गिरीश कुबेर

ग्रीसचे धडे – ४

pune rain marathi news, pune unseasonal rain marathi news
पुण्यात हलकापाऊस; दुचाकी घसरण्याच्या घटना
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

मायदेशी परतण्याचा दिवस आणि वेळ आली. वेब-चेक इन झालं होतं. त्यामुळे निवांतपणे विमानतळावर पोहोचलो. त्यानंतर जे काही घडलं ते घाम फोडणारं. त्याचा हा अनुभव..

तसं खूपच साम्य आहे आपल्यात आणि ग्रीकांत. एखाद्या गावात मागच्या गल्लीत एखादा कचऱ्याचा ढीग दिसतो आणि ग्रीस हा युरोपपेक्षा आशियाच्या जवळ का ते कळतं. संध्याकाळच्या मद्यालयातल्या गप्पांतला आवाज जरा चढा लागला तर ग्रीक बंधू/भगिनी युरोपियनांप्रमाणे तितके काही खजील होत नाहीत. हे वर्तमान. पण इतिहासाचं काय?

 गंमत म्हणजे ग्रीस हा प्राचीन काळात एक देश असा नव्हताच. शहरं, प्रांत यांचा तो एक महासंघच जणू. ही शहरं, हे प्रांत एकमेकांशी लढायचे. त्यांचे आपापसांत संघर्ष व्हायचे. पण परक्यांविरोधात एकत्र यावं असं काही त्यांना वाटलं नाही. ही शहरं/प्रांत यांच्यातली शासनपद्धतीही अगदी भिन्न होती. कुठे सरंजामशाही होती, कुठे राजेशाही तर कुठे थेट हुकूमशाही. ख्रिस्तपूर्व ३३८ साली मॅसेडॉन प्रांतात दुसरा फिलिप सत्तेवर आला आणि चित्र बदललं. त्यानं एकमेकांशी युद्धं करण्यात मश्गूल स्थानिक सुभेदारांना एकत्र आणलं आणि या सर्वास काही एक आकार द्यायचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आलंच. पण खरा यशस्वी ठरला तो त्याचा मुलगा.

तो अलेक्झांडर द ग्रेट. इजिप्तमधल्या अलेक्झांड्रियापासून ते तुर्कस्तानापर्यंत अनेक शहरं त्यानं वसवली. थेट भारतापर्यंत आला होता तो. त्याच्या कर्तृत्वाच्या खुणा आज मध्यपूर्वेत अनेक देशांत आढळतात. पण ग्रीकांचं कौतुक अशासाठी की ते हे इतिहासाचं ओझं घेऊन अजिबात जगत नाहीत. आपण इतिहासात महान होतो, पण त्याचं आता काय इतका सरळ वास्तववादी सूर त्यांच्यात दिसतो. उगाच पूर्वीच्या काळी इथे सोन्याचा धूर निघत असे, पण परकीयांनी कसं आपल्याला लुटलं आणि मातीमोल केलं, ‘त्यांच्या’मुळेच केवळ आपण मागास राहिलो असं अरण्यरुदन अजिबात कानावर पडत नाही ग्रीसमध्ये. खरं तर अलेक्झांडर द ग्रेटचा देश हा. त्याच्या काळातल्या शौर्यकथा, रामराज्याच्या दंतकथा वगैरेंवर सहज वर्तमानातलं अपयश दडवता येईल ग्रीकांना. पण तसं ते अजिबात करत नाही. अगदी इतिहासाचा अभ्यासक किंवा वस्तुसंग्रहालयाचा अधिष्ठाताही एखादी सिनेमाची कथा सांगावी तितक्या रसाळपणे आपल्या देशाचा इतिहास सांगतो, पण त्याची तटस्थता बरंच काही शिकवून जाणारी. ज्या इतिहासाचं आपण काहीही करू शकत नाही त्यावरून वर्तमानात डोकी फोडायची नसतात हे त्या टिकलीइतक्या देशाला कळतं याचं कौतुक वाटावं की शल्य हे ठरवणं तसं अवघडच.

एका बाजूला पॉसीडॉनचा रम्य इतिहास आणि दुसरीकडे त्या वाटेवर राजधानी अथेन्समध्ये अगदी समुद्राच्या चौपाटीत उपनगरीय स्टेशन बांधण्याइतकी आधुनिकता असा हा देश! म्हणजे ट्राममधून पाऊल बाहेर टाकलं की थेट वाळूतच अशी गंमत. आणि तरीही प्रवासी आणि चौपाटीवरचे आपापल्या परिसराची शिस्त आणि आदब पाळत एकमेकांना आपला त्रास होणार नाही याची काळजी घेत आपापले व्यवहार पार पाडत असतात.

