‘बिग बँग थिअरी’नुसार विश्वाचे वय साधारणत: १३-१४ अब्ज वर्षे इतके आहे. हा सिद्धान्त बरोबर नाही असे आम्हाला वाटते. ते सिद्ध करायला पुरावा म्हणजे अशी वस्तू शोधून काढणे जिचे वय विश्वाच्या वयापेक्षा जास्त आहे. आम्ही काही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत ज्यांचे वय विश्वाच्या वयापेक्षाही जास्त आहे. या संशोधनात आम्ही चौघे आहोत- मी, माझा आयुकातील सहकारी विजय मोहन, एक ऑस्ट्रेलियातील प्रोफेसर आणि एक ‘इसो’ म्हणजे युरोपियन सदर्न ऑब्झर्वेटरीमधील आहे. आम्ही अशा ताऱ्यांच्या शोधात आहोत, ज्यांचे वय २० अब्ज वर्षे आहे. म्हणजे १३-१४ अब्जांपेक्षा नक्कीच जास्त! ते कसे मिळतील. तर आपल्या आकाशगंगेच्या काठावरती एक लहानशी आकाशगंगा आहे, त्याला ‘लार्ज मॅजेलानिक क्लाऊड’ म्हणतात. मॅजेलान नावाचा जगप्रवासी होता, त्याला दक्षिण गोलार्धातून प्रवास करताना हे ढग दिसले, त्यावरून या ढगांना असे म्हटले जाते. त्यातला जो मोठा ढग आहे, तिथे आम्हाला असे तारकासमूह दिसले, ज्यांचे वय २० अब्ज आहे, असे प्राथमिकदृष्ट्या वाटते. परंतु, ते सिद्ध केले तरच त्याला महत्त्व आहे. कारण तुम्ही प्रस्थापित सिद्धान्ताला छेद देता तेव्हा तुमचा पुरावासुद्धा भक्कम असायला हवा. या नव्या मांडणीतील आमच्या दृष्टीने आम्ही सर्व पळवाटा बंद केल्या आहेत. परंतु, जेव्हा हा सिद्धान्त प्रकाशित करण्यासाठी पाठवला तेव्हा एका रेफरीने, अमुक एक पळवाट तुम्ही अजून रोखू शकला नाही. त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का, असे म्हटले. त्यामुळे याबाबत आम्हाला आणखी काही निरीक्षणे करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

अशी एक कल्पना आहे की, या विश्वाची निर्मिती कधी झालीच नाही. ते सतत, अनादी-अनंत म्हणतात तसे आहे. आणि त्यामध्ये एक नवीन वस्तूंची निर्मिती सतत होत असते. त्यातून ठरावीक तारे तयार होतात. काही काळानंतर त्यांचा नाश होतो. असे हे विश्व आहे. अशा विश्वात तुम्हाला कितीही वय घेतले तरी, त्या वयाचे तारे सापडायला हवेत. काही लोक अनेक विश्वांची कल्पना मांडतात. पण माझ्या मते तुम्हाला तुमच्या निरीक्षणातून आणि एकंदरातून जे विश्व गवसते, तेच एकमेव विश्व आहे. त्याच्या पलीकडचे विश्व हे ‘कम्प्लीटली इमॅजनरी’ आहे. त्याला शास्त्रीय पुरावा असा दिसत नाही.

