ज्ञानेश भुरे

आजही विविध क्षेत्रे अशी आहेत की तेथे पुण्याने आपली छाप सोडलेली नाही. मग, ती संस्कृती जपण्याची असो वा परंपरा टिकविण्याची. पुण्याने आपले योगदान दिले आहे. क्रीडा क्षेत्रही याला अपवाद नाही. क्रीडा क्षेत्रातही पुण्याचे योगदान मोठे आहे.

क्रीडा क्षेत्रातील पुण्याची छाप पडायला १९१९ पासून सुरुवात झाली. तेव्हा ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ पाठविण्यावरून पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे पहिली बैठक झाली होती. टाटा समूहाचे दोराबजी टाटा यांनी त्या वेळी पुढाकार घेतला होता. क्रीडा क्षेत्रातील पुण्याच्या योगदानाची इतकी जुनी ओळख आहे. त्यानंतर आज लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या बॅडमिंटन खेळाचा जन्मदेखील पुण्यात झाला. तेव्हा तो पूना गेम या नावाने ओळखला जायचा. पुढे बदल होत होत त्याचे नामकरण बॅडमिंटन झाले. मात्र, आजही बॅडमिंटनचा जन्म पुण्यातच झाला हे कुणीही नाकारत नाही. सर्व ऑलिम्पिक क्रीडा प्रकार एका छताखाली खेळले जातील असे अद्यायावत क्रीडा संकुलही पुण्यात उभे राहिले. अगदी अलीकडच्या काळात म्हणजे खेळाचे आधुनिकीकरण होत असताना रोलबॉल या खेळाचाही जन्म पुण्यात झाला. इतकेच नाही, तर साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळत असलेल्या गिर्यारोहण प्रकारात गिर्यारोहकांसाठी आव्हान असलेले एव्हरेस्ट शिखर सर करणारे सर्वाधिक गिर्यारोहक पुण्यात आहे. एव्हरेस्ट सर करणारा सुरेंद्र चव्हाण हा पहिला पुणेकर ठरला. त्यानंतर या खेळाची आवड इतकी वाढली की गेली काही वर्षे दोन-तीन पुणेकर एव्हरेस्ट सर करतातच. अभिजित कुंटे, ईशा करवडे, सौम्या स्वामिनाथन यांच्यापासून सुरू झालेली बुद्धिबळाची आवड हर्षित राजा, अभिमन्यू पुराणिक, आकांक्षा हगवणे, शशिकांत कुतवळ, सलोनी सापळे अशी वाढतच आहे.

हेही वाचा >>> दोन नव्या धोरणांतून विज्ञानाची साथ आणि विकासाची वाट…

पुण्यातून फुटबॉलपटू समोर आले नसतीलही पण, फुटबॉल खेळणारे खेळाडू आहेत आणि फुटबॉलवर चर्चा करणारेदेखील आहेत. यात हॉकीला विसरून चालणार नाही. बाबू निमल यांच्यानंतर धनराज पिल्ले पुढे विक्रम पिल्ले यांनी हॉकीचा पुणे वारसा पुढे नेला. कौस्तुभ राडकर, आशीष कासोदेकर असे अलीकडच्या काळातील वाढत्या ट्रायथलॉन प्रकारातील आयर्नमॅनचीदेखील संख्या वाढत आहे. गोपाळ देवांग, मनोज पिंगळे असे ऑलिम्पियन बॉक्सरही पुण्याने दिले. कबड्डीपटू आणि कुस्तीपटूंची नावे दिली तर रकानेही पुरणार नाहीत. ही परिस्थिती आता राहिलेली नाही. या एका पिढीनंतर पुढे काय, असा प्रश्न आज वयाच्या सत्तरीत आलेल्या पुणेकर क्रीडाप्रेमींना पडला आहे. शहरातील मैदान जोपासणे किंवा त्याचा विकास करणे ही खरे तर जबाबदारी महानगरपालिकेची असते. पण, शहरात महापालिका खेळाकडे आस्थेने बघताना दिसून येत नाही. मैदानांसाठी राखीव असणाऱ्या जागांवर जॉगिंग ट्रॅक बांधण्याची चढाओढ सुरू आहे. मोठ्या स्पर्धा होतात, तेव्हा संघटनांना खेळाडूंच्या राहण्याची सोय करण्यासाठी पदरमोड करून हॉटेल्समध्ये व्यवस्था करावी लागते. अशा वेळी शहरात क्रीडा हॉस्टेलची निर्मिती झाली तर तो पर्याय उपलब्ध होऊ शकतो. सणस मैदानावर असे हॉस्टेल निर्माण केले होते. पण, महापालिकेने हे हॉस्टेल वैद्याकीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहे. अशा छोट्या छोट्या गोष्टी पुण्यात रुजलेल्या क्रीडासंस्कृतीवर परिणाम करत आहेत.

