अजय काळे
आजची विद्यार्थी पिढी ही डिजिटल जगतात वाढणारी पिढी आहे. माहिती मिळविण्याची, शिकण्याची आणि स्वतःला व्यक्त करण्याची तिची पद्धत पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असणे ही काळाची गरज झाली आहे. ही गरज ओळखून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये तंत्रज्ञानाधारित शिक्षण, कौशल्य विकास आणि भविष्यकालीन क्षमतांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने गुगलच्या सहकार्याने शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराकडे केवळ तांत्रिक प्रशिक्षण म्हणून नव्हे, तर शिक्षणातील नव्या शक्यतांच्या दृष्टीने पाहणे अधिक उचित ठरेल.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा सुरू झाल्यापासून काही प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत. ‘एआयमुळे शिक्षकांचे महत्त्व कमी होणार का?’, ‘माहिती सहज उपलब्ध असताना शिक्षकांची गरज काय?’ असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरे शोधताना शिक्षणाच्या इतिहासाकडे एकदा मागे वळून पाहणे आवश्यक वाटते. फळा आला, पाठ्यपुस्तके आली, रेडिओ, दूरदर्शन, संगणक, इंटरनेट आणि स्मार्टफोन आले. प्रत्येक वेळी तंत्रज्ञानामुळे शिक्षणाच्या पद्धती बदलल्या; पण शिक्षकाचे स्थान अबाधित राहिले. ना त्याला पर्याय निर्माण झाला, ना त्याचे महत्त्व कमी झाले. कारण शिक्षण ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नसून माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे. म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेकडे शिक्षकाचा प्रतिस्पर्धी म्हणून नव्हे, तर नव्या युगातील सहप्रवासी म्हणून पाहणे अधिक योग्य ठरेल.

शिक्षकाचे काम केवळ वर्गात अध्यापन करण्यापुरते मर्यादित नसते. पाठ नियोजन, अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत कृतींची आखणी, प्रश्ननिर्मिती, कार्यपत्रिका तयार करणे, मूल्यमापन, अहवाल लेखन, शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे सातत्याने निरीक्षण अशा अनेक जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडाव्या लागतात. अनेकदा विद्यार्थ्यांसाठी अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची इच्छा असूनही वेळेच्या मर्यादा आड येतात. अशा वेळी कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षकाची जागा घेण्यासाठी नव्हे, तर त्याच्या मदतीला धावून येणारा एक सक्षम सहकारी ठरू शकते. यामुळे वाचणारा वेळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी, अधिक उपक्रमशील अध्यापनासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक गरजा समजून घेण्यासाठी वापरता येऊ शकतो.

माझ्या दृष्टीने एआयचे सर्वांत मोठे योगदान म्हणजे ते शिक्षकाच्या विचारांना नवे आयाम देऊ शकते. एखाद्या पाठासाठी विविध स्तरांनुसार प्रश्न तयार करणे, उपक्रमांची आखणी करणे, स्थानिक संदर्भातील उदाहरणे शोधणे, खेळाधारित कृती सुचविणे, चित्रे, तक्ते, सादरीकरणे तयार करणे, भाषांतर करणे किंवा एखादी संकल्पना विद्यार्थ्यांच्या पातळीला अनुरूप सोप्या भाषेत मांडणे यांसारख्या अनेक गोष्टी एआयच्या सहाय्याने अधिक प्रभावीपणे करता येतात. जे काम पूर्वी बराच वेळ घेणारे होते, ते आज कमी वेळात आणि अधिक परिणामकारकपणे करता येऊ लागले आहे. परिणामी, यांत्रिक कामांचा ताण कमी होऊन विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्यासाठी वेळ उपलब्ध होतो. माझ्या मते, हाच या तंत्रज्ञानाचा सर्वांत मोठा फायदा आहे.

आजचा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना केवळ माहिती देण्यापेक्षा विचार करायला, प्रश्न विचारायला, अनुभवातून शिकायला आणि स्वतः ज्ञानाची निर्मिती करायला प्रोत्साहन देतो. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. त्याची गती, क्षमता, आवडीनिवडी आणि शिकण्याच्या गरजा भिन्न असतात. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच पद्धत प्रभावी ठरत नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे अध्ययन साहित्य तयार करणे, अतिरिक्त मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांना पूरक सामग्री उपलब्ध करून देणे किंवा प्रगत विद्यार्थ्यांसाठी अधिक आव्हानात्मक कृती तयार करणे शक्य होते. त्यामुळे अध्यापन अधिक समावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित होते.

अर्थात, कोणत्याही गोष्टीवरील अती अवलंबित्व धोकादायकच असते. एआयदेखील याला अपवाद नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती देऊ शकते; परंतु ती माहिती नेहमीच अचूक असेल याची हमी नसते. त्यामुळे एआयने दिलेली माहिती चिकित्सक दृष्टीने तपासणे, तिची विविध संदर्भांच्या आधारे पडताळणी करणे आणि आवश्यक ते बदल करणे ही शिक्षकाची जबाबदारी राहणार आहे. माहिती आणि ज्ञान यांतील फरक समजावून सांगणे, योग्य प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणे आणि विवेकपूर्ण विचारांची जडणघडण करणे हे कोणतेही तंत्रज्ञान करू शकत नाही.

खरे तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांत मोठा लाभ वेळ वाचविण्यात नसून, शिक्षकाला पुन्हा विद्यार्थ्यांकडे घेऊन जाण्यात आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू तंत्रज्ञान नसून विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील कुतूहल ओळखणे, त्यांच्या शंकांना संवेदनशीलतेने उत्तर देणे, अपयशात त्यांना धीर देणे, यशात त्यांचे कौतुक करणे आणि त्यांच्यामध्ये मूल्यांची पेरणी करत त्यांना चांगला माणूस म्हणून घडविणे हे कोणत्याही कृत्रिम बुद्धिमत्तेला शक्य नाही.

कदाचित उद्याच्या वर्गात फळ्याची जागा स्क्रीन घेईल, वहीऐवजी टॅबलेट असेल आणि माहितीचा स्रोत कृत्रिम बुद्धिमत्ता असेल; पण विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील कुतूहलाला दिशा देणारा, त्यांच्या अपयशावर मायेचा हात ठेवणारा, त्यांच्या यशात आनंद मानणारा आणि त्यांच्यात माणूस घडविण्याचे स्वप्न पाहणारा शिक्षक तितकाच आवश्यक राहील. म्हणूनच, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात माझ्यासारख्या शिक्षकाला भीती वाटत नाही; उलट एका नव्या सहप्रवाशासोबत अधिक समृद्ध, अधिक सर्जनशील आणि अधिक मानवी शिक्षणप्रवासाची उत्सुकता वाटते.

शिक्षक म्हणून एआय मला केवळ वेळ वाचवून देणार नाही; तो मला पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये रमण्याची संधी देणार आहे. आणि कदाचित, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या नव्या युगात शिक्षक म्हणून माझे सर्वांत मोठे यश हे तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळविण्यात नसून, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक संवेदनशील, अधिक विचारशील आणि अधिक माणूसपण जपणाऱ्या पिढीच्या निर्मितीत सहभागी होण्यात असेल.  

(लेखक प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.)