‘विश्वात जीवसृष्टी सर्वत्र आहे आणि सूक्ष्म जीवांचा वर्षाव पृथ्वीवर होत असतो’ अशी कल्पनाही दोघा शास्त्रज्ञांनी मांडली आहे. असा वर्षाव होण्याची पद्धत किंवा त्याचे माध्यम असते धूमकेतू! त्यांच्या शेपटीवरून प्रवास करून सूक्ष्मजीव लांबून येतात. त्या शेपटाचे आपल्या वायुमंडळाशी घर्षण झाले की त्यातले काही जीव आपल्या वायुमंडळावर येतात. मग गुरुत्वाकर्षणाने ते खाली उतरतात आणि पृथ्वीवर पोहोचतात. त्यांना आपण कसे शोधू शकतो? – म्हणून आम्ही असा विचार केला की एक मोठा ‘पे लोड’ त्यात अनेक सिलेंडर्स निर्वात, निर्जंतुक करून सील करायचे आणि वर (पृथ्वीच्या स्थिरावरणापर्यंत) पाठवायचे. मग ठरावीक उंचीवर एकेक सिलेंडर उघडायचा आणि त्यात आसपासची हवा असेल ती घ्यायची. अशा प्रकारे वेगवेगळ्या टप्प्यांवरची सँपल खाली आणली. एकूण ४१ किलोमीटर उंचीपर्यंत आम्ही जाऊ शकलो. तुम्ही म्हणाल, या ४१ आकड्यामध्ये विशेष काही आहे का? एवढेच की, इतक्या उंचीपर्यंत नेला जाणारा स्वस्त बलून आम्हाला मिळत होता. त्याच्या दुप्पट-तिप्पट पैसे खर्च केले असते तर आणखी मोठा बलून मिळाला असता, पण तो आणखी ३-४ किलोमीटर वर गेला असता. म्हणजे फारसा फायदा झाला नसता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे- तुम्ही खूप वर जाऊन सँपल गोळा करायचे म्हटलात तर तिथे हवा इतकी विरळ असते की तिथे आपल्याला काही मिळत नाही. तिथे बलून टिकून राहू शकत नाही. उलट, जमिनीपासून दहा किलोमीटरपर्यंतचे सँपल गोळा करायचे तर एक प्रश्न असतो- कन्टॅमिनेशनचा. जमिनीवरून वर गेलेले ऑरगॅनिझम त्या उंचीवर जातात. त्यामुळे अशा उंचीवर गेले पाहिजे जिथे पृथ्वीवरील जीव पोहोचणार नाहीत आणि हवाही तितकी विरळ नसेल. या दृष्टीने आम्ही ही उंची निवडली. सन २००१ आणि २००५ मध्ये असे दोन प्रयोग केले. दोन्हीमधून आम्हाला बॅक्टेरिया मिळाले आहेत. २००५ साली आम्हाला जास्त माहिती मिळू शकली. त्यात असे बॅक्टेरिया मिळाले, ज्यांची पृथ्वीवर अजून नोंद नव्हती. हे केल्यावर असा प्रश्न येतो की हे बॅक्टेरिया ४१ किलोमीटर उंचीवर कसे आले? तुम्हाला जर बाहेरून येणाऱ्या जीवसृष्टीचा सिद्धान्त आवडत नाही, सर्व काही पृथ्वीवरच निर्माण झाले पाहिजे असा जर तुमचा आग्रह असेल तर तुम्ही आम्हाला अशी पद्धत सांगा- ज्यायोगे हे बॅक्टोरिया ४१ किलोमीटरपर्यंत वर जातील. ज्वालामुखीच्या उद्रेकानेसुद्धा वस्तू २७-२८ किलोमीटरपर्यंत वर जातात. त्यांना ४१ किलोमीटरपर्यंत नेणारा मार्ग अजून आम्हाला तरी माहीत नाही. तुम्हाला तो मार्ग माहीत असेल तर तो सांगा. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे आता पॉझिटिव्हली सिद्ध करायचे असेल की ते बॅक्टेरिया बाहेरचे आहेत, तर त्यांचे आणखी विश्लेेषण करायला लागते. अशी कल्पना करू या की आपल्यात असलेला कार्बन साधा कार्बन आहे. ‘कार्बन १४’ आहे तो वेगळा ‘आयसोटोप’ असतो. त्याचे प्रमाण किती असायला पाहिजे त्यावरून आपण सांगू शकतो ही वस्तू पृथ्वीवरची आहे की बाहेरची. तशा प्रकारचे विश्लेषण करता यावे, म्हणून पुढच्या बलून फ्लाईटसाठी आम्ही ‘इस्रो’कडे प्रस्ताव पाठवला आहे आणि त्यांनी तत्त्वत: समर्थन केले आहे.

