विवेक सुतार
चॅटजीपीटीसारख्या एआयला थेट बँक खाते जोडण्याच्या नव्या सुविधेला (सध्या केवळ अमेरिकेत) तंत्रज्ञानाच्या दुनियेत लोक नुसता ‘फिचर अपडेट’ म्हणत असले तरी बारकाईने बघितले तर हा आपल्या जगण्याचा पायाच मुळासकट हलवणारा क्षण आहे. हे तंत्रज्ञान आता थेट माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आणि निर्णयक्षमतेच्या गाभाऱ्यातच शिरू पाहतोय.
तंत्रज्ञानाचे अंधभक्त व तंत्रज्ञानाचा विनाकारण धसका घेणारे, हे दोन्ही गट ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या उक्तीप्रमाणे निव्वळ बौद्धिक आळशीपणाचेच दर्शन घडवत असतात. आर्थिक वर्तन हा मानवी आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि माणसाची मानसिकता उघडा करणारा पैलू आहे. आपल्या आशा, आकांक्षा, भीती, हाव, चिंता आणि आपली ओळख या सगळ्यांचा तो एक जिवंत आरसा. अशा वेळी या बोलक्या यंत्राला तुमच्या पैशाचा हिशोब देणे, म्हणजे तुमच्या बजेट बरोबर तुमच्या अंतरंगाचा संपूर्ण नकाशाच त्याच्या स्वाधीन करण्यासारखे आहे. आणि एकदा का हा नकाशा तयार झाला, की तो कोणाच्या हातात जातो, कोण वाचतो आणि त्यावर कोण आपली पोळी भाजून घेतो, हा सर्वात भयंकर आणि महत्त्वाचा प्रश्न.
अनेक अभ्यासक याकडे केवळ गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून पाहतील. त्यांचा हा दृष्टिकोन चुकीचा नाही, पण तो अपुरा नक्कीच आहे. ही चिंता रास्त असली तरी ती आपल्याला समजणारी गोष्ट आहे. त्याबाबत बोलण्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत, नियम आहेत , संमतीचे सोपस्कार आहेत. पण खरी गोम त्यापलीकडेच आहे. प्रश्न फक्त तुमच्या आर्थिक डेटाचा नसून, तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला दिल्या गेलेल्या या नव्या वळणाचा आहे. या यंत्राच्या सततच्या मध्यस्थीमुळे माणसाची आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता आणि पर्यायाने स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याची ताकदच बदलून जाईल, ही चिंतेची बाब आहे.
गुटेनबर्गने जेव्हा छापखाना काढला, तेव्हा नुसती पुस्तके स्वस्त झाली नाहीत, तर ज्ञानावरची मक्तेदारी मोडली गेली, सत्याचा अर्थ लावण्याचा अधिकार बदलला. गुगलने जेव्हा माहितीची जंत्री आपल्या समोर मांडली, तेव्हा त्यांनी केवळ आपल्याला हवी ती माहिती शोधून दिली नाही, तर कोणते सत्य आपण आधी पाहावे आणि कोणत्या माहितीला प्रमाण मानावे, याचा एक नवा पायंडाच पाडला. स्मार्टफोनने माणसाला केवळ माणसाशी जोडले नाही, तर आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या, कंटाळण्याच्या आणि अगदी एकांतात राहण्याच्या व्याख्येलाच हादरा दिला. या सगळ्या गोष्टी सुरुवातीला ‘कामाचा वेग वाढवणारी क्रांती’ म्हणूनच आपल्या बोकांडी बसल्या, पण कालांतराने त्यांनी माणसाचे ज्ञानाशी, समाजाशी आणि स्वतःशी असलेले नातेच कायमचे बदलून टाकले.
आर्थिक व्यवहारांशी जोडलेले एआय याच साखळीतला एका महाभयंकर वेगाने आलेला पुढचा टप्पा आहे. जाहिरातींवर अविश्वास दाखवायला, खाण्याच्या पदार्थांवरची लेबले वाचायला आणि समाजमाध्यामांवरील अल्गोरिदम-भूलथापा ओळखायला आपण थोडेफार शिकलो आहोत. पण एखाद्या जिव्हाळ्याच्या मित्रासारख्या आवाजात, आपल्या आर्थिक चिंतांना गोंजारून, जेव्हा हे यंत्र आपल्याला सल्ला देऊ लागते, तेव्हा आपण पार विरघळून जातो. भाषा हे विश्वासाचे सर्वात मोठे हत्यार आहे. एकदा का विश्वास बसला, की ‘सुंठीवाचून खोकला जाण्याची’ शक्यता कमीच असते. तोपर्यंत या यंत्राने आपल्यावर केवढा तरी पगडा बसवलेला असतो.
अर्थशास्त्रात ‘नज’ (nudge) म्हणजे नकळत दिलेला हळूवार धक्का नावाची एक संकल्पना आहे. माणसाला न दुखावता त्याच्याकडून विशिष्ट वर्तन करवून घेण्याची ही कला. जेवणाच्या ताटात गोड पदार्थांच्या आधी सॅलड ठेवले की लोक सॅलड जास्त खातात, तसलाच हा प्रकार. पण आता विचार करा, तुमच्या बँकेतल्या प्रत्येक व्यवहाराचा अभ्यास करून, तुमच्या मनस्थितीचा पार अचूक वेध घेऊन आणि तुमच्यासारख्या लाखो लोकांच्या सवयी तपासून हे यंत्र तुम्हाला जो ‘नज’ देईल, तो किती भयंकर असेल! ‘गोड बोलून गळा कापणे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.
