मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतरमंतरवर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाच्या पूर्वसंध्येला कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात आंदोलनाच्या संदर्भातील वस्तुस्थिती मांडली. सीजेपीची भविष्यातील वाटचाल, राजकीय पक्ष म्हणून निवडणुका लढण्याची शक्यता, ‘सीजेपी’च्या पहिल्या आंदोलनानंतरची परिस्थिती, आदिवासी शाळांची पाहणी अशा अनेक प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलीच; पण स्वत:बद्दलच्या प्रश्नांतूनही सामाजिक संवेदनशीलतेचा मुद्दा त्यांनी मांडला…
कॉक्रोच जनता पार्टीनं विविध राजकीय विषयांवर आंदोलन उभं केलं आहे. पक्षाचा पाया विस्तारतोय. परंतु निवडणुका लढणारा राजकीय पक्ष म्हणून काम करण्याचा सध्या तरी विचार नाही. राजकीय पक्ष स्थापन करण्याची योग्य वेळ कधी असेल हे मला आताच सांगता येणार नाही. आज परिस्थिती अशी की, आम्ही राजकीय पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला विरोध होईल. समजा निवडणुकीत आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले तरी त्यांना फोडण्यात येईल!
आमच्या पक्षात फूट पाडून गट निर्माण केले जातील, लोकप्रतिनिधींना सुरतमार्गे गुवाहाटीला नेलं जाईल, तिथं त्यांना रिसॉर्टमध्ये ठेवलं जाईल… मग ‘काय झाडी, काय डोंगार’ हे ऐकायला मिळेल. आमचा पक्ष फोडला जाईल, चिन्ह गोठवलं जाईल. महाराष्ट्रात हेच प्रकार घडले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्याबाबत तेच घडत आहे. सध्या प्रस्थापित राजकीय पक्षांना अस्तित्वासाठी झगडावं लागत आहे. अशा वेळी राजकीय पक्ष म्हणून पुढे येण्यासाठी फार काही अनुकूल वातावरण आहे, असं मला तरी वाटत नाही. २०२९च्या निवडणुकीत आम्ही राजकीय पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ, असं सध्या तरी चित्र नाही.
राजकीय पक्ष म्हणून नोंदणी नसली तरी आम्ही सर्व राजकीय विषयच हाती घेतले आहेत. राजकीय पक्ष नसलो तरी आम्हाला काँग्रेसचा ब संघ, ‘आप’चा ब संघ किंवा अगदी भाजपला मदत करण्यासाठी स्थापन झालेली चळवळ असं हिणवलं जातं. आमची भूमिका स्पष्ट आहे. प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांना नेहमीच नव्यानं पुढे येणार्या पक्षांची भीती असते. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत यावर आमचा भर आहे. त्यासाठीच आम्ही जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलं. त्या आंदोलनाला यश आलं. धर्मेंद्र प्रधान कधीच राजीनामा देणार नाहीत, असे दावे ठामपणे केले जात होते. पण विद्यार्थ्यांच्या दबावापुढे मोदी सरकारला झुकावं लागलं.
कॉक्रोच जनता पार्टी तीन महिन्यांपूर्वी अस्तित्वात तरी होती का? नव्हती. सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्यातून ही चळवळ उभी राहिली. इन्स्टाग्रामवर या पक्षाला युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ‘नीट’च्या पेपरफुटीचा विषय हाती घेतला, त्याला युवकांनी प्रतिसाद दिला. प्रस्थापित राजकीय पक्ष गंभीरपणे राजकारण करत असताना कॉक्रोज जनता पार्टी म्हणजे सीजेपीच्या मागे विद्यार्थी, जेन-झी का उभे राहिले ? सीजेपी ही चळवळ १६ मे रोजी इन्स्टाग्रामवर उभी राहिली. चार दिवसांत या पेजला एक कोटी २० लाख पाठीराखे मिळाले. तर सत्ताधारी भाजप एवढा जुना पक्ष असला तरी त्यांच्या पेजला ८० लाख पाठीराखे होते. म्हणजेच आम्ही भाजपला समाजमाध्यमांत मागे टाकलं आहे. यावरून समाजात किती असंतोष आहे हे स्पष्ट होतं.