पृथ्वीवर इतके पाणी आले कुठून, याबाबत सध्याच्या थिअरीज थोड्या ‘स्पेक्युलेटिव्ह’ आहेत. पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर पुष्कळ आहे, जरी आपल्या दैनंदिन जीवनात ते आपण दुर्मीळ म्हणत असलो तरी! ज्या पद्धतीने ते आले त्याचे वर्णन करताना ते इतक्या प्रमाणात कसे आले, हे सांगणेही आवश्यक आहे. अजून तसे ‘एक्स्प्लनेशन’ कुणी दिले आहे असे मला वाटत नाही.

फलज्योतिषाचे यश किती?

माझा फलज्योतिषाविषयीचा अनुभव तुम्हाला सांगतो : आम्ही तीनचार लोकांनी मिळून एक प्रयोग केला होता- फलज्योतिषात भाकीत करण्याची शक्ती आहे का, हे तपासण्यासाठी! शंभर हुशार विद्यार्थी आणि शंभर मतिमंद विद्यार्थी यांच्या कुंडल्या जन्मावरून तयार करून घेतल्या. त्यांचं रॅण्डमायझेशन करून ४०/४० चे गट बनविले आणि फलज्योतिषांना आवाहन केले की, आम्ही तुम्हाला ४० चा एक सेट देऊ. त्यात काही मतिमंद आहेत, तर काही हुशार आहेत. ते कोणते हे आम्हाला माहीत आहे. त्यांची कुंडली पाहून तुम्हाला त्यातून, कोण मतिमंद व कोण हुशार हे शोधून काढायचे आहे. चाळीसपैकी किती उत्तरे बरोबर आली तर हे शास्त्र खरे समजायचे, हेही सांगितले. संख्याशास्त्राच्या निकषांनुसार ४० पैकी २८ बरोबर आले तर ते खरे मानायचे. पण ज्यांनी भाग घेतला त्यांच्यापैकी अॅव्हरेज परफॉर्मन्स हा १८ होता- निम्मासुद्धा नाही! आणि ज्यांचे अनेक अंदाज बरोबर आले त्यांचा २४ होता. म्हणजे २८ या पासिंग मार्क्सच्या सर्वचजण खाली होते. एका फलज्योतिषाच्या संस्थेनेही यात भाग घेतला होता. त्यांना २०० पत्रिका दिल्या. त्यांना सांगितले की, ११८ बरोबर यायला हव्यात. पण त्यांचेही केवळ १०२ इतकेच बरोबर आले. तेही निम्म्याच्या जवळपासच होते. १०० तर नुसत्या ‘चान्स’नेही बरोबर येऊ शकतात. हे झाल्यावर आमचा निष्कर्ष असा निघाला की, ज्योतिषाची भाकीत करण्याची क्षमता ‘कॉईन टॉसिंग’एवढीही नाही. त्यावर काही फलज्योतषांनी आक्षेप घेतला की यात भाग घेणारे खरे फलज्योतिषी नव्हते. पण सबंध संस्थेने भाग घेतला त्याचे काय? ते सर्व तुम्ही बाद करणार का? एखाददोन फलज्योतिषांनी एवढेही म्हटले की, आमचे १८ बरोबर आले असतील, तर तुम्ही आम्हाला तसे सर्टिफिकेट द्या. ते तेवढ्यावर समाधानी होते.

एकंदर सायकिअॅट्रिस्ट लोकांचा धंदा परदेशात जितका चालतो, तितका इथे चालत नाही; इथे ज्योतिषांचा चालतो. त्यामुळे असेही म्हणतात की, चांगलेे ज्योतिषी – म्हणजे सक्सेसफुल ज्योतिषी- बरेच वेळा चांगले सायकिअॅट्रिस्ट असतात. त्यांना लगेच कळतं- लोकांना काय सांगितलं की बरं वाटेल.

