श्यामलाल यादव पुरातन वस्तू म्हणजे केवळ संग्रह करून ठेवण्याच्या आणि अभिमानाने मिरवण्याचा ठेवा नसतो. त्यात संबंधित समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, विकासाच्या पाऊलखुणा दडलेल्या असतात. भारतात अशा अमूल्य ठेव्याला तोटा नाही. म्हणूनच असेल कदाचित, पण अशा वस्तूंबाबत अतिपरिचयात् अवज्ञा होताना दिसते. पुरातन वस्तूंच्या महत्त्वाविषयी पुरेशी जागरुकता नसल्यामुळे भारतातील अनेक मौल्यवान पुरातन वस्तू जगभरात विखुरलेल्या दिसतात. अशाच हरवलेल्या ठेव्याचा एक मोठा संच नुकताच अमेरिकेतून भारतात परत आला आहे. दोन सेवकांसह उभ्या असलेल्या व्यक्तीची टेराकोटातील आकृती, प्रसिद्ध कलिंगणार्थना मुद्रेतील कृष्णाचे कांस्य शिल्प, गरुडावर स्वार झालेल्या विष्णू आणि लक्ष्मीची वालुकाश्मातील प्रतिमा, पूर्व भारतातील टेराकोटाच्या फुलदाण्या या आणि अशा एकूण १०५ पुरातन वास्तूंचा त्यात समावेश आहे. या सर्व वस्तूंची विवध काळांत तस्करी झाली होती. अन्यही काही वस्तू परतीच्या मार्गावर आहेत. या पुरातन वस्तूंच्या माध्यमातून भारतीय कला, संस्कृतीचा हरवलेला ऐतिहासिक वारसाच पुन्हा गवसला आहे. अन्य देशांतून तस्करी करून अमेरिकेत नेण्यात आलेल्या पुरातन वस्तू संबंधित देशांना परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचा एक भाग म्हणून या वस्तू भारतात पाठविण्यात आल्या असून अन्य देशांतील वस्तूही अशाच प्रकारे परत करण्यात येणार आहेत. न्यूयॉर्क येथील ‘मेट्रोपोलिटन म्युझियम ऑफ आर्ट’मध्येही (एमईटी) भारतातील काही पुरातन वस्तू असल्याचे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने मार्च २०२३ मध्ये प्रकाशित केले होते. त्यानंतर एमईटीने या वस्तू भारताला परत करण्यात येणार असल्याचे कळविले होते. त्या वस्तूही भारतात पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुरातन नसलेल्या २५० मौल्यवान वस्तूही परत आणण्यात येणार आहेत. या पुरातन वास्तूंपैकी काही वस्तूंची तस्करी सुभाष कपूरने केली होती. तो नोव्हेंबर २०२३ पासून तामिळनाडूच्या तुरुंगात असून त्याला १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. १०५ पैकी ३५ पुरातन वस्तू कोलकात्याच्या ईशान्येस ३५ किलोमीटरवर असलेल्या चंद्रकेतुगड या पुरातत्त्व क्षेत्रात आढळल्या होत्या आणि त्या तब्बल दोन हजार वर्षे जुन्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला आहे. अनेक दशकांपासून तेथून टेराकोटाच्या पुरातन वास्तूंची तस्करी होत असल्याचेही सांगितले जाते. या सर्व १०५ वस्तू विविध कालखंडांतील असून बहुतेक वस्तू हजार वर्षांहून अधिक जुन्या आहेत. यापैकी ४६ वस्तू पूर्व भारतातील, २९ दक्षिण भारतातील आणि १७ मध्य भारतातील आहेत. तीन पुरातन वास्तूंचे मूळ मध्य किंवा पूर्व भारत असावे, असे नमूद केले आहे. प्रत्येकी दोन वस्तू उत्तर प्रदेश आणि राजस्थान किंवा गुजरात; आणि प्रत्येकी एक मध्य किंवा पश्चिम भारत, हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड, उत्तर प्रदेश किंवा बिहार, उत्तर भारत आणि पश्चिम भारतातील असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या कलाकृती एकतर दिल्लीच्या जुन्या किल्ल्यातील जप्त केलेल्या पुरातन वास्तूंच्या गॅलरीत प्रदर्शित केल्या जातील किंवा ज्या राज्यांमधून त्यांची तस्करी झाली त्या राज्यांना परत केल्या जातील. भिन्न साहित्य आणि काळ कलाकृतींत दोन तीर्थंकर, शिव, लक्ष्मी, गणेश, विष्णू, सूर्य, कुबेर आणि कृष्ण या देवी-देवतांचे चित्रण आहे. संगमरवरी स्मृतीशीळा, स्टीलचा खंजीर आणि त्याचे म्यान अठराव्या व एकोणीसाव्या शतकातील अरबी/ पर्शियन शिलालेखही त्यात आहे. २७ वस्तू इ.स. २-३मधील, १६ वस्तू सहाव्या व सातव्या शतकातील, १३ वस्तू बाराव्या- तेराव्या शतकातील आणि १५ वस्तू पंधराव्या ते सतराव्या शतकातील असल्याचा अंदाज आहे. सर्वांत ‘नव्या’ पुरातन वास्तू अठराव्या ते एकोणीसाव्या शतकातील आहेत. टेराकोटा, कांस्य, वालुकाश्म, लाकूड, संगमरवरी दगड, ब्लॅक स्टोन, ग्रॅनाइट, चांदी, पितळ, स्लेट स्टोन, स्पॉटेड सँडस्टोन आणि स्टीलपासून या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनीसह इतर काही देशांतून अनेक पुरातन वास्तू परत मिळविण्यात आल्या आहेत. तस्कर सुभाष कपूरच्या अटकेनंतर पुरातन वास्तू परत आणण्याच्या हालचालींना वेग आला. त्याला ३० ऑक्टोबर २०११ रोजी जर्मनीतून अटक करण्यात आली होती आणि जुलै २०१२ मध्ये त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले. १ नोव्हेंबर २०२२ रोजी कुंभकोणम न्यायालयाने कांचीपुरमच्या वरधराज पेरुमल मंदिरातील मूर्तींची चोरी आणि बेकायदा निर्यात केल्याबद्दल त्याच्यावर आरोप निश्चित केले. सध्या तो त्रिची येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अमेरिकेतील वस्तूंची चोरी आणि तस्करी यासह विविध आरोप आहेत. ‘होमलँड सिक्युरिटी इन्व्हेस्टिगेशन’ने (एचएसआय) जुलै २०१९मध्ये न्यूयॉर्क न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, “कपूर यांनी चोरलेल्या पुरातन वास्तूंची एकूण किंमत १४५.७१ दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक आहे. एकंदर जगभरात ठिकठिकाणी विखुरलेला आपल्या इतिहिसाचा ठेवा पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवणे गरजचे आहे. संस्कृती मिरविण्याचे वारे वाहत असताना, खरी संस्कृती जाणून घेऊन तिचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यासाठी हाच ठेवा उपयुक्त ठरू शकतो. हे विखुरलेले तुकडे जोडून कदाचित आपण आपल्या संपन्न संस्कृतीच्या खऱ्याखुऱ्या चित्राशी ओळख करून घेऊ शकतो. shyamlal.yadav@expressindia.com