विजया जांगळे

माध्यम कोणतेही असो, बदल घडवून आणण्याची क्षमता पत्रकारांत असतेच! मग ही पत्रकारिता वृत्तपत्रांसाठी केलेली असो, वृत्तवाहिन्यांसाठी किंवा मग पॉडकास्टसारख्या नवमाध्यमात. ‘सिरियल’ या पॉडकास्टने मांडलेल्या पुराव्यांमुळे अमेरिकेत २३ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे या नव्या माध्यमाच्या सामर्थ्याचेच द्योतक आहे. या प्रकरणी २३ वर्षे तुरुंगात घालवलेला अदनान निर्दोष आहे की नाही, हे भविष्यात सिद्ध होईलच, मात्र १०० दोषी सुटले तरी चालतील, एकाही निर्दोष व्यक्तीवर अन्याय होता कामा नये, हे तत्त्व प्रस्थापित करण्याचे मात्र या पॉडकास्टने केले आहे.

१९९९ साली अमेरिकेतील बाल्टिमोर शहरातील वुडलॉन हायस्कूलमध्ये शिकणारी १८ वर्षीय हे मिन ली ही कोरियन अमेरिकी तरुणी शाळा सुटल्यानंतर अचानक नाहीशी झाली. महिनाभराने तिचा उद्यानात पुरलेला मृतदेह आढळला. शवविच्छेदनात तिचा हाताने गळा दाबून खून करण्यात आल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण तीन संशयित होते. त्यापैकी हे मिन लीचा पूर्वीचा प्रियकर आणि सहाध्यायी असलेला पाकिस्तानी अमेरिकी अदनान सैय्यद हा एक होता. लीचे अन्य कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्यामुळे संतप्त होऊन त्याने तिची हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. आपण निर्दोष आहोत, यावर अदनान ठाम होता आणि आजही आहे. त्याच्यावर खटला भरण्यात आला. हा खटला अदनानचा मित्र जे. वाइल्ड याच्या साक्षीवर आधारित होता. हे मिन लीचा मृतदेह पुरण्यात आपण अदनानला मदत केल्याची साक्ष त्याने न्यायालयात दिली. अदनानच्या सेलफोनचे लोकेशन तपासले असता, त्या वेळी तो त्याच भागात असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर खून, चोरी आणि अपहरणाचे (किडनॅपिंग) आरोप ठेवण्यात आले. आरोप सिद्ध झाले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या दोन दशकांत अदनानने अनेकदा आपण निर्दोष असल्याचा दावा अनेकदा केला, मात्र दरवेळी तो फेटाळण्यात आला.

अदनानला शिक्षा होऊन साधारण एक दशक उलटून गेल्यानंतर त्याच्या परिचितांपैकी एक आणि पेशाने वकील असलेल्या राबिया चौधरी यांनी पत्रकार सारा केनिंग यांच्याशी संपर्क साधला. त्यांना अदनानबाबतची हकिकत सांगितली. सारा यांनी या प्रकरणाचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. हाती आलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील विविध दुवे जोडून ‘सिरियल’ या १२ भागांच्या पॉडकास्ट मालिकेची निर्मिती करण्यात आली. २०१४ साली ती रिलीज झाली. या पॉडकास्टने तेव्हा बाल्यावस्थेत असलेल्या पॉडकास्ट या माध्यमातील लोकप्रियतेचे विक्रम नोंदवले. हा पॉडकास्ट ३४ कोटी वेळा डाउनलोड केला गेला आणि आजही ऐकला जात आहे. या पॉडकास्टला काही पुरस्कार देऊन गौरवण्यातही आले.

एकतर हा खटला पूर्णपणे एका साक्षीदाराच्या साक्षीवर आधारित होता, दुसरे म्हणजे यातील अन्य दोन संशयितांपैकी कोणी दोषी आहे का, हे नीटसे पडताळून पाहण्यात आले नव्हते. बचाव पक्षाच्या वकिलांनी खटला गांभीर्याने लढवला नसल्याचे अनेक दाखले या पॉडकास्टमधून देण्यात आले. अखेर २०२१मध्ये बाल्टिमोरमधील न्यायालय (स्टेट अटर्नी ऑफिस) आणि अदनानच्या नव्या वकिलांनी या खटल्याचा पुन्हा आढावा घेतला आणि प्रकरणाची नव्याने सुनावणी घेणे गरजेचे असल्याचा निष्कर्ष काढला. या प्रकरणातील अन्य दोन संशयितांची योग्य प्रकारे चौकशी झालेली नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. या आरोपींची नावे उघड करण्यात आली नसली, तरीही दोघांनीही हे मिन लीला शारीरिक इजा केल्याचे पुरावे आहेत. यांच्यापैकी एक आरोपी लाय डिटेक्टर टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यामुळे त्याला सोडून देण्यात आले होते, मात्र हे तंत्र आता ग्राह्य धरले जात नाही.

अजूनही अदनान निर्दोष असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्याला तुरुंगातून घरी सोडण्यात आले असले, तरीही मुक्त करण्यात आलेले नाही. नव्याने सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत त्याला गृहकैदेत ठेवले जाणार आहे. जीपीएस ट्रॅकरद्वारे त्याच्यावर नजर ठेवली जाईल.

अदनानने ३० वर्षांच्या तुरुंगवासापैकी २३ वर्षांची शिक्षा तर आधीच भोगली आहे. १७ व्या वर्षांपासूनचा म्हणजे शिक्षण, करिअरचा संपूर्ण काळ त्याला तुरुंगात व्यतीत करावा लागला, मात्र दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये सिरियल रिलीज झाली. २०१९मध्ये एचबीओने या प्रकरणावर दोन माहितीपट प्रदर्शित केले. ‘अदनान निर्दोष असेल, तर काय?’ हा प्रश्न या दोन्ही माध्यमांनी प्रेक्षक आणि श्रोत्यांच्या मनात निर्माण केला. त्यातूनच त्याच्यावर अन्याय झाला असेल, तर त्याला एवढ्या वर्षांनी का असेना, एक संधी द्यावीच लागेल, अशी लोकभावना निर्माण झाली. अदनान तुरुंगाबाहेर पडला तेव्हा झालेला जल्लोष आणि त्याच्या आताच्या वकिलांना जमावाने दिलेली दाद, यातून त्याला असलेला पाठिंबा दिसून आला. निर्दोष व्यक्तीवर कारवाई होता कामा नये, या तत्त्वावर विश्वास असलेला एक मोठा वर्ग तयार झाला.

या निमित्ताने पॉडकास्टसारख्या नव्या माध्यमातील ताकद अधोरेखित झाली आहे. वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांसाठी काम केलेले अनेक पत्रकार आज स्वतंत्रपणे हे माध्यम अजमावून पाहत आहेत. पुराव्यांवर आधारित अभ्यासपूर्ण विश्लेषण असणारे पॉडकास्ट ऐकणाऱ्यांचा वर्ग विस्तारत आहे. ज्यांना कोणत्याही आर्थिक गणितांत न अडकता, कोणाचेही हितसंबंध जपण्याचा तणाव न घेता निव्वळ पॅशन म्हणून स्वतंत्रपणे पत्रकारिता करायची आहे, असे अनेकजण या माध्यमातून दर्जेदार आशय श्रोत्यांपुढे मांडत आहेत. ‘सिरियल’च्या निमित्ताने या माध्यमाची ताकद अधोरेखित झाली आहे हे निश्चित.