डॉ. कृष्णा गायकवाड
“जग बदल घालुनी घाव। सांगुनी गेले मज भीमराव।।
गुलामगिरीच्या चिखलात। रुतून का बसला ऐरावत।।”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वरील गीतातून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते एक महान समाजसुधारक, क्रांतिकारक आणि सामाजिक विचारवंत होते. अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे मातंग समाजात झाला. त्यांचे बालपण अत्यंत संघर्षमय आणि दुःखदायक परिस्थितीत गेले. वैयक्तिक दुःखांचा विचार न करता आपल्या विचारांनी, कार्याने आणि लेखणीने त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. जातिभेद आणि जातीव्यवस्थेच्या उतरंडीमुळे शिक्षण, सामाजिक सन्मान आणि समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या समाजातून पुढे आलेले अण्णाभाऊ हे एक समृद्ध आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते.
अण्णाभाऊंच्या समाजावर ब्रिटिश राजवटीने ‘गुन्हेगार जात’ असा शिक्का मारलेला होता. त्यामुळे त्यांच्या बालपणीचे जीवन अस्थिर होते. धनसंपत्ती किंवा शेतीसारखे कोणतेही आर्थिक साधन नसल्यामुळे त्यांचे वडील भाऊराव सिद्धोजी साठे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांची जबाबदारी अण्णाभाऊंवर आली. परिणामी त्यांचे शिक्षणही पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या वाट्याला केवळ दीड दिवसांचे शालेय शिक्षण आले.
लहानपणीच त्यांनी जातीय अन्यायाचे चटके अनुभवले. परिसरात कुठे दरोडा पडला किंवा चोरी झाली की पोलिस अण्णाभाऊंच्या वस्तीत येऊन लोकांची धरपकड करीत. अशा वेळी लोक डोंगरात जाऊन लपून राहत. गावात कोणालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. अशा अमानवी अनुभवांनी त्यांच्या मनावर खोलवर परिणाम केला. याच अनुभवांतून त्यांच्या मनात अन्यायाविरुद्धचा संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाची जाणीव अधिक दृढ होत गेली.
लहानपणापासूनच अण्णाभाऊंना विविध छंद होते. मैदानी खेळांचा पिढीजात वारसा असल्यामुळे दांडपट्टा चालविण्यात ते अत्यंत प्रवीण होते. गर्दीपासून दूर असलेल्या डोंगर-दऱ्या, राने आणि नद्यांमध्ये भटकणे त्यांना आवडत असे. पक्षी निरीक्षण, शिकार, मध गोळा करणे, पोहणे, मासेमारी करणे, जंगलात एकटे भटकणे, पक्ष्यांशी मैत्री करणे आणि जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक जाणून घेणे, असे अनेक छंद त्यांना होते.
जत्रांमध्ये जाऊन ते तेथील विविध कलाप्रकारांचे बारकाईने निरीक्षण करत. पुढे लोकगीते, पोवाडे आणि लावण्या पाठ करण्याची त्यांना आवड निर्माण झाली. विविध गोष्टी ऐकून त्या इतरांना सांगण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती समवयस्क मुलांचा गोतावळा जमू लागला. लोकगीते टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे-लावण्या आत्मीयतेने सादर करणे आणि दांडपट्टा चालविण्यात प्रावीण्य मिळवणे, या कलागुणांमधूनच त्यांच्यातील महान कलावंत आणि जागतिक दर्जाचा लेखक घडत गेला.
मात्र त्यांच्या कलागुणांना गावात पुरेसा वाव मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी वडिलांसोबत मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईत आल्यानंतरही त्यांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला नाही. पोटासाठी त्यांनी हमाल, बूटपॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहणारा कामगार, वेटर, डोअरकीपर, कुत्र्यांची देखभाल करणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा आणि खाणीत काम करणारा, अशी अनेक कष्टाची कामे केली. या संघर्षमय जीवनातून त्यांनी मुंबईतील कामगार, गरीब आणि वंचित जनतेचे जीवन जवळून पाहिले. याच अनुभवांनी त्यांच्या साहित्याला वास्तववादी आणि परिवर्तनवादी दिशा दिली.
