प्रा. तात्यासाहेब काटकर
महान राष्ट्र ते महाराष्ट्र अशी महाराष्ट्र या शब्दाची साधीसरळ उत्पत्ती म.म. काणे यांनी केली आहे. महान पराक्रमी तो महापराक्रमी, महानपुरुष तो महापुरुष. तद्वतच महान राष्ट्र ते महाराष्ट्र. १ नोव्हेंबर १९५६ रोजी ‘मुंबई’ या नव्या राज्याची निर्मिती झाली होती. त्यानंतरच्या काळात संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी राज्यभरात अनेक ठिकाणी निदर्शने झालीत. ८ मार्च १९६० रोजी द्वैभाषिकांचे विभाजन करणारे ‘मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक’ मंजूर झाले. १७ मार्च रोजी मुंबई विधानसभेने आपल्या भावी राज्याचे नाव ‘महाराष्ट्र’ ठेवले. त्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तसेच याच दिवशी देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिला कामगार दिन मद्रास शहरात १९२३ ला झाला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला. देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी एक मे हा दिवस कामगार दिन म्हणून पाळला जातो.

छत्रपती शिवरायांसारखा प्रेरणादायी आदर्श राजा, संत आणि ग्रंथांचे संस्कार, निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण, खाद्यसंस्कृतीचं वैभव, संपत्ती निर्मिती करणारे एक महत्त्वाचे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. या राज्याचा आर्थिक इतिहास नुसता कौतुकास्पद नाही तर अनुकरणीय आहे. महाराष्ट्रात मराठी संतांनी समाजमनाची जी काही शतके मशागत केली, त्यामुळे शिवाजी महाराजांसारख्या युगकर्त्या अलौकिक राज्यकर्त्यांला त्याच्या विचारांना समजून स्वीकार करणारा समाज अनायासे मिळाला. म्हणजे शिवाजी महाराजांचा अवतार होईपर्यंत संतांनी आचार-विचार, स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व आदी गुणांचे पाठ तत्कालीन समाजाकडून गिरवून घेतले होते. त्यानंतर शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक महामानवांनी महाराष्ट्र घडवला. आज त्यांच्या विचारावरच महाराष्ट्र चालतोय. खरे तर या मातीत जन्मलेली संत परंपरा असो की येथील विचारवंतांनी पुरस्कृत केलेला तर्कवाद. भारतीय संगीताचे आश्रयस्थान असो की प्रगल्भ मराठी कवितेचा प्रांत असो. महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आणि ते टिकवलेही. असा हा आपला महाराष्ट्र, पण…

आज आधुनिक महाराष्ट्रात विचारसंघर्ष होताना दिसत नाहीत. होतात ते ‘चक्का-जाम’, ‘रास्ता रोको’ किंवा ‘खळ्ळ खटय़ाक’! ही विकारवशता झाली आहे. तसेच वैयक्तिक ताशेरे, दोषारोप, धर्माचे राजकारण, जातीपातीचे राजकारण, भावनेचे राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, स्त्रियांच्या बाबातीत गलिच्छ टिपण्या याचे प्रमाण वाढतच आहे. कोणीही राज्यकर्ते हे सत्ता टिकवण्यासाठी मतलबी व्यवहार करणार, हे उघड आहे. पण किती ? त्याला प्रमाण असावे. आपल्यामुळे राज्याचे नाव खराब होत आहे याची काळजी कोणीच करत नाही. राज्याच्या राजकारणातील जुनी पिढी ही प्रगल्भ होती. शाळा, रुग्णालये, रस्ते, पाणी असे सामान्यांशी निगडीत सामाजिक प्रश्न सोडविण्याकरीता त्यांची बांधिलकी होती. आता प्राधान्यक्रम बदलला आणि अवांतर विषयांना महत्त्व दिले जात आहे. डॉक्टर-वकील यांनी आपला समाजाचे नेतृत्व करण्याचा बाणा तर केव्हाच सोडून दिला आहे. आजचे विचारवंतही तटस्थ राहिले नाहीत, तेही मोहात गुरफटलेत. मग समाजाला कोण तारणार? आज अवघ्या महाराष्ट्राला वैचारिकतेचे वावडे निर्माण झाले आहे आणि नीतिमत्ता, चारित्र्य, सदसद्विवेक यांचा छुपा किंवा क्वचित कोठे उघड तिरस्कार वाटू लागला आहे.

महाराष्ट्रत चाललेले गलिच्छ व किळसवाणे राजकारण पहता पोटाची खळगी भरणारे, कष्ट करून खाणारे, झोपेतून उठल्यापासून ते रात्र होईपर्यंत शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला कोण काय म्हणाले, कोण जेलमध्ये गेले, कुठे ईडीची धाड पडली हे काय करायचे आहे. ब्रेकिंग न्यूज आणि टीआरपीच्या या जीवघेण्या प्रसारयुगात बातम्यांची विश्वासार्हता, पुढाऱ्यांचे एकमेकांवरील आरोपांचे काही देणेघेणे नाही. एकेकाळी महाराष्ट्रातील राजकारणाचा आदर्श घेतला जात होता पण आज ? शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या अगणित आत्महत्या ही तर महाराष्ट्राच्या भूतकाळाची काळी बाजू ती आजतागायत चालू आहेच व आता त्यात आंदोलनकर्त्यां असंख्य तरूणांच्या आत्महत्याची भर पडली आहे. शिक्षणतज्ज्ञ, लेखकांनी, महिलांनी व्यसने व आत्मघात यावर भाष्य केले का ? आज मूल्यशिक्षण कमी झालेले दिसते. वाचन संस्कृतीचा अभाव हा तर सर्व साहित्यिक संस्था, परिषदा यांचा फार मोठा पराभव आहे. आज असे एकही क्षेत्र नाही की, जेथे भ्रष्टाचार होत नाही. उलट आज भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला आहे. केवळ मोठ्या शहरांतूनच नव्हे, तर अगदी खेडोपाडीसुद्धा कामांच्या कागदांवर ‘वजन’ ठेवले नाही तर कामे होत नाहीत. पवलोपावली भ्रष्टाचार होताना दिसतो पण त्या विषयी कोणीही बोलत किंवा तक्रार करत नाही. अगदी बोटावर मोजण्याइतके प्रमाण तक्रारीचे आहेत. हे सर्व महाराष्ट्रात आहे असे नाही. संपूर्ण देशात हेच आहे.

फक्त जय महाराष्ट्र म्हणून बदल होणार नाही तर कोणत्या गोष्टी महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येतात त्या गोष्टीचा विचार करायला हवा. भ्रष्टाचार, गरिबी, मुलींवरचे अत्याचार या गोष्टींचा नायनाट केला पाहिजे. पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवली पाहिजे आणि प्रगतीची नवी शिखरे करण्याचा निर्धार केला पाहिजे. शेवटी मी एवढेच म्हणेन,

महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यकथा,

पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा…

सर्व महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा……..

(लेखक महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक असून ते शैक्षणिक व सामाजिक विषयावर लेखन करतात)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

tatyasahebkatkar28@gmail.com