कलाकाराने नेहमी व्यवस्थेला अस्वस्थ करण्याचं, हलवण्याचं काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांनी व्यक्त केली. ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम सोहळयात प्रमुख अतिथी म्हणून त्या उपस्थित होत्या. लेखक, दिग्दर्शक रावबा गजमल, लेखक दिग्दर्शक अजय पाटील आणि लेखिका प्रा. अपूर्वा भिलारे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

तरुण रंगकर्मी नेहमी एनएसडीसारख्या संस्थेत जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहतात, मात्र अशा नामांकित संस्थेत प्रवेश मिळाला नाही, तरी खचून जाण्याची गरज नाही. नाटक ही कला आपल्याकडे हजारो वर्षांपासून चालत आली आहे. लोक नाटक करता करता शिकत जातात. नाटकाचं औपचारिक प्रशिक्षण घेतलंच पाहिजे या कल्पनेवर बहुधा विसाव्या शतकात जोर दिला गेला. विविध प्रकारचे लोक नाटकाचा अभ्यास करू शकतील अशी जागा असली पाहिजे, या विचाराने एनएसडीसारख्या नाटय प्रशिक्षण संस्था उभारल्या गेल्या. त्या काळाच्या अनुषंगाने तो विचार अगदी योग्य होता. देशाच्या कानाकोपऱ्यांतून लोक एनएसडीमध्ये येतील, आपल्याबरोबर परंपरागत ज्ञान आणतील आणि त्याच्या जोडीने नव्याचा शोध घेतील. तिथल्या प्रशिक्षणात, तिथे सादर होणाऱ्या नाटकांत या साऱ्याचा अर्क उतरेल, अशी कल्पना त्यामागे होती. वास्तवातला अनुभव मात्र कल्पनेपेक्षा वेगळा होता.

 उद्देश किती सफल झाला?

मी एनएसडीत होते तेव्हा कर्नाटकातल्या पारंपरिक संगीत नाटयक्षेत्रात लोकप्रिय असलेले नाटयदिग्दर्शक आणि एनएसडीचे माजी विद्यार्थी व्ही. व्ही. कारंथ संचालक होते. तीन वर्षांचा अभ्यासक्रम होता. पहिल्या वर्षी सर्वांना एकसारखंच शिक्षण घ्यावं लागे. त्यानंतरची दोन वर्ष विद्यार्थ्यांनी अभिनय, दिग्दर्शन किंवा नाटकाच्या तांत्रिक बाजू (स्टेज क्राफ्ट – रंगभूषा, वेशभूषा, निर्मिती व्यवस्था, प्रकाशयोजना, नेपथ्य, इ.) यापैकी एका विषयात विशेष प्रावीण्य प्राप्त करणं अपेक्षित होतं. या पद्धतीत एक उतरंड निर्माण होत असे. अभिनय शिकणाऱ्यांना अधिक महत्त्व मिळे. दिग्दर्शक विचार करत बसत. एक प्रकारे ‘स्टार सिस्टिम’ तयार झाली होती. कारंथ यांनी ते चक्र तोडायचं ठरवलं. त्यांनी सर्व विषय तिन्ही वर्ष एकत्रित शिकवले जावेत, असा निर्णय घेतला. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला भलेही फक्त अभिनयात रस असेल, पण म्हणून प्रकाशयोजना वा भारतीय अभिजात नाटकांचा अभ्यास त्याला बुडवता येत नसे. नाटकाबद्दलची माणसाची सर्वांगीण समज वाढवण्याच्या उद्देशाने, एक माणूस म्हणून विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षणक्रम आखले गेले होते आणि हे उद्दिष्ट काही अंशी साध्यही झाले. 

 गुरू-शिष्य परंपरा महत्त्वाची..

नाटयशिक्षक घडवण्याची गरज आहे. आपल्याकडे पारंपरिक संगीत, नृत्यकला वा अगदी दशावतारासारखी लोककला पाहिली तर गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व आहे. ज्ञान- संस्कारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, जे एनएसडीत प्रत्यक्षात येईल, असं वाटलं होतं. थोडयाफार प्रमाणात ते शक्य झालं. 

