उत्पल व. बा.

वादांचा केवळ राजकीय खेळ होऊ नये भोवतालची परिस्थिती नागरिकही पाहताहेत, हे राजकारण्यांनी लक्षात घ्यावं, यासाठी हा पत्रलेख…

loksatta editorial on maharashtra govt tables supplementary demands of rs 95000 crore
अग्रलेख : ‘पुरवणी’ची बतावणी!
Rahul Gandhi, Rahul Gandhi's Lok Sabha Speech, Opposition Leader Rahul Gandhi, bjp senior leaders rebuttal Rahul Gandhi, amit shah, bjp, Rajnath singh, congress, lok sabha, vicharmanch article, loksatta article,
भ्रमाचा भोपळा फुटलाय, हे सत्य स्वीकारा…
controversial trainee ias officer puja khedkar
अग्रलेख : बेबंदशाहीचे ‘पूजा’पाठ!
corruption in awarding tenders corruption in mumbai civic body heavy rains bring mumbai to a halt
अग्रलेख : टेंडर प्रजासत्ताक!
loksatta editorial about indira gandhi declared emergency in 1975
अग्रलेख : असणे, नसणे आणि भासणे!
Loksatta editorial Prime Minister Narendra Modi optimistic remarks about Maharashtra economic development in Mumbai
अग्रलेख: ‘महाशक्ती’चे ‘रिटर्न गिफ्ट’!
loksatta editorial on election results in france left wing alliance won most seat in french
अग्रलेख : फ्रेंच ट्विस्ट!
sc verdict on arvind kejriwal bail
अग्रलेख : नियामक नियमन

 ‘लोकसत्ता’मध्ये ‘पहिली बाजू’ सदरात ‘असत्याची फॅक्टरी बंद पडेल’ हा भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा लेख (९ जुलै) आणि त्याचा प्रतिवाद करणारा, काँग्रेस प्रवक्ते धनंजय जुन्नरकर यांचा लेख (१० जुलै) प्रकाशित झाला. दोन्ही राजकीय बाजूंनी आपलं म्हणणं मांडल्यानंतर सत्य-असत्य आणि राजकारण याबद्दल पुन्हा काही म्हणावंसं वाटतं. वास्तविक हे म्हणताना नागरिक म्हणून माझ्या स्थानावरून मला जे दिसलं आहे ते स्पष्टपणे मांडलं तर त्याला पक्षीय/ राजकीय लेबल लागू नये; पण ते कदाचित लागू शकेल. याचं कारण असं की ‘असत्यकथना’च्या किंवा जुन्नरकर यांनी लेखात म्हटल्याप्रमाणे ‘कथानकवादी राजकारणा’च्या संदर्भात पाहिलं तर भाजप अनेक योजने पुढे आहे हे उघड गुपित असल्यासारखं आहे आणि त्याचा उच्चार केला तर तुम्हाला नागरिक न म्हणता राजकीय म्हटलं जाऊ शकतं. (ही आजची आपली ‘वैचारिक शोकांतिका’ आहे!).

