-डॉ. गिरीश पिंपळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी फार उत्तुंग नसली, तरी आपण जी काही पदके जिंकली, त्यांचा आपल्याला सगळ्यांनाच अभिमान आहे आणि ते अगदी स्वाभाविक आहे. परंतु दरवर्षी जुलै / ऑगस्टमध्ये आपला देश दुसऱ्या एका क्षेत्रातही अनेक पदके जिंकत असतो. ती असतात जागतिक पातळीवरच्या विज्ञान आणि गणित ऑलिम्पियाड या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिळवलेली. या परीक्षा शालेय / कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात. त्यांचे अनेक टप्पे असतात. यापैकी सुरवातीचे टप्पे भारतात पार पडतात आणि अगदी तावून सुलाखून मोजक्या भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीसाठी निवड होते. प्राथमिक स्तरांवर विद्यार्थ्यांचे परीक्षण करण्याचे काम होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स, कानपूर या प्रतिष्ठित संस्थातर्फे करण्यात येते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि गणित या विषयांची ऑलिम्पियाड घेतली जातात. शालेय स्तरावरच मुलांना मूलभूत विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांनी पुढे यापैकी एका विषयात करियर करावे या उद्देशाने या स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन जागतिक स्तरावर करण्यात येते. ‘ऑलिम्पियाड’मधली कामगिरी आपल्या देशाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे या अत्यंत आव्हानात्मक आणि बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या परीक्षेत आपले विद्यार्थी दरवर्षी पदकांची लयलूट करतात! यावर्षी देखील ही परंपरा सुरू राहिली आहे. याबाबतच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. यावर्षी इराण मध्ये झालेल्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ४३ देशांतील १९३ विद्यार्थी सहभागी झाले होते. या ऑलिम्पियाडमध्ये भारताने दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदके पटकावली आहेत. पदकांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाच्या भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमधील गेल्या २५ वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला तर तो अतिशय अभिमानास्पद आहे. आपल्या देशाने ४१ टक्के सुवर्ण, ४२ टक्के रौप्य आणि ११ टक्के कास्य पदके जिंकली आहेत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाड यावर्षी सौदी अरेबियामध्ये पार पडले. त्यात आपल्या संघाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य पदक संपादन केले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या गणित ऑलिम्पियाडमध्ये आपली कामगिरी खूपच सरस ठरली आहे. त्यात आपण चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले आहे. शिवाय एका विद्यार्थ्याला विशेष गुणवत्ता प्रशस्तिपत्र मिळाले आहे. गणित ऑलिम्पियाडमध्ये भारताची ही आत्तापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी आहे. जीवशास्त्र या विषयातदेखील आपले विद्यार्थी आघाडीवर आहेत. यावर्षी एक सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांचे ते मानकरी ठरले आहेत. खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही सातत्याने अनेक वर्षे भारतीय संघ सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके संपादन करत आला आहे. हेही वाचा.उपवर्गीकरण समतेसाठी नव्हे; समरसतेसाठी! डॉक्टर, इंजिनियर की संशोधक? हे सगळे विस्ताराने सांगायचे कारण एका प्रश्नामध्ये सामावलेले आहे. हे विद्यार्थी पुढे जातात कुठे? म्हणजे ते मूलभूत विज्ञानात करियर करतात का? अगदी थोडे अपवाद सोडले तर दुर्दैवाने त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. म्हणजे ‘कॅच देम यंग’ ही गोष्ट त्यांच्या बाबत शक्य होत नाहीये. का होते असे ? याचे उत्तर सोपे आहे. आपल्या समाजात चांगले करियर करणे याचा अर्थ ‘डॉक्टर किंवा अभियंता होणे’ इतका मर्यादित आहे. पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालाच्या वेळी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होत असे. या यादीत आलेला एकही मुलगा किंवा मुलगी ‘मला वैज्ञानिक व्हायचे आहे’ असे म्हणत नसे. आजही होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (KVPY) अशा काही परीक्षा घेतल्या जातात. पण यात यशस्वी होणारे फारच थोडे विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे वळतात. आयआयटी प्रवेशासाठी जेइइ घेतली जाते. पण या मार्गाने जाऊन आयआयटीमध्ये एमएस्सी, पीएच.डी. करता येते हे बहुतेकांना माहीतच नसते किंवा माहीत असले तरी त्यांना त्या वाटेने जायचेच नसते. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी आयसर (IISER – Indian Institute of Science Education and Research) नावाच्या संस्था देशात काही ठिकाणी निर्माण केल्या. हुशार विद्यार्थी मूलभूत विज्ञानाकडे वळावेत यासाठी या संस्था स्थापन झाल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही बंगलोरची नामवंत संस्था बारावीनंतर एमएस्सीसाठी प्रवेश देते हे किती जणांना ठाऊक असते ? भारताने अंतराळ क्षेत्रात अक्षरशः गरुडभरारी घेतली आहे. आपले अंतराळयान चंद्रावर पोहोचले. आदित्य एल-१ यान सूर्याचा अभ्यास करत आहे. या सर्व प्रगतीबद्दल आपण मोठ्या अभिमानाने बोलतो. पण आपली मुले वैज्ञानिक व्हावीत असे प्रयत्न मात्र करत नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) इतक्या वेगाने प्रगती करत आहे की या क्षेत्रात आपला देश जगातील पहिल्या चार देशांमध्ये समाविष्ट झाला आहे. या संदर्भात केंद्र सरकारने २००७ मध्ये एक अतिशय महत्वाचे पाऊल उचलले. ते म्हणजे इस्रोला लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी त्रिवेंद्रम येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी (IIST) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था म्हणजे एक अभिमत विद्यापीठ असून तेथेसुद्धा मूलभूत विज्ञानात शिक्षण घेता येते. सबसे बडा रुपय्या… विज्ञानासाठी इतक्या समर्पित संस्था उभ्या राहिल्या आहेत, मोठा निधी उपलब्ध आहे तरीही हुशार विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियर करावेसे वाटत नाही. त्याला वाटले तरी पालक त्या गोष्टीला साधारणपणे परवानगी देत नाहीत. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे ‘उत्तम करियर म्हणजे मोठे पॅकेज मिळवणे’ अशी आपल्या समाजाची ठाम धारणा आहे आणि ते अभियंता होऊन मिळवता येते; संशोधक होऊन नाही. ‘ये रे ये रे पावसा’ ही कविता कधीच कालबाह्य झाली आहे. आता ‘ये रे ये रे पैसा’ हेच आमच्या जीवनाचे ध्येय झाले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी अतिशय मार्मिक विधान केले आहे. ते म्हणतात, “ पृथ्वी सूर्याभोवती फिरत नाही; ती रुपयाच्या नाण्याभोवती फिरते…” या विधानाचा प्रत्यय करियरबाबत नेहमीच येत असतो. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना १२ / १४ तास अक्षरशः राबावे लागते. त्यांना वैयक्तिक / कौटुंबिक आयुष्य रहात नाही. स्वत:च्या लग्नासाठीसुद्धा पुरेशी रजा मिळत नाही! संशोधक म्हणून काम करताना उलट स्थिती असते. कामाच्या वेळा निश्चित असतात. संशोधनातून मिळणारा बौद्धिक आनंद आणि समाधान याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. पगार अभियंत्याच्या पगाराइतका लठ्ठ नसला तरी चांगला असतो. आपले संशोधन प्रकल्प पुरे करण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध होतो. परदेशात जाण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. खरे तर मूलभूत संशोधनाचे मोल काय आहे याचा अनुभव आपण कोविड काळात घेतला आहे. या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी मूलभूत विज्ञानच कोविडवरच्या लशीच्या रूपाने मानवजातीच्या मदतीला धावले आहे. त्याने मानवजात जिवंत ठेवली आहे. हेही वाचा.लेख: मूल्यांकन निकषांबरोबरच शिक्षणही नको बदलायला? संशोधनाला प्राधान्य हवे इतरत्र कुठेच प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्याने बीएस्सीला प्रवेश घ्यायचा ही आपली धारणा साफ चुकीची आहे. त्यामुळे आणि आधी सांगितलेल्या कारणांमुळे आपल्या देशात वैज्ञानिकांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. नोबेल पारितोषिक म्हणजे या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान. १९०१ साली पहिले नोबेल पारितोषिक दिले गेले. म्हणजे या गोष्टीला आता १२३ वर्षे झाली. या काळात या भारत देशात अब्जावधी लोकांनी जन्म घेतला. पण इतक्या प्रदीर्घ इतिहासात अवघ्या एका भारतीय वैज्ञानिकाला हा सन्मान प्राप्त झाला. ही घटना फार वेदनादायी आणि खोलवर विचार करायला लावणारी आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. संशोधन करणे तुलनेने थोडे सोपे झाले आहे. आपल्या देशात उत्तम दर्जाच्या संस्था निर्माण झाल्या आहेत. खगोलशास्त्र या विषयातील उदाहरणे द्यायची तर पुणे येथील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र म्हणजे आयुकाने जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे. त्या संस्थेचा आता मोठा विस्तार होत आहे. नारायणगावजवळ भव्य अशी रेडिओ दुर्बीण उभारली गेली आहे. गुरुत्वीय तरंगाच्या संशोधनासाठी जागतिक पातळीवर जो प्रचंड प्रकल्प उभारला गेला आहे त्यात आपला देश आता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ या गावी या प्रकल्पाचे एक केंद्र उभारले जात आहे. असे अनेक प्रकल्प बुद्धिमान तरुणांची वाट पाहत आहेत. हेही वाचा.ऑलिम्पिक खेळांच्या मैदानात राजकारणाचा ‘खेळ’ प्रसिद्ध विचारवंत डॉ. अभय बंग यांनी ‘या जीवनाचे काय करू?’ या शीर्षकाचे एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. करियरची निवड करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावे असे मला आग्रहाने सांगावेसे वाटते. त्यात ते म्हणतात, “जीवनाचे प्रयोजन शोधा. हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळते. इथे वन्स मोअर नाही… हे अमूल्य आयुष्य आपण कशासाठी वापरणार ? जगण्यासाठी काही गरजा जरूर असणार आहेत. त्या पूर्ण कराव्या लागतील. पण ‘मिळालेले एकमेव आयुष्य मी पैशासाठी विकणार नाही, आयुष्याचा असला मूर्खपणाचा सौदा मी अजिबात करणार नाही’ असा संकल्प करा. आयुष्याला पैशापेक्षाही मौल्यवान असा हेतू पाहिजे… केवळ अर्थप्राप्तीसाठी जगू नका, अर्थपूर्ण जगा!’’ gpimpale@gmail.com (लेखक भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत).