प्रा. अंबादास नरसिंगराव पाचंगे
मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर ८० च्या दशकातील छायाचित्रे, त्या काळातील गाणी, कपडे, सायकली, रेडिओ, दूरदर्शन, शाळेच्या आठवणी, जुन्या वस्तू, गावाकडचे जीवन आणि त्या काळातील शहरी संस्कृती पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. “आमच्या काळात असे होते”, “ते दिवसच वेगळे होते”, “८० चे दशक म्हणजे खरे आयुष्य” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर उमटत आहेत. आजच्या पिढीला हा काळ साधा, निरागस आणि सुंदर वाटतो. मात्र या गोड आठवणींच्या पडद्यामागे आर्थिक संघर्ष, सामाजिक बंधने, अपुऱ्या सुविधा आणि अनेक कठीण वास्तवही दडलेले होते. म्हणूनच ८० च्या दशकाकडे केवळ जुन्या आठवणींच्या भावनिक नजरेतून पाहण्याऐवजी त्या काळातील चांगुलपणा आणि मर्यादा दोन्ही समजून घेणे गरजेचे आहे.
नाती घट्ट होती; पण कांही बंधनेही होती:
८० च्या दशकातील कुटुंबव्यवस्था आजच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर संयुक्त किंवा विस्तारित स्वरूपाची होती. एकाच घरात आई-वडील, मुले, आजी-आजोबा, काका-काकू, आत्या आणि चुलत भावंडे अशी अनेक माणसे एकत्र राहत असत. घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हत्या; ते भावनिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्व होते. वडील हे घरातील प्रमुख निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व मानले जात. त्यांचा शब्द अनेकदा अंतिम असे. मुलांनी मोठ्यांसमोर प्रश्न विचारणे किंवा आपले मत ठामपणे मांडणे अनेक घरांत सहज स्वीकारले जात नसे. आईची जबाबदारी तर प्रचंड असे. घर, मुले, शेती, जनावरे किंवा कौटुंबिक व्यवसाय सगळे सांभाळताना अनेक महिलांनी स्वतःच्या इच्छा आणि करिअरला दुय्यम स्थान दिले.
मुलांचे बालपण मात्र मोकळ्या जागांमध्ये फुलत असे. अंगण, रस्ते, शेत, माळरान आणि शाळेचे मैदान हीच त्यांची खेळाची मैदाने होती. लगोरी, कबड्डी, खो-खो, विटीदांडू, लपंडाव, गोट्या, भोवरा अशा खेळांतून शरीरासोबत मैत्री, संघभावना आणि कल्पकता विकसित होत असे. पण या नात्यांमध्ये प्रेमासोबत शिस्त, भीती, सामाजिक अपेक्षा आणि कुटुंबाच्या निर्णयांचे ओझेही होते. प्रेमविवाह, वेगळे करिअर किंवा मुलींनी स्वतंत्र जीवन निवडणे अनेकदा सहज स्वीकारले जात नसे.
शिक्षण म्हणजे सुविधा नव्हे, तर संघर्ष :
आज इंटरनेट, स्मार्टफोन, ऑनलाइन शिक्षण, डिजिटल पुस्तके आणि असंख्य शैक्षणिक साधने सहज उपलब्ध आहेत. ८० च्या दशकात शिक्षण मिळवणे अनेक विद्यार्थ्यांसाठी संघर्षाचे होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा किंवा महाविद्यालय गाठण्यासाठी मैलोन्मैल चालावे लागे किंवा सायकलवर प्रवास करावा लागे. काही विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर शेती, मजुरी किंवा घरकामही करावे लागे. प्रत्येकाला नवीन पुस्तके मिळतीलच असे नव्हते. मोठ्या भावंडांची जुनी पुस्तके वापरणे, मित्रांकडून पुस्तके घेणे आणि वहीचा प्रत्येक पान जपून वापरणे सामान्य बाब होती. त्या काळात माहितीचा मुख्य आधार शिक्षक, पाठ्यपुस्तके, ग्रंथालये आणि वर्तमानपत्रे होते. माहिती कमी होती, पण तिची किंमत मोठी होती. शिक्षकांचे स्थानही वेगळे होते. शिक्षक म्हणजे केवळ विषय शिकवणारी व्यक्ती नव्हे, तर मार्गदर्शक आणि अनेकदा पालकासारखा आधार देणारी व्यक्ती असे. गरीब विद्यार्थ्याला पुस्तके मिळवून देणे, फी भरण्यास मदत करणे किंवा अभ्यासासाठी प्रोत्साहन देणे अशा अनेक आठवणी आजही अनेकांच्या मनात आहेत. अर्थात, त्या काळातील शिक्षणपद्धतीत कठोर शिस्त आणि शिक्षेची पद्धतही होती, जी आजच्या दृष्टिकोनातून स्वीकारार्ह वाटेलच असे नसली तरीही त्यातील अनेक बाबी महत्त्वाच्या होत्या.
