अन्यथा : तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे..

शाळा हा शालेय शिक्षणाच्या वाटेवरचा मोठा अडथळा आहे असं मार्क ट्वेन म्हणाला होता. त्या धर्तीवर ‘साइट सीइंग’ हा पर्यटनानंदाच्या वाटेवरचा मोठा अडथळा आहे..

अन्यथा : तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे..
ग्रीसचे धडे

गिरीश कुबेर

ग्रीसचे धडे – ३

अंधार पडताच उतारावरची सर्व घरं, हॉटेलं यांनी मेणबत्त्या लावल्या. वातावरण एकदम नरकचतुर्दशीची पहाटच बनलं. आकाश जणू जमिनीवर सांडलं..

शाळा हा शालेय शिक्षणाच्या वाटेवरचा मोठा अडथळा आहे असं मार्क ट्वेन म्हणाला होता. त्या धर्तीवर ‘साइट सीइंग’ हा पर्यटनानंदाच्या वाटेवरचा मोठा अडथळा आहे.. हे जवळपास २६-२७ देश फिरल्यानंतर आलेलं अनुभवसिद्ध शहाणपण आहे. काय होतं की पर्यटनाला निघालेली माणसं काही ‘बघत’ नाहीत, अनुभवत नाहीत. फक्त ‘साइट सीइंग’ करतात. या अशा साइट सीइंगला सोकावलेल्यांची भाषा बघा! तशीच असते. कर्त्यांची. म्हणजे ते म्हणतात.. आमचं लंडन ‘झालंय’, पॅरिस ‘झालंय’, यंदा आम्ही स्पेन ‘करणार’ आहोत इत्यादी. यातल्या बऱ्याच जणांच्या हातात वाणसामानाची असते तशी अगदी यादीबिदी असते. आणि ‘झाली’ त्यातली एखादी जागा की लगेच ते यादीत टिक करतात. न जाणो यादीतल्या ४३ जागांऐवजी ट्रॅव्हल कंपनीवाल्यानं ४२च दाखवल्या तर काय घ्या! म्हणून ही जागरूकता. त्यातल्या काही ग्राहक चळवळीशी संबंधित असलेल्यांना तर मनातून एखादी जागा ‘चुकावी’ असंच वाटत असावं, असा वहीम घ्यायला जागा आहे. कारण लगेच हे ग्राहक न्यायालय, गेला बाजार वर्तमानपत्रात संपादकास पत्र वगैरे लिहायच्या तयारीतच असतात. असो. अशांनी अजिबात जाऊ नये आणि ज्यांना काहीही पाहायचं नाही, करायचं नाही.. केवळ अनुभवायचं आहे अशांनीच जावं अशी एक जागा ग्रीसमध्ये आहे. इतिहासबितिहास समजून झाला की तिकडे जायचं हे ठरलेलंच होतं. इटलीतलं व्हेनिस किंवा ऑस्ट्रियातलं झेल अम सी कसं तसं हे ग्रीसमधलं गाव. सँतोरिनी.

 हाताच्या तळव्याइतकं बेट आहे हे. वस्ती असेल १२-१३ हजार. त्यामुळे सगळेच तसे एकमेकांना ओळखत असावेत. कारण येता-जाता प्रत्येक स्थानिक दुसऱ्या स्थानिकाला हात करून ग्रीक भाषेत काय कसं काय विचारत असतो. ही त्यांची सवय गावाकडची आठवण करून देणारी. आणि तसे ग्रीकही भारतीय वाटावेत इतके अघळपघळ. सदेह बोलतात. म्हणजे हातवारे, खांदे उडवणं, ओठांचे चंबू इत्यादी. साधा पत्ता विचारला तरी इतकं काही सांगू लागतात की वाटतं थोडय़ा वेळात तेच म्हणतील.. थांबा, मीच येतो दाखवायला. सँतोरिनीत याचा वारंवार प्रत्यय येत गेला.

