– शहाजी मोरे

मानव तब्बल ५३ वर्षांनी पुन्हा एकदा चंद्राच्या अगदी समीप जाण्यास निघाला आहे. युद्धाच्या झळांनी ग्रासलेल्या जगाला या निमित्ताने एक आनंदाची झुळूक अनुभवण्याची संधी मिळत आहे. जगाच्या इतिहासात एक आख्यायिका बनून राहिलेली मानवाच्या पहिल्या चांद्रसफरीची कहाणी प्रत्यक्षात उतरली ती १९ जुलै, १९६९ या दिवशी! अमेरिकेचे अंतराळवीर निल आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पहिले पाऊल ठेवले तेव्हा जगाने जो रोमांच अनुभवला असेल त्याची तुलना त्यानंतरच्या आजवरच्या कोणत्याही अवकाश मोहिमेशी होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर बझ ऑल्ड्रिनही होते व तिसरे अंतराळवीर मायकेल कोलीन्सस हे अवकाशयानातच होते.

त्यानंतर १९६९ ते १९७२ (डिसेंबर) या कालावधीत अपोलो मोहिमेंतर्गत एकूण १२ अमेरिकी अंतराळवीरांनी चंद्रास भेट दिली, चंद्रावर चालण्याचा अनोखा विक्रम केला. त्यानंतर मात्र अशा मानवी मोहिमा थंडावल्या, थांबल्या! खरे तर त्यानंतरच्या काळात तर अवकाश संशोधनाने अभूतपूर्व प्रगती केली. अगदी धुमकेतू, अशनींवरही अवकाशयाने पाठविण्यात आली, व्हॉयेजर १, २ आपल्या सूर्यमालेचा परिसर सोडून त्यापलीकडे गेली आहेत, अवकाशात दुर्बिणी सोडण्यात आल्या, मंगळावर लहानसे हेलिकॉप्टर उडविण्यात आले, कृष्णविवराच्या छायेची प्रतिमा टिपण्यापर्यंत अवकाश संशोधनाने भरारी घेतली, परंतु मानव चंद्रावर उतरणे हे यापेक्षा खूप कठीण काम आहे.

ज्याकाळी मानव चंद्रावर प्रथम उतरला त्याकाळची राजकीय परिस्थिती खूपच वेगळी होती. शीतयुद्धाच्या परमावधीचा तो काळ होता, अमेरिका व तत्कालीन सोव्हिएत युनियन एकमेकांबद्दलच्या भयगंडाने पछाडले होते. त्यातच सोव्हिएत युनियनचे स्पुटनिक-१ अवकाशात भ्रमण करून परत आले होते. अमेरिकेने आपले पहिले अवकाशयान १९५८ मध्ये पाठविले. परंतु पहिले अवकाशयान, पहिला अंतराळ प्रवास करणारा प्राणी (लायका नावाचा कुत्रा), पहिला मानवी अंतराळवीर असे सर्व काही ‘पहिले’ होते ते सोव्हिएत युनियनचे! अमेरिका सोव्हिएत युनियनच्या मागेच होती.

याच संघर्षातून तत्कालीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी घोषणा केली की ‘हे दशक (१९६० चे) संपण्यापूर्वी अमेरिकी व्यक्ती चंद्रावर गेलेली असेल.’ त्यानंतर चक्रे वेगाने फिरू लागली. कधी नव्हे ते अमेरिकेच्या एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के रक्कम या चांद्र‌मोहिमेसाठी निश्चित करण्यात आली. अभियंते, शास्त्रज्ञ कामाला लागले. अनेक संकटांवर, जोखिमांवर मात करत, अनेक जोखिमा स्वीकारीत चंद्रावर माणूस उतरविण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले व अखेर अपोलो ही मानवी चांद्रमोहीम प्रत्यक्षात आली. भारताच्या चांद्रयान-१ ने २००८ मध्ये चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे मिळविले आणि जग पुन्हा एकदा चंद्राकडे आकृष्ट झाले. आर्टेमिस मोहिमही त्याचाच परिणाम आहे. पाण्याचे महत्व सर्वजण जाणतातच.

आता अमेरिकेचा प्रतिस्पर्धी रशिया नाही. ती जागा चीनने घेतली आहे. चीनचा चंद्रावर माणूस उतरविण्याचा मनसुबा आहे, त्यामुळे चीनच्या चांद्रभरारीपूर्वीच आपल्या अवकाश मोहिमांमधील प्रगतीमध्ये आपण आजही अव्वल असल्यचे दाखवून देण्यासाठी प्रामुख्याने अमेरिकेने ही मोहीम हाती घेतली असावी. ही मोहीम अपोलो मोहिमेसारखी केवळ स्पर्धेसाठी नाही तर खूप मोठी आर्थिक गणिते त्यामागे आहेत. त्याचबरोबर भविष्यातील इतर ग्रहांवरील (विशेषतः मंगळावरील ) मोहिमांसाठी चंद्रावर एक अवकाश स्थानक व अवकाशयान प्रक्षेपण केंद्रही उभारण्याचा अमेरिकेचा अर्थात नासाचा मानस आहेच! त्याशिवाय खासगी उद्योगांकडून अवकाश मोहिमांसाठी मिळणाऱ्या साधनांचा व यंत्रणांचा वापर करून त्यांची चाचणीही घेता येते व त्यासाठी आर्टेमिस मोहीम आखण्यात आली आहे. अर्थातच अवकाशमोहीमांचे अर्थकारणही या मोहिमेमागे आहे.

ही मोहिम फक्त अंतराळवीरांना चंद्रावर उतरविणे व परत आणणे एवढ्या पुरती मर्यादित नाही. पृथ्वीपासून सर्वांत दूर अवकाशात जाणाऱ्या या मोहिमेतील अंतराळवीरांच्या शरीरावर खोल अवकाशाच्या (डीप स्पेस) होणाऱ्या परिणामांचा अभ्यासही करता येणार आहे. आजपर्यंत इतक्या दूरवर मानव कधी पोहोचला नव्हता. त्यामुळे भविष्यातील सुदूर ग्रहांवरील मोहिमांच्या दृष्टीने हा अभ्यास खूप महत्वाचा असेल. या मोहिमेअंतर्गत चंद्रावर दीर्घ काळ वास्तव्य, नियमित चांद्र सहली, आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ जिथे सूर्यप्रकाश पाहोचू शकत नाही व बर्फरूपात पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यता आहे, अशा अंधाऱ्या विवरांजवळ मानवी अंतराळवीर उतरविण्यासाठी ‘आर्टेमिस’ चांद्रमोहीम आखण्यात आली आहे. यालाच ‘लुनार इकॉनॉमी’ (चान्द्रमोहीमांमागील अर्थकारण) म्हटले जाते.

यातीलच दुसरा टप्पा आहे तो आर्टेमिस-२! या टप्प्यात ‘ओराय़न’ नावाच्या अवकाश कुपीस घेऊन आर्टेमिस- २ हे अवकाशयान फ्लॉरिडा येथून चंद्राकडे झेपावले. त्यातून रिड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, व जेरेमी हेन्सेन हे तीन अंतराळवीर व ख्रिस्तियाना कॉख या अंतराळवीरांगना चंद्राभोवती वेढा पूर्ण करतील. हा टप्पा १० दिवसांचा व एक कोटी मैल प्रवासाचा आहे, व भविष्यातील चांद्र मोहिमांचा पाया असेल. या चौघांमध्ये एक महिला (ख्रिस्तियाना कॉख) व एक कृष्णवर्गीय व्हिक्टर ग्लोव्हर) असे अमेरिकन समाजातीत विविध घटकांतून आलेले अंतराळवीर आहेत. अपोलो मोहिमेत फक्त तीनच पुरुष अंतराळवीर जाऊ शकत होते, बसण्याची व्यवस्थाच त्रिआसनी होती. आर्टेमिस अंतर्गत चंद्राच्या पलीकडे अंतराळ‌वीर पोहोचतील तेव्हा पृथ्वीपासून सर्वात दूर जाणारे हे चार अंतराळवीर असतील. चंद्रापलीकडे ४६०० किमी पेक्षाही जास्त अंतरावरून आर्टेमिस परतणार आहे. आजपर्यंत कोणतीही मानवी मोहीम एवढी दूर पोहोचलेली नाही. आर्टेमिस परततानाचा वेगही आतापर्यंतचा सर्वांत विक्रमी वेग म्हणजेच ४०,००० कि. मी. प्रती तास असेल.

आर्टेमिस – १ मध्ये परतताना झालेल्या बिघाडानंतर उष्णता रोधक तावदानाची झिज झाल्यामुळे अवकाशयानातील जीवनाधार (लाईफ सपोर्ट) यंत्रणांच्या अनेक चाचण्या घ्याव्या लागल्या, बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व यंत्रणा पुन्हा पुन्हा तपासाव्या लागल्या व पुन्हा अवकाशयानाची चाचणी घेतली असता हिलियम प्रवाहाची समस्या असल्याचे दिसून आले. चॅलेंजर (१९९६) व कोलंबिया (२००३) या अवकाशयानाच्या अपघातानंतर अवकाश प्रवास कमी जोखिमाचा होण्यासाठी हर एक प्रयत्न केला जात आहे. अगदी क्षुल्लक गोष्टीमुळे सुद्धा पुन्हा तपासण्या घ्याव्या लागत आहेत, त्यामुळे अवकाश मोहीमांच्या तयारीचा वेग मंदावून त्या महाग झाल्या आहेत. एका प्रक्षेपणासाठी यंत्रणेस ४ अब्ज डॉलर्स एवढा खर्च येत आहे.

सध्या अवकाशमोहिमा, चांद्रमोहिमा स्पेस एक्स, ब्ल्यू ओरिजीन सारख्या व्यावसायिक संस्थांनी बाजारात आणलेल्या अवकाशवाहनांवर अवलंबून आहेत. काही वर्षांपूर्वी अवकाशयाने खासगी असतील अशी कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील महत्वपूर्ण तंत्रांची खात्री व्हावी लागते. क्रायोजेनिक इंथन भरणे, मानवरहीत प्रक्षेपण, अवकाशयानापासून अंतराळवीर असणाऱ्या कुपीचे सुटे होणे, पुन्हा जोडले जाणे (डॉकींग-अनडॉकींग) सुरक्षितरित्या चंद्रावर उत्तरणे (लॅडींग) इ. गोष्टी तपासण्यासाठी बराच काळ जावा लागतो. नासाच्या नियोजनाप्रमाणे सर्व काही पार पडले तर २०२८ मध्ये अंतराळवीरांना घेऊन आर्टेमिस – ४ चंद्राच्या द. ध्रुवीय प्रदेशात उतरेल. आर्टेमिस ३ मध्ये अवकाशयान पृथ्वीलगतच्या कक्षेतून (लो-अर्थ ऑर्बिट) भ्रमण करून पृथ्वीवर परत येईल. व्यावसायिक अवकाश यानातून चंद्रावर उतरण्यासाठी वेगळे होण्याची चाचणी घेण्यासाठी (अनडॉकींग) हा टप्पा २०२७ मध्ये नियोजित होता.

अलिकडे अनेक यांत्रिक (रोबॉटीक) चांद्रमोहिमा असफल वा धोक्याच्या ठरल्या आहेत. रशियाची ‘ल्युना – १५’ चंद्रावर कोसळली, जपानची ‘स्लिम’ (स्मार्ट लॅंडर फॉर इन्व्हेस्टिगेटींग मून) चंद्रावर उतरली परंतु उलटी झाली, अमेरिकेची एक खासगी मोहीम प्रक्षेपणानंतर काही वेळातच अयशस्वी वरली, ओडीसीज ल्युनार लँडर (ओडी) सुद्धा चंद्रावर पोहोचले परंतु नंतर चंद्रास स्पर्श करताना कलंडले.

चंद्रावर अवकाशयान उतरविणे हे एक मोठे आव्हान असते. गुरुत्वाकर्षण कमी, वातावरणाचा अभाव यामुळे अवकाशयानाचा वेग कमी करणे खूप कठीण असते. चंद्रावरील अतिसूक्ष्म धूळ उपकरणांच्या कामात बाधा आणू शकते, चंद्रावरील प्रारणांमुळे अवकाशयानातील इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा बिघाडू शकते व त्यामुळे संदेशवहन उशिरा झाल्यास अवकाशयान उतरविण्यात समस्या निर्माण होऊ शकतात. चांद्रयानावरील संवेदकांना (सेन्सर्स) चांद्रभूमीची जाणीव वेळीच होणे महत्वाचे असते, यातून सुखरूप उतरणे खूप महत्त्वाची कामगीरी असते.

१४ डिसेंबर १९७२ रोजी चंद्रावरून परतताना अखेरचा अंतराळवीर जिन सर्मान यांनी, “आम्ही आलो होतो तसेच परत जात आहोत, आणि देवाची इच्छा असेल तर, आम्ही शांतता आणि मानवजातीच्या आशेसह परत येऊ.” असे उद्गार काढले होते ते अगदी खरे होत आहेत!

आर्टेमिस- २ ला शुभेच्छा!

shahajibmore1964@gmail.com