डॉ. हमीद दाभोलकर ,कार्यकर्ता, महाराष्ट्र अंनिस
सर्वधर्मीय बाबाबुवा यांना सध्याच्या काळी अगदी सुगीचे दिवस आल्याची परिस्थिती आहे. सर्वसाधारणपणे अंधश्रद्धा म्हटले की लिंबू-मिरची, मांजर आडवे जाणे, करणी-भानामती अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. सध्या हे चित्र झपाट्याने बदलते आहे. खरात प्रकरण आणि त्यानंतर महाराष्ट्रात ज्या ५०हून अधिकांवर कारवाई झाली त्यावरून बदलती भाषा सहज लक्षात येऊ शकेल. खरात बाबा हा स्वत: ‘ओशनोग्राफी’ नावाच्या गोष्टीतला तज्ज्ञ असल्याची बतावणी करायचा. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी जे पेय तो द्यायचा त्यालादेखील ‘ओशनोजल’ असे नाव होते. समुद्राचा अभ्यास करणार्या ‘ओशनोलॉजी’ या ज्ञानशाखेशी, नाव साधर्म्य सोडले तर याचा काडीमात्र संबंध नाही. विज्ञानाचे नाव घेऊन तद्दन अवैज्ञानिक गोष्टी प्रभावी मार्केटिंगद्वारे लोकांच्या गळी उतरवण्याचा एक मोठा उद्योग सध्या सुरू आहे. त्यामध्ये ‘ओशनोग्राफी’प्रमाणे मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन, डक्टिलोग्राफी, न्यूमरॉलॉजी, वास्तुशास्त्र, ऑराफार्मिंग, क्वांटम हीलिंग, टॅरो कार्ड ‘हो पोनो पोनो’ अशा अजब नावांच्या असंख्य गोष्टी आहेत.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्था आणि तिचे प्रणेते श्री श्री रवी शंकर यांनी सुरू केलेला ‘इंट्युशन’ नावाचा कोर्स हेदेखील त्याचेच उदाहरण आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे भावना दुखावल्या जाण्याच्या कालखंडात ज्यांना लक्षावधी लोक ‘फॉलो’ करतात अशा ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि श्री श्री रविशंकर यांच्याविषयी चिकित्सा करणे अनेकांना आवडणार नाही, पण या ‘इंट्युशन’ कोर्सच्या नावाखाली केलेले दावे इतके अवैज्ञानिक आहेत की त्याविषयी बोलणे आवश्यक ठरते.
स्वत: श्री श्री रवी शंकर हे त्यांच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यावरून याविषयी सांगतात की या कोर्समुळे मनाची चेतना जागृत होते. हा कोर्स केल्याने मुले डोळ्यांवर पट्टी बांधून वाचू शकतात, सायकल चालवू शकतात, तसेच क्रिकेटदेखील खेळू शकतात. केवळ एवढेच नाही तर मनाच्या सामथ्र्याने हातातल्या चमच्याकडे बघून आणि त्याच्याशी बोलून तो चमचा वाकवू शकतात. कोर्सच्या दुसर्या टप्प्यात सफरचंदावर नजर स्थिर केली की सफरचंद अपोआप कापले जाते. काही लाख मुलांनी हा कोर्स केला आहे, असादेखील त्यांचा दावा आहे. इंद्रियजन्य ज्ञानाच्या पलीकडे जाऊनदेखील अंतर्मनाची ताकद वाढवून अनेक अशक्य गोष्टी करता येऊ शकतात, असा या मागचा साधारण दावा आहे. गमतीचा भाग असा की या स्वरूपाच्या कोर्ससाठी मुलांना पाठवणारे बहुतांश पालक हे बर्यापैकी शिक्षण झालेले आणि समाजाच्या ‘आहे रे’ वर्गातून येणारे आहेत! शिक्षणाचा अभाव असल्याने, अज्ञानातून किंवा टोकाच्या अभावग्रस्त परिस्थितीतून हताश होऊन व्यक्ती अंधश्रद्धेला बळी पडली तर आपण ते समजून घेऊ शकतो, पण या सुशिक्षित मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय पालकांची अंधश्रद्ध मानसिकता ही वेगळी गोष्ट आहे. ‘ये दिल मांगे मोअर’ किंवा कितीही मिळाले तरी पुरत नाही अशी काहीशी ही मानसिकता!
यातील बहुतांश पालकांना आपल्या मुलांना ‘सुपरमॅन’ किंवा ‘सुपरवुमन’ करायचे आहे. ज्या मुलांना डोळ्यांनी नीट वाचता येते त्यांना डोळ्यांवर पट्टी बांधून वाचायची काय गरज आहे? किंवा नजरेने चमचा वाकवणे याचा माणसाला काय उपयोग? आपल्या मुलाला नजरेच्या शक्तीने सफरचंद कापता आले, तर त्याने काय सध्या होणार आहे, असे साधेसाधे प्रश्न त्यांना पडत नाहीत. आपल्या मुलांकडे काही तरी इतरांपेक्षा वेगळी आणि भारी क्षमता आहे एवढ्या गोष्टीवर समाधानी असलेले हे पालक आहेत, असे खेदाने म्हणावे लागते.