आपल्या देशात लोकशाही ही केवळ निवडणुकांपुरतीच सीमित राहिली हे दुर्दैवाचं आहे. लोकशाहीत प्रसार माध्यमं, दबाव गट, नागरी संघटना यांची भूमिका महत्त्वाची असते. पण गेल्या १० ते १२ वर्षात या सार्या दबाव गटांचं पार खच्चीकरण करण्यात आलं. या सर्व गटांना पुन्हा महत्त्व मिळावं ही आमची भूमिका आहे. लोकशाही ही निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडेसुद्धा असावी असा आमचा प्रयत्न राहील.
तीन्ही मागण्या कायम
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानं काय साध्य होणार, असा प्रश्न आम्हाला विचारला जातोय. एक ज्ञानेश कुमार गेले तर दुसरे येतील, तिसरे येतील हे बरोबर. निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात निष्पक्षपातीपणे घेण्याची जबाबदारी खरं तर निवडणूक आयोगाची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात सर्वच निवडणुकांमध्ये घोटाळे, मतचोरी असे प्रकार खुलेआमपणे घडले आहेत. १३ कोटी मतदारांची नावं वगळण्यात आली. याबद्दल ज्ञानेश कुमार यांना शिक्षा नको का? निवडणूक प्रक्रिया पारदर्शक असली पाहिजे. दुर्दैवानं ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका मुक्त व मोकळ्या वातावरणात पार पडण्याची अजिबात शक्यता दिसत नाही. ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर फक्त आम्ही किंवा अन्य राजकीय पक्ष नाही तर त्यांचे समकक्ष असलेल्या दोन निवडणूक आयुक्तांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपचं बाहुलं आहेत. अशांना बदललंच पाहिजे. त्यांची उचलबांगडी, ‘एसआयआर’ रद्द करणं आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत पारदर्शकता आणणं या आमच्या तीन मागण्या कायम आहेत. त्यावर सीजेपी अजिबात तडजोड करणार नाही.
निवडणुकांना नाही, घोटाळयांना विरोध…
देशाचे संविधान मानता मग निवडणुकांवर बहिष्काराचं आवाहन का करता, असा प्रश्न मला विचारला जातो. निवडणुकांमध्ये घोटाळा किंवा मतचोरी होत असल्यास अशा निवडणुका का लढवाव्यात, असा माझा सवाल आहे. देशातील महत्त्वाच्या सर्व निवडणुकांमध्ये घोटाळा होतो. क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झाल्यास प्रत्येक चेंडू हा ‘नो बॉल’ नसतो. काही चेंडू स्विंग होतात आणि विकेट जाते. क्रिकेटचा सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला तरच लोक तो बघतील. दहा षटकातच सामना आटोपला तर लोक हा सामना बघणार नाहीत. तसंच इथं आहे. दोन – चार निवडणुका विरोधकांनी जिंकल्या की आपोआपच आवाज बंद होतो. पण सार्वत्रिक निवडणुका असो वा उत्तर प्रदेशसारखं एखादं महत्त्वाचं राज्य… त्या निवडणुका घोटाळे करूनच जिंकल्या जातात. महाराष्ट्राचंच उदाहरण बोलकं आहे. लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ आणि ‘महाविकास आघाडी’नं मिळवलेल्या मतांमधला फरक दोन टक्केच होता. विधानसभेत काय झालं ? भाजप व मित्र पक्षांनी एकतर्फी निवडणूक जिंकली. मतदारांची संख्या एवढी कशी वाढली यावर निवडणूक आयोगाला उत्तर देता आलेलं नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपला मदत करतात हे जगजाहीर आहे. त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपची मंडळी का पुढाकार घेतात? दोन समकक्ष निवडणूक आयुक्तच मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मनमानीला विरोध करतात यातून निवडणूक आयोग निष्पक्ष नाही हेच सिद्ध होतं. यामुळेच, माझा निवडणुकांना नाही, तर घोटाळा करून जिंकल्या जाणार्या निवडणुकांना विरोध आहे.
