शहाजी उमा बाजीराव मोरे
सर्व सजीवांतील चैतन्य किंवा जिवंतपणास कारणीभूत असलेल्या रायबोझोम या पेशीतील घटकाविषयी अत्यंत महत्वपूर्ण संशोधन करणाऱ्या ॲडा योनाथ या इस्रायलच्या पहिल्या व जगातील रसायनशास्त्रातील आठपैकी चौथ्या नोबेल पारितोषिक विजेत्या महिला! कमालीची जिद्द, पराकोटीची चिकाटी, प्रखर बुद्धिमत्ता, अपार कष्ट करण्याची मानसिकता असलेल्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्या ॲडा योनाथ या इस्रायलच्या महिला शास्त्रज्ञ होत्या. त्यांचे ३१ ऑगस्ट, २०२६ रोजी निधन झाले. त्यांच्या आधी नोबेल पारितोषिकांच्या १०९ वर्षांच्या इतिहासात (२००९ पर्यंत) केवळ तीनच महिला हे पारितोषिक मिळवू शकल्या.
सूक्ष्म जीवाणूंपासून मोठ्या प्राण्यांपर्यंत सर्वच सजीवांच्या शरीरात रायबोझोम्स असतात. ते शरीरास आवश्यक प्रथिने बनविण्याचे कार्य करीत असल्यामुळे त्यांना ‘पेशींमधील प्रथिनांचा कारखाना’, असे संबोधले जाते. डी.एन.ए. (डीऑक्सी रायबोन्युक्लिक ॲसिड) हे तसे निष्क्रिय असते; परंतु त्यांच्यामध्ये प्रथिने बनविण्याची माहिती असते. ही माहिती वाचून, नंतर प्रत्यक्ष क्रिया करून रायबोझोम प्रथिनांची निर्मिती करतात.
कोणताही सजीव रायबोझोमशिवाय जगू शकत नाही, रोगजंतूही! त्यामुळेच अपायकारक जीवाणूंच्या रायबोझोम्सना औषधांचे लक्ष्य (टार्गेट) केले जाते. आजची बहुतांश प्रतिजैविके ज्या जीवाणूंमुळे आजार झालेला असतो त्या जीवाणूंच्या रायबोझोम्सवरच हल्ला करतात. त्यामुळे तो रोगकारक जीवाणू जगू शकत नाही व रुग्ण बरा होतो; परंतु प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) वाढत्या वापरामुळे सध्या त्यांचा प्रभाव कमी होत चालला आहे. अनेक जीवाणू आता प्रतिजैविकांना दाद देत नाहीत.
रायबोझोम प्रथिने कशी निर्माण करतात हे १९६० नंतरच्या काळातसुद्धा एक कोडेच होते. डी.एन.ए.मधील प्रथिन निर्मितीविषयीच्या जनुकीय संकेतांची आर.एन.ए.च्या रेणूमध्ये कॉपी केली जाते. त्या आर.एन.ए.ला मेसेंजर आर.एन.ए. असे म्हणतात. हा एम.आर.एन.ए. पेशी केंद्रकाच्या बाहेर येतो व रायबोझोम त्याला पकडतो. त्याच्यावर कॉपी केलेला संदेश ‘वाचतो’ व प्रथिनांची निर्मिती केली जाते; परंतु रायबोझोम रेणू प्रथिननिर्मितीचे कार्य रेण्वीय स्तरावर कसे करतात हे एक गूढच होते. ते उकलण्यासाठी त्या रेणूची रचना पूर्ण व बारकाव्यानिशी समजायला हवी. डॉ. ॲडा योनाथ यांनी सर्वप्रथम १९६०-७० या काळात त्या दृष्टीने पथदर्शी व अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी रायबोझोमचा क्ष-किरण स्फटिकशास्त्राच्या (एक्स-रे क्रिस्टलोग्राफी) साहाय्याने अभ्यास केला. क्ष-किरण स्फटिकशास्त्राद्वारे अभ्यासासाठी पदार्थाचे परिपूर्ण असे स्फटिक असावे लागते; परंतु प्रथिनांचे उत्तम प्रकारचे स्फटिक मिळविणे हे फारच अवघड काम होते; शिवाय जितका मोठा रेणुसमुदाय (मॉलेक्युलर कॉम्प्लेक्स) तितके अवघड त्याचे स्फटिक मिळविणे असते.
