प्रा. स्वप्निल तांबे
“महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र, म्हणजे थोर,
निर्दोष, सगुण,सात्विक,तेथे अनाचाराची बुद्धी न उपजे,
आपण अनाचार ना करी आणिकासी करू न देई.”
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे शिष्य गुर्जर शिवबास यांनी वरील शब्दांत महाराष्ट्राची महती वर्णिली आहे. बाराव्या शतकातले हे वर्णन आज एकविसाव्या शतकात महाराष्ट्राला लागू होईल का? विशेष म्हणजे समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राची पीछेहाट होत असताना हा प्रश्न उद्भवतो. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपण मागे पडत असताना अध्यात्मिक क्षेत्रातही आपली पिछेहाट होणं हे काही आपल्या महान, उदात्त संत परंपरेला धरून नाही.

ज्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा कुंभार, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत सोयराबाई, संत सावता माळी, संत तुकाराम यांसारख्या संतांनी अध्यात्माची सांगड दैनंदिन विहित कर्माशी घालून भक्तिमार्ग सोपा केला, जिथे सामाजिक समतेचा आदर्श निदान अध्यात्मिक क्षेत्रात तरी संतांनी रुजवला, जिथे ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ असा साधू ओळखण्याचा निकष संतानी घालून दिला. त्याच महाराष्ट्रातील जनतेला या थोर संतपरंपरेचा विसर पडावा आणि अशोक खरातासारख्या भोंदूंच्या पायावर नतमस्तक व्हावेसे वाटावे. यासारखी खेदाची दुसरी बाब नाही.

भोंदू खरातच्या अनुयायांमध्ये जसा अडाणी लोकांचा एक वर्ग आहे. (येथे अडाणी म्हणजे निरक्षर नव्हे. तर वैज्ञानिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनाचा अभाव म्हणजे अडाणी असा अर्थ अभिप्रेत आहे.) अनेक वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांचाही या भोंदू बाबाच्या अनुयायांत समावेश असल्याचे उघड झाले आहे. राजकारण्यांची छायाचित्रे व्हायरल होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे मात्र त्या प्रमाणात पुढे आलेली दिसत नाहीत. त्यांचेही पितळ उघडे पाडले जाणे गरजेचे आहे. कारण या अधिकाऱ्यांना मानणारा एक तरुण वर्ग समाजात आहे. समाजमान्यता मिळालेली प्रतिष्ठित व्यक्ती जेव्हा एखादी सामाजिक कृती करतो, तेव्हा त्याला आदर्श मानणारा समाजही त्या व्यक्तीचे अनुकरण करू लागतो. म्हणून या अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी झाली पाहिजे. ज्या कोणाचे या भोंदूशी संबंध आहेत त्यांना कठोरात कठोर शासन केले जाणे गरजेचे आहे. ज्या लोकांकडून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार केला जावा अशी अपेक्षा भारतीय घटनेने केली आहे तोच वर्ग या प्रकरणी वैज्ञानिक दृष्टिकोन धाब्यावर बसवत आहे, असे प्रथम दर्शनी तरी निदर्शनास येते. हे राज्यघटनेचे उल्लंघन आहेच, सोबत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक संतपरंपरेला काळिमा फासणारी बाबदेखील आहे.

कवियत्री बहिणाबाई चौधरी म्हणतात,

“नको नको ज्योतिषा , माझ्या दारी नको येऊ,
माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू.
धनरेषांच्या चऱ्यांनी, तळहात रे फाटला,
देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला…
म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या,
बापा नको मारू थापा, अशा उगा खऱ्या खोट्या.”

निरक्षर बहिणाबाईंना हे कळालं तर साक्षर सुशिक्षितांना हे का बरं कळू नये? अंधभक्तांपुढे बहिणाबाई कित्येक पटींनी उठून दिसतात. मूल होत नाही म्हणून या भोंदू खरातकडे जाणाऱ्या, त्याच्या लैंगिक शोषणाला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठी आहे. ‘नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती?’ म्हणजे जर स्त्रियांना केवळ नवसांनी मुले होत असतील तर त्यांना पतीची गरज तरी का पडावी? गंमत म्हणजे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना फक्त निरीक्षणाच्या आणि तर्काच्या आधारावर त्या काळातील संतांना जे उमगले ते आपल्याला आजही का पटत नाही.

समाजातील सुशिक्षित मानला जाणारा वर्ग या भोंदूगिरीला बळी का पडला असेल? याची दोन कारणे देता येतील. एक म्हणजे मुळातच ते अंधश्रद्ध असतील. त्यांचा बुवाबाजी, मंत्र-तंत्र, जादूटोण्यावर विश्वास असेल. हा विश्वास काही सहज लोकांत निर्माण होत नाही. तर त्यामागे नियोजनबद्ध काम करणारी एक यंत्रणा असते. समाजातील अनेक लोकांचे जीवन असुरक्षिततेने भरलेले असते. अशा परिस्थितीत लोकांना मानसिक आधार, आशा किंवा दिलासा हवा असतो. याच गरजेचा फायदा काही भोंदू, ढोंगी बाबा घेतात. हे बुवा-बाबा खोटी आशा निर्माण करतात, “तुमच्या सर्व समस्या एका पूजेमुळे सुटतील” किंवा “विशेष उपायाने लगेच श्रीमंती येईल”. असे सांगून किंवा लोकांच्या मनात भीती निर्माण करून त्यांना नियंत्रित केले जाते. हे सर्व विचारपूर्वक आणि नियोजनबद्धरित्या केले जाते. टीव्ही, समाजमाध्यमे, जाहिराती यांच्या माध्यमातून या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. अनेक मराठी वृत्तवाहिन्यांवर ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य सांगणारे महाभाग आपले दुकान चालवत असतात. दुसरे कारण म्हणजे या भोंदुंचा प्रभाव राजकारण्यांवर आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे धरणाचे पाणी एका भोंदूच्या संस्थानाला वळवले जाणे, पुरेसे बोलके आहे.

या भोंदू बाबा प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी आपला राजीनामा देताना, आपण वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे खरातबाबाकडे जात होतो अशा आशयाचे विधान केले. पण आपण केलेले कृत्य अत्यंत निंदनीय आहे याची कल्पना आल्यानंतर, आता सगळे बिंग फुटले आहे याची जाणीव झाल्यानंतर. वारकरी परंपरा काय सांगते याचा पत्ता या माजी अध्यक्षांना आहे का? कधी डोळसपणे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबांचा गाथा हे वारकरी संप्रदायाने पूज्य मानलेले ग्रंथ त्यांनी वाचले असतील का? असे मोघम विधान करणे आणि वारकरी संप्रदायाला आपल्या कृत्यासाठी जबाबदार धरणे अयोग्य आहे.

“टिळा टोपी उंच दावी , जगीं मी एक गोसावी,
अवघा वरपंग सारा,पोटीं विषयांचा थारा,
मुद्रा लावितां कोरोनि ,मान व्हावयासी जनीं,
तुका म्हणे ऐसे किती , नरका गेले पुढें जाती.”

असा स्पष्ट शब्दात तुकोबांनी भोंदूगिरीचा निषेध केलेला असताना. आपण वारकरी संप्रदायाचे पाईक हे विधान फार चमत्कारिक आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील समाज अनिष्ट चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा यामध्ये अडकलेला होता. अशा स्थितिशील समाजाला गतिशील करण्यासाठी संतांनी वेगवेगळे मार्ग अनुसरले कीर्तन परंपरा या महाराष्ट्रात रुजवली. याच परंपरेचा वापर प्रसिद्धीसाठी आणि त्याद्वारे स्वतःच्या लैंगिक इच्छापूर्तींसाठी एक तथाकथित ह.भ.प करत असल्याचे उघड होते, तेव्हा मन उद्विग्न होते. ह.भ.प.निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी मध्यंतरी “शाळेतल्या मुलीचं दप्तर तपासत जा. मुलीचे मोबाइल चेक करत जा. तीन-तीन सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे. दोन नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाइल घरात आवाज देत नाही, सज्जन आहे तो.” असे विधान केले.

असेच यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हे दुसरे महाराज. फरक इतकाच की एका महाराजांच्या डोक्यात जातपितृजासत्ता खोलवर रुजलेली आहे ती अधून मधून वाणीच्या माध्यमातून बाहेर येते तर दुसऱ्या महाराजाच्या अत्याचारी विकृतीतून ती बाहेर आली. भोंदू खरातच्या प्रकरणाला समाज माध्यमांतून वाचा फोडली जात असताना. पारनेरमधील कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याचे प्रकरण मागे पडत आहे. या महाशयानी कीर्तन परंपरेचा वापर करून प्रसिद्धी कमवली, माया जमवली. स्वतःची ‘श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था स्थापन’ केली आणि पुढे त्याने एका अल्पवयीन मुलीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याचे आरोप झाले. वारकरी संप्रदायाच्या नावाखाली अनेक भोंदू लोक स्वतःच्या नावापुढे ह.भ.प पदवी लावून कीर्तनकार झालेले आहेत. अशा बुवाबाबांना वेळीच ओळखून वारकरी संप्रदायाने त्यांच्यापासून फारकत घ्यायला हवी.

खरंतर वारकरी संप्रदायाला दादा महाराज सातारकर, नाना महाराज साखरे, बाबासाहेब आजरेकर, मामासाहेब दांडेकर अशा तलेवार विद्वानांची परंपरा लाभलेली आहे. अगदी अलीकडील नाव घ्यायचं म्हणजे ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर हे तरुण कीर्तनकार होय. त्यांचे ‘होय होय वारकरी’ हे पुस्तक वारकरी संप्रदायावरती भाष्य करणारे एक प्रमुख पुस्तक आहे. बरेच तरुण कीर्तनकार वारकरी संप्रदायाचा सखोल अभ्यास न करता कीर्तनाला उभे राहतात, प्रसिद्धी मिळवतात. स्वतःच्या संस्था उभ्या करतात. यातून पैसा मिळतो. पोटापाण्याची सोय होते, पण ज्यांचा वारकरी संप्रदायाशी काडीमात्र संबंध नाही अशांनाही सावधपणे ओळखता आले पाहिजे. पाठांतराच्या जोरावर पोपटपंची करणे वेगळे आणि समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘अभ्यासोनी प्रकटावे, नाही तरी झाकोनी असावे’ या उक्तीनुसार अभ्यास करून कीर्तन करणे वेगळे. एखाद्या व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा तास असतो, तसा कीर्तनातही असावा. त्यामुळे अशा तथाकथित ह.भ.पंचे अर्धवट ज्ञान बाहेर येईल. समाजापुढे या ढोंगी बुवांचे खरे स्वरूप प्रकट होईल.

बुवा-बाबाच्या नादाला लागण्याआधी, त्याच्या चरणावर नतमस्तक होण्याआधी, त्याचे शिष्यत्त्व स्वीकारण्याआधी, त्याला गुरु करून घेण्याआधी-

“गुरु कीजै जानि के, पानी पीजै छानि,
बिना बिचारे गुरु करे, परै चौरासी खानि.”

गुरू आधी तपासून मगच स्वीकारावा. अन्यथा तोंडावर आपटण्याची वेळ येते, हा संत कबीरांचा सल्ला आपण कधी ऐकणार आहोत का?

हल्ली भगव्या रंगाचे आकर्षण फार वाढलेले आहे. कोणीही सोम्या गोम्या उठतो, भगवी वस्त्र धारण करतो. आणि संन्यासी म्हणून मिरवतो. खरंतर भगवा रंग म्हणजे त्यागाचे प्रतीक. पण आज भगव्या रंगाच्या आडोशाने राजरोस विकृत चाळे करणारे बुवा-बाबा महाराष्ट्रात आहेत. समाज अशा लोकांना साधू पुरुष म्हणून मानसन्मान देतो.

“भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा,
तेथे अनुभवाचा, काय पाड.”

प्रसिद्धीपोटी चमत्कारांचा दावा करणारा, भगवी वस्त्रे लेऊन आपला स्वार्थ साधणारा बुवा-बाबा हा ढोंगीच असणार यात तीळमात्रही शंका मनात येता कामा नये. जो महाराज, बुवा-बाबा चमत्कार करतो त्याला लांबूनच नमस्कार घातलेला बरा…! स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून प्रामाणिकपणे काम केले तर यश हमखास मिळते. त्यासाठी कोणत्याही बुवा-बाबाकडे स्वतःचे भविष्य पाहण्याची गरज नाही. कर्मकांड करण्याची गरज नाही. माऊली म्हणतात,

“तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्मकुसुमांची वीरा,
पूजा केली होय अपारा, तोषालागीं.”

ज्या महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा सर्वप्रथम पारित होतो त्याच पुरोगामी महाराष्ट्रात भोंदू खरातसारखा बुवा अध्यात्माच्या नावाखाली विकृत चाळे करतो. हे कुठेतरी आपण अधोगतीला लागल्याचे निदर्शक आहे. भोंदू खराताकडे जाणाऱ्या लोकांची जशी चूक आहे तसाच सरकारचीही दोष आहे. भोंदू बाबाचे प्रकरण बाहेर आल्यानंतर सगळेच हात साफ करून घेत आहेत. परंतु या बुवाबाजीच्या विरोधात सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या का? सरकारकडे कायद्याचे पाठबळ असताना अशी घटना महाराष्ट्रात होतेच कशी? जादूटोणा, भोंदुगिरी विरोधात सरकारने काय पावले उचलली आहेत? समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सरकारने कोणत्या स्वरूपाचे काम केले आहे? आजही असे कित्येक बुवा-बाबा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांचे वेगवेगळ्या पातळीवर शोषण करत आहेत. भोंदू अशोक खरातच्या निमित्ताने महाराष्ट्र यातून योग्य तो बोध घेईल आणि वर उल्लेख केल्याप्रमाणे स्वतः कोणाबाबत अनाचार करणार नाही व कुठे अनाचार होत असेल तर फक्त बघ्याची भूमिका घेणार नाही अशी अपेक्षा.

swapniltambe2712@gmail.com