हे बेट तसं दूर आहे. नुसतं अथेन्स वगैरे ‘करणाऱ्या’स गैरसोयीचं आहे. बोटीनं यावं लागतं. पाच-सात तासांचा प्रवास. तोही इतका प्रसन्न करणारा की नांदीच इतकी आनंददायी आहे तर पुढचं नाटक किती रम्य असेल अशी हुरहुर निर्माण करणारा. मुळात त्या परिसरातला समुद्रही इतका ताजा टवटवीत. नुकताच सुस्नात झाल्यासारखा. शुद्ध निळाशार. त्यातनं ओंजळभर पाणी काढलं तर हातात ती निळाई येईल, असं वाटायला लावणारा. आपल्याकडचे समुद्र कसे कंटाळवाणे करडे असतात. दमले, भागलेले आणि कष्ट करून करून राखाडी रंगाचे झालेले. निवृत्तीला आलेला एखादा सरकारी कर्मचारम्ी दररोज १० ते ५ च्या फेऱ्यात अडकलेला असतो तसे आपले समुद्र. भरती-ओहोटीच्या फेऱ्यात सापडलेले. तिकडे त्या समुद्राच्या निळाईशी आकाशही स्पर्धा करत असतं आणि या दोघांना सामावून घेणारी, थंडी म्हणू नये इतपतच उबदार हवा. तिथला समुद्रही ‘लागत’ नाही की काय कोण जाणे! कारण कोणी त्या सुंदर बोटीवर आलं मागताना दिसलं नाही.

या उत्साही आनंदात सँतोरिनी येतं, पण घोर निराशा करतं. बोट बंदराला लागल्यानंतर डोक्यावरचं ऊन टोचू लागलेलं असतं. आणि मागे रखरखीत डोंगर. लडाखच्या रस्त्यावर दिसतात तसे. स्वत:त काही रुजवू न देणारे. आपण चुकलो की काय.. असा भाव चेहऱ्यावर. तो पाहायची तिथल्या यजमानांना सवय झाली असावी बहुधा. तो म्हणतो : अनदर फोर्ती मिनीत जर्नी.. देन ब्युतिफुल.. 

तो अनदर जर्नी सुरू होतो. एक-दोन वळणांनंतर आणि जरा उंच गेल्यानंतर डोंगराची दुसरीच बाजू समोर येते. उतारावर आखीव-रेखीव पोपटी हिरवे तुकडे पसरलेले. त्यांच्या कोपऱ्यांत गोंडस घरं. आपण हे सर्व काय, हे विचारायचा प्रयत्न करतो. यजमानाला वाटतं तिथे जायची इच्छा आपण व्यक्त करतोय. तो म्हणतो.. नॉत नाऊ.. लॅतर. नॉत नाऊ तर नॉत नाऊ! साधारण पाऊण तासात आपण पोहोचतो आपल्या हॉटेलमध्ये वगैरे. गाडीतून उतरल्या उतरल्या डोळे विस्फारतात आणि सौंदर्यवाचक चीत्कार कानावर येऊ लागतात. प्रत्येकाची अवस्था अशीच असते. सँतोरिनी साधारण कन्याकुमारीसारखं. पण तितकं रुंद नाही. अगदी पश्चिमेकडल्या टोकाला तर, इंग्रजीतलं व्ही हे अक्षर आडवं केलं तर कसं दिसेल तसा त्या बेटाचा आकार. दोन्ही बाजूंनी ती समुद्री निळाई. अथांग पसरलेली. मध्येच; निळय़ा आकाशात पांढऱ्या ढगांचे दोनचार चुकार तुकडे तरंगावेत तसे दोनचार लहानसहान जमीन तुकडे. आणि मधून बरोबर पाहिलं तर त्या व्ही अक्षराच्या आडव्या दोन बाजू एकमेकांच्या जवळ येत येत एकमेकांना अखेरीस भेटलेल्या आणि एक होऊन समुद्राला बिलगलेल्या. समुद्रही सोज्वळ. शांत. उगाच घाबरवणारा नाही. त्यामुळे लहान लहान पोरंटोरंही त्यावर घसरगुंडीचा खेळ खेळण्यात रंगलेली. आणि दोन्ही बाजूंच्या उतारावर छोटी छोटी घरं. सगळय़ांचं छप्पर एकसारखं. अर्धगोलाकार. सगळय़ाच घरांची छतं अशीच्या अशी. यजमान म्हणाला की सुरुवातीला हे इथल्या लोकांनी केलं ते छतावरचं पाणी सहज गोळा करता यावं म्हणून. पण आता तिथल्या नगरपालिकेचा नियमच आहे तसा. कोणाकडेही जायचं असेल तर दोनचार पावलं उतार आणि दोनचार पावलं चढ. कधी जास्तच. बहुतांश घरं दोनच रंगांत. समुद्र, आकाश यातल्या निळाईशी स्पर्धा करणारा निळा. आणि आपल्याकडे पाहायला मिळत नाही असा सुंदर पांढरा. पण आपला पांढरा सरकारी दवाखान्यातल्या भिंतींची आठवण करून देतो. तिथला पांढरा हवाहवासा वाटतो. अनेक तरुणीही पांढऱ्या रंगांच्या स्कर्ट वा पायघोळ झग्यांमध्ये दिसत होत्या. आपल्याकडे पांढऱ्याला इतकी सांस्कृतिक पाचर मारून ठेवलेली आहे की पांढऱ्या कपडय़ात कोणी दिसलं की लगेच नर्स, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या अनुयायी किंवा शोकसभेतून आलेल्या बॉलीवूडी महिला वगैरे यांचीच आठवण येते. असो. आम्ही सँतोरिनीत पोचलो तेव्हा उन्हं उतरू लागली होती. पण अंधार पडायला आणखी दोन-तीन तास होते. त्या निळाईवर सोनपिवळं ऊन भलतंच आकर्षक वाटत होतं. अशा वातावरणात असुंदरही सुंदर भासू लागतं तर सुंदरांची काय कथा?