प्रथिनांमध्ये लक्षावधी अणू असतात. योनाथ यांना या प्रत्येक अणूचे रायबोझोममधील नेमके स्थान शोधायचे होते. त्या काळी विज्ञानात आजच्याएवढी प्रगती झाली नव्हती. त्यामुळे योनाथ यांचे काम जवळजवळ अशक्यच, असे त्या काळच्या अनेक शास्त्रज्ञांना वाटत होते आणि खरोखरीच ते तसे वाटण्यासारखे होते. सामान्य तापमानाला राहणाऱ्या प्राण्यांमधील रायबोझोम्स अतिशय नाजूक असावेत व विपरीत किंवा खडतर परिस्थितीत जगणाऱ्या जीवाणूंमधील रायबोझोम्स त्यांच्या संशोधानासाठी योग्य असे त्यांना वाटले. त्या मुळे त्यांनी उष्ण पाण्याच्या झऱ्यामध्ये, म्हणजेच सुमारे ७५ अंश सेल्सिअस तापमानात जगणाऱ्या ‘जिओबॅलिलस स्टिरोथर्मोफिलस’ या जीवाणूवर संशोधन सुरू केले. १९८० मध्ये रायबोझोमच्या एका भागाचे (सबयुनिट) त्रिमितीय (थ्री-डायमेन्शनल) स्फटिक मिळविण्यात यशस्वी झाल्या. त्या स्फटिकाच्या क्ष – किरण स्फटिक शास्त्रानुसार अभ्यास करण्याकरिता त्याच्या क्ष किरण प्रतिमा घेण्यात आल्या. परंतु या क्ष-किरण प्रतिमा पुरेशा स्पष्ट नव्हत्या मग त्यांनी मृत समुद्रातील सूक्ष्मजीव हॅलोॲर्क्युला मरिस्मोर्तुई मधील रायबोझोम मिळविले व त्याच्यापासून स्फटिक बनवून मिळविलेल्या क्ष-किरण प्रतिमांनी त्यांचा मार्ग मोकळा केला.
रायबोझोमचे मिळविलेले स्फटिक अतिशय नाजूक असत. सामान्य तापमानाला ते टिकून रहात नसत म्हणून योनाथ यांनी त्यांना उणे १८५ अंश सेल्सियस तापमानापर्यंत थंड वातावरणात ठेवले. स्फटिक अतिथंड करून त्यांचा क्ष किरणाद्वारा अभ्यास करण्याची नवी पद्धत किंवा शाखा क्रायो बायो क्रिस्टलोग्राफी (अतिशित जैव स्फटीकशास्त्र) योनाथ यांच्यामुळे उदयास आली. १९८० ते १९९० च्या दशकांमध्ये त्यांच्या प्रयोगशाळेत अधिकाधिक गुणवत्तेच्या रायबोझोमच्या प्रतिमा मिळू लागल्या. याच काळात भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन – ब्रिटीश शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन व अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ थॉमस स्टिईस यांनी रायबोझामविषयी संशोधन सुरू केले. १९९१ मध्ये त्यांनी मिळविलेल्या रायबोझोम्सच्या मोठ्या घटकाच्या क्ष-किरण प्रतिमा अतिशय उत्कृष्ट होत्या. त्यानंतर इतर शास्त्रज्ञ या विषयावर संशोधनासाठी उतरले, व २००० मध्ये रायबोझोम्सच्या लहान व मोठ्या घटकांच्या क्ष – किरण प्रतिमांविषयी शोधनिबंध प्रकाशित केले.
रायबोझोमवरील संशोधनात हे फारच महत्त्वपूर्ण होते. अगदी मैलाचा दगड म्हणतात असे ! योनाथ यांनी संशोधन सुरू केले तेव्हा अनेक शास्त्रज्ञ साशंक होते; परंतु आता अनेक शास्त्रज्ञांनी या क्षेत्रात संशोधनास प्रारंभ केला. शास्त्रज्ञांना आता खात्री वाटत होती की, रायबोझोमच्या रचनेचा नकाशा (मॅप) मिळविता येऊ शकतो. त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर २००० मध्ये योनाथ, स्टिइझ व रामकृष्णन यांनी आपल्या संशोधनावरून रायबोझोमच्या स्फटिक रचनेविषयी शोधनिबंध लिहिले. यामध्ये सादर केलेली रायबोझोमची स्फटिक रचना अधिक स्पष्ट होतीच. शिवाय रायबोझोममधील अणूंच्या स्थानाविषयी माहिती मिळत होती. या तिघांच्या संशोधनामुळे रायबोझोमचा अतिशय सूक्ष्म आकारातील (अण्विक स्तरावर) नकाशा बनविता येऊ शकतो हे निश्चित झाले. या तिघांच्या प्रयत्नातून, संशोधनातून रायबोझोमच्या अगदी उच्च दर्जाच्या किंवा अगदी स्पष्ट दिसणाऱ्या प्रतिमा मिळाल्या. या प्रतिमांमुळेच नवीन प्रतिजैविके बनविण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या सशोधनाचा व्यावहारीक प्रभाव साथरोगाविषयीच्या वैद्यकीय क्षेत्रात तात्काळ दिसून आला. या संशोधनाबद्दल या तिघांना २००९ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.