 मला कोणी शिकवू शकत नाही

एनएसडीतील काळात मला एकच गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे मला कोणी शिकवू शकत नाही, पण मी शिकू शकते. तिथे आम्ही ३३ विद्यार्थी होतो. प्रत्येकाला नाटकात काम मिळणं शक्य नव्हतं. आमच्यासारखे काहीजण होते जे तिथल्या ग्रंथालयात पडीक असत. इतकं उत्तम ग्रंथालय उभारणं हे इब्राहिम अल्काझी यांचं एक मोठं योगदान. मला जे शिकायचं आहे ते वर्गात मिळत नसेल तर पर्यायी मार्ग काढणं गरजेचं होतं. नाटयक्षेत्रात अभियांत्रिकी वा वैद्यकीय अभ्यासक्रमांसारखे तयार अभ्यासक्रम नाहीत, जे पूर्ण करून नोकरी मिळवता येते. इथे तुमचा मार्ग तुम्हालाच शोधावा लागतो. त्यासाठी लोकांशी बोलणं, नाटक पाहणं, संहिता वाचणं, निरीक्षण गरजेचं असतं. तरुण कलाकारांपैकी कितीजण नाटक वाचतात? संहिता वाचायची नसेल, तर या क्षेत्रात येऊच नका. मला माझ्या या शोधयात्रेत सत्यदेव दुबेंसारखा मार्गदर्शक भेटला. त्यांनी मला नाटक काय असतं हे शिकवलं. आपण अशा बेभरवशी क्षेत्रात आहोत, जिथे आई-वडिलांकडून, समाजाकडून पािठबा मिळणं कठीण आहे. पण सगळीकडून मिळणारे नकार पचवूनही आपण नाटयक्षेत्रात आहोत, याचाच अर्थ मनाला समाधान देणारं काहीतरी इथे आहे, जे अन्यत्र नाही.

 मनातील साचे मोडावे लागतील

माझं कुटुंबच नाटकातलं असल्यामुळे काही प्रमाणात मला त्याचा फायदा झाला, म्हणजे मी कोणाला कामासाठी भेटायला गेले तर दीनाची मुलगी म्हणून किमान बसवून ऐकून घेत, एवढंच. त्यापलीकडे काही नाही. हेच माझ्या मुलांच्या बाबतीतही आहे, त्यामुळे तेही आज या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहेत.

मी स्वत: आधुनिक विचारांच्या कुटुंबात वाढलेली असल्याने मला कधीही एखादी गोष्ट करण्यासाठी परवानगी घ्यावी लागली नाही. तरीसुद्धा स्त्री म्हणून काहीएक प्रतिमा समाजातील अनुभवांतून, पुस्तकांतून, नाटकांतून मनात तयार होत जाते. ती इतकी पक्की होत जाते की खरं काय, हे आपण जाणूनच घेत नाही. मनातल्या द्वंद्वाशी आधी लढायला हवं. ते मला वेळीच लक्षात आलं नाही, त्यामुळे मी ठामपणे काही भूमिका घेतली, पण तोवर गोष्टी बदलल्या होत्या. या क्षेत्रात आजही महिलांना पुरुष कलाकारांपेक्षा कमी मानधन दिलं जातं. त्याच ताकदीची, लांबीची भूमिका असाली तरी कमी मानधन मिळतं. पटकथेतही स्त्रियांना फार कमी महत्त्व दिलं जातं.   

 ऐन विजयाच्या क्षणी आपण मागे फिरतो..

पूर्वी स्त्रिया नाटयनिर्मितीमध्ये फारशा नव्हत्या. विजयाबाई मेहता या आद्य स्त्री नाटयनिर्मात्या. माझी आई दीना पाठकने अहमदाबादमध्ये स्वत:ची नाटयसंस्था सुरू केली आणि कलाकार घडवले. आज अनेक स्त्रिया निर्मिती, दिग्दर्शन करतात. हे सकारात्मक आहे. स्त्री-पुरुष या दोघांच्या दृष्टिकोनातून कलाकृती घडली, तर ती एकांगी ठरणार नाही. पण भारतीय मानसिकता बदलत नाही. जिंकण्याच्या अगदी जवळ असताना आपण माघार घेतो आणि हरतो.

