रसिका आगाशे
अशीही माणसं आहेत, असंही जगणं आहे! मग ते साहित्यात, चित्रपटात कुठेच का दिसत नाही? ही माणसं विचार करतात, जे अयोग्य वाटतं ते बदलण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्नही करतात. फक्त दिसत नाहीत. विद्रोही साहित्य संमेलनाने अशी अनेक प्रश्नचिन्हं माझ्या मनात निर्माण केली..
अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची उद्घाटक म्हणून मला जेव्हा आमंत्रण मिळालं तेव्हा मला खरंच माहीत नव्हतं, हा अनुभव माझ्यासाठी किती महत्त्वाचा ठरणार आहे. ते दोन दिवस माझ्या आयुष्यात किती उलथापालथ घडवू शकतात याचा अंदाजच नव्हता. पण परत येऊन काही दिवस गेले तरी तिथे डोळय़ात साठवलेल्या प्रतिमा माझा पाठलाग करत राहिल्या आहेत. आणि मुंबईत येऊन जेव्हा मी हे इथल्या मित्रमैत्रिणींशी बोलत राहिले तेव्हा लक्षात आलं की या संमेलनाबद्दल इथे फारसं कुणालाच माहीत नाही. कारण प्रस्थापित माध्यमांमध्ये याबद्दल फारसं काही लिहिलं-बोललं गेलेलं नाही.
प्रस्थापित हा फार मजेदार शब्द आहे. मी प्रस्थापितांच्या जगात जन्मले, वाढले. मला असलेले विशेष अधिकार, मिळत असणारे फायदे गृहीत धरत गेले. इथेच उगवणारे साहित्य वाचत राहिले, प्रस्थापितांचेच नाटक-सिनेमे बघत राहिले, आणि जगात इतर लोक आहेत हे विसरूनही गेले होते. इतर लोक- माझ्या समुदायापेक्षा, धर्मापेक्षा, मतांपेक्षा, विचारसरणीपेक्षा वेगळे काहीही करणारे लोक म्हणजे इतर! ज्यांची संख्या जास्त आहे, पण सत्ता त्यांची नाही. आणि मग ती माणसं दिसेनाशी व्हायला लागतात. ती माणसं कथा, कादंबऱ्यांमध्ये दिसत नाहीत, अशी सगळी माणसं मला या विद्रोही साहित्य संमेलनात भेटली. त्यांची दु:खं, त्यांचे आनंद, त्यांचे अगदी हाडामांसाचे प्रश्न, सगळय़ाला मला स्पर्श करता आला.
सकाळी ९ च्या सुमारास रस्त्यावरून एक विचारयात्रा सुरू करण्यात आली होती. विचारयात्रेत कोण होतं.. नंदुरबारहून आलेले आदिवासी मित्र, धुळय़ाहून आलेल्या मैत्रिणी; उदगीर, यवतमाळ आणि असंख्य गावांतून, छोटय़ा शहरांतून आलेले कवी, कलाकार. लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेली ही शहरांची नावं मुंबई, पुण्याच्या उद्घोषात माझ्या डोक्यातून अगदी पुसली गेली होती. कोण होती ही माणसं, जी फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचा जयजयकार करत होती. कोणी लाल सलाम, कुणाचा प्रेमाचा जय भीम, कुणाच्या पायात स्पोर्ट शूज, कुणी अनवाणी.. ही कुठून कुठून, वाट्टेल तसा प्रवास करून स्वखर्चाने वध्र्यात आली होती. (या सगळय़ांत, नागपूपर्यंत विमानाने येऊ शकते, असं सांगणाऱ्या मला चांगलंच कानकोंडं झाल्यासारखं होत होतं.) पण शेजारी चालणाऱ्या बाई, मी अगदी त्यांच्या रोजच्या भेटीतली आहे असं मानून माझ्याशी मनसोक्त गप्पा मारत होत्या. वध्र्यातल्या उन्हाला ना जुमानता तरुण मुलं आणि म्हातारे-कोतारेही ताल धरत होते. त्यांच्यासोबत चालत-चालत कधी पावरी आणि ढोलताशाच्या नादात त्यांनी मला आपलं मानून घेतलं मला कळलंही नाही.
विविध प्रदर्शनी आणि स्टॉल्सचं उद्घाटन करता करता आम्ही मुख्य मंचावर पोहोचलो. मंचाचं नाव फुले, आंबेडकर, शाहू विचारमंच. विद्रोही परंपरेला जपणारे आणि समतेचा विचार करणारे हे महापुरुष! शेतकरी, कष्टकरी समाजाबद्दल बोलणारे, त्यांना बोलते करणारे. किती समर्पक नाव! कारण हे जे गावागावांतून आलेले लोक होते, ते इथे यासाठीच तर आले होते, कारण प्रस्थापित मंचावर त्यांना जागा नव्हती. त्यांच्या विचारांना जागा नाही, त्यांच्या जगाला जागा नाही! ती जागा, व्यक्त होण्याची जागा त्यांना इथे मिळते.