एका राजीनाम्याचे अनेक अर्थ
‘नीट’ किंवा अन्य परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ग्रामीण भागातून शहरात येणार्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना कर्ज काढावं लागतं. पुण्यात किंवा अन्य कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये राहाणंही आर्थिकदृष्ट्या कठीण असतं. अशा वेळी पेपरफुटी, मग फेरपरीक्षा यांचा विद्यार्थ्यांवर शैक्षणिक तसंच आर्थिक ताण येतो. त्याच्याशी सामना करणं हे मोठंच आव्हान असतं. ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीबद्दल आम्ही शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीमाम्याची मागणी करत होतो. सरकारनं दुर्लक्ष चालवलं होतं. वास्तविक या पेरफुटीमुळे २० विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. खरं तर, पहिल्या मृत्यूनंतरच प्रधान यांनी राजीनामा देणं आवश्यक होतं. ते झालं नाही. विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू झालं. दिल्लीत २० जुलैला पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. तरीही मुलं- मुली डगमगली नाहीत. उलट दुसर्या दिवशी परत हे विद्यार्थी तिथं हजर होते.
जंतर-मंतरवरील आंदोलनानं शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला याचा वेगळा फायदाही झाला. लोक उघडपणे व्यक्त होऊ लागले. ‘आमच्या शाळेची दुरवस्था दूर करा, रस्ते करा’ असे व्हिडिओ १० – १२ वर्षांची मुलं-मुली तयार करू लागले. हे सारं मी जंतर-मंतरवरच्या जून-जुलैतल्या आंदोलनाचं यश मानतो. एका राजीनाम्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. गेली १० -१२ वर्षे ज्या भीतीचं वातावरण होतं, ती भीती आता संपली आहे.
मग, मॅनेजमेंट कोट्या’चं काय?
मी आरक्षणाचा कधीच लाभ घेतला नाही, त्यामागचं एकमेव कारण म्हणजे, मला आजूबाजूला नेहमी ऐकायला मिळायचं की, तुझं तर मस्त आहे रे, तुला अभ्यास करायची काय गरज? तुझं तर कोट्यातून सहज होऊन जाईल. याला काय म्हणायचं? तुम्हाला आरक्षणाचा इतका राग का येतो? इतकं पोटात का दुखतं? मॅनेजमेंट कोट्याबद्दल मात्र तुम्हाला काहीच वाटत नाही. आरक्षणावर मात्र सगळे तुटून पडतात.
मी ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या बाजूनं आहे. परंतु, जिथं ३०-४० लाख रुपयांत जागा विकल्या जातात, त्या मॅनेजमेंट कोट्याविरुद्ध मात्र कुणी ब्र काढत नाही. माझ्या मते यामागचं मानसशास्त्रीय कारण खूप वेगळं आहे. एससी-एसटी समाजातील मुलं प्रामुख्याने ग्रामीण, वंचित भागातून, प्रतिकूल परिस्थितीतून येतात. त्यांच्याकडे पाहून तुम्हाला कधीही मत्सर वाटत नाही, की माझं आयुष्य याच्यासारखं असावं किंवा मला याच्यासारखं बनायचं आहे. उलट तिथं एक छुपा अहंकार असतो की, मी या लोकांसोबत का बसावं? यांनी माझ्या बरोबरीनं का शिकावं? पण याउलट मॅनेंजमेंट कोट्यातून आलेला मुलगा वा मुलगी अत्यंत श्रीमंत, गर्भश्रीमंत कुटुंबातून आलेली असते. अंगावर महागडे ब्रॅण्डेड कपडे, हातात महागड्या वस्तू. तिथे मात्र मत्सर जागा होतो, की काय भारी आयुष्यं आहे. मलाही असंच बनायचंय. हाच तो मानसिक फरक आहे, ज्यामुळे मॅनेजमेंट कोट्याविरूद्ध चकार शब्द काढत नाहीत. पण आरक्षणावर तुटून पडतात.
