अशोक राजवाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोल्सोनारो उजवे, लूला डावे एवढाच फरक नाही. नेतृत्वाच्या दोन प्रवृत्ती आठवडय़ाअखेर पणाला लागणार आहेत..

जगात आकारानं पाचवा आणि लोकसंख्येनुसार सातवा क्रमांक लागणाऱ्या ब्राझीलमधली अध्यक्षीय निवडणूक तोंडावर आली आहे. २ ऑक्टोबरला या लढतीतील पहिली फेरी होणार आहे. दोन वेगवेगळय़ा शक्ती समोरासमोर येत आहेत. जनमत चाचण्यांमध्ये डाव्या आघाडीचे लुईस इनासिओ लूला द सिल्वा (थोडक्यात: लूला)  सतत कमीजास्त फरकाने आघाडीवर आहेत; तर कट्टर उजवे जाइर बोल्सोनारो काहीसे मागे पडले आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी १९७७ पासून १७ वर्ष जाइर बोल्सोनारो लष्करात होते. तिथे ते कॅप्टनच्या हुद्दय़ापर्यंत पोहोचले होते. १९६४ ते १९८५ हा काळ ब्राझीलमध्ये लष्करशाहीचा, त्यापैकी सात-आठ वर्ष बोल्सोनारो लष्करात होते. ‘लष्करी राजवटीत लोकांचा छळ झाला पण तिने पुरेशी माणसं मारली नाहीत,’ हे त्यांचं जाहीर मत आहे. ते २०१८ च्या निवडणुकीत ‘अलायन्स फॉर ब्राझील’ पक्षाचे उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी उभे राहिले. हा पक्ष त्यांच्या मते ‘परंपरावादी मूल्यं मानणारा, राष्ट्रवादी, सर्व धर्माचा आदर करणारा, स्व-संरक्षणाचा अधिकार मानणारा, त्यासाठी शस्त्रास्त्रं बाळगणं आवश्यक आहे असं मानणारा, जगाबरोबर मुक्त व्यापार करू इच्छिणारा’ होता. यातल्या गोंडस शब्दांच्या मागे असलेलं वास्तव लक्षात घेऊन ब्राझीलमधल्या माध्यमांनी त्यांच्या पक्षाचं वर्णन ‘अति-उजवा आणि लोकैकवादी (पॉप्युलिस्ट) पक्ष’ या शब्दांत केलं होतं.    

बोल्सोनारोंच्या निवडणूक प्रचारात आधी लूला आणि नंतर अध्यक्ष झालेल्या डिल्मा रूसेफ यांच्या काळातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, आर्थिक दुरवस्था हे महत्त्वाचे मुद्दे होते. हे सगळे मुद्दे घेऊन प्रचार करतानासुद्धा बोल्सोनारोंच्या भाषणांत वर्णभेद, लिंगभेद, भांडवलधार्जिणेपणा, मूळनिवासी टोळय़ांबद्दल तिरस्कार, पर्यावरणाबद्दल बेफिकिरी या सगळय़ाचं पुरेपूर दर्शन होत होतं. अगोदरच्या डाव्या शासनातल्या भ्रष्टाचाराचे बरेच तपशील बाहेर आले होते आणि जनतेत त्याबद्दल नाराजी होती. आपण स्वच्छ शासन देऊ असं बोल्सोनारो म्हणत होते. त्याच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी बोल्सोनारोंच्या बाजूने कौल दिला. 

जानेवारी २०१९ मध्ये बोल्सोनारोंच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. पण एकूणच बोल्सोनारोंचा इतिहास आणि त्यांच्या प्रचारातले मुद्दे पाहून अनेकांना ब्राझीलची काळजी वाटत होती. आपल्या बेताल बडबडीमुळे आणि त्यांच्या डोक्यातल्या बेजबाबदार योजनांमुळे त्यांना ‘दक्षिणेकडचे ट्रम्प’ म्हणूनच दुनिया ओळखू लागली होती. पर्यावरणाविषयी अनास्थेत तर ते कधी कधी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा एक पाऊल पुढेच दिसायचे. बोल्सोनारोंची अध्यक्षीय कारकीर्द सुरू झाली. ब्राझीलच्या हद्दीत येणाऱ्या  अ‍ॅमेझॉन जंगलक्षेत्रात ऑगस्ट २०१९ च्या दरम्यान अचानक मोठय़ा प्रमाणात वणवे लागल्याचं दिसू लागलं. एकूण क्षेत्रफळ ५५ लाख चौरस किमी असलेल्या अ‍ॅमेझॉनच्या अरण्याचा ६० टक्के भाग म्हणजे सुमारे ३३ लाख चौ. किमी. ब्राझीलच्या हद्दीत येतो. हा आकार आपल्या देशाच्या (भारताच्या) सुमारे ८२ टक्के एवढा आहे. जगाचं फुप्फुस म्हटलं जाणारं अ‍ॅमेझॉनचं जंगल, जगात एकूण जेवढा कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो त्यापैकी सुमारे वीस टक्के वायू अ‍ॅमेझॉनचं जंगल शोषून घेतं. या अरण्यातील  वणव्यांच्या संख्येत २०१८ सालापेक्षा ८० टक्क्यांनी वाढ झाली. या आगींकडे बोल्सोनारो जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहेत असं अनेकांना वाटत होतं. शेतकरी, पशुपाल, बीफची विक्री करणारे, खाणवाले यांच्या लॉबीज सतत बोल्सोनारोंची पाठराखण करत असतात. त्यांना मतं मिळवून देतात.

ब्राझीलच्या जंगलक्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर घोटाळे सुरू आहेत. अवैध लाकूडतोडही कमीजास्त प्रमाणात सर्वच जंगलक्षेत्रांत होत असते. पण जंगल- रक्षणासाठी असलेल्या निधीमध्ये बोल्सोनारोंनी कपात केली. त्यांच्यापूर्वीच्या डाव्यांवर याबाबतीत बोल्सोनारो टीकेची झोड उठवत असतात. डाव्या आघाडीच्या  शासनांचं  जंगलतोड आणि खाणकामाला विरोध करण्याचं धोरण कसं व्यापारविरोधी ऊर्फ अव्यवहार्य होतं असा बोल्सोनारोंच्या टीकेचा मथितार्थ असतो. आणि डाव्यांच्या या ‘व्यापारविरोधी’ धोरणाला बोल्सोनारोंचा उपाय काय असेल? तर इथलं खाणकाम वैध करून टाकणं. तसा प्रस्ताव बोल्सोनारो संसदेत आणू पाहात होते. त्याआधीच, अमेझॉनमध्ये लाकूडतोड करून तिथे सोनं शोधणाऱ्या बाहेरून आलेल्या लोकांनी आपापले सुमारे २० हजार अवैध कॅम्प उभे केले आहेत.

बोल्सोनारोंच्या बेताल बडबडीबद्दल एक स्वतंत्र लेखच लिहिता येईल. एखाद्या महिलेचा अवमान करण्यासाठी ते तिला ‘बलात्कारास अयोग्य’ ठरवतात, ‘मला चार मुलगे आहेत; पण पाचव्या वेळी मी कमजोर पडल्यामुळे मुलगी निपजली’ असे जाहीरपणे सांगतात आणि समिलगी, ट्रान्सजेंडर किंवा तत्सम व्यक्तींबद्दल त्यांना मुळीच आस्था नाही. त्यांचा वंशवाद त्यांच्या विविध वक्तव्यांमध्ये डोकावत असतो.

 करोनाच्या काळात बोल्सोनारोंनी कायम अज्ञानावर आधारित बडबड केली. करोनाविषाणू हा फ्लूचाच कुठलातरी नवा प्रकार आहे; त्यात थंडी वगैरे वाजते; त्यात विशेष लक्ष देण्यासारखं काही नाही असा बोल्सोनारोंचा सुरुवातीचा आविर्भाव होता. पण जेव्हा करोनाचं संकट अधिकाधिक गहिरं होत गेलं तसं त्यांनी जनतेला आवाहन केलं : या  संकटाला एखाद्या मर्दासारखे भिडा; लहान पोरासारखं वागू नका. आपल्याला केव्हातरी मरायचंच आहे. तेव्हा न घाबरता कामावर जा. ब्राझीलमधल्या एकूण २७ पैकी २० राज्यांनी बोल्सोनारोंच्या प्रयत्नांना धुडकावून सरळ लॉकडाऊन लागू केला. यात बोल्सोनारोंच्याच पक्षातले गव्हर्नरसुद्धा होते. एक प्रकारे बोल्सोनारोंच्या विरुद्ध ही राजकीय बंडखोरी होती. ब्राझीलमधली जनता  २५  मार्च २०२० ला रात्री  भांडी आणि थाळय़ा वाजवत होती. पण या वादनासोबत ‘बोल्सोनारो, चले जाव’ अशा घोषणा लोक आपापल्या घरांतून देत होते.  

एकदा बोल्सोनारोंना, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरियावरचं औषध हा करोनावर रामबाण उपाय आहे याचा ट्रम्प महाशयांप्रमाणे साक्षात्कार झाला. आणि ते आपल्याला मिळालंच पाहिजे असा आग्रह त्यांनी आपल्या भारताकडे धरला. वास्तविक हे औषध मलेरियावरचं. ते करोनासाठी एकमेव आणि रामबाण औषध नव्हे; ते अनेक औषधांपैकी एक आहे; ते अत्यंत विचारपूर्वक दिलं पाहिजे वगैरे माहीत असूनही हा हट्ट त्यांनी धरला होता.

जानेवरी २००३ मध्ये लूलांची राजवट सुरू झाली. पुढे २०१० पर्यंत ते ब्राझीलचे अध्यक्ष होते. ते सत्तेवर आले त्या वेळी त्यांना प्रशासकीय अनुभव नव्हता.  शिवाय त्यांचा डावीकडे असलेला कल आणि कामगारवर्गीय पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्याकडून नेमकी काय अपेक्षा करायची याबद्दल सर्वाच्या मनात साशंकता होती.  त्यांच्या आर्थिक धोरणांमध्ये ते कोणते बदल करतील हे काहींना समजत नव्हतं. त्यांचं परराष्ट्रीय धोरण कसं असेल; परदेशातून येणाऱ्या भांडवलाबद्दल त्यांची काय भूमिका असेल याबद्दल संदिग्धता होती. त्यांच्या कार्यकाळात एकूण १.३ कोटी नवे रोजगार निर्माण झाले. लूलांच्या कार्यकाळात ब्राझीलच्या परदेशी व्यापारात वाढ झाली; शिवाय आयात-निर्यातीतली शेष रक्कम १३१० कोटी डॉलर वरून ३३३० कोटी डॉलपर्यंत पोहोचली. आर्थिक वृद्धीचा दर १.९ टक्क्यांवरून ५.२ टक्क्यांपर्यंत गेला. अर्थातच यामुळे दारिद्रय़ निवारणाचे कार्यक्रम राबवणं लूलांना शक्य झालं. या त्यांच्या कामांमुळे लूलांची लोकप्रियता बरीच वाढली. २०१८ साली ब्राझीलमध्ये जेव्हा रीतसर निवडणुका झाल्या. त्या वेळी तुरुंगात असूनसुद्धा लूला त्यांच्या काळातल्या कामगिरीमुळे जनतेत सर्वात लोकप्रिय होते. जनमताच्या चाचण्यांत ते आघाडीवर होते. ते निवडून येऊ शकले असते. पण तेव्हा ते तुरुंगात असल्याने ब्राझीलच्या कायद्याप्रमाणे ते निवडणूक लढवू शकले नाहीत.

वर्कर्स पार्टीला तिच्या पक्षाच्या सत्तेतल्या मंत्र्यांनी केलेले भ्रष्टाचार महागात पडले. अर्थातच २०१८ च्या निवडणुकीत त्याचा फायदा कट्टर उजव्या बोल्सोनारोंना  मिळाला आणि ते निवडून आले. मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मतदारांत आज २०२२ सालातसुद्धा लूलांच्या आघाडीबद्दल काही नाराजी आहे आणि वर्कर्स पार्टीला मतदान करताना मतदार काहीसे साशंक आहेत. तरीही जनमत चाचण्यांत लूला आघाडीवर आहेत.

लूलांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेतील कच्च्या मालाचा बाजार तेजीत होता. ब्राझीलला त्यातून मिळालेल्या उत्पन्नामुळे दारिद्रय़ निवारणाचं काम त्या मानानं सोपं होतं. पण आज अशी परिस्थिती राहिलेली नाही. जे निवडून येतील त्यांच्यासाठी परिस्थिती पूर्वीइतकी सुकर नाही. उद्या लूला निवडून आले तरी ते आजच्या परिस्थितीत जनतेचा विश्वास कायम राखण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे. आज लॅटिन अमेरिकेतल्या मेक्सिको, पेरू, चिले, व्हेनेझुएला, कोलंबिया, बोलिव्हिया, होंडुरास, निकाराग्वा, अर्जेटिना या देशांतल्या जनतेने डावीकडे झुकलेल्या शासनांना आपली पसंती दिली आहे. (अमेरिकेत दुसरी ‘पिंक टाइड’ येते आहे असं  तिचं वर्णन केलं जातं.  पहिली ‘पिंक टाइड’ १९९८ पासून सुमारे २०१४ सालापर्यंत होती. २०२० पासून पुन्हा दुसऱ्या पिंक टाइडचं उधाण येत आहे.) अर्थव्यवस्थेचा आकार, लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या तिन्ही दृष्टींनी सर्वात मोठा असलेला ब्राझील या ‘पिंक टाइड’मध्ये येण्यानं जागतिक स्तरावर प्रागतिक आणि डाव्या शक्तींना बळ मिळेल. या घोडदौडीला थोपविण्याचाही प्रयत्न तितक्याच तीव्रतेनं होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी ब्राझीलची लढत महत्त्वाची आहे. अखेर हा प्रवृत्तींमधला झगडा आहे.

 तरीही राजकीय निरीक्षकांना धाकधूक आहे. जर बोल्सोनारो हरले आणि लूला निवडून आले तर हा निकाल बोल्सोनारो मान्य करतील का? ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबद्दल आपल्याला शंका आहे; त्यामुळे मतदान योग्य तऱ्हेने होणार नाही..’ असं त्यांनी आतापासूनच सांगायला सुरुवात केली आहे. शिवाय बोल्सोनारोंचे लष्कराशी असलेले अनेक वर्षांचे संबंध लक्षात घेता त्यांचा वापर करून ते लष्करी कट घडवून आणतील काय अशी दुसरी एक काळजी सर्वाच्या मनात आहे.  

ashokrajwade@gmail.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2022 brazilian presidential election brazil presidential election presidential election in brazil zws
First published on: 27-09-2022 at 03:06 IST