 समाजमाध्यमांवर आंधळा विश्वास नको

समाजमाध्यमांच्या मदतीने आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेक कलाकार करत आहेत. रील्ससारख्या प्रकारांनी अनेकांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली आहे. अल्पावधीत तुमची गोष्ट सांगा. यामुळे खरोखरच आपल्याला अगदी थोडक्यात आपलं म्हणणं मांडण्याची चांगली सवय लागेल. आपण पाल्हाळ लावतो. प्रेक्षक अगदी मूर्ख आहेत असं समजून आपण नाटकातही प्रत्येक भावना आपल्याला चेहऱ्यावर दाखवायची असते, खरंतर वास्तवात आपण भावभावना लपवायचा प्रयत्न करतो. समाजमाध्यमं कुठे कमी पडतात? तुमच्या कामाबद्दलचा प्रतिसाद तुम्हाला या माध्यमातून उशिरा मिळतो. नाटकात तुमचं काम आवडलं नाही तर लोक उठून जाताना तुम्हाला दिसतात. समाजमाध्यमांवर आपण लाइक्स-डिसलाइक्सवरून आपल्या कामाचं परीक्षण करतो, पण मुळात समोरच्याने ते खरंच पाहिलं आहे की नाही? का तो तोंडदेखलं लाइक देतो आहे, हे कळत नाही. समाजमाध्यमं आपल्याला थोडंफार मूर्खही बनवतात. हे वास्तव स्वीकारून समाजमाध्यामांचा उपयोग कसा करायचा, हे शिकायला हवं.

 नव्या माध्यमांचं भय का?

समाजमाध्यमांच्या मदतीने अभिनय शिकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, पण उत्तम अभिनय, उत्तम सिनेमा, नाटक पाहायचं असेल तर या माध्यमांच्या मदतीने ते तुम्हाला सहज शक्य आहे. आमच्या वेळी तो पर्याय नसल्याने वाचण्यावर किंवा संधी मिळेल तेव्हा प्रत्यक्ष नाटक बघण्यावर आमचा भर असे. दिग्गज कलावंत शंभू मित्रा एकदा मुंबईत त्यांची चार नाटकं सादर करणार होते. त्यांनी इडिपस राजाची भूमिका केली होती, खरंतर तोवर शंभूदांची दृष्टी फारच कमकुवत झाली होती, पण त्यांनी रंगमंचाचं मोजमाप घेतलं होतं, कुठून कुठे जायचं, कुठे थांबून संवाद म्हणायचे याची सगळी पक्की तयारी त्यांनी केली होती. त्या वेळी मी अवघ्या १२-१३ वर्षांची होते. नाटक फार समजत नव्हतं मला.. बंगाली भाषेत होतं ते.. पण त्यांनी जे केलं ते मनावर कोरलं गेलं आहे. जे सर्वोत्तम ते शोधण्याचं, पाहण्याचं काम आपण केलं पाहिजे. विजय तेंडुलकर यांचं एक नाटक पाहिलं की आपण त्याची वाहवा करतो, पण त्यांनी अन्य कोणती नाटकं लिहिली? त्याचा समाजावर काय परिणाम झाला? त्यांचं मराठी रंगभूमीवरचं स्थान काय, त्यांच्या नाटकांमुळे देशभरातलं वातावरण का ढवळून निघालं, हे जाणून घेतो का? ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्याचा इतिहास जाणून घेतलाच पाहिजे आणि त्यासाठी समाजमाध्यमांचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. त्यामुळे या नव्या माध्यमांचं भय बाळगण्यापेक्षा त्यांचा स्वत:च्या प्रगतीसाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे शोधलं पाहिजे.

 संधीसाठी तयार असायला हवं

आपल्याला जोवर यश मिळत नाही, तोपर्यंत आपण काहीतरी चांगलं केलं आहे यावर आपला विश्वास बसत नाही. त्यामुळे एखादा पुरस्कार किंवा कौतुक असं काहीतरी कलाकाराला नेहमी त्याच्या यशाचं परिमाण म्हणून हवं असतं. कला आणि यशाचा खरंतर असा संबंध असता कामा नये. इतरांच्या प्रतिसादात आपल्या यशाचं मोल शोधणं योग्य नाही, कारण तसं करत राहिलो तर आपण कायमच अस्वस्थ राहणार. मुळात, लोकांचा प्रतिसाद आपल्या हातातच नसतो. सतत स्वत:च्या कलेत सुधारणा कशी करता येईल, किती वेळात आणि किती हुशारीने मी ती करू शकेन, इतकंच तुमच्या हातात आहे. कदाचित लोकांकडून कौतुक मिळेलही, पण त्यामुळे पुढचं कामही मिळेल, याचा भरवसा नाही. ‘मला एक ब्रेक मिळायची खोटी की..’ अशा वल्गनांत तथ्य नसतं. चांगल्या संधीची वाट पाहावीच लागते, येणाऱ्या प्रत्येक भूमिकेबरोबर, नवं काही शोधत स्वत:त सुधारणा करत राहिलं पाहिजे. जेणेकरून जेव्हा संधी चालून येईल तेव्हा त्याचं सोनं करण्यासाठी तुम्ही तयार असाल. 