दुसर्याच्या त्रासात कसला आनंद?
सरन्यायाधीशांना ‘झुरळ’ हा शब्द सुचला नसता तर काय केलं असतं, या प्रश्नाचं सरळ उत्तर म्हणजे,अमेरिकेतच – कदाचित बोस्टनमध्ये एखादी चांगली नोकरी मिळवून तिथेच स्थिरस्थावर झालो असतो. कुटुंबियांनाही तिकडंच नेलं असतं. कारण इथलं विखारी वातावरण पाहून २०२२-२३ मध्येच मी या देशात न राहण्याचा निर्णय घेतला होता. विषारी किंवा विखारी वाटण्याचं कारण म्हणजे, दुसर्यांचं नुकसान होतंय यात लोक आनंद मानायला लागले होते… या अनेकांच्या आयुष्यात वा करिअरमध्ये काही चांगलं घडत नसेल. कारण नोकर्या नव्हत्या, लोकांची प्रगती थांबली होती; पण ते आनंद कशात मानत होतो? तर मुस्लिमांची घरं बुलडोझरनं पाडली जातायत यात. हे असं कुणा मुस्लिमाचं घर बुलडोझरनं पाडलं म्हणून माझं घर मोठं होणार आहे का? लोक दुसर्यांच्या दु:खात, त्रासात आनंद शोधत होते. हा समाज एका विचित्र दिशेनं जात असल्याचं दिसत होतं. मलाही भारतात चांगल्या संधी दिसत नव्हत्या. देशातील बेरोजगारीचा दर गेल्या ४० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर होता. हा समाज संवेदनशील, कनवाळू राहिलेला नाही. तो कमालीचा क्रूर आणि दुसर्यांच्या दु:खात आनंद मानणारा बनत चालल्याचं तीव्रतेनं जाणवलं.
संवेदनशीलता शिकवायला हवी
संवेदनशीलता हरवण्याचा कमी-अधिक प्रकार इतर देशांमध्येही, तिथल्या समाजांमध्येही होता, नाही असं नाही. परंतु, तिथला बहुसंख्य समाज कसा वागतो हे पाहावं लागेल. अमेरिकेत दोन वर्षे होतो. परंतु, तिथले लोक इतरांविषयी अधिक संवेदनशील आणि दयाळू असल्याचा अनुभव घेतला. मी स्वत: दलित आहे. बोस्टनमध्ये शिकत असताना भारतातून आलेली मुलं मी अमुक-तमुक जातीचा आहे, हे अत्यंत अभिमानानं सांगत. त्यांच्या त्या अभिमानाबद्दल माझ्या अमेरिकन मित्रांना कुतूहल वाटायचं. जातीव्यवस्था नेमकी आहे तरी काय, असं ते उत्सुकतेनं विचारत. त्यावर ‘आम्ही अमुक-तमुक घराण्यातून (क्लॅन) आलो आहोत’ असं ही भारतीय मुलं सांगत. मग मात्र अमेरिकन मुलं तोंडावर सांगत की, आपलं घराणं किंवा जातीविषयी अभिमानानं सांगणं अत्यंत चुकीचं आहे. ते खरंही आहे. ही जातीव्यवस्थाच अमानुष आहे. अमेरिका, युरोपमध्ये वर्णद्वेष आहे. नाही असं नाही. परंतु, तिथल्या मुलांमध्ये लहानपणापासूनच एक प्रकारची संवेदनशीलता रुजवली जाते. तसं आपल्याकडे नाही.
आपल्याकडे जातीवादाबद्दलची जाणीवजागृती म्हणजे काय, तर त्या विषयावर बोलायचंच नाही! आपल्या शाळांमध्ये तरी यावर कुठं शिकवलं जातं? पुस्तकात फक्त एकच ओळ असते… जातीभेद करणं हा गुन्हा आहे किंवा जातीभेद वाईट आहे, इतकंच. पण जातीभेद म्हणजे नक्की काय, तो कसा होतो हे मुलांना कोण समजावून सांगणार? आपल्याकडे मूळ मुद्द्यालाच पद्धतशीरपणे बगल दिली जाते. मुख्य विषयावर कुणी बोलतच नाही.