हेही वाचा >>> ‘नीट’ परीक्षा नीटनेटकी होण्यासाठी…

केशव उपाध्ये यांनी त्यांच्या लेखात राहुल गांधी लोकसभेत खोटं बोलले असा आरोप केला आहे. ‘लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुस्लिमांना देशातून बाहेर काढणार, दलित-आदिवासींचे आरक्षण रद्द करणार, संविधान बदलणार यांसारख्या अनेक खोट्यानाट्या गोष्टी पसरवून काँग्रेस आणि इंडिया आघाडीने सत्तेसाठी आपण कोणत्या थराला जाऊ शकतो, याची प्रचीती दिली’ असंही त्यांनी लिहिलं आहे. भाजपचे प्रवक्ते म्हणून उपाध्ये विरोधी पक्षावर हल्ला चढवणार हे उघडच आहे. राजकीय पक्षांनी एकमेकांवर केलेल्या आरोपांमधील तथ्य शोधून सत्य बाहेर काढणं हा एक वेगळा, अभ्यासाचा विषय आहे. स्वतंत्र (राहिलेली) माध्यमे आणि जबाबदार, जाणकार नागरिक यांनीच ते करावं अशी स्थिती आहे. पण माझ्यासारखा मनुष्य जेव्हा त्याच्या ‘नागरिक’ या स्थानावरून राजकारणाच्या पटावरील घडामोडी पाहतो तेव्हा त्याला काही गोष्टी दिसतात आणि त्या अधोरेखित कराव्याशा वाटतात. असत्यकथन हा मुद्दा घेतला तर मला भाजपच्या अनेक गोष्टी दिसतात. ‘काँग्रेस तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेईल आणि ते… घुसखोरांना देईल’ असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यांनी मुसलमान हा शब्द वापरला नव्हता तर घुसखोर हा शब्द वापरला होता. आणि हे बोलण्याआधी त्यांनी काँग्रेस सगळं मुस्लिमांना देऊ इच्छिते अशा आशयाचं विधान केलं होतं. आता हे विधान असत्य नाही आणि निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून ते बरोबरच आहे असं कदाचित उपाध्ये म्हणतील. कारण अर्थातच ते मोदींनी केलेलं आहे. लोकसभा निवडणूक होण्याआधी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश मदन लोकूर, उच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश ए. पी. शहा आणि वरिष्ठ पत्रकार एन. राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांना खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं होतं. राहुल गांधींकडून हे आमंत्रण स्वीकारल्याचं पत्र दिलं होतं. पण नरेंद्र मोदींनी आमंत्रणाला उत्तर दिलं नाही. संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधींनी ‘नीट’ परीक्षेबाबत संसदेत चर्चा व्हावी यासाठी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं. पण तशी चर्चा झाली नाही. संसदेत राहुल गांधींचं जे भाषण गाजलं त्यात कुठेही ‘हिंदू हिंसक आहेत’ असं म्हटलेलं नव्हतं. हिंदू धर्म अहिंसा शिकवतो हे सांगून, आजच्या राजकारणाबद्दल ‘जे लोक स्वत:ला हिंदू म्हणवताहेत ते २४ तास हिंसा आणि द्वेष पसरवताहेत’ असं भाजपला उद्देशून म्हटलं गेलं. या विधानानंतर मात्र नरेंद्र मोदी लगेच उठून उभे राहिले आणि ‘हा अत्यंत गंभीर विषय आहे. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणं गंभीर आहे’ असं म्हणाले. वास्तविक त्यांना ‘भाजप हिंसा-द्वेष पसरवतो हे सिद्ध करून दाखवा’ असं म्हणता आलं असतं. पण ते तसं म्हणाले नाहीत. त्यानंतर भाजपने गुजरातमधील काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. शिवाय राहुल गांधींबाबत तो हिंदूविरोधी आहे म्हणून समाजमाध्यमांमधून आणि इतरत्र जोरदार प्रचार सुरू झाला. समोरासमोर चर्चेला किंवा कुठल्याही चर्चेला कायम नकार द्यायचा आणि जे बोललं गेलेलंच नाही ते बोलल्याचं बिनदिक्कतपणे सांगत वातावरण पेटवून द्यायचं हे किमान पंतप्रधानांनी तरी करू नये असं म्हणता आलं असतं; पण तसं म्हणता येत नाही हे पुरेसं बोलकं आहे.

हेही वाचा >>> भ्रमाचा भोपळा फुटलाय, हे सत्य स्वीकारा…

भाजपने ज्याचं नाव घेत धार्मिक राजकारण केलं तो श्रीराम हा सत्यवचनी म्हणून ओळखला जातो. श्रीरामाच्या या गुणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने आयटी सेल स्थापन करून गेली काही वर्षं असत्याचा सतत प्रचार करणं केशव उपाध्ये यांना कसं वाटतं हेही समजून घेणं आवश्यक ठरेल. ‘हम जो चाहे वो संदेश जनता तक पहुंचा सकते हैं। चाहे खट्टा हो या मीठा हो, सच्चा हो या झूठा हो। ये काम हम कर सकते है, मगर वो इसलिये हो पाया क्योंकि हम ३२ लाख (लोगों) के व्हॉट्सअॅप ग्रूप बना के खड़े थे।’ हे विधान अन्य कुणाचं नसून अमित शहा यांचं आहे. २०१८ साली अमित शहा यांनी हे विधान कोटा, राजस्थान इथल्या भाजपच्या सोशल मीडिया कार्यकर्त्यांसमोर बोलताना केलं होतं. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ आजही उपलब्ध आहे. त्याच वर्षी १७ जून २०१८ रोजी शिवम शंकर सिंग या भाजप आयटी सेलमध्ये राम माधव यांच्यासह काम करणाऱ्या कार्यकर्त्याने ‘मी भाजप का सोडतो आहे?’ या शीर्षकाची एक पोस्ट ‘मीडियन’ या संकेतस्थळावर लिहिली होती. त्यात त्यानं भाजपचं मूल्यमापन ‘गुड, बॅड, अग्ली’ अशा तीन भागांत केलं होतं. मी भाजप सोडतो आहे याचं मुख्य कारण भाजपतर्फे पसरवले जाणारे खोटे मेसेजेस हे आहे असं त्यानं म्हटलं होतं.