क्रिकेट, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, टेनिस, टेबल टेनिस, फुटबॉल, जलतरण, खो-खो, कबड्डी, कुस्ती, तिरंदाजी, नेमबाजी, बॉक्सिंग, हॉकी, जिम्नॅस्टिक्स, रग्बी, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, रोइंग, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, तलवारबाजी, अश्वारोहण, गिर्यारोहण, बिलियर्ड्स, स्नूकर इतक्या साऱ्या खेळांना पुण्याने सामावून घेतले आहे. पण या सर्व खेळांसाठी आता पुण्यात मैदाने आहेत का? खेळाडूंना सुविधा उपलब्ध होतात का? त्यामुळे क्रीडासंस्कृती नुसती रुजून उपयोगाचे नाही, ती टिकविता आली पाहिजे. इथे कुठे तरी आता विचारांची गल्लत होऊ लागली आहे.

हेही वाचा >>> पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?

पुणेकर खेळाडूंनी पदकेही आणायला हवीत.

पुण्यात अलीकडे अनेक शिक्षण संस्थांनी आपली मैदाने कमी करण्यास सुरुवात केली आहे. मैदानाच्या जागांवर इमारती बांधून तिथे वेगवेगळे अभ्यासक्रम सुरू केले जात आहेत. पूर्वी स. प. महाविद्यालयाच्या पाठीमागून फिरायला गेले की खो-खोचे खुंट दिसायचे. आज ते गायब झाले आहेत. भविष्यात खो-खो मैदान कसे असते हे चुकून एखाद्या मुलाने आपल्या पालकांना विचारले, तर ते दाखवायलाही मैदान शोधावे लागेल. कबड्डीचे सामने मैदानावर भरवतानाही आता मैदानाचा शोध घ्यावा लागतो. हे वास्तव आहे. क्रिकेटची मैदाने उभी राहत आहेत, फुटबॉलची मैदाने निर्माण होत आहेत. पण, यावर बदलत्या प्रवाहाची छाप आहे. बॉक्स क्रिकेट, बॉक्स फुटबॉल आता वाढू लागले आहे. मुलांनी मैदानावर येणे यासाठी हे एकवेळ ठीक आहे. पण, यामुळे क्रीडासंस्कृती जपली जाणार नाही. ही मैदाने तासावर भाड्याने दिली जातात. तासभर खेळायचे आणि परतायचे यामुळे खेळ नाही, तर व्यवसाय वाढणार आहे. अनेक क्लब आज पुण्यात आहेत. त्यांचा मोठा इतिहास आहे. पण, आज त्यांची फी पुणेकरांना परवडणारी नाही. त्यामुळे खेळ हा फक्त श्रीमंतांसाठीच की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

एक काळ पुणे शहर क्रीडा क्षेत्राचेही माहेरघर बनू पाहत होते. क्रीडा संकुलाच्या निर्मितीनंतर या विचारधारणेने वेग घेतला होता. क्रीडा प्रबोधिनीची स्थापना झाली, क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी झाली. कुस्तीच्या तालमी एककाळ पुण्याचे वैभव मानल्या जायच्या. रुस्तम ए हिंद स्व. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या कालावधीत गोकुळ वस्ताद तालमीची ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ अशी वेगळी ओळख निर्माण झाली होती. आज तालमीकडे फारसे कुणी गांभीर्याने बघत नाहीत. मॅटचा वाढता प्रभाव आता पुण्यातही दिसू लागला आहे. पुण्यात क्रीडासंस्कृती रुजली, त्याच्या वाटा रुंदावल्या असे म्हणताना पुणेकर असल्याचा अभिमान वाटतो. पण, वाढत्या शहरीकरणात ही रुजलेली संस्कृती आता वेगळी वाट धरू लागली आहे. dnyanesh.bhure@expressindia.com