चांगल्या सुविधा? ते काय असतं?
सरकार ग्रामीण भागात दर्जेदार प्राथमिक शिक्षण देण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, बंगळूरुसारख्या शहरांमध्ये कसंही करून शिक्षण मिळून जातं. पण ग्रामीण भागात राहणार्या मुलांपर्यंत चांगलं शिक्षण पोहोचतच नाही. आम्ही ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेदरम्यान काही शाळांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. मुलींच्या स्वच्छतागृहाला साधी दारं नव्हती. एका आदिवासी आश्रमशाळेतील मुलींना विचारलं, ‘तुम्हाला इथे चांगल्या सोयी-सुविधा मिळतात का?’ त्यावर त्या मुली अगदी सहज म्हणाल्या, ‘हो, आम्हाला चांगल्या सुविधा मिळतात.’ मग मी त्यांना दुसरा प्रश्न विचारला, ‘पण मुळात ‘चांगल्या सुविधा’ म्हणजे काय असतं, हे तुम्हाला माहिती आहे का?’ यावर त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी विचारलं, ‘वसतिगृहात तुम्ही पलंगावर झोपता की जमिनीवर?’ त्या म्हणाल्या, ‘आम्ही जमिनीवर झोपतो.’ त्यावर मी त्यांना पुन्हा विचारलं, ‘तुम्हाला खाली झोपावं लागतंय, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता की इथे चांगल्या सुविधा आहेत?’ याच दरम्यान आश्रमशाळेत मुलांना साप चावण्याच्या घटनाही घडल्या होत्या. पुढं त्यांना विचारलं की, ‘एका खोलीत एकंदर किती मुली राहतात?’ तर त्या आदिवासी आश्रमशाळेत एका छोट्या खोलीत तब्बल २५ ते ३० मुली रहायच्या. मी स्वत: त्या खोलीत गेलो. तिथे मला पाच मिनिटंही उभं राहता आलं नाही, इतकी तिथे उकाडा होता. घुसमटल्यासारखं होत होतं. कारण, हवा खेळती राहण्याची कुठलीच व्यवस्था तिथे नव्हती. साधा पंखाही नव्हता. खोली पूर्णपणे कोंदट होती. पण तरीही त्या मुलींना वाटत होतं की, ‘आम्हाला चांगल्या सोयीसुविधा मिळतात’. कारण त्या लहान मुलांना मुळात ‘चांगलं काय असतं’ हे कधी पाहायलाच मिळालेलं नाही.
सीजेपीचा जन्म हा अपघातानं झाला, हे खरं आहे. विचार करून सुरुवात केली असती तर ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ पासून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली असती.
न्यास-नोंदणीला अद्याप यश नाही
सीजेपीसमोर निधीचा मोठा प्रश्न आहे. आमच्या आंदोलनाला कोणतीही कॉर्पोरेट मदत मिळाली नव्हती. दिल्ली विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी दुपारच्या तर एम्सच्या काही डॉक्टरांनी रात्रीच्या जेवणाचा खर्च उचलला होता. आंदोलनासाठी पिण्याचं पाणी चक्क दिल्ली पोलिसांच्या काही कुटुंबियांकडून येत होतं. एका लष्करी महिला अधिकार्यानंही स्वत:ची ओळख गुप्त ठेवून आंदोलनाला सर्वतोपरी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली होती. मी या संवेदनशील लोकांची नावं जाहीर करू शकत नाही, कारण नावं समोर आली तर सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करू शकतं. येत्या काळात न्यास म्हणून दिल्लीत नोंदणी करण्याचा आमचा विचार आहे. त्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नोंदणी केल्यानंतर लोकवर्गणीतून सीजेपीसाठी निधी जमा करण्याचा विचार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, हीच ‘पात्रता’?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर आधीच फुटला होता, तर सरकारने परीक्षा, मुलाखती आणि तात्पुरती निवड यादी का जाहीर केली, असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. केवळ मुख्यमंत्र्यांचे मित्र असणं हीच एमपीएससीच्या अध्यक्षांची एकमेव पात्रता आहे का आणि ते मित्र नसते तर त्यांना हे पद मिळाले असते का? यावरून स्पष्ट होते की, राज्यपालही केवळ मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या लोकांचीच अशा पदांवर नियुक्ती करतात आणि देशातील सर्व घटनात्मक संस्था आज सत्तेशी पूर्णपणे हातमिळवणी करून काम करत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पात्रता काय तर ते मुख्यमत्र्यांच्या जवळचे एवढीच !