अण्णाभाऊ साठे यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही जनजागृतीचे मोठे कार्य केले. एक कलाकार तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते विविध उपक्रम आणि आंदोलनांमध्ये सहभागी होत असत. ‘चले जाव’ चळवळीच्या काळात वाटेगाव येथे बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चळवळीच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. पुढे त्यांनी मुंबईत कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
माटुंगा लेबर कॅम्पमधील कामगार आणि राज्यातील विविध भागांतून मुंबईत आलेल्या श्रमिकांना सोबत घेऊन त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविला. १९४४ मध्ये शेतकरी परिषदेत त्यांनी ‘लाल बावटा कला पथकाची’ स्थापना केली. याच काळात शाहीर अमरशेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर हे एकत्र आले. या कला पथकाच्या माध्यमातून त्यांच्या साहित्यिक आणि कलात्मक प्रवासाला नवी दिशा मिळाली. लावण्या, पोवाडे आणि पथनाट्ये ही त्यांच्या पुढील ललित साहित्याची पूर्वतयारी ठरली. त्यांनी सुमारे १५ वगनाट्ये लिहिली आणि त्यातून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. याच काळात अण्णाभाऊंनी स्वतंत्रपणे लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांचा ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ कामगारांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला. या कला पथकामुळे त्यांच्या अंगी असलेला कलाकार समाजासमोर आला आणि त्यांच्या लेखणीला व्यापक व्यासपीठ मिळाले.
१९५० ते १९६२ हा अण्णाभाऊंच्या साहित्यिक जीवनातील सुवर्णकाळ मानला जातो. या काळात त्यांच्या साहित्याच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या. त्यांनी १३ लोकनाट्ये, ३ नाटके, १३ कथासंग्रह, ३५ कादंबऱ्या, १ शाहीरी पुस्तक, १५ पोवाडे, १ प्रवासवर्णन आणि ७ चित्रपट कथा अशा विविध साहित्यकृतींची निर्मिती केली. त्यांच्या साहित्यामध्ये ग्रामीण, दलित, महिला आणि समाजातील इतर शोषित-वंचित घटकांचे जीवन प्रभावीपणे चित्रित झाले आहे. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील पात्रे ही समाजातील सर्वसामान्य माणसे होती. अन्याय, शोषण, छळ, कपट, जातिभेद आणि सामाजिक विषमता अशा विविध प्रश्नांवर त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रखरपणे भाष्य केले.
अण्णाभाऊंच्या विचारांचा केंद्रबिंदू हा माणूस आणि त्याचा सन्मान हा होता. ते म्हणत-
“तू गुलाम नाहीस, तर तू या वास्तव जगाचा निर्माता आहेस.”
भारतीय समाजव्यवस्थेतील अन्यायकारक रूढी आणि विषमतेविरुद्ध लढणारे अण्णाभाऊ सर्वसामान्यांसाठी न्यायाची मागणी करीत. जातीव्यवस्थेवर प्रखर टीका करताना ते म्हणतात-
“जात हे वास्तव आहे, गरिबी ही कृत्रिम आहे. गरिबी नष्ट करता येऊ शकते; पण जात नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे.”
जातिव्यवस्थेमुळे होणारा अन्याय त्यांच्या लेखणीतून सातत्याने व्यक्त होत राहिला. वर्णव्यवस्थेने सर्वसामान्यांवर केलेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचा तीव्र रोष होता. धर्माच्या नावाखाली माणसाला हीन समजण्याच्या प्रवृत्तीवर भाष्य करताना ते म्हणतात-
“अनिष्ट धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून रोग आहे.”
१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले; मात्र अण्णाभाऊंच्या मते हे स्वातंत्र्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत समानतेने पोहोचले नव्हते. गोरगरीब आणि वंचित जनतेच्या जीवनात फारसा बदल झालेला नाही, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरही सामाजिक विषमता, जातिभेद आणि आर्थिक शोषणाविरुद्ध त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. रूढी, परंपरा आणि धार्मिक अवडंबरावर आधारित विषम समाजव्यवस्थेबद्दल ते अस्वस्थ होते. त्यांच्या परिवर्तनवादी विचारांतून ही अस्वस्थता स्पष्टपणे जाणवते.
“यह आज़ादी झूठी है, मेरे देश की जनता भूखी है.”
या विचारातून त्यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ सामाजिक आणि आर्थिक समानतेत असल्याचे अधोरेखित केले. अशा विविध सामाजिक प्रश्नांवर अण्णाभाऊंनी आपल्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठविला.