 कल्पनाशक्ती महत्त्वाची

कॅमेऱ्यासमोरचा अभिनय आणि रंगमंचावरचा अभिनय यात फरक असेल तर तो फक्त तांत्रिक बाबींचा आहे. कॅमेऱ्यात बघून काम करताना तांत्रिक बाजू लक्षात घ्यावी लागते आणि कुठलाही सर्वसामान्य माणूस थोडयाफार निरीक्षणाने ते साध्य करू शकतो. भूमिका करताना त्यामागची तयारी महत्त्वाची. पात्र जिवंत करायचं असेल, तर कलाकाराला ते आपल्या कल्पनेतून उभं करावं लागतं. कलाकाराचं काम हे पूर्णत: कल्पनेवर अवलंबून असतं. अभिनयाची व्याख्याच मुळात तशी आहे. समोरून येणाऱ्या गोष्टीला दिला जाणारा काल्पनिक प्रतिसाद म्हणजे अभिनय. एखादी जागा, बरोबर असलेली माणसं ही खरोखरच आपल्या नात्याची नाहीत, हे कलाकाराला माहिती असतं, पण चित्रपट किंवा नाटकाचा भाग म्हणून तो त्या नात्यांमध्ये जसा संवाद घडला असता तसा व्यक्त होतो. सगळंच खोटं असतं आणि तरीही ते पात्र कसं बोलेल, कसं वागेल, काय कपडे घालेल, कुठे लकबी वापरेल, याची कल्पना घेऊन ते खुलवावं लागतं आणि त्यासाठी तुमची निरीक्षण शक्ती महत्त्वाची असते. जग धुंडाळा, माणसं पाहा, अनुभवा, खुल्या मनाने सगळं समजून घ्या. बाकी नसीर म्हणतात तसं फिल्मी अभिनय म्हणा किंवा नाटकात केला

जाणारा अभिनय भडक आहे म्हणा.. त्याचा अर्थ एकच आहे की तो वाईट अभिनय आहे. तुम्ही कुठल्याही चौकटीत अडकलात की तुमच्या विचारशक्तीवर मर्यादा येतात. जोपर्यंत कुठल्याही साच्यात न बसता,

कुठल्याही एका विचारधारेत न अडकता काम कराल तितकं मोकळेपणाने काम करू शकाल आणि हे सगळयाच बाबतीत टीव्ही, मालिका, चित्रपट अगदी नाटकाच्या बाबतीतही सत्य आहे.

कलाकार हा नेहमी व्यवस्थेला अस्वस्थ करण्याचं, हलवण्याचं काम करतो. इतर लोक जे सांगत आहेत, तेच खरं मानणं, हो ला हो करणं यासाठी कलाकार नाही. तो प्रत्येक मुद्दयाविषयीचा वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कलाकाराला सामाजिक भान असलंच पाहिजे, त्याने प्रत्येक विषयावर बोललंच पाहिजे असं काही नाही. पण बोलण्यापेक्षा तुमच्या कामातून तुमची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. आपल्या भोवताली जे काीही घडत आहे ते समजून घेणं, त्यावर विचारमंथन करणं, चिंतन करणं आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुमचा विचार तुमच्या कामातून उतरवणं हे माझ्या मते खूप गरजेचं आहे.

टॅलेंट लाइज इन द चॉइसेस यू मेक..