अर्थात, अटलबिहारी वाजपेयींनंतरच्या भाजपचं स्वरूप पुरतं बदललेलं आहे. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्यावर जे आक्षेप आहेत तेही अनेकदा मांडले गेलेले आहेत. ते स्वत: अनेकदा त्यांच्या भाषणांमधून खरं बोललेले नाहीत, याचा तपशील माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. समाजमाध्यमांचा जोरकस वापर भाजपने प्रथम सुरू केला हे खरं; पण नंतर इतरही पक्षांनी सुरू केला. त्यांच्याकडूनही फेक न्यूज पसरवल्या गेल्याची शक्यता आहेच. भाजप समर्थक आणि विरोधक यांच्या द्वंद्वात ‘भाजप आणि एकूण हिंदुत्ववादी संघटना इतका द्वेष पसरवतात तर आपल्याकडून काही वेळा प्रखर उत्तर दिलं गेलं तर ते मनावर घ्यायचं कारण नाही’ असा बचाव विरोधकांकडून येत असतो. भाजपने पद्धतशीरपणे, सातत्याने समाजमाध्यमांचा वापर द्वेष पसरवण्यासाठी केला – मुख्य म्हणजे समाजमाध्यमं नव्हती तेव्हाही उजव्या विचारसरणीने हे केलं होतं. समाजमाध्यमांचा दुरुपयोग तुरळक प्रमाणात होणं आणि ‘तसा दुरुपयोग करत राहणं हेच तुमचं चरित्र असणं’ यात फरक आहे. योग्य माहितीच्या अभावी, हेतूत दुष्टावा नसताना काही असत्य बोललं जाणं आणि हेतुपूर्वक असत्य बोलत राहणं यातही फरक आहे. पण हा बारकावा अर्थातच भाजप किंवा भाजप समर्थक लक्षात घेणार नाहीत. दिसत असूनही ते तिकडे दुर्लक्षच करतील.

आता इथे असा प्रश्न येईल की भाजपची ‘असत्याची फॅक्टरी’ राजरोसपणे अनेक वर्षं सुरू आहे म्हणून मग काँग्रेसकडून किंवा अन्य भाजपविरोधी पक्षांकडून कधी असत्यकथन झालं तर ते क्षम्य मानायचं का? तर अर्थातच नाही! आजच्या काळाची शोकांतिकाच ही आहे की योग्य-अयोग्य, चांगलं-वाईटच्या व्याख्या सापेक्ष झाल्या आहेत. असत्य जर आपला पक्ष, आपला नेता बोलत असेल तर ते क्षम्य मानून त्याला ‘राजकारणात तेवढं चालतंच’ या श्रेणीत बसवलं जातं आणि तेच जर विरोधी पक्ष, विरोधी नेता बोलत असेल तर त्यावर आक्रोश केला जातो. असत्य आणि राजकारण यांचा परस्परसंबंध पाहिला तर आपल्या हे सहजच लक्षात येईल की राजकारणाचा मूळ स्वभावधर्मच असा आहे की त्यात असत्य हे पूर्णपणे निषिद्ध कधीच मानलं गेलेलं नाही. निदान ‘नरो वा कुंजरो वा’ अशी भूमिका तरी घ्यावीच लागते हे जवळजवळ सर्वमान्य आहे. पण तिथून सुरुवात करून आता आज राजकारणात असत्याला प्रतिष्ठा मिळवून दिली गेली आहे आणि त्यातून नागरिकांची दिशाभूल केली जाते आहे.

असत्य हे असत्य असल्याने त्याचा निषेध करताना माझ्यासारख्या नागरिकाने माझ्या पक्षीय झुकावाच्या पलीकडे जात तो नोंदवला पाहिजे. त्यामुळे राहुल गांधी जर असत्य बोलले असतील तर त्याचा मी स्पष्ट शब्दात निषेध करायलाच हवा आणि केशव उपाध्ये यांचा दावा सत्य असेल तर तो निषेध मी इथे नोंदवतोदेखील. लोकशाहीत नागरिकांनी स्वायत्त संस्थांप्रमाणेच राजकीय पक्षांवर नजर ठेवणं आणि त्यांना आवश्यक तिथे टोकत राहणं आवश्यकच आहे. त्यामुळे राहुल गांधीच नव्हे तर काँग्रेस किंवा ‘इंडिया आघाडी’तील अन्य कुठल्याही पक्षातील कुणाहीकडून असत्य बोललं गेलं असेल तर त्याचा निषेध करणं हे नागरिक म्हणून माझं कर्तव्यच आहे. आता दुसऱ्या बाजूने पाहता मी वर भाजपबद्दल आणि भाजपच्या असत्य पसरवण्याच्या ‘संस्थात्मक उभारणी’बद्दल जे काही मांडलं आहे त्यावर विचार केला, ते पटलं तरी भाजपचे प्रवक्ते असल्याने केशव उपाध्ये त्यावर काही बोलणार नाहीत हे उघड आहे. पण प्रवक्तेपदाच्या पलीकडे तेही माझ्यासारखाच एक ‘नागरिक-माणूस’ही आहेत आणि त्या माणसाला माझं म्हणणं पटेल असा माझा विश्वास आहे. माणसांमधला, नागरिकांमधला ‘प्रवक्ता’, ‘समर्थक’ जाऊन तिथे ‘माणूस’ जागा होण्याची आज कधी नव्हे इतकी गरज आहे! आणि हे म्हणणाऱ्या माझ्यासारख्यानंदेखील स्वत:ला या बाबतीत तपासत राहिलं पाहिजे. असं झालं तरच काहीएक ‘मूल्यात्मक आशा’ शिल्लक राहील! utpalvb@gmail.com