देवेश गोंडाणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी विजयादशमीनिमित्त होणाऱ्या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये यंदा २६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी धम्मदीक्षा घेतल्याची माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने दिली आहे. धर्माच्या मुद्द्यावर सगळीकडेच वातावरण संवेदनशील असताना धम्मदीक्षा सोहळ्याचे वेगळेपण अधोरेखित होते. त्यानिमित्त धम्मदीक्षा सोहळा, त्याची पार्श्वभूमी, त्याचे सामाजिक महत्त्व या सगळ्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती असणे आवश्यक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६६ वर्षांपूर्वी नागपूरमध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याच वेळी त्यांनी भारत बौद्धमय करीन अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. समानता, स्वातंत्र्यता, बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले होते. परंतु, या घटनेच्या अवघ्या दोन महिन्यांनी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने त्यांचे हे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचे काम १९५७ पासून अखंडितपणे नागपूरच्या दीक्षाभूमीवर सुरू आहे. शिक्षणाने समृद्ध झालेला आणि रूढी परंपरांच्या वणव्यात पोळून निघालेला समाज आज बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन विजयादशमीच्या मुहूर्तावर हजारोंच्या संख्येने सीमोल्लंघन करत आहे.

डॉ. आंबेडकरांचे सर्वात महत्त्वाचे बंड म्हणजे, त्यांनी घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा. धर्म बदलाच्या या बंडाने हिंदू धर्मीयच नाही तर, इतर धर्मीय, सर्व जगच हादरून गेले. बदल हा निसर्गतः घडतो. उन्हाळ्यानंतर पावसाळा, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो. कळीचे रूपांतर फुलात होते. या बदलास परिवर्तन म्हणतात, पण बाबासाहेबांनी घडवलेला बदल निसर्गनिर्मित नव्हे तर तो मानवनिर्मित होता. म्हणून ते परिवर्तन नव्हे तर प्रवर्तन होते. ठरवून केलेले प्रवर्तन होते. मुस्लीम धर्मीयांना ते मुस्लीम व्हावेत, ख्रिश्चनांना ते ख्रिश्चन व्हावेत, शिखांना ते शीख व्हावेत असे वाटत होते. अनेकांनी त्यांना आपल्या धर्मात यावे, म्हणून आमिषही दाखवले. मात्र, सहा लाख अनुयायांसह बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अशा धम्माचा त्यांनी स्वीकार केला की, ज्यात नशीब, स्वर्ग, कर्म, मोक्ष, कर्मकांड किंवा पुनर्जन्म अशा भाकड कल्पनांना थारा नाही. विशेष म्हणजे जातीचा तर लवलेशही नाही. जातविरहित धम्म समाजाला देत विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले. म्हणूनच दसऱ्याच्या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या धम्म प्रवर्तनाला आता ६६ वर्षे पूर्ण झाली. बाबासाहेबांचा लढा म्हणजे जातीअंताचा लढा आहे. जातीचा अंत करण्याची एक पद्धती म्हणूनदेखील बौद्ध धम्माकडे बाबासाहेब पाहतात. अनेक नद्यांचे पाणी समुद्रात मिळाल्यानंतर हे पाणी कोणत्या नदीचे हे जसे सांगता येत नाही. तसेच कोणत्याही जातीचा किंवा वर्णाचा मनुष्य बौद्ध धम्मात आल्यास त्याची पूर्वीची ओळख संपते, असे बुद्ध म्हणतात.