संमेलनाचं उद्घाटनच इतकं वैशिष्टय़पूर्ण होतं- मानवी मेंदूला जी द्वेषाची, विकारी विचारांची, तर्कहीन भांडवलाची, विविध प्रकारच्या विषमतेची घट्ट कुलपं पडली आहेत, ती (प्रतीकात्मकरीत्या) उघडून या संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. (आणि इतक्या लांब, या धूळ- धुरकट वध्र्याला येऊन आपण काही चुकीचं तर केलं नाही ना, असा या पुण्याच्या मुलीला जो प्रश्न पडला होता त्याचं सकारात्मक उत्तर मिळालं.) किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी आणि मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे आणि महाराष्ट्रातल्या असंख्य समविचारी मित्रमैत्रिणींनी हा घाट घातला होता, त्याला प्रचंड प्रतिसाद होता. विचारमंचासमोरची गर्दी हटत नव्हती, उलट त्यात भरच पडत होती. सगळय़ांची भाषणं रंगत होती. पण ती भाषणं फक्त साहत्यिक, शिक्षित लोकांनाच कळतील अशी क्लिष्ट नव्हती. समोरच्या गर्दीत सगळेच होते. शिक्षित, उच्चशिक्षित आणि लिहिता-वाचता ना येणारेही! काही वर्षांपूर्वीच्या मला हा प्रश्न नक्की पडला असता की निरक्षर लोकांचं साहित्य संमेलनात काय काम? गोष्ट, कविता ही कागदावर आकार घेण्यापूर्वी निराकार असते, एका रिकाम्या अवकाशात कुणी तरी काही तरी रचत आहे, असं वाटतं. पण तो अवकाश माणसांनी गच्च भरलेल्या सभोवतालात कायमच श्वास घेत असतो. साहित्य म्हणजे फक्त गुळगुळीत बांधणीतले शब्द नसतात. ते कुणाचं तरी आयुष्य असतं. अगदी आतडय़ापासून जगलेलं. रोज जगण्यासाठी वणवण भटकणारं. जिथे धड रस्तेही बांधले गेले नाहीयेत, जिथे प्यायचं पाणी रोज मिळत नाही, तिथे रोजच्या व्यवहाराचं ओझं वाहत असताना तयार झालेलं तत्त्वज्ञान साक्षात माझ्या समोर उभं होतं, तिथे अनेक गोष्टी घडत होत्या. वेगवेगळे कार्यक्रम, प्रदर्शनं, कवी संमेलनं, परिसंवाद, विविध क्षेत्रांतल्या नामांकित लोकांची भाषणं. या कार्यक्रमाची पत्रिका खरंच संग्रहणीय आहे.
पण दोन गोष्टींनी मला अगदी आतपर्यंत हलवून सोडलं. पहिली म्हणजे पहिल्याच दिवशी काही लोकांचे सत्कार होते. त्यांच्यासाठी मानपत्रं वाचून दाखवण्यात येत होती. मानपत्रातून त्यांच्या कार्याचा आलेख समोर येत होता. आणि मला वारंवार एकच प्रश्न छळत होता. कोण आहेत ही माणसं? कुठल्या ध्येयाने झपाटलेली आहेत. कुणी शाळा बांधतंय, कुणी महिलांसाठी कार्य करतंय, कोणी झाडी बोलीचे अभ्यासक आहेत, कोणी आदिवासी नेता तर कुणी भटके विमुक्त संघटक आहेत.
मी तशी लिहिती-वाचती मुलगी आहे. मग मला का या माणसांची नावं ही माहीत नाहीत. इंटरनेटवर माहितीचा महापूर वाहत असताना त्यांच्या कार्याचा मागमूसही का नसावा? पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका छोटय़ा परदेशी मुलीबद्दल मला माहीत असतं, पण माझ्याच राज्यात, इतकं उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांबद्दल इतकी उपेक्षा? कारण त्यांच्याबद्दल इंग्रजीत छापून आलेलं नाही. मुख्य प्रवाहात त्यांच्या कामाचं कौतुक झालेलं नाही. सहज उपलब्ध असलेल्या नाटक, चित्रपटांमध्ये ते किंवा त्यांच्यासारखी पात्रं नाहीत. मग कसं कळणार त्यांच्याबद्दल? आणि जे काम मुख्य प्रवाहात पोहोचलेलं नाही, ते महत्त्वाचं नाही, असाच सूर बहुतांशी आळवला जात असल्यामुळे ही माणसं आपल्यासाठी अस्तित्वहीन असतात.
यातले अनेक जण, हे आपापल्या घरातले, अनेकदा, आपल्या पूर्ण जाती, उपजातीतले, पहिलेवहिले शिकलेले (साक्षर) लोक आहेत. आणि ते समाजासाठी झटत आहेत, पण त्यांचा साहित्यात उल्लेख नाही. तुम्ही म्हणाल, ‘दलित साहित्यात असेल की!’ ‘दलित साहित्य?’ साहित्यालाही जाती, उपजातींत एकदा वाटून टाकलं, की मग आपण फक्त ‘आपल्या’ लोकांबद्दल वाचायला मोकळे. म्हणजे पुन्हा एकदा ही सगळी माणसं मुख्य प्रवाहातून बाहेर! (मुख्य प्रवाह कशाला म्हणायचं आणि का हा एक वेगळाच विषय आहे.) असो!