इस्रायलमधील जेरुसलेममध्ये २२ जून १९३९ रोजी ॲडा योनाथ यांचा ज्यू धर्मीय अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. ॲडा लिफ्शीट्झ हे त्यांचे विवाहपूर्वीचे नाव. त्यांचे आई – वडील पोलंडमधून सध्या जे इस्रायल आहे तेथे ॲडांच्या जन्मापूर्वी सहा वर्षे स्थलांतरीत झाले होते. ॲडा यांच्या वडिलांचे त्या ११ वर्षाच्या असतानाच निधन झाले. त्यांचे कुटुंब त्यांच्या मावशीच्या घरीच रहात असे. वडिलांच्या निधनानंतर ॲडा यांचे कुटुंब तेलअवीवमध्ये आले. त्यांच्या आईने अर्थखात्यात कारकून म्हणून नोकरी मिळविली. त्यांचे वेतन कुटुंबाला पोसण्याऐवढे व शिक्षणासाठी पुरेसे नव्हते. एकदा आपल्या आईला काम करताना त्यांनी पाहिले. आपल्या आईला साधी गणिती आकडेमोड करता येत नाही हे पाहून ॲडा यांना धक्काच बसला. ‘या प्रकारचे ज्ञान, आकलन आणि कौशल्ये मला फार महत्वाची वाटतात,’ असे त्या म्हणाल्या होत्या. ॲडाची चाचणी परीक्षेतील प्रगती पाहून त्यांना तेलअवीव मधील उच्चभ्रूंसाठी असलेल्या माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला. परंतु शाळेची फी आणि दोघा बहिणींचा शिक्षण खर्च भागायची मारामारी. त्या जात्याच गणितात हुशार असल्यामुळे त्यांनी आपल्याच वयाच्या मुलांना गणित व इतर विषय शाळा सुटल्यानंतर व सुट्टीच्या दिवशी शिकवून कुटुंबाला आर्थिक हातभार लावला. त्यानंतर सक्तीचे सैन्य प्रशिक्षण व सेवा संपल्यानंतर त्या जेरुसलेमला परतल्या व १९६२ मध्ये रसायनशास्त्राच्या पदवीधर व १९६४ मध्ये हिब्रू विद्यापीठाची जैवभौतिकशास्त्रातील पीएच.डी. पदवी संपादित केली. पीएच.डी. पश्चात (पोस्ट डॉक) संशोधनासाठी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व कार्नेजी मेलॉन युनिव्हर्सिटी, पिट्सबर्ग या नामवंत शिक्षण व संशोधन संस्थांमध्ये दोन वर्षे संशोधन करून त्या इस्रायलच्या रेहोवोत येथील वैझमन इन्स्टिटयूटमध्ये परतल्या. तिथे त्यांनी प्रोटीन क्रिस्टलोग्राफी प्रयोगशाळा उभारली व आपले रायबोझोमवरील संशोधन सुरू केले. परंतु या प्रयोगशाळेसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसे. म्हणून योनाथ जर्मनीला गेल्या. प. बर्लीनमधील मॅक्स प्लॅक इन्स्टिट्यूट ऑफ मॉलेक्युलर जिनेटिक्समध्ये अनेक प्रजातीच्या रायबोझोमवर संशोधन केले जात होते. तेथे रायबोझोमवरील आपले संशोधन त्यांनी सुरु केले.
पुढे जर्मनीतील हॅम्ब्युर्ग येथील मॅक्स प्लॅक रिसर्च इन्स्टिट्यूट शाखेशी सहयोग (कोलॅबोरेशन) करून तेथे रायबोझोमवरील संशोधन केंद्र सुरू केले. आपल्या संशोधनासाठी त्यांनी रहोवोत ते हॅम्ब्युर्ग सतत प्रवास करावा लागत असे. रायबोझोमवरील संशोधनासाठी त्यांना कष्टप्रद व सहनशीलतेची मर्यादा पाहणारे तब्बल २५ हजार प्रयोग करावे लागले.