अण्णाभाऊ साठे यांचे ‘माझी मैना गावाकडे राहिली’ हे गीत अत्यंत लोकप्रिय झाले. स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्धही त्यांनी प्रभावी लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये स्त्री व्यक्तिरेखांना महत्त्वाचे स्थान मिळाले. ‘चित्रा’ आणि ‘वैजयंता’ या कादंबऱ्यांमधून त्यांनी स्त्रियांचे जीवन, त्यांच्या समस्या आणि संघर्ष प्रभावीपणे मांडले.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली. १९६१ मध्ये त्यांनी रशियाला भेट दिली. तेथे त्यांनी शिवचरित्र पोवाड्याच्या माध्यमातून मांडले आणि त्यांच्या साहित्याचे रशियन भाषेत भाषांतर झाले. त्यांची सर्वात महत्त्वाची कादंबरी ‘फकिरा’ होय. या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आणि तिला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठी प्रसिद्धी मिळाली.
अण्णाभाऊंच्या साहित्यावर अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. १९६१ मध्ये ‘वैजयंता’ या कादंबरीवर चित्रपट तयार झाला. त्यांच्या ‘आवडी’ या कादंबरीवर आधारित ‘टिळा लावते मी रक्ताचा’ हा चित्रपट १९६९ मध्ये प्रदर्शित झाला. तसेच ‘माकडीचा माळ’, ‘चिखलातील कमळ’, ‘वारणेचा वाघ’ आणि ‘अलगूज’ या त्यांच्या साहित्यकृतींवरही चित्रपट तयार झाले.
लेखन प्रेरणा दिन
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करत महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जयंतीदिनी, १ ऑगस्ट रोजी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये हा दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या जीवनाला शब्द दिले. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी ‘लेखन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचा शासनाचा निर्णय हा त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाला दिलेली सार्थ मानवंदना आहे.
ज्यांना औपचारिक शिक्षणाची संधी अत्यंत अल्प प्रमाणात मिळाली, त्यांनी आपल्या अनुभवांच्या आणि प्रतिभेच्या बळावर मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. म्हणूनच ‘लेखन प्रेरणा दिन’ हा केवळ लेखनाचा उत्सव न राहता, वंचितांच्या जीवनाचे वास्तव समजून घेण्याचा, सामाजिक प्रश्नांवर संवेदनशीलपणे लिहिण्याचा आणि परिवर्तनवादी साहित्यनिर्मितीची प्रेरणा घेण्याचा दिवस ठरावा. त्यांच्या साहित्याचे वाचन, चिंतन आणि अनुकरण करून नव्या पिढीने लेखनाची प्रेरणा घ्यावी आणि आपल्या लेखणीतून सामाजिक परिवर्तनाचा विचार पुढे न्यावा, हाच या दिवसाचा खरा हेतू ठरावा.
अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे हे साहित्य, शाहिरी, सामाजिक चळवळ आणि सांस्कृतिक परिवर्तन या सर्वच क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. जीवनाच्या वाटेवर लेखन आणि कलेच्या माध्यमातून ते यशस्वी झाले असले, तरी वैयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक संकटांना आणि उपेक्षेला सामोरे जावे लागले. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांचे कौटुंबिक जीवनही संघर्षमय होते, मात्र त्यांच्या लेखणीने आणि शाहिरीने उभ्या केलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा प्रभाव आजही कायम आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचितांच्या वेदनांना शब्द दिले, श्रमिकांच्या संघर्षाला आवाज दिला आणि सामाजिक विषमतेविरुद्ध बंड पुकारले. म्हणूनच ते केवळ एक साहित्यिक किंवा लोकशाहीर नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाचे पुरस्कर्ते आणि शोषित-वंचितांच्या संघर्षाचे प्रखर भाष्यकार होते. त्यांचे साहित्य आजही समाजाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा मार्ग दाखविते. १९६९ मध्ये त्यांचे निधन झाले; परंतु त्यांच्या विचारांची ज्योत आजही समाजमनात तेवत आहे. अण्णाभाऊ साठे यांचे जीवन, साहित्य आणि विचार हे सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे एक अमूल्य पर्व आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा ‘लेखन प्रेरणा दिन’ त्यांच्या विचारांचा आणि साहित्यिक वारशाचा दीप पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणारा प्रेरणादायी उपक्रम ठरावा, हीच त्यांना खरी आदरांजली!
