टीव्हीच्या पडद्यावर दिसत होते की, अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीमध्ये हजारोंच्या संख्येने शोकाकुल लोक जमले होते. पवार कुटुंब बारामतीमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. राज्याचे मुख्यमंत्री होण्याची तीव्र इच्छा असलेल्या, पण होऊ न शकलेल्या अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी जमण्यामागे हेच एकमेव कारण असावे! एका नाव गुप्त ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तीची टिप्पणी अशी होती की, ते अखेरीस अशा मार्गाने पुढे निघून गेले आहेत, ज्या मार्गावर कोणत्याही प्रतिज्ञापत्रांची, अटकपूर्व जामिनाची किंवा कायदेशीर कसरतींची गरज नसते.
अजित पवार यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा गंभीर आरोपांना तोंड द्यावे लागले होते. त्यापैकी सर्वात गंभीर मुद्दा होता तो मागील सरकारमध्ये त्यांच्याकडे सिंचन खाते होते. तेव्हा सिंचन प्रकल्पांसाठीचा राखीव निधी हडप केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर दाखल केला गेलेला भ्रष्टाचाराचा खटला. भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर अजित पवार यांची निर्दोष मुक्त करण्यात आली.
राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सोडून दिले. या विभागाचे प्रमुख बनवले त्या परमबीर सिंग यांनी कॅमेऱ्यासमोर सांगितले की अजित पवारांवर खटला चालवण्यासाठी आमच्याकडे कोणताही पुरावा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना या पदावर बसवले होते. माझ्या आठवणीनुसार त्यांनी हे सांगितले तेव्हा मुख्यमंत्रीही तिथे उपस्थित होते! ते काहीही असो, सर्वसाधारणपणे लोकांना असे वाटते की अजित पवार भाजपमध्ये गेल्यावर त्यांचे सगळे दोष पुसले गेले आणि ते दोषमुक्त झाले.
अलीकडेच, काही महिन्यांपूर्वी, अजित पवारांच्या दोन मुलांपैकी एक असलेले पार्थ पवार अडचणीत आले. अमाडिआ एंटरप्रायझेस या त्यांची प्रमुख मालकी असलेल्या कंपनीने महार (अनुसूचित जाती) समाजासाठी राखीव असलेली जमीन विकत घेतली होती. वास्तविक ती जमीन कायद्यानुसार विक्रीयोग्य नव्हती. अशी जमीन पार्थ यांच्या कंपनीने अत्यंत कमी किमतीत खरेदी केली. प्रसारमाध्यमांनी व्यवहाराचे तपशील प्रसिद्ध केल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्या मुलाला वाचवले. शिवाय फडणवीस सरकारही पुन्हा त्यांच्या मदतीला धावून गेले. अखेरीस ती जमीन महार समाजालाच परत द्यावी लागली.
आणखी एक धक्कादायक उदाहरण म्हणजे, महसूल कायदे तोडल्याबद्दल अजित पवार यांच्या समर्थकांवर कारवाई करणाऱ्या एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याला त्यांनी फोनवर जाब विचारला. त्या कारवाईचे आदेश अधिकृत महसूल अधिकाऱ्यांनी दिले होते आणि ते सरकारच्या निर्देशांनुसारच होते. सत्ताधारी पक्षाने कायदे करायचे आणि ते मोडले गेले तरी पोलिसांनी डोळेझाक करावी, ही अपेक्षा कशी ठेवली जाते याचे हे उत्तम उदाहरण होते!
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही समावेश असलेले अलीकडचे एक प्रकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील अपहाराचे. ते सध्या ईडी न्यायालयात आहे. या उदाहरणांवरून वाचकांना वाटावे की अजित पवार ज्याच्यावर कितीही संकटे आली, आरोप, अपघात झाले किंवा अडचणी आल्या तरी ते प्रत्येक वेळी वाचतात, पुन्हा उभे राहतात किंवा सुटतात. २८ जानेवारीच्या सकाळी मुंबईहून बारामतीला जाताना अजितदादांचे विमान कोसळून त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मात्र बारामतीतील लोकांनी त्यांच्या कथित गैरकृत्यांना पूर्णविराम देत त्यांच्या प्रती सहानुभूतीच बाळगली.