प्रतिजैविकांच्या (अँटीबॉयोटिक्स) वाढत्या वापरामुळे अनेक रोगजंतू प्रतिजैविकानांही दाद देत नसत. त्याकाळी प्रतिजैविकांचे निर्माते संशोधक अंधारातच काम करीत होते. रोगजंतूंचा रायबोझोम मानवी पेशीतील रायबोझोम न मारता मारला गेला पाहीजे. मानवी रायबोझोम्सना अपाय न करता जीवाणूंचा रायबोझोम मारण्यात यश आले ते योनाथ यांच्या संशोधनामुळे! त्यामुळे औषधनिर्माते नव्याने औषध निर्मिती करायला लागले तर पूर्वीच्या औषधात आवश्यक त्या सुधारणा किंवा बदल करू शकले. त्यामुळेच अनेक साथ रोगावर प्रभावी प्रतिजैविके निर्माण करता येत आहेत. याचे फार मोठे श्रेय जाते ते ॲडा योनाथ यांनाच! नोबेल पारितोषिकांशिवाय त्यांना इतर अनेक जागतिक पारितोषिके व सन्मान प्राप्त झाले.
योनाथ केवळ संशोधानातच रमल्या असे नाही तर त्यांनी वेळोवेळी इस्रायलमधील सामाजिक, राजकीय परीस्थिवर लक्ष ठेवून असत. गरज पडेल तेव्हा त्यांनी आपला आवाज उठवला व परखड शब्दांत नेत्यानाहू सरकारला सुनावले. वैज्ञानिक संशोधनाइतकीच त्यांची सामाजिक आणि राजकीय मतेदेखील अत्यंत स्पष्ट, धाडसी होती. त्या इस्रायलमधील उजव्या विचारसरणीच्या राजकारणाच्या तीव्र टीकाकार मानल्या जात होत्या. त्यांचा मानवतावादी दृष्टीकोनही पराकोटीचा होता. २००९ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर लगेचच त्यांनी एका मुलाखतीत ‘इस्रायलने आपल्या तुरुंगातील सर्व पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी, मग त्यांनी इस्रायली नागरिकांवर हल्ले केले असले तरीही,’ असा मनोदय व्यक्त केला.
इस्रायल सरकारने २०२३ मध्ये आणलेल्या वादग्रस्त न्यायिक बदलांविरोधात त्यांनी इतर ६ नोबेल विजेत्यांसह एक खुले पत्र प्रसिद्ध केले होते. या कायद्यांमुळे देशातील लोकशाही धोक्यात येईल आणि उच्च शिक्षण संस्थांवर नकारात्मक परिणाम होईल, सरकार किंवा धार्मिक संघटना वैज्ञानिक संशोधनात हस्तक्षेप करतील असा इशारा त्यांनी दिला होता. ॲडा योनाथ या केवळ प्रयोगशाळेपुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक वर्गाने उभारलेल्या ‘लोकशाही नाही, शिक्षणक्षेत्र नाही’ (नो डेमोक्रॅसी, नो अॅकेडेमिया) या मोहिमेचे त्यांनी नेतृत्व केले. अशा शास्त्रज्ञाची आज भारतालाही गरज आहे. ॲडा योनाथ यांनी आपण स्त्री असल्याचे महत्वाचे मानले नाही. त्या म्हणत, ‘मी शास्त्रज्ञ आहे, ना पुरुष, ना स्त्री, फक्त शास्त्रज्ञ!’
त्या स्वतः अत्यंत गरीब कुटुंबातून आल्या होत्या. त्यांचे असे मत होते की समाजात महिलांना विज्ञानाकडे वळण्यासाठी पुरेसे प्रोत्साहन मिळत नाही. करिअरसाठी कुटुंब न सांभाळण्याच्या कल्पनेशी त्या असहमत होत्या. त्यांच्या मते, ‘कुटुंब किंवा अपत्य असणे ही शिक्षा नसून निसर्गाने महिलांना दिलेला एक सुंदर विशेषाधिकार आहे आणि संशोधानासोबतच कुटुंब सांभाळणे शक्य आहे.’ त्यांनी आपल्या रायबोझोमवरील संशोधनास प्रारंभ केला तेव्हा अनेक शास्त्रज्ञांनी त्यांची चेष्टा, कुचेष्टा केली. रायबोझोम व त्यावरील संशोधन त्याकाळी होतेच तसे म्हणा! परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. रायबोझोमवरील संशोधनाचा त्यांचा प्रकल्प म्हणजे ‘डेड एंड’ आहे, असे इतर सहकारी म्हणत. तर काही त्यांना ‘त्यांच्या रायाबोझोम्वरील संशोधनाचा प्रवास संपण्यापूर्वी तुझा प्रवास संपेल’, असे म्हणून प्रचंड नाउमेद करत. असे शेरे ऐकूनसुद्धा आपल्या निश्चयापासून मागे न फिरणाऱ्या योनाथ सलाम व श्रद्धांजली!
shahajibmore1964@gmail.com