प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या माहितीनुसार, १९५७ पासून दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन केले जाते. सुरुवातीच्या काळात हा सोहळा एक दिवस चालत असे. भदंत आनंद कौशल्य हे दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देत होते. परंतु, सुरुवातीला बाबासाहेबांवर असलेले अपार प्रेम, निष्ठा आणि श्रद्धेपोटी लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेत. यातील बहुतांश अनुयायी हे महाराष्ट्रातील आणि दलित समाजातीलच होते. बाबासाहेब सांगायचे की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार आहे. आज समाज शिक्षित होत आहे. इतर समाजातील बांधव उच्चशिक्षित होऊन हजारो वर्षांपासून त्यांच्यावर थोपवलेल्या अंधश्रद्धा, कर्मकांडाविरोधात बोलायला लागला आहे. त्यांना बाबासाहेबांचा बुद्ध धम्म हा विज्ञाननिष्ठ व मानवतावादी आहे हे पटते. बुद्धाचा विचार आधुनिक काळामध्येसुद्धा महत्त्वपूर्ण व प्रासंगिक असल्याने आज केवळ दलितच नव्हे तर इतर धर्मीय लोक दीक्षाभूमीवर येऊन हजारोंच्या संख्येने बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत. स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले सांगतात, धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल व देशाच्या इतरही भागांतील नागरिकांचा समावेश असतो. काही वर्षांआधी धम्मदीक्षा घेणाऱ्यांची संख्या पाच ते दहा हजारांमध्ये राहत असे. यामध्येही बहुतांश अनुयायी हे महाराष्ट्राच्या दलित समाजातील राहायचे. मात्र, बुद्धांचा शांती, अहिंसा, समता आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्त्व लोकांना समजू लागल्याने धम्मदीक्षा घेणाऱ्यांच्या संख्या वाढत आहे. या वर्षी दीक्षाभूमीवर आलेल्या २६ हजार ६२३ अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यामध्ये इतर मागासवर्गीयांसह अन्य समाजातील अनुयायांचीही संख्या मोठी होती. धम्मदीक्षा घ्यायची असल्यास सुरुवातीला एक अर्ज भरून द्यावा लागतो. त्यात त्यांचे पूर्ण नाव, पत्ता व धम्मदीक्षा घेण्याबाबत इतर माहिती घेतली जाते. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे धम्मदीक्षा घेणाऱ्यांना २२ प्रतिज्ञा ग्रहण करवून घेतात. यानंतर धम्मदीक्षा दिल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. सुरुवातीला प्रमाणपत्र हवे म्हणून लोक या सोहळ्यात सहभागी व्हायचे. काहींमध्ये तर आपण बौद्ध धम्माचे प्रमाणपत्र मिळवले की आपल्याला दलितांना मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ होईल अशी भ्रामक समजूत होती. मात्र, आज काळ बदलला. बाबासाहेबांनी पाहिलेले बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने सकारात्मक पावले पडत आहेत. बुद्धाने दाखवलेला समतेचा मार्ग स्वीकारण्याकडे नागरिकांचा कल वाढत असल्याचेही फुलझेले म्हणाले.

प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रदीप आगलावे सांगतात, बाबासाहेबांचा बुद्ध धम्म हा विज्ञाननिष्ठ व मानवतावादी आहे. त्यामुळे बुद्धाचा विचार आधुनिक काळामध्येसुद्धा महत्त्वपूर्ण व प्रासंगिक आहे. बुद्धाचा विचार हा जगातील सर्व विचारवंतांनी मान्य केला. आज लोकांची शैक्षणिक प्रगती झाली, ते विचार करू लागले आणि म्हणूनच त्यांना बौद्ध धम्मच महत्त्वाचा वाटू लागला. आज देशामध्ये कितीही धर्मांधता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तरी लोकांना बुद्धाचा मार्गच महत्त्वपूर्ण वाटत असल्याने धम्मदीक्षा घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा घेणारे अनुयायी हे भाड्याची वाहने करून किंवा पैसे देऊन आणलेले नसतात. शिक्षणामुळे त्यांच्या विचारांत झालेली क्रांती त्यांना दीक्षाभूमीवर खेचून आणते. धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये काही संघटनाही सहभागी होतात. यात ओबीसींमधील संघटनांचा समावेश आहे. काही वर्षांआधी दीक्षाभूमीवर एका ओबीसी संघटनेने मोठा कार्यक्रम घेऊन बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बौद्ध धम्माचा स्वीकार करणाऱ्यांची वाढत असलेली संख्या हे सकारात्मकतेचे पाऊल असून समाजामध्ये सुरू असलेल्या जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाला एक उत्तर असल्याचे डॉ. आगलावे सांगतात.

१९५६ ला ज्या वेळी बाबासाहेबांनी धर्म परिवर्तन केले तेव्हा समानता, स्वातंत्र्यता, बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. भारत बौद्धमय करण्याचे त्यांचे स्वप्न म्हणजे स्वातंत्र्यता, समानता, बंधुभाव व न्यायावर आधारित राष्ट्र निर्माण करणे होय. जग परिवर्तनशील आहे, हा बुद्धांचा नियम आहे. जगात परिवर्तन करायचे असेल तर आधी विचारात परिवर्तन व्हायला हवे. विचारपरिवर्तन झाले तर भारत बौद्धमय होऊ शकतो आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अपुरे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

devesh.gondane@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 thousand citizens took dhammadiksha this year 66 year old tradition of dhammadiksha is still vibrant today asj
First published on: 09-12-2022 at 09:32 IST