हॉलीवूड अभिनेता रॉबर्ट डी निरो यांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात, ‘टॅलेंट लाइज इन द चॉइसेस यू मेक..’. गुणवत्ता वगैरे असं काही नसतं, नसीरही हे वारंवार सांगतात. नीरो यांनी ते अधिक स्पष्ट करून सांगितलं आहे, तुम्ही काय निवडता? लिहिताना, दिग्दर्शन करताना, अभिनय करताना.. तुम्ही काय निर्णय घेता? यातून तुम्ही घडत जाता. तुम्हाला स्वत:चं काही करायचं आहे की दुसऱ्याची नक्कल करायची आहे? आपल्या बाबतीत तर सगळीच गंमत आहे. आपलं आयुष्य, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, अनुभव इतके रसरशीत आहेत, पण त्यातून आपल्याला काहीच घ्यायचं नाही आहे. आपल्याला आपल्या आयुष्याची नक्कल करण्यापेक्षा अमिताभ बच्चन यांच्यासारखा अभिनय करायचा आहे, तो का? आपल्याला नक्कल नव्हे  अभिनय करायचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. 

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेला आल्यावर ऊर्जा मिळते. ‘लोकसत्ता’च्या प्रतिमेला साजेशी अशी ही स्पर्धा असते. लोकांकिकेच्या सुरुवातीच्या काही वर्षांत परीक्षण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून हा प्रवास पाहत आले आहे. – प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री

विविध भागांतील विद्यार्थ्यांना संबंधित भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते, हे स्पर्धेचे वैशिष्टय. मुंबईबाहेरचे रंगकर्मी काय विचार करतात,  हे स्पर्धेतून जाणून घेता येते. काही अविस्मरणीय क्षण गोळा करण्याची संधी मिळते. – तुषार दळवी, अभिनेता

माझी सुरुवात एकांकिकांमधून झाली, त्यामुळे ‘लोकसत्ता लोकांकिके’ला आवर्जून येत असते. ‘जेन – झी’कडून अनेक नवीन गोष्टी शिकता येतात. तरुणांच्या समस्या, विचार करण्याची पद्धत, तंत्राचा वापर, उत्तम सादरीकरण पाहायला मिळते. – मीना नाईक,  ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शक

जी एकांकिका मनात प्रश्न निर्माण करते, विचारप्रवृत्त करते, ती श्रेष्ठ. तसेच, एकांकिकेतून मांडलेला विषय, त्यातून मिळणारा आनंद, अनुभव हा पारितोषिकांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. ज्यांना एकांकिकेचा रोग लागतो, ते आयुष्यात यशस्वीच होतात. – प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ रंगकर्मी

मराठीचा वारसा पुढे न्यायचे काम विद्यार्थ्यांचे आहे. महाराष्ट्राबाहेर मराठीसाठी धडपड करणाऱ्या कलाकारांसाठी ‘लोकसत्ता’ने काहीतरी उपक्रम राबवावा, असे मनापासून वाटते.  – अशोक नायगावकर, ज्येष्ठ कवी

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत तंत्रज्ञान, विज्ञान, मनोव्यापार, नातेसंबंध इत्यादी विषय मांडले गेले. या स्पर्धामधून उद्याचे लेखक, दिग्दर्शक घडणार आहेत. लेखक घडविणे अत्यंत आवश्यक असल्याची जाणीव झाली. राजकीय, सामाजिक प्रश्न बदलले आहेत. ते प्रश्न पुढील स्पर्धेत दिसावेत. – नीरजा, कवयित्री

कुठलीही व्यावसायिक चौकट न बांधता, ही मुलं स्वत: बसवरती सेट चढवणं, तो उतरवून प्रयोगाच्या जागी लावणं हे कष्ट  उत्साहाने प्रयोग सादर करतात. मला या मुलांच्या जिद्दीचं प्रचंड कौतुक वाटतं. २००२ मध्ये एकांकिका स्पर्धा गाजवणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ११ जण मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून नावारूपाला आले आहेत.   – क्षितिज पटवर्धन, लेखक-गीतकार-दिग्दर्शक

एकांकिका हा अतिशय शुद्ध प्रायोगिक नाटयाचा फॉर्म आहे. रंगकर्मी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडत असतात. राज्यभरातून ‘लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.  – अभिनय बेर्डे, अभिनेता

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्तुत्य उपक्रमाचे गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने आयोजन केले जात आहे, यासाठी ‘लोकसत्ता’चे कौतुक आहेच. या स्पर्धेमुळे राज्यभरातील तरुण रंगकर्मीना मंच उपलब्ध होतो. ‘लोकांकिका’ स्पर्धा काळात सांस्कृतिक उपक्रमच राज्यभर सुरू असतो. – वैजयंती आपटे, नाटयनिर्मात्या

‘लोकसत्ता लोकांकिका’ हा तरुण पिढीला ऊर्जा देणारा उपक्रम आहे.  सर्वच संघांना नाटयक्षेत्रातील दिग्ग्जांसमोर कला सादर करता येते. यामुळे त्यांना अनेक संधी मिळतात. अतुल परचुरेंच्या नावे वाचिक अभिनयाचा पुरस्कार देऊन अतुलचा फार मोठा सन्मान ‘लोकसत्ता’ने केला आहे. – सोनिया परचुरे, नृत्यांगना

‘लोकसत्ता लोकांकिका’मुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. रंगभूमीशी संबंधित गोष्टी शिकता येतात. ‘लोकसत्ता’ दहा वर्षांपासून स्पर्धा आयोजित करत असून त्यामागे प्रचंड मेहनत आहे.‘लोकसत्ता’चे आभार. – देवेंद्र पेम, नाटयकर्मी

‘लोकसत्ता लोकांकिका’मुळे कला क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी लोकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनातून नवी पिढी समृद्ध होईल. इथे येणाऱ्या मान्यवरांकडून होतकरू कलाकारांना संधीही मिळू शकते. तरुणांच्या मनात नक्की काय सुरू आहे, याची कल्पना आली. – अजित भुरे, लेखक व दिग्दर्शक

‘महाराष्ट्राची लोकांकिका’ हा मान मिळवणे, हा आमच्या संघासाठी अविस्मरणीय क्षण आहे. या यशाचे श्रेय आमच्या लेखक, दिग्दर्शक, सर्व कलाकार व तांत्रिक सहकाऱ्यांना जाते. तसेच, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि नाटयमंडळ प्रमुख यांच्या प्रोत्साहनाबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत. हे यश पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा देणारे आहे. – जब वी मेटा संघ, सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम ( म. ल. डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले )

मंच हा नावीन्याला प्रोत्साहन देत असल्याची या स्पर्धेमुळे जाणीव झाली. या राज्यस्तरीय स्पर्धेतील यशामुळे जबाबदारी वाढली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत प्रथम येणे आमच्यासाठी फार अभिमानास्पद आहे. व्यावसायिक रंगभूमीसाठीही आम्हाला ‘लोकसत्ता’चे सहकार्य लाभणार आहे, हीदेखील आमच्या संघासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. – पराग ओझा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, विनय आपटे स्मृती पारितोषिक (जब वी मेटा)

गेल्या काही वर्षांपासून एकांकिकांसाठी संगीत संयोजनाचे काम करत आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’सारख्या प्रतिष्ठित स्पर्धेत पारितोषिक मिळणे ही आमच्यासाठी मानाची गोष्ट आहे. या यशात आमचा साथीदार संचित गायकवाड याचाही मोलाचा वाटा आहे. – अमेय चव्हाण, चिन्मय पंडित आणि सार्थ गवस, सर्वोत्कृष्ट संगीत (जब वी मेटा)

महाअंतिम फेरीसाठी तयारी म्हणजे रोजचा रियाजच होता. तालमीत रोज काहीतरी सातत्याने प्रयोग करत आम्ही ‘जब वी मेटा’ घडवत होतो. महाराष्ट्रातून पहिलं येणं अभिमानास्पद आहे. मला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी अविश्वसनीय क्षण आहे. जबाबदारीची भावना मनात घट्ट  बसली आहे. – शंतनू ढवळी, सर्वोत्कृष्ट अभिनय, (जब वी मेटा)

बऱ्याच वर्षांनंतर आम्ही एकांकिका स्पर्धेत सहभागी झालो आणि प्रथम पारितोषिक मिळाले. त्याचबरोबर मला परीक्षक पसंतीचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हे पारितोषिक मिळाले. या सर्व यशाचे श्रेय आमच्या संपूर्ण संघाला जाते. २०२६ मध्येही आमच्या एकांकिकेला असेच सातत्यपूर्ण यश मिळत राहावे, हेच आमच्या संपूर्ण टीमचे ध्येय आहे. – ऋतू मोरे, परीक्षक पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, (जब वी मेटा)

अंतिम फेरीत राज्यभरातून आलेल्या दर्जेदार एकांकिकांच्या सादरीकरणातून नाटकाविषयीची नवी दृष्टी मिळाली. अंतिम फेरीत मला परीक्षक पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेता हा सन्मान मिळणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यामुळे आत्मविश्वासही वाढला आहे. भविष्यात रंगभूमीवर अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. – प्रसाद फडके, परीक्षक पसंती सर्वोत्कृष्ट अभिनेता, फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी (तुकारामाची टोपी)

