त्यागराज खाडिलकर

नाटककार कृ. प्र. खाडिलकर यांच्या १५० व्या जयंती वर्षांनिमित्त

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
death of Uttar Pradesh gangster Mukhtar Ansari
अन्सारीच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी, उपचारादरम्यान मृत्यू; तुरुंगात विषप्रयोग केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
Mukhtar Ansari death
कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीच्या तुरुंगात मृत्यूनंतर न्यायालयीन चौकशीचे आदेश

नाटय़ाचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर! प्रखर देशभक्त, स्वातंत्र्यसैनिक, झुंजार पत्रकार, नटसम्राट बालगंधर्व ते केशवराव दात्यांपर्यंत अनेक दिग्गज अभिनेत्यांचे रंगभूमीवरील ‘गुरुपीठ,’ आणि यशस्वी राष्ट्रधर्मी  नाटककार! २५ नोव्हेंबर १८७२ साली जन्मलेल्या कृष्णाजीपंतांचे यंदा ‘शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जन्म वर्ष’, म्हणजेच सोप्या मराठीत १५० वे जयंती वर्ष! कृष्णाजींचा जन्म सांगलीचा. कृष्णाच्या जन्माआधीच चार महिन्यांपूर्वी वडील प्रभाकरपंत यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्यामुळे ‘हा बापाच्या मुळावर जन्माला आला’ या भावनेतून नर्मदा बाईंनी कृष्णाकडे ढुंकूनही पाहिलं नाही! 

शाळेत तिसऱ्या इयत्तेत असतानाच त्यांनी पहिलं नाटक लिहिलं, ते शाळेतल्या मास्तरांना दप्तरात सापडलं, मग ते त्यांनी लगेचच आगीच्या बंबात टाकलं. अशा रीतीने पहिलं नाटक ‘आग्नेय स्वाहा’ झालं!

कॉलेजात शिकत असताना शेक्सपियरची ‘हॅम्लेट’ व ‘अथेल्लो’ ही नाटके मराठी रंगभूमीवर पाहिल्यावर त्या नाटकांकडे त्यांचे विशेष लक्ष गेले. हॅम्लेट व आयागोच्या धरतीची व तोडीची दोन पात्रे एकाच नाटकात आणली तर नवीन चांगले नाटक होईल अशा कल्पनेत गुंग असतानाच रावसाहेब खरे यांचे नाना फडणवीस यांचे चरित्र त्यांच्या वाचनात आले आणि त्यांना विचारवंत पण विकारवश  हॅम्लेट सवाई माधवरावांमध्ये सापडला. १८९३ मध्ये वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांनी पहिले संपूर्ण नाटक लिहिले, ‘सवाई माधवराव यांचा मृत्यू!’ 

खाडिलकर लोकमान्य टिळकांना भेटण्यासाठी पहिल्यांदा गेले तेव्हा लोकमान्यांनी त्यांचे ‘सवाई माधवराव यांचा मृत्यू’ हे नाटक आणि ‘ब्राह्मण व त्यांची विद्या’ या ग्रंथावरील टीका हे दोन्हीही ‘विविध ज्ञानविस्तार’ या मासिकात वाचलेले होते. या लेखकाचा पिंड देशभक्ताचा आहे आणि विचार प्रणाली व युक्तिवाद राष्ट्र प्रेमाच्या रसाने ओथंबलेला आहे हे त्यांना उमगले होते. पहिल्याच भेटीत टिळकांनी कृष्णाजींना लेख लिहिण्यास सांगितले आणि लेखाचा विषयही सुचवला. ‘राष्ट्रीय महोत्सवांची आवश्यकता.’ आणि दुसरेच दिवशी