हुमायून मुरसल

मुस्लिमांच्या ‘देवबंद मदरशा’चे प्रमुख वरवर आपण सारे एकच असे भासवणाऱ्या, धर्मसहिष्णुतेच्या बाता करत असले तरी त्यांच्या म्हणण्यातील द्विराष्ट्रवादी मेख संविधानवादी भारतीयांनी ओळखायला हवी..

Difference Between Congress And BJP Manifestos Sankalp patra Nyay Patra
काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

दारूल उलूम देवबंद मदरशाचे प्रमुख अर्शद मदनी यांनी अलीकडेच ‘जमात ए उलमा ए हिंदू’च्या अधिवेशनात आदम आणि मनु, अल्लाह आणि ॐ हे एकच असल्याचा सिद्धांत मांडला! त्या अधिवेशनात ते म्हणाले, ‘हिंदूुराष्ट्र स्थापण्याच्या निमित्ताने धर्माधतेने उच्छाद मांडलेला आहे. मुस्लिमांना, घरवापसी करा नाही तर देश सोडा, अशा धमक्या देण्यात येत आहेत. धर्माध राजकारणाने एकदा देश विभाजित झाला आहे. सेक्युलर राज्यघटना बाजूला करून धर्माच्या आधारे देश चालविण्याचा प्रयत्न झाल्यास पुन्हा देशाची फाळणी होईल. साम्राज्यवादी जगभरात देश तोडण्याचे कारस्थान रचत आले आहेत. नागालँड, मिझोराम इ. ख्रिश्चन राज्यांना ते तोडण्याचे प्रयत्न करतील.’ – हे सांगतानाच, मोहन भागवत आणि ‘आरएसएस’शी आमचा वाद नाही. देशहितासाठी धार्मिक सौहार्दतेचे सर्वानी रक्षण केले पाहिजे. अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

‘आदम आणि मनु’ तसेच ‘ॐ आणि अल्लाह’ एक असल्याचा सिद्धांत मांडताना, मदनी यांनी कुरआन आणि हदिस या मुस्लिमांच्या धर्मग्रंथांचा हवाला दिला. ‘इस्लामी श्रद्धेनुसार आदमला अल्लाहने मातीपासून बनविले, जीव फुंकला आणि भारतीय उपखंडात पाठविले. अल्लाहने संपूर्ण विश्वाची आणि सृष्टीची निर्मिती केली. अल्लाहने पृथ्वीवर पाठविलेला इस्लामचा पहिला प्रेषित आदम आहे. आदमने ‘एक अल्लाह’चा संदेश दिला. भारतीय धर्मशास्त्रात याच आदमचा उल्लेख मनु आणि अल्लाहचा उल्लेख ॐ असा आहे,’ असे या मदनी यांचे म्हणणे!

या तर्कटाचा अर्थ काय?
तपशिलात न जातासुद्धा, अर्शद मदनींच्या सिद्धांताचा हिंदू धर्मशास्त्रे, पुराणे इ. यांच्याशी मेळ बसत नाही हे उघड आहेच. शिवाय सुन्नी पंथीयांपैकी सर्वच इस्लामिक धर्मतज्ज्ञांनी मदनींशी सहमती दर्शवलेली नाही. इतर इस्लामी पंथांची सहमती कठीण आहे. मनुचा संबंध ‘मनुस्मृती’शी आहे, जो जातिव्यवस्थेचे कठोर पालन करणारे कायदे सांगतो. डॉ आंबेडकरांनी तर ‘मनुस्मृती’चे दहन केले आहे. भारतात जैन, बौद्ध, लिंगायत, शीख, ख्रिश्चन, पारसी या इतर धर्मसमूहांचे आणि आदिवासी, भटके इ. समाजगटांचे या सिद्धांताशी काय घेणेदेणे? अर्शद मदनींनी असा सिद्धांत मांडून ‘सनातन धर्मा’शी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या देशात ९५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या धर्मातरित मुस्लीम आणि बहुजन जनतेला ते काय संदेश देऊ इच्छितात?