…तर अराजकता माजेलच कशी?
देशातील तरुणांना पुरेशा संधी आणि नोकर्या न मिळणं हेच आजच्या सर्व आर्थिक आणि सामाजिक समस्यांच्या मागचं मूळ कारण आहे. आज २०-३० हजार रुपयांची नोकरी करणार्या तरुणाला मुंबईसारख्या शहरात घर भाडेतत्त्वावर किंवा विकत घेणं परवडू शकत नाही. तरुण पिढीकडे उपजीविकेचं नीट साधन नसणं हे अत्यंत चिंताजनक आहे. आमच्या आंदोलनामुळे अराजकता माजेल असं सरकार सांगतं. पण बहुसंख्य लोक बेरोजगार असतात आणि त्यांच्या आयुष्यात आशेचा कोणताही किरण उरत नाही, तेव्हाच खरी अराजकता पसरते हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे.
आईच्या डोळ्यांतली भीती पाहून राग येतो…
आंदोलनासाठी बाहेर पडायचं म्हटलं की आईच्या डोळ्यात एक भीती असते. एकदा आपला मुलगा घरातून बाहेर पडला की घरी परत येईल की नाही, या काळजीनं ती ग्रस्त असते. हे केवळ माझ्याच बाबतीत घडतं असं नाही. या आंदोलनात सहभागी होणार्या प्रत्येक मुलाच्या आईवडिलांच्या डोळ्यांत ही भीती आहे. पण, ही भीती कशासाठी ? हा देश आपला आहे; ही पोलीस व्यवस्था आपली आहे; तरीही मुलांच्या पालकांना भीती वाटते आहे, याचा मला सर्वाधिक राग येतो.
त्यांच्या दृष्टीने आपण झुरळंच…
सीजेपीच्या स्थापनेमागचा माझा खरा राग ‘झुरळ’ (कॉक्रोच) या शब्दावर होता. हा शब्द नेमकं काय दर्शवतो? तो केवळ तात्कालिक राग किंवा आक्रस्ताळेपणा नव्हता. तर सत्ताधारी आपल्याबद्दल नक्की काय विचार करतात, याचं ते जिवंत उदाहरण होतं. आपण झुरळांसारखे किंवा परजीवी कीटकांसारखे आहोत, असंच त्यांना वाटतं. ते आपल्याला त्यापेक्षा जास्त काही समजतच नाहीत! आज आपल्याकडे रस्त्यांवरील खड्ड्यात पडून, पुलाखाली दबून, रेल्वे अपघातात लोक मरतात. आजारी पडून दवाखान्यात जावं तर साधे बेड्स मिळत नाहीत. सरकारी रुग्णालयात लोक जमिनीवर, व्हरांड्यात पडलेले असतात. हे जगणं एखाद्या झुरळासारखं आणि परजीवी कीटकासारखं नाही, तर मग काय आहे? म्हणूनच, सरन्यायाधीशांनी पुढे त्या विधानाचा इन्कार केला असला तरी, ते विधान आजही या संपूर्ण व्यवस्थेची क्रूर मानसिकता दर्शवणारच आहे.
समान संधी नाही, तोवर गुणवत्ता हा भ्रम!
जात आणि गरिबी यांचा खूप जवळचा संबंध आहे. इतर जातींमध्ये गरीब नसतात, असं नाही. पण तुम्ही नोकर्यांमधलं त्यांचं प्रतिनिधित्व तपासून पाहा. आज आयएएस अधिकार्यांमध्ये किती आदिवासी आहेत? कुणी म्हणेल की, ते अभ्यासच करत नाहीत, म्हणून तिथं नाहीत, त्यांच्यात टॅलेंटच (बुद्धिमत्ता) नाहीये. पण मुळात हे टॅलेंट काय असतं? टॅलेंट हा एक केवळ भास किंवा भ्रम आहे. गुणवत्ता हा सुद्धा एक भ्रम आहे! मेरिट इज मिथ …..
जेईई, नीट यांसारख्या परीक्षांमधल्या टॉपर मुलांच्या कठोर परिश्रमांना मला कमी लेखायचं नाही, पण ते यश केवळ त्यांच्या अंगभूत टॅलेंटमुळे मिळालेलं नसतं, तर त्यांच्या विशेषाधिकारांमुळेही असतं. तुम्ही ज्या चांगल्या शाळांमध्ये जाता, तिथेच शिक्षणाबद्दल आणि शिकण्याबद्दल मानसिकता घडवली जाते. त्यानंतर तुम्हाला सर्वोत्तम कोचिंग क्लासेसमध्ये शिकायला मिळतं. हे सगळं ग्रामीण भागातल्या मुलांना मिळणं शक्य आहे का? जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्या मुलांना बसण्यासाठी साधे बाक नसतात. शिक्षक वेळेवर शिकवायला येत नाहीत. माझ्या गावाशेजारच्या एका शाळेत तर मुख्याध्यापकच खिशात देशी दारूची बाटली घेऊन येत. या शाळेत शिकणारी मुलं मुंबई-पुण्यात शिकणार्या मुलांशी स्पर्धा करू शकतील का? मग असं म्हणणार का, की ग्रामीण भागातल्या त्या मुलांमध्ये गुणवत्ता नाही ? तुम्ही गुणवत्तेवर तेव्हाच बोलू शकता, जेव्हा देशातील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षणाची समान संधी मिळेल. आधी ती सुनिश्चित करा, मग आपण गुणवत्तेवर मनसोक्त वाद घालू. पण तुम्ही संधीच्या समानतेवर न बोलता, गुणवत्तेविषयी बोलू शकत नाहीत. गुणवत्ता हे दुसरं काही नसून तुम्हाला मिळालेली साधनसामग्री आणि विशेषाधिकार आहेत. याचं सगळ्यात जिवंत उदाहरण मी स्वत: आहे! लोकांना वाटेल, मी हुशार होतो म्हणून अमेरिकेत गेलो. पण तसं नाहीये. हा केवळ एक अपघात होता. माझे वडील अभियंते असल्यानं, घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यानं, मी संभाजीनगरमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकू शकलो. पुढे पुण्यात जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकलो. थोडक्यात मी इतरांपेक्षा जास्त विशेषाधिकारप्राप्त होतो, हेच त्यामागचं खरं कारण आहे. पण, अजूनही माझ्यावर शैक्षणिक कर्ज आहे. माझे सख्खे चुलत भाऊ गावातच राहून मजुरी करत आहेत. माझी आत्या शेतात मोलमजुरी करते. माझा एक भाऊ बांधकाम मजूर म्हणून कामाला जातो, दुसरा शेतात घाम गाळतो, तर तिसरा वाहन चालक म्हणून काम करतो. आता आम्ही सगळे एकाच रक्ताचे आहोत, एकाच कुटुंबातून आलो आहोत. मग त्यांच्यात बुद्धिमत्ता किंवा टॅलेंट नव्हतं का? नक्कीच होतं! आमच्यात फक्त एकच फरक होता. ते हिंगोलीसारख्या अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण भागात लहानाचे मोठे झाले, तर मी संभाजीनगरसारख्या चांगल्या शहरात वाढलो. मला चांगल्या शाळेत शिकता आलं, दुर्दैवानं त्यांना ती संधीच कधी मिळाली नाही. आमच्या आयुष्यातला हाच एकमेव आणि सर्वात मोठा फरक आहे.