 आमच्या घराचा मालक म्हणाला, आता ‘जस्त रिलॅक्स’. कुठे कशासाठी म्हणून जायचं नाही, कसली वेळ पाळायची नाही, काही सुरू होण्याची वाट पाहायची नाही आणि म्हणून काही बंद व्हायची चिंता नाही. बॅगा त्या घरात टाकून आम्ही त्या आडव्या व्हीच्या मधून टोकाच्या दिशेनं निवांतपणे रवंथ करत निघालो. ऊन अधिकाधिक सोनपिवळं होत गेलं. दोन्ही बाजूंना कलादालनं वाटावीत अशी दुकानं, घरं. मध्येच रेस्तराँ. प्रत्येकानी दर्शनी टेबलावर चकचकीत बादल्यांत (वाईट शब्द आहे, त्याला इलाज नाही) वाइनच्या बाटल्या बुडवून ठेवलेल्या. वाइनचे टय़ुलिप ग्लासेस, त्यातली वातावरणातल्या सोनेरीपणाशी स्पर्धा करणारी वाइन आणि त्यातून आरपार जाणारी किरणं, त्या लोलकांतून पांढऱ्याशुभ्र कपडय़ांवर पडणारे कवडसे.. सारंच अनुभवनीय. हे रेस्तराँज चांगले रात्री १ पर्यंत सुरू असतात. आणि सकाळी ६ वाजता पुन्हा ताजंतवानं होत स्वागत करायला तयार.

ही आनंदभैरवी अधिक खुलली अंधार पडल्यावर. उतारावरची सर्व घरं आणि हॉटेलं यांनी मेणबत्या लावल्या आणि वातावरण एकदम नरकचतुर्दशीची पहाटच बनलं. वरचं आकाश जणू जमिनीवर सांडलं. पण कसलाही कानठळय़ा बसवणारा आवाज नाही. प्रसन्न शांतता आणि ती भंगवणारा तरुण-तरुणींचा किलकिलाट. साथीला हातातल्या ग्लासांचा किणकिणाट. रोजचं हे असं. करायचं काहीच नाही. आनंद घोट घोट घेत रेंगाळायचं. समुद्राच्या कडेला. गावातल्या चौकात. बाजारातल्या कट्टय़ांवर किंवा आणखी कुठे. इथल्या वास्तव्यात एकही कंटाळवाणा, दमलाभागलेला चेहरा दिसला नाही की कधी कोणी भिकेसाठी समोर हात पसरले नाहीत. रस्त्यांवरचे दिवेही अगदी नाकाखालचंच दाखवणारे. पण मध्यरात्र उलटल्यावरही चालत परतताना कधी काळजी स्पर्शून गेली नाही. दोनेक दिवसांत त्या हिरव्या तुकडय़ांचा अर्थही लागला. ते सर्व मळे होते. द्राक्षाचे. तिथल्या घराघरांत त्या द्राक्षांना मुक्ती मिळते. त्या मुक्तीचा आनंद हवा तितका घेण्याची सोय आहेच. दर चार पावलांवर भाषा बदलावी तशी दर घरात इथे द्राक्षद्रवाची चव बदलते. ती ‘देता किती घेशील’.. असा प्रश्न.

 इतक्या सुंदरतेची सवय नसते आपल्याला. गुदमरायला होतं. शुद्ध हवेत नाक चोंदतं तसं. हाही अनुभव. तुकारामबाबा म्हणतात तसा ‘तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे..’ असा आनंदाच्या डोही आनंदतरंग उमटवणारा..

girish.kuber@expressindia.com

      @girishkuber

मराठीतील सर्व विशेष लेख ( Features ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anyatha intimate greece school school education obstacle site seeing ysh

Next Story
कादंबरीच्या सीमोल्लंघनाची शंभरी..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी