पाणी पूर्व पॅसिफिककडे सरकते आणि महासागर-वातावरणामध्ये मोठे बदल सुरू होतात. यालाच पुढे ENSO – El Niño Southern Oscillation – असे नाव देण्यात आले. १९८० पर्यंत वैज्ञानिकांना हे स्पष्ट झाले की ENSO ही पृथ्वीच्या हवामान व्यवस्थेतील अत्यंत प्रभावी प्रणाली आहे. मान्सून, दुष्काळ, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा आणि जागतिक हवामानातील अनेक बदल ENSO शी संबंधित असतात.

सध्या जग पुन्हा एकदा नव्या एल निनोकडे वाटचाल करत आहे. अनेक संशोधकांच्या मते हा आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली एल निनोंपैकी एक ठरू शकतो. अर्थात तो अजून सुरुवातीच्या अवस्थेत आहे आणि अंतिम परिणाम नेमका किती होईल हे पुढील काही महिन्यांत स्पष्ट होईल. पण जर सध्याचे अंदाज खरे ठरले, तर त्याचा परिणाम जगभर जाणवू शकतो.

आज परिस्थिती पूर्वीपेक्षा काहीशी वेगळी आहे. आता उपग्रह, महासागर निरीक्षण यंत्रणा आणि प्रगत हवामान मॉडेल्समुळे एल निनोवर सतत लक्ष ठेवता येते. शेती तंत्रज्ञानही सुधारले आहे. त्यामुळे पूर्वीसारखा अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. पण तरीही एल निनोमुळे अनेक अडचणी वाढू शकतात. उदाहरणार्थ, आधीच जगभरात खतांचा तुटवडा, ऊर्जा दरवाढ आणि युद्धांमुळे आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एल निनोमुळे दुष्काळ, उष्णतेच्या लाटा किंवा उत्पादनात घट झाली, तर त्याचा परिणाम अधिक गंभीर होऊ शकतो.

एल निनोची तीव्रता मोजण्यासाठी मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान पाहिले जाते. सामान्य एल निनोमध्ये तापमान साधारण १ अंश सेल्सिअसने वाढते. पण १९८२, १९९७ आणि २०१५ मधील शक्तिशाली एल निनो घटनांमध्ये ही वाढ २ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होती. त्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला होता. यंदा काही अंदाजांनुसार तापमान ३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढू शकते, जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते.

याच संदर्भात इंडियन ओशन डाईपोल (IOD) ही प्रणालीही महत्त्वाची ठरते. IOD म्हणजे हिंदी महासागरातील एल निनोसारखीच एक हवामान प्रणाली. जेव्हा हिंदी महासागराच्या पश्चिम भागातील पाणी अधिक गरम आणि पूर्व भागातील पाणी अधिक थंड होते, तेव्हा “पॉझिटिव्ह IOD” तयार होतो. अशावेळी भारतात मान्सूनला मदत मिळते आणि पाऊस चांगला पडण्याची शक्यता वाढते. उलट “नेगेटिव्ह IOD” मध्ये पाऊस कमी होऊ शकतो. सध्या IOD तटस्थ अवस्थेत आहे. पण काही जागतिक हवामान मॉडेल्सनुसार मान्सूनच्या उत्तरार्धात पॉझिटिव्ह IOD तयार होऊ शकतो. जर तसे झाले, तर एल निनोचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊन भारताला दिलासा मिळू शकतो. मात्र IOD चा अंदाज एल निनोपेक्षा कमी खात्रीशीर मानला जातो.

अलीकडचे मोठे एल निनो वर्ष म्हणजे २०१५. त्या वर्षी महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली होती. २०१६ च्या उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना रेल्वेने पाणी पुरवावे लागले होते. १९७२ चा दुष्काळही महाराष्ट्रासाठी कायम स्मरणात राहिलेला आहे. आजही गावातील वडीलधारी मंडळी त्या काळाच्या आठवणी सांगतात- रेशनवर मिळणारा लाल गहू, जनावरांचे झालेले नुकसान आणि ओस पडलेली शेती. मात्र आता परिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे.

हरितक्रांती, सिंचन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता कमी झाली आहे. आज मुख्य चिंता अन्नधान्यापेक्षा पाण्याची अधिक असते. भारतीय हवामान विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा देशात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या सुमारे ९२% पडू शकतो. महाराष्ट्रात कोकण-गोव्यात ९३%, मध्य महाराष्ट्रात ९०%, मराठवाड्यात ८८% आणि विदर्भात ९१% पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एकूणच पाहता, यंदा एल निनोमुळे पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र पुढील काही महिन्यांत IOD ची स्थिती कशी बदलते, यावरही बरेच काही अवलंबून असेल. त्यामुळे हवामान विभागाचे अंदाज, महासागरातील बदल आणि मान्सूनची प्रगती यावर सतत लक्ष ठेवणे गरजेचे ठरणार आहे.

(लेखक भारतीय हवामान विभागात शास्त्रज्ञ आहेत.)