मुख्यमंत्रीपदाच्या मोहात अजित पवारांनी आपले काका आणि राजकीय गुरू शरद पवार यांनाच दूर लोटले. अनेक दशकांपूर्वी शरद पवारांनीही असेच केले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांनी आपले मार्गदर्शक यशवंतराव चव्हाण यांच्यापासून फारकत घेतली आणि तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना बाजूला सारत पक्षांतर केलेल्या आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. तेव्हा त्यांचे वय होते अवघे ३८.
या दोन घटनांमधील फरक असा की शरद पवार- अजित पवार यांच्यात जसे काका-पुतण्याचे नाते आहे, तसे शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचे कौटुंबिक नाते नव्हते. तसे पाहिले तर अजित आणि शरद यांचे कौटुंबिक नातेही तपासून पाहण्यासारखे आहे. अलीकडेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका एकत्र लढवण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एकत्र आले होते. या निवडणुकीत ते हरले असले तरी त्या एका क्षणी तरी ते एकत्र होते. इतक्या वाऱ्याच्या वेगाने नाते कसे बदलू शकते, ही बाब आश्यर्यचकीत करणारी आहे.
काँग्रेसप्रमाणेच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी पक्ष आहे; त्यामुळे तो भाजपच्या विचारसरणीपासून दूर आहे. भाजपबरोबर गेल्यानंतरही अजित पवार यांनी स्पष्ट केले होते की त्यांच्या राष्ट्रवादी गटाचा भाजपच्या मुस्लिमविरोधी विचारसरणीशी संबंध नाही. अलीकडील मुंबई महानगरपालिका निवडणुकांत त्यांनी काही मुस्लिम उमेदवार उभे केले होते आणि त्यापैकी एक-दोन निवडूनही आले होते.
अजित पवारांच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्य सरकारने जाहीर केलेला तीन दिवसांचा दुखवटा संपत आलेला असतानाच राष्ट्रध्वज अजूनही अर्ध्यावर होता! भाजपने उपमुख्यमंत्रीपद देऊ केल्यानंतर राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आलेल्या सुनेत्रा पवार यांनी इतक्या उतावळेपणाने ते स्वीकारल्याबद्दल अनेकांना धक्का बसला.
भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, अमित शहा तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या बहुतांश नेत्यांनी अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत उपस्थित राहणे ही राज्यातील सध्याचे सर्वात चाणाक्ष राजकारणी देवेंद्र फडणवीस यांचीच ही कल्पना असावी, असे मला वैयक्तिक पातळीवर वाटते. कारण अजित पवारांच्या अचानक मृत्यूनंतर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वाढणाऱ्या राजकीय दबावाचा सामना त्यांना करावा लागणार होता.
अजित पवारांचा गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत गेला असता, तर आपली धर्मनिरपेक्ष ही प्रतिमा जपण्यासाठी शरद पवार यांनी भाजपबरोबर जाणे नाकारले असते. असे झाले असते तर त्यामुळे फडणवीसांची शिंदेवरची पकड सैल झाली असती, असे म्हटले जाते. उलट, अजित समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत गेले नाहीत, तर विधानसभेत त्यांची सुमारे ४० आमदारांची ताकद शिंदे सेनेच्या दबावाला तोंड देण्यासाठी भाजपला कधीही उपयोगी ठरू शकते.
म्हणूनच अजित पवारांचा गट बरोबर ठेवणे भाजपसाठी गरजेचे होते. त्यामुळे अजित पवार यांच्या पत्नीला उपमुख्यमंत्रीपद देणे ही फडणवीसांसारख्या चतुर राजकारण्याने आपल्या जादूच्या टोपीतून काढलेला आणखी एक ससाच होता.
सत्ताधारी पक्षात सामील होण्यासाठी पक्ष बदलणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातला नेहमीचा खेळ आहे. वैचारिकदृष्ट्या कटिबद्ध असलेले राजकारणी असे उड्या मारत नाहीत, पण असे लोक दुर्मिळ आहेत. पदाची लालसा किंवा नफा इतकेच बाकीच्यांना पुरेसे असते. दुसरे म्हणजे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा टाळणे ही देखील अनेकांसाठी महत्त्वाची गोष्ट होऊन बसली आहे. (लेखक माजी पोलीस आयुक्त आहेत) समाप्त