तुमच्या खर्चाच्या सवयींवरून तुमच्या ताणतणावाचा, एकटेपणाचा, राजकीय विचारांचा आणि अगदी आजारपणाचाही इतका अचूक अंदाज लावता येतो, की तुम्ही स्वतःही तसा लावू शकणार नाही. अशा माहितीवर पोसलेले आणि तुम्हाला नेहमी खुश ठेवण्यासाठी बनवलेले हे यंत्र जाणीवपूर्वक तुम्हाला फसवणार नाही, पण ‘एंगेजमेंट’ वाढवण्याच्या नादात ते अशी काही दिशाभूल करेल की विचारता सोय नाही. समाजमाध्यमांनीने हे आधीच सिद्ध केले आहे की लोकांना सत्य किंवा त्यांचे भले यापेक्षा त्यांच्या स्वतःच्याच विचारांना कोणीतरी दुजोरा दिलेला जास्त आवडतो.
पैशाच्या बाबतीत तर माणसाचा जीव नेहमीच टांगणीला लागलेला असतो. कर्जाचा डोंगर, उधळेपणाची लाज, म्हातारपणाची सोय या काही हवेतल्या गप्पा नाहीत; त्या आपल्या जिव्हारी लागणाऱ्या गोष्टी आहेत. अशा वेळी हा कृत्रिम मित्र तुम्हाला देवासारखा वाटू लागला तर नवल ते काय? आपण तर आपल्या निर्जीव दुचाकीलाही लाडाने नाव ठेवून तिची पूजा करणारी भाबडी माणसं आहोत. मग आपल्या भावनांशी एवढ्या एकरूप होणाऱ्या या यंत्राच्या प्रेमात पडायला आपल्याला कितीसा वेळ लागणार?याच भावनिक गुंतागुंतीचा फायदा हे यंत्र अतिशय चलाखीने घेऊ शकते.
एकदा एखादी सवय अंगवळणी पडली की ती आपली गरज बनते आणि नंतर तो आपला श्वासच होऊन जातो. आपण दिवा लावताना कधी विजेचा विचार करतो का? किंवा इंटरनेट वापरताना त्याच्या मागच्या तांत्रिक गणितांचा? नाही. या गोष्टी इतक्या अंगवळणी पडल्या आहेत की त्या नसतील तर जगणेच अशक्य वाटते. एआयही असेच आपल्या आयुष्यात नकळत झिरपणार आहे. पैशासारख्या सर्वात नाजूक, असुरक्षित क्षेत्रात हे यंत्र आपली सवय बनत चालले आहे, हीच ती धोक्याची घंटा आहे.
आजची जेनझी पिढी, जी कर्जाचे कागदपत्रही या एआयला विचारल्याशिवाय वाचू शकत नाही, ज्यांना व्याजाच्या गणिताची आणि आर्थिक अनिश्चिततेची ती आवश्यक अशी बोच कधी जाणवलीच नाही, त्यांच्यासाठी या यंत्राची मदत घेणे त्यांची गरज बनलेली असेल. ‘आयत्या बिळावर नागोबा’ प्रमाणे तयार झालेली ही सवय मग कोणत्याही सरकारी कायद्याने मोडता येणार नाही.
एखादा माणूस या यंत्रामुळे शहाणपणाचा निर्णय घेतो की नाही यापेक्षा जेव्हा, असे लाखो लोक विचार करण्याचेच काम या यंत्रावर सोपवून मोकळे होतील, तेव्हा या संपूर्ण मानवजातीचे काय होईल? ‘सरड्याची धाव कुंपणापर्यंत’ तशी प्रत्येक नव्या पिढीची विचार करण्याची मजल या यंत्रावरच अवलंबून राहील. मागच्या पिढीचे जेवढे नुकसान झाले, ते त्यांना नैसर्गिक वाटेल आणि पुढची पिढी त्याहूनही कमी क्षमतेवर समाधान मानेल. स्वतःच्या बुद्धीचा हा ऱ्हास आपल्याला दिसणार नाही; तो मोजण्याची आपली पट्टीच आपण गमावून बसलेलो असू. कॅल्क्युलेटर आल्यावर माणसाने गणित करणे सोडले नाही; पण, भाऊ कॅल्क्युलेटर फक्त आकडेमोड करते, ते तुम्हाला घर गहाण ठेवू का नको, हे सांगत नाही! आत्तापर्यंतच्या तंत्रज्ञानाने निर्णय घेण्याची ताकद माणसाकडेच ठेवली. आता प्रश्न लोकशाहीत स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकणाऱ्या एका सुजाण नागरिकाच्या अस्तित्वाचा आहे. या तंत्रज्ञानावर सरसकट बंदी आणावी असं अजिबात नाही. फक्त आपण या तंत्रज्ञानाची केवळ भलामण करणाऱ्या, त्याचा केवळ द्वेष करणाऱ्या या टोकाच्या भूमिका बाजूला ठेवून, अतिशय डोळसपणे याकडे बघायला हवे.