समाजव्यवस्थेत जवळीक आणि कांही बंधनेही :
मोबाईल आणि सोशल मीडिया नसल्यामुळे प्रत्यक्ष भेटीगाठींना मोठे महत्त्व होते. गावातील एखाद्या घरात लग्न असो, आजारपण असो, दुःखद घटना असो किंवा घरबांधणीचे काम शेजारी आणि नातेवाईक मदतीला धावून येत. आज आपण “नेटवर्क” म्हटले की इंटरनेटची जोडणी डोळ्यांसमोर येते; त्या काळात नेटवर्क म्हणजे माणसांची जोडणी होती. मात्र त्या काळातील समाज पूर्णपणे आदर्श होता असे म्हणणे चुकीचे ठरेल. जात, धर्म, वर्ग, आर्थिक स्थिती आणि लिंग यांचा सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव होता. अनेकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक संधी मिळवताना अडथळ्यांना सामोरे जावे लागे. आपुलकी होती, पण सामाजिक विषमताही होती. माणुसकी होती, पण रूढी आणि परंपरेची बंधनेही होती.
स्त्रीजीवन, त्यागाच्या पलीकडचे वास्तव :
८० च्या दशकाच्या आठवणींमध्ये आईचा त्याग मोठ्या प्रेमाने सांगितला जातो. पण त्या त्यागामागील वास्तव समजून घेणेही महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील अनेक स्त्रिया पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करत. पाणी भरणे, स्वयंपाक, मुलांचे संगोपन, जनावरांची देखभाल, शेतीतील कामे आणि घरातील वयोवृद्धांची सेवा या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर असत. मुलींच्या शिक्षणाबाबतही अनेक मर्यादा होत्या. “मुलगी लग्न करून दुसऱ्या घरी जाणार” या मानसिकतेमुळे तिच्या शिक्षणावर किंवा करिअरवर खर्च करण्यास काही कुटुंबे तयार नसत. तरीही याच काळात अनेक महिलांनी शिक्षण घेतले, नोकरी केली आणि डॉक्टर, शिक्षक, परिचारिका, अधिकारी अशा विविध क्षेत्रांत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. म्हणून त्या काळातील स्त्री ही केवळ त्याग करणारी आई किंवा गृहिणी नव्हती; ती परिस्थितीशी संघर्ष करत स्वतःच्या अस्तित्वासाठी जागा निर्माण करणारी व्यक्तीही होती.
कमी साधने, पण काटकसर आणि कल्पकता :
८० चे दशक आजच्या उपभोगवादी संस्कृतीपेक्षा खूप वेगळे होते. वस्तू सहज उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक वस्तूची किंमत जाणवायची. कपडे वारंवार बदलले जात नसत. सणासुदीला नवीन कपडे घेणे ही मोठ्या आनंदाची गोष्ट असे. चप्पल किंवा बूट फाटले तर ते दुरुस्त केले जात. जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुनर्वापर केला जाई. “वापरा आणि फेका”ऐवजी “जपा, दुरुस्त करा आणि पुन्हा वापरा” ही जीवनशैली होती. रेडिओ, सायकल, घड्याळ किंवा घरातील एखादी वस्तू अनेक वर्षे वापरली जाई. वस्तूंची किंमत केवळ पैशांत नव्हे, तर त्यांच्याशी जोडलेल्या आठवणींमध्येही मोजली जात असे.
मनोरंजन कमी, पण आनंद सामूहिक :
रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, नाटक, जत्रा, तमाशा, भजन, कीर्तन आणि गावातील सांस्कृतिक कार्यक्रम ही मनोरंजनाची प्रमुख साधने होती. घरात टीव्ही असणे हीच मोठी गोष्ट होती. एखादा लोकप्रिय कार्यक्रम लागला की, घरातील सर्वजण एकत्र बसत. कधी शेजारी-पाजारीही कार्यक्रम पाहायला येत. आज प्रत्येकाच्या हातात स्वतंत्र स्क्रीन आहे परंतु नात्यात दुरावा असल्याचे दिसून येते, मात्र त्या काळात एकाच स्क्रीनसमोर अनेक माणसे बसत. मनोरंजन कमी होते, पण सामूहिक आनंद मोठा होता आणि नात्यामध्ये जवळीकता असल्याचे दिसून येते.
पत्रांची वाट पाहणारे जग आज एखाद्याला समाजम माध्यमाद्वारे एखादा संदेश पाठवल्यानंतर काही सेकंदांत उत्तर मिळते. ८० च्या दशकात मात्र पत्र म्हणजे भावना शब्दांत जपण्याची प्रक्रिया होती. एखाद्या व्यक्तीचे पत्र येण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागे. पोस्टमन गावात आला की त्याच्याकडे सगळ्यांचे लक्ष असे. पत्र मिळाल्यानंतर ते पुन्हा पुन्हा वाचले जाई. प्रतीक्षा ही त्या काळातील संवादाचा अविभाज्य भाग होती. कदाचित म्हणूनच संवाद कमी असला तरी ही त्या काळात त्याची भावनिक किंमत अधिक होती.
पैसा कमी होता, पण माणूस उपलब्ध होता :
त्या काळाच्या आठवणींमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे परस्पर सहकार्याची भावना. घरात अन्न कमी असले तरी पाहुण्याला जेवू घालणे, शेजाऱ्याच्या दुःखात सहभागी होणे, गरजू विद्यार्थ्याला पुस्तक देणे, आजारी व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जाणे किंवा प्रवासात अनोळखी व्यक्तीला मदत करणे या छोट्या – छोट्या कृतींमधून माणुसकी जपली जात असे. लोक श्रीमंत नसतील, पण एकमेकांसाठी वेळ होता. पैसा कमी होता, पण श्रम देण्याची तयारी होती. साधने कमी होती, पण माणसे एकमेकांसाठी उपलब्ध होती. कदाचित हीच त्या काळाची खरी संपत्ती होती. वर्तमानात मुबलक साधने असताना सुद्धा नात्यांना वेळ दिला जात नसल्यामुळे अनेक नाती वेळे अभावी तुटताना दिसून येतात.
मग ८० चे दशक खरोखरच सुवर्णकाळ होता का? हा प्रश्न आज विशेष महत्त्वाचा आहे. सोशल मीडियावर ८० चे दशक अनेकदा अत्यंत सुंदर, निरागस आणि परिपूर्ण काळ म्हणून दाखवले जाते. पण कोणताही काळ पूर्णपणे सुंदर किंवा पूर्णपणे वाईट नसतो. ८० च्या दशकात नाती घट्ट होती; पण वैयक्तिक मात्र स्वातंत्र्यावर बंधनेही होती. शिक्षकांचा आदर होता; पण कठोरता आणि भीतीही होती. कुटुंब एकत्र होते; पण व्यक्तीच्या इच्छांना अनेकदा कमी महत्त्व मिळत असे. स्त्रियांचा त्याग मोठा होता; पण त्यांच्या स्वातंत्र्याला मर्यादा होत्या. जीवन साधे होते; पण त्या साधेपणामागे आर्थिक संघर्षही होता. म्हणून ८० च्या दशकाचे खरे मूल्यमापन करताना त्यातील चांगुलपणा जपण्यासारखा आहे आणि मर्यादांमधून शिकण्यासारखेही आहे, हे मान्य करावे लागेल.
जुन्या काळात परत नाही; तर जुन्या मूल्यांकडे परत जाने महत्त्वाचे आज विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जीवनात अभूतपूर्व बदल झाले आहेत. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी क्षणात संवाद साधता येतो. शिक्षणाच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. आरोग्य, वाहतूक, माहिती आणि रोजगाराच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. मात्र या प्रगतीसोबत एक प्रश्नही उभा राहतो आपण सुविधा वाढवल्या, पण माणसांमधील अंतर तर वाढवले नाही ना? ८० च्या दशकाकडे परत जाण्याची गरज नाही. त्या काळातील प्रत्येक गोष्ट पुन्हा आणण्याचीही गरज नाही. पण त्या काळातील काही मूल्ये आजच्या जीवनात नक्कीच आणता येतील कुटुंबासाठी वेळ, शिक्षकांविषयी आदर, श्रमाची प्रतिष्ठा, वस्तूंची जपणूक, गरजूंना मदत, शेजाऱ्याशी आपुलकी, स्त्रीचा सन्मान, शिक्षणाची तळमळ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी ही ८० च्या दशकाकडून घेतली तर वर्तमान मानवी जीवन सुखी होण्यसाठी निश्चितच मदत होईल. म्हणूनच ८० च्या दशकाचे फोटो, गाणी आणि फॅशन व्हायरल होत असताना केवळ “ट्रेंड” व्हायरल करण्यापेक्षा त्या काळातील “मूल्ये” व्हायरल करण्याची वर्तमानात गरज आहे.
थोडक्यात ८० चे दशक हे केवळ जुन्या वस्तूंचे, जुन्या गाण्यांचे किंवा जुन्या फॅशनचे दशक नव्हते. ते कमी साधनांत आयुष्य उभे करणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, मुलांना शिकवणाऱ्या, कुटुंब सांभाळणाऱ्या आणि पुढच्या पिढीसाठी चांगल्या भविष्याची पायाभरणी करणाऱ्या एका पिढीचे प्रतिनिधित्व करते. साधने बदलतात, जीवनशैली बदलते, पिढ्या बदलतात; पण माणुसकी, आपुलकी आणि नात्यांची ऊब यांना कोणताही पर्याय नसतो. आज जुन्या काळात परत जाण्याची गरज नाही; गरज आहे ती जुन्या काळातील चांगुलपणा नव्या काळात आणण्याची.
राज्यशास्त्र विभाग प्रमुख,
श्री स्वामी समर्थ विद्याप्रसारक मंडळाचे
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव,
ता. मालेगाव, जि. नाशिक,
pachangeambadas@gmail.com