वैज्ञानिक प्रगतीने मानवी प्रश्न सुटतीलच असे नाही…

विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती चारही दिशांना होते आहे, तरी आजची तरुण पिढी आमच्यापेक्षा अधिक अंधश्रद्ध आहे. याचं कारण- कोणत्याही गोष्टीचे कारण शोधणे ही विज्ञानाची शिकवण असते, आपणच विचारायचं असं का होतं- एकंदर जीवन अधिक ‘कॉम्प्लिकेटेड’ झालंय. अनेक निर्णय अनेक वेळी तुम्हाला घ्यायचे असतात. अशा वेळी तुमची मानसिकता तेवढी सक्षम नसली तर तुम्हाला वाटतं, कोणता निर्णय घ्यावा हे कोणीतरी आम्हाला सांगावं. मग तुम्ही वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करता. साधूबाबांकडे जाता किंवा फलज्योतिषी किंवा वास्तुशास्त्र यांचा आधार घेता. अशा प्रकारचे अंधविश्वास जास्त वाढत गेले, त्याचे कारण या पिढीपुढे असलेले प्रश्न वाढत गेलेत. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बाजूने बोलणारे फारसे राजकीय नेते नसतात असे मी दाखवून देत असतो. आता खेदाने तशी स्थिती आहे असे म्हणावे लागते. त्यावर ओव्हरनाइट उपाय आहे असे वाटत नाही. लोकशिक्षण आणि मुलांमध्ये शिक्षण देऊन त्यांच्यात विज्ञान-तंत्रज्ञानाचं महत्त्व रुजवलं तर ती मोठी झाल्यावर जास्त महत्त्व देतील असं म्हणायचं.

एखादी गोष्ट आपण मुद्दाम दाबून दूर होणार नसते. ते पटवून दिले पाहिजे. काही लोकांवर याचा प्रभाव पडतो, काही ते ऐकून सोडून देतात. मला जी पत्रं येतात त्यातून जाणवतं की, थोडा तरी प्रभाव पडतो.

मार्क चांगले मिळाले, तरी …

शालेय पातळीवरल्या विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत असं म्हणता येईल की तो विषय तुम्ही समजावून सांगितला पाहिजे, तो पाठ करून येत नाही. परंतु, आपली शिक्षणाची आणि परीक्षेची पद्धती अशी आहे की एखादा पोर्शन पाठ करून जसाच्या तसा लिहिला की बरोबर, नाहीतर नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विषय खरोखर समजत नाही, त्यातील खुबी कळत नाहीत. मार्क चांगले मिळाले, तरी त्यांना तो विषय समजला की नाही याबद्दल मला शंका वाटते. कारण पाठ करून उत्तर दिलं जातं. मला असं वाटतं की, विज्ञान आणि गणित निदान पहिल्या काही इयत्तांसाठी मातृभाषेतून शिकवायला पाहिजे. इथं मराठी, उत्तर भारतात हिंदी. मी स्वत: हिंदीमधून दहावीपर्यंत शिकलो. मला काही त्यामुळे इन्फिरिऑरिटी वाटत नाही किंवा मला कमी दर्जाचं शिक्षण मिळालं असंही नाही. चांगले शिक्षक असतील तर सर्व व्यवस्थित होतं. पण आज आपल्याकडे परिस्थिती अशी की, नवी मराठी शाळा उघडण्यासाठी फार त्रास होतो!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(डॉ. जयंत व मंगला नारळीकर यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या संपादकीय विभागातील सहकाऱ्यांच्या संवादाचा ‘लोकसत्ता आयडिया एक्स्चेंज’ हा उपक्रम ऑगस्ट २०११ मध्ये पार पडला, त्या प्रश्नोत्तरांतून जयंत नारळीकरांनी व्यक्त केलेल्या विचारांचा हा संपादित अंश.)