अगदी निघण्याच्या आधी एक ताई भेटल्या. धुळय़ातून आल्या होत्या बहुधा. मला म्हणाल्या, ‘नंबर दे तुझा.’ मी विचारलं, ‘काय करणार नंबर घेऊन?’ त्या म्हणाल्या, ‘दे तर, मी फोन करेन तुला.’ मी म्हणलं, ‘द्या फोन, मी टाकते.’ तर म्हणाल्या, ‘मोबाइल नाही माझ्याकडे.’ मला कळेना मग माझा नंबर घेऊन काय करणार? तर म्हणाल्या, ‘‘मलाही मुली आहेत, आता त्यांच्या पुढच्या शिक्षणाचं बघायला हवं. चांगलं भाषण देतेस तू. त्यांना तुझ्यासारखं शिकवायचंय. तर त्यासाठी काय हवं काय नको सांगशील ना?’’ मी मुकाट त्यांच्या हातातल्या कार्यक्रम पत्रिकेवर नंबर लिहून दिला. काय करतील बरं त्यांच्या मुली मोठय़ा होऊन? अशाच, आपल्या आईसारख्या कुठे तरी विद्रोहाची ज्वाला प्रज्वलित ठेवतील? शिकून सवरून सन्मानाने जगतील ना? मला काळजीच वाटायला लागली. (आणि त्यातल्या कुणी फारच चांगली कामगिरी केली, खूप नाव कमावलं तर मुख्य धारेतले लोक तिला ‘ही कशी आमचीच’ असं म्हणून कॉ-ऑप्ट करण्याचा प्रयत्न तर नाही करणार ना? ही पुढची काळजी!)
तर विद्रोही साहित्य संमेलनातील, एक दुसरा महत्त्वाचा उपक्रम म्हणजे गटचर्चा! गटचर्चा हा शब्द अत्यंत रुक्ष वाटतो. पण त्या भल्या मोठय़ा मांडवात १५-२० जणांचे अनेक घोळके बसून ज्या पद्धतीने स्वत:चे अनुभव सांगत होते, हिरिरीने मत मांडत होते, ते बघून मला आपल्या करंटेपणाची कीव आली. त्यांचे विषय- नागरिकत्वाचा प्रश्न, नवे शैक्षणिक धोरण- मनुवादाचे नूतनीकरण, जल- जंगल- जमीन अधिकाराचा प्रश्न, माध्यमांची गळचेपी आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या ते जागतिकीकरण.. तब्बल १६ विषयांवर गटचर्चा सुरू होत्या. किती गोष्टी आकार घेत होत्या, किती गृहीतकं चूक ठरत होती, किती बंध बांधले जात होते आणि किती बेडय़ा निखळून पडत होत्या. मी वेगवेगळय़ा ठिकाणी बसून त्यांचे चेहरे पाहत होते, त्यांच्या चर्चा, गप्पा ऐकत होते. किती शिस्तबद्ध, तरीही किती मोकळं संभाषण. वाटत होतं, असं धावत जावं, आणि प्रस्थापित लेखकांना पकडून आणावं आणि म्हणावं, ही घ्या जितीजागती पात्रं. हे घ्या धगधगते विषय. करा तुमच्या लेखण्यांना धार आणि पोहोचू द्या या कहाण्या सगळीकडे. पण ही आग पेलणं प्रस्थापितांच्या पलीकडचं आहे. कारण या गोष्टी आतून- बाहेरून ओरबाडून काढतात. आपले स्वच्छ, सुंदर चेहरे कसे लोभामुळे बरबटले आहेत ते दाखवतात. मीही याच प्रस्थापितांच्या जगातून तिथे गेले होते आणि गेले काही दिवस माझी झोप गायब आहे. गलबलून येतंय. खूप अपराधी वाटतंय. कदाचित पुढच्या काही दिवसांत मी परत प्रस्थापित, व्यावसायिक वाटेवरून चालू लागेन. या गोष्टी कुणाला ऐकायच्या नसतील, कारण त्या विकल्या जात नाहीत असं मला सांगण्यात येईल. आणि मी कदाचित तेच लिहीत आणि बनवत राहीन जे धोपट मार्गावर सुरू आहे. आत्मा विकत घेणाऱ्या दुकानांनी रस्ता गजबजून गेला आहे. माझं काय होईल मलाही माहीत नाही, पण ही जी माणसं मला गवसली आहेत, त्यांचं काय करायचं, हा प्रश्न मला छळत नक्की राहील. किमान त्यांच्या गवसण्याची गोष्ट तरी सांगून टाकावी म्हणून हा लेखनप्रपंच.
लेखिका, अभिनेत्री, दिग्दर्शिका
beingrasika@gmail.com