 त्याचा अनुभवानंद पुरेसा घेऊन झाल्यावर मायदेशी परतण्याचा दिवस आणि वेळ आली. वेब-चेक इन झालं होतं. त्यामुळे निवांतपणे विमानतळावर पोहोचलो. त्यानंतर जे काही घडलं ते घाम फोडणारं. त्याचा हा अनुभव. झालं ते असं..

 पुलंच्या ‘प्रवासात मी अब्रूपेक्षाही तिकिटाला जपतो’ या उक्तीस जागत आम्ही विमानोड्डाण वेळेच्या दीडेक तास आधी विमानतळावर पोहोचलो. बॅगा देण्याचा काऊंटर पूर्ण रिकामा! ते पाहून गदगदायलाच झालं. पुढचे डय़ुटी फ्रीचे बेत मनात तयार झाले. पाच-दहा मिनिटांत काम झालं की नंतर निवांत.. असा विचार. त्याच उत्साहात काऊंटरवर पासपोर्ट दिले. पलीकडच्या महिलेची सूचना – ‘ युअर एअर सुविधा सेल्फ डिक्लरेशन प्लीज!’

 एअर सुविधा.. ही काय नवीन भानगड? हा शब्दच त्या वेळी पहिल्यांदा ऐकला. त्यात ‘सुविधा’ होती, म्हणजे हे काही ग्रीस सरकारचं लचांड असणार नाही, हे कळलं. पण म्हणजे काय? आमचा हा गोंधळ तिला कळला. काचेपलीकडून तिनं सांगितलं.. तुमच्या देशानं परदेश प्रवासानंतर मायदेशात परतणाऱ्यांसाठी हे एअर सुविधा डिक्लरेशन भरून घेणं आवश्यक केलंय. सो सॉरी, आमचा नाइलाज आहे. तुम्हाला ते द्यावं लागेल.

 प्रवासाआधी आवश्यक त्या सर्व सरकारी यंत्रणांकडून माहिती घेतली होती. कोविडकाळात प्रवास हेच आव्हान होतं, तेव्हा आवश्यक ती सर्व खबरदारी घेतलेली बरी हा विचार! पण एकानंही या एअर सुविधाविषयी काही सांगितलं नव्हतं. आम्हाला चिंता होती ग्रीसमध्ये हिंडताना, तारांकित-अतारांकित हॉटेलात वगैरे ठिकाणी कोविड लसीकरण, चाचण्या अहवाल वगैरेविषयी विचारलं जाईल. पण इतक्या दिवसांत कोणीही कुठेही कशावरनंही अडवलं नव्हतं. जणू कोविड असं काही घडलंच नव्हतं. त्या आनंद-वेगास इथं विमानतळावर, मायदेशी परतताना असा हा कचकन ब्रेक लागला. हे एअर सुविधा प्रकरण कसं हाताळायचं? एव्हाना मागे पाच-सहा प्रवासी जमलेले. तेही भरतभूकडे निघालेले. त्यांनाही माहीत नव्हतं हे प्रकरण काय. आपल्या अज्ञानात अन्यही सामील झाले की एक दिलासा मिळतो. तसं काहीसं झालं. मग काचेपलीकडची ती महिला बाहेर आमच्यात आली आणि नक्की काय करायला हवं आम्ही ते तिनं सांगितलं. आवश्यक तो फॉर्म अर्थातच आमच्याकडे नव्हता. ती म्हणाली ऑनलाइन भरायचाय. दिल्ली विमानतळाच्या वेबसाइटवर जा.. तिथं तो आहे.

पण आमचं मुंबईप्रेम जागं झालं. तिला म्हटलं आम्ही चाललोय मुंबईला तर दिल्ली विमानतळाच्या वेबसाइटला का जाऊ? ती म्हणाली.. नका जाऊ! पण हा फॉर्म दुसरीकडे कुठेच नाही. आम्हाला सांगितलंय तुमच्या देशानं की भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी दिल्ली वेबसाइटवरनं फॉर्म घ्या.. नसेल घ्यायचा तर नका घेऊ.

या वाक्यानं सगळेच भानावर आले. झक्कत दिल्ली विमानतळाच्या वेबसाइटवर गेलो. आमच्या मागच्यांची कीव आली. त्यांच्याकडे ना मोबाइल होता, ना लॅपटॉप, ना त्यामुळे होती काही मोबाइल कनेक्टिव्हिटी. ते तर पार भेदरलेले. त्यांना म्हटलं आधी आमचं उरकतो, समजून घेतो आणि मग तुमच्यासाठी हे करू या.