खासदार हेमामालिनी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासारखे लोक याची जाहिरात करत आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे काही मंत्रीदेखील या इंट्युशन प्रोग्रामची भलामण करताना दिसतात ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. या सार्वांनी यात सहभागी होणे तातडीने थांबवणे आवश्यक आहे. इंट्युशन कोर्समधील दाव्यांची उपलब्ध वैद्यकीय ज्ञानाच्या प्रकाशात तपासणी केली असता दिसून येते की डोळ्यांना मिळणारा प्रकाश हा अगदी नीट पद्धतीने बंद केला तर समोर असलेली वस्तू दिसणे अशक्य आहे. महाराष्ट्र अंनिस कार्यकर्त्यांनी हे अनेक वेळा अनेक ठिकाणी सिद्ध करून दाखवले आहे, जर अंतज्र्ञानामुळे दिसते असा दावा कोणी करत असेल तर एक साधी चाचणी करता येते. ज्या वस्तूची तपासणी करायची आहे ती वस्तू जिथे नजर जाणार नाही अशा डोक्याच्या मागच्या बाजूला धरली किंवा शेजारच्या खोलीत ठेवून ओळखायला लावली तर ती वस्तू ओळखणे अशक्य आहे. कोणताही मेंदू विकारतज्ज्ञ किंवा नेत्ररोगतज्ज्ञ हे सहज सांगू शकतो. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’, मेंदू विकारतज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना नेत्र विकारतज्ज्ञांची राष्ट्रीय संघटना यांनी अशा दाव्यांविषयी भूमिका घेणे आवश्यक आहे.
अर्थात, या प्रकारे चमचा वाकवणे किंवा डोळ्यांवर पट्टी बांधून गोष्टी ओळखणे हा दावा करणारे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आणि श्री श्री रवी शंकर हे काही पहिले नाहीत! इंटरनेटवर माहिती घेतली आणि अभ्यास केला तर ‘युरी गेलर’, ‘जेम्स रयान्डी’ या जादूगारांनी अशी हातचलाखी करणार्या अनेक लोकांचे पितळ उघडे पाडले आहे. डोळ्यांवर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांमध्ये जी जागा राहते त्यामधून बघून गोष्टी ओळखल्या जातात. जर हाताने दाब देऊन डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यांवर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर या गोष्टी ओळखता येत नाहीत. आजूबाजूला पूर्ण अंधार करून तसेच संपूर्ण अंध मुलांनादेखील कितीही प्रशिक्षण दिले तरी अशा प्रकारे वस्तू ओळखता येत नाहीत. यात वाकवले जाणारे चमचे हे आधीच कमकुवत करून ठेवले असतात आणि हाताचा थोडा दाब टाकून ते सहज वाकवता येतात. महा अंनिसचे अनेक कार्यकर्ते ही हातचलाखी करून दाखवतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्हे तसेच केरळ, गुजरात, कर्नाटकसारख्या राज्यांत असे प्रशिक्षण वर्ग भरमसाट मोबदला घेऊन सुरू आहेत या वर्गांमधून विद्यार्थी आणि पालक यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. बालहक्क आयोगानेदेखील यात लक्ष घालणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका कोणत्याही विशिष्ट धर्म, पंथ किंवा संस्थेविरोधात नाही. आमचा विरोध हा केवळ अवैज्ञानिक, अप्रमाणित आणि लोकांची दिशाभूल करणार्या दाव्यांना आहे. एखादा दावा करणार्याने तो वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करावा, हीच आमची भूमिका आहे. विज्ञानाला प्रश्नांची भीती वाटत नाही; उलट विज्ञान प्रश्न विचारण्यालाच प्रोत्साहन देते. श्री श्री रवी शंकर आणि त्यांची आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था हे ज्या अध्यात्माविषयी बोलतात त्यामध्ये सत्यशोधनाला खूप महत्त्वाचे स्थान आहे, त्यामुळे हा इंट्युशन कोर्स मागे घ्यावा अथवा महाराष्ट्र अंनिसमार्फत अशा दाव्यांसाठी देण्यात येणारे ५१ लाखांचे आव्हान तरी स्वीकारावे. समाजाने प्रगतीसाठी व्यक्तीपूजा किंवा संस्थाभक्ती सोडून पुराव्याला महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे.
समाजमाध्यमांतून अंधश्रद्धा पसरवणार्या गोष्टींचा जो जोरदार प्रचार होत आहे, त्याविषयी जादूटोणाविरोधी कायदा लावून कारवाई करण्याची यंत्रणा उभी करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने देऊन जवळपास सहा वर्षे झाली आहेत. याविषयी शासनाने काहीही केलेले नाही. अशी यंत्रणा तातडीने उभी केली तर या गोष्टींना आळा घालता येऊ शकेल.
डोळ्यांवर पट्टी बांधून वाचन ही गोष्ट जर खरोखरच शक्य असेल, तर तो एक क्रांतिकारक शोध ठरेल. पण तोपर्यंत अशा दाव्यांकडे चिकित्सक दृष्टीने पाहणे, पुराव्यांची मागणी करणे आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे. हाच भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(अ)(ह)मध्ये नमूद केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चिकित्सक वृत्ती जोपासण्याच्या घटनात्मक कर्तव्याचा खरा अर्थ आहे.