विद्यार्थी म्हणून ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा अनुभव खास होता. शिस्त आणि संघभावनाही शिकता आली. मला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. ही स्पर्धा आमच्या मेहनतीला योग्य व्यासपीठ देते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. – प्रांज्वळ पडळकर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (वामन आख्यान)

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा ही व्यवस्थापन व स्पर्धात्मक तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि वेळेचे नियोजन शिकण्याची संधी मिळते. विविध विषयांवरील सादरीकरणामुळे स्पर्धेची जाणीव होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आत्मविश्वास वाढवणारी आहे. – अनिकेत खरात, संघप्रमुख, सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय, मॉडर्न महाविद्यालय, पुणे (वामन आख्यान)

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आयोजक, परीक्षकांचे आम्हाला आपुलकीचे सहकार्य लाभले. या स्पर्धेचा अनुभव समृद्ध करणारा आहे. इथे नव्या विचारांच्या आणि वेगळया कलाकृतींच्या सादरीकरणाला प्रोत्साहन मिळते. ही स्पर्धा आम्हाला पुढेही सातत्याने सर्जनशील काम करण्याची प्रेरणा देत राहील. – केतकी भालवणकर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (वामन आख्यान)

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत आम्ही पहिल्यांदाच पोहोचलो. नियोजन चोख असल्याने स्पर्धा सुरळीत पार पडली. पुण्याहून येऊनही माझ्या संघाची धावपळ झाली नाही. स्पर्धेच्या शेवटी रत्ना पाठक शाह यांच्या मुलाखतीतूनही खूप शिकायला मिळाले. ही स्पर्धा फक्त बक्षिसाची शर्यत नसून ती एक शिकण्याची  संधी आहे. – विराज विवेक दिघे, अतुल परचुरे स्मृती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय,  (वामन आख्यान)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनेसाठी आमच्या संघाला पारितोषिक मिळाल्याने आनंद झाला. परीक्षकांनी केलेल्या महत्त्वाच्या सूचनांतून आम्हाला बहुमोल मार्गदर्शन मिळाले. यामुळे आम्हाला पुढील प्रयोगात बदल करता येतील. खासकरून मकरंद अनासपुरे यांच्याकडून संपूर्ण संघाला मोलाचे मार्गदर्शन लाभले.  – साई शिरसेकर आणि प्रथमेश जाधव, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय, नाशिक (राशोमोन)

‘थिम्मक्का’ या आमच्या एकांकिकेला महाअंतिम फेरीत सर्वोत्कृष्ट लेखकाचे पारितोषिक मिळाले. प्रयोगाच्या सादरीकरणानंतर अनेक जणांनी भेटून आम्हीही वृक्षारोपण करू असे सांगितले. ही आम्हाला मिळालेली पोचपावती होती.  -साईराज घोलप,  सर्वोत्कृष्ट लेखक ( थिम्मक्का )

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत मला सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे पारितोषिक मिळाले. थिम्मक्कांना त्यांच्या मुलांकडून (झाडांकडून) आदरांजली वाहिली. जाण्याच्या दृश्यात झाडांची पाने गळतात तेव्हा मिळालेली दाद आणि प्रयोगानंतर भेटून नेपथ्याचे केलेले कौतुक हे फार मोलाचे होते. -सिद्धेश नांदलस्कर, सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार (थिम्मक्का )

‘थिम्मक्का’ या एकांकिकेत मी प्रथमच मुख्य पात्र साकारले होते. अंतिम फेरीच्या दिवशी या स्पर्धेतील ऊर्जा अनुभवास आली. प्रेक्षकांची दाद माझ्यासाठी फार मोलाची आहे. परीक्षक पसंती अभिनयाचे पारितोषिक मिळाले याचा आनंद आहेच. – अपर्णा घोगरे, परीक्षक पसंती अभिनय (थिम्मक्का)

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेतून पुढे येऊन लेखन-दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवणारे रावबा गजमल,  प्रा. अपूर्वा भिलारे आणि अजय पाटील यांनी रत्ना पाठक शाह यांच्याशी नाटयक्षेत्राशी संबंधित विविध मुद्दयांवर चर्चा केली.