अर्शद मदनींना हा सिद्धांत आता का आठवला? हिंदू आणि मुस्लिमांचा आदिम धार्मिक वारसा एकच आहे, असे दाखवून दिल्याने हिंदू-मुस्लीम एकोपा निर्माण होण्यास मदत होईल, असहिष्णुता आणि विद्वेष दूर होईल, असा चांगला हेतू या सिद्धांताची मांडणी करण्यामागे असल्याचे मानता येईल. पण, हा सिद्धांत एवढय़ापुरता मर्यादित राहात नाही. मदनी सिद्धांताकडे पुन्हा नीट पाहिल्यास (अल्लाहने आदमला बनवले/ भारतीय उपखंडात पाठवले आदी) भारताचा मूळ धर्म इस्लाम असे ते सुचवताहेत हे लक्षात येईल, त्यामुळे मुस्लिमांनी नव्हे तर हिंदूंनी घरवापसी केली पाहिजे, असाही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघेल. पुढे असेही अर्थ निघतात की, मुळात भारतभूमी ही इस्लामी भूमी असून मूलत: भारत मुस्लिमांचा देश आहे, इस्लाम परकीय धर्म नाही आणि मुसलमान परकीय नसून भारताचे मूलनिवासी आहेत. अशा प्रकारे, या सिद्धांताच्या माध्यमातून अर्शद मदनींनी घरवापसी आणि देश सोडण्याच्या धमक्यांनी अस्वस्थ झालेल्या मुस्लीम समुदायाला धीर देण्याचा आणि ‘आरएसएस’ला तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.


ही उचापतखोरी कशाला?

आधुनिक भारतीय राज्यघटनेने, भारत देश कोणाचा? भारतीय कोण? याचा कायमचा निकाल लावल्यानंतर, हेच प्रश्न, पुन्हा धर्माच्या आधारे उकरून काढायची उचापतखोरी कशाला? भारतीय राज्यघटनेने भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे सांगितले आहे. नागरिकत्वाचा मूळ कायदा आणि झालेल्या दुरुस्त्या गृहीत धरून, सर्वसाधारणपणे जो भारतात जन्मला किंवा कायद्याने भारतीय नागरिकत्व प्राप्त केले, तो भारतीय नागरिक आहे. जन्म, धर्म, जात, वंश, रंग, लिंग, प्रदेशनिरपेक्ष, प्रत्येक नागरिक कायद्यापुढे समान आहे. भारतीय जनता म्हणजे नागरिक सार्वभौम आहेत.अर्थात, आरएसएस आणि त्यांची राजकीय आघाडी असलेला भाजपसुद्धा भारताला धर्माधारित हिंदूुराष्ट्र बनवू इच्छितात किंवा‘भारत हिंदूंचा’ म्हणताना नागरिकत्वाचा आधार हिंदू धर्म आहे, असे मानतात. त्यांचे पाठीराखे मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनविण्याची भाषा बोलतात. हे अमान्य करणारे अर्शद मदनी आणि जमात ए उलेमासुद्धा भारत देश आणि भारतीय नागरिकत्वाचा मुद्दा, ‘ॐ अल्लाह’च्या सिद्धांताद्वारे इस्लामशी जोडण्याचा प्रयत्नकरतात. म्हणजे दोघांना द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत सोडायचा नाही! दोघांनीही राज्यघटनेचा मूळ धर्मनिरपेक्ष पायाच प्रामाणिकपणे मान्य केलेला नाही, असे दिसते.

अर्शद मदनींचा सिद्धांत, भारतीय मुस्लिमांना भेडसावणारा दुय्यम नागरिकत्वाचा आणि राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सोडवितो का? या सिद्धांतामुळे हिंदूराष्ट्राच्या मागणीचा आधार नाहीसा होतो का? माझ्या मते, द्विराष्ट्रवादी सिद्धांताला यामुळे उलट बळकटी मिळते. हा सिद्धांत भारताचे आणि भारतीय मुस्लिमांचे अतोनात नुकसान करणारा आहे. भारतीय राज्यघटनेचा आधार सर्व भारतीयांना आणि खास करून अल्पसंख्याकांना राजकीय मजबुती देणारा आहे.

मदनींना इतिहास, धर्मच का प्रिय?
मदनींचे म्हणणे मान्य केल्यास, जगभरातील विविध देशांत वास्तव्य करणाऱ्या मुस्लिमांचे काय होईल? धर्म मूलाधार मानल्यास युरोप, आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे मुसलमान भूमिपुत्र राहणार नाहीत. इराण, अफगाणिस्तानसह इस्लामी राष्ट्रांच्या इतिहासात मागे गेल्यास काय होईल? कारण ग्रीस, मेसेपोटेमिया, चीन, लॅटिन अमेरिका यांच्या प्राचीन संस्कृतीचे काय? प्रत्येक देशातील समाजविभागांचे आदिम धर्म, धर्मपुराणे, पौराणिक कथा, महाकाव्ये वेगवेगळी आहेत. धर्मग्रंथ वेगळे आहेत. जगाची विभागणी धर्माच्या आधारे करायची का? ऐतिहासिक आणि राजनैतिक वैचारिक प्रगतीची चक्रे उलटी फिरवायची काय? पुन्हा एकदा धर्मयुद्धांना आमंत्रण द्यायचे काय?

इतिहासातून संपूर्ण मानवजातीच्या हिताचे काही चिरंतन सत्य सापडत असेल तर घ्यावे. अन्यथा, इतिहास मेलेल्यांची कर्मकहाणी आहे. वास्तविक आधार आणि पुराव्यांनी सिद्ध झालेला असला तरी, इतिहास ही माणसाच्या कुतूहलाची गोष्ट असावी. एवढेच त्याला महत्त्व असावे. आपला अहंकार, अस्मिता, गौरव, वारसा, अभिमान आणि जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी इतिहासाला साकडे घालणे बंद करावे. राजकारणासाठी इतिहासाचा वापर हा
सध्याच्या राजकारण्यांची कतृत्वहीनता आणि नालायकी सिद्ध करतो. नागरिकांच्या बुद्दूपणाची पातळी कळते.

धर्म ही आत्यंतिक खासगी बाब आहे. तो प्रत्येकाचा सखोल आंतरिक आत्मशोध आहे. धर्म माणसाला प्रामाणिक, न्यायी आणि संवेदनशील बनवत असेल, तर ठीक आहे. धर्माचे राजकारण बंद होण्यासाठी प्रबोधनाच्या चळवळी बळकट झाल्या पाहिजेत. त्यापलीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन, चौकसबुद्धी, तार्किक विचार आणि बुद्धिवाद विकसित होण्यासाठी खूप काम होणे आवश्यक आहे. ते झालेले नाही, म्हणून माणसे अजूनही वैचारिक दारिद्रय़ात आणि विचारांनी हजार दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासात जगतात.

विकास असंतुलित, चंगळवादी आणि विकृत झाला आहे. पर्यावरण बरबाद होऊन, जागतिक तापमानवाढीने मानवजातीचे अस्तित्व संकटात आले आहे. आर्थिक असमानता अमर्याद आणि टोकाची झाली आहे. राष्ट्रवाद हिंसक आणि युद्धखोर बनला आहे. लोकांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवासाचे प्रश्न गंभीर आहेत. स्त्रियांची गुलामी पुरुषसत्ताकतेला दूर न करता संपणार नाही. ही खरी आव्हाने टाळण्यासाठी धर्माचे राजकारण माथी मारले जात आहे. धर्मनिरपेक्षता, वैचारिक मुक्ती, समानता आणि स्त्री-पुरुष समता नष्ट होणार असेल, होत असेल.. तर ‘अल्लाह आणि ॐ’ एक झाले तरी त्याचा उपयोग काय?

लेखक परिवर्तनवादी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.
humayunmursal@gmail.com