मग दिल्ली वेबसाइटला भेट. तिथून तो फॉर्म डाऊनलोड करणं. तो भरणं. पहिले प्रश्न अगदी बिनडोक सरकारी. सर्दी, खोकला, ताप, दमा, हिवताप, टीबी, कॅन्सर वगैरे काही आजार झालाय का? आजारातून बाहेर पडल्यावर पत्ता वगैरे. तो खराच द्या अन्यथा.. अशी धमकी. मग सूचना तुमचं लसीकरण प्रमाणपत्र अपलोड करा. सुदैवाने त्याची प्रत मोबाइलमध्ये होती. ती अपलोड केली. लगेच सूचना : ‘फॉरमॅट इन्व्हॅलिड’ – जेपीजी फाइल नाही चालणार, पीडीएफच हवी. आता ती कशी कन्व्हर्ट करणार? सुदैवाने मेहुण्याच्या लॅपटॉपमध्ये कन्व्हर्टर अ‍ॅप होतं. मग सगळं कागदपत्रांचं लटांबर त्याच्या लॅपटॉपमध्ये पाठवून द्यायची झटापट. नशीब हे की हे सर्व ‘क्लाऊड’वर होतं. ते झाल्यावर मग ‘आरटीपीसीआर’ चाचणीचं प्रमाणपत्र. त्याचीही पीडीएफ हवी. तीही केली.

मग प्रश्न. सहप्रवासी कोण? ते नाव दिलं. त्याचा प्रवास-तपशीलही तुमच्यासारखाच आहे का, हा प्रश्न. उत्तर अर्थातच होकारार्थी. त्यावर पुढची सूचना. सर्व तपशील भरण्याची. मग आधी विचारलेला प्रश्न, त्याचं उत्तर.. याचा अर्थ काय? पण विचारणार कोणाला! खाली मान घालून पुन्हा लेखनकामाठी केली. मग वेबसाइटवरून शाब्बासकी मिळाली. ती मिरवत पुन्हा कौऊंटरवर. तर ती महिला म्हणाली : ७२ तास आधीचं करोना चाचणी प्रमाणपत्र हवं.

 ती चाचणी केलीच नव्हती. एव्हाना सर्वाचा धीर खचलेला. आणखी दोन-दिवस राहावं लागलं तर काय याची चाचपणी सुरू झाली. त्या महिलेला म्हटलं.. आम्ही आमच्या मायदेशात जातोय.. तुला का या चाचणीची फिकीर. ती उत्तरली.. मला अजिबात ती नाही. तुमच्याच देशाला आहे. मग काहीशी वादावादी. त्यावर तोडगा निघाला तो असा की लशीची पूरक मात्रा घेतलेली असेल तर चाचणीची गरज काय? पण हे ती मान्य करेना. मग म्हटलं संबंधित भारतीय अधिकाऱ्यांना विचार. ती शहाणी. तिनं आपल्याच देशाच्या अधिकाऱ्यांना विचारलं. ते म्हणाले असावेत, जाऊ दे ना.. तू कशाला भानगडीत पडतीयेस जाणाऱ्यांच्या, ते येत असते तर गोष्ट वेगळी. हा तोडगा मान्य झाला.

या दिव्यानंतर ‘सुरक्षा जाँच’ वगैरे सोपस्कारानंतर आत गेलो तर विमानाचे दरवाजे बंद व्हायला फक्त १५ मिनिटे होती. मागच्या प्रवाशांचं काय झालं कोणास ठाऊक. काऊंटरवर सर्वाना बजावलं होतं, हे प्रमाणपत्र भारतात गेल्यावर मोबाइलवर काढून ठेवा. तपासलं जाईल.

 मुंबईला उतरल्यावर ते शोधत होतो, कोण तपासणार ते.. इमिग्रेशन कक्षाआधी एक फक्त बोर्ड होता. त्यावर प्रश्न : एअर सुविधा डिक्लरेशन केलं आहे ना?

ते पाहायला, तपासायला कोणीही नाही. इतर देशांतून आलेल्या प्रवाशांचीही अशीच संतप्त प्रतिक्रिया. मग या सव्यापसव्याचा अर्थ काय? परदेशात कोणी विचारलंही नाही याबद्दल आणि मायदेशात परतताना मात्र हा छळ! जणू घरी परतल्यावर काय वाढून ठेवलंय याचा तो इशाराच. 

ता.क. : दोन दिवसांपूर्वीच बातमी आली. सरकार या ‘एअर सुविधा’चा फेरविचार करतंय. काही भारतीयांकडून विमानं चुकल्याच्या तक्रारी आल्याचं सरकारनं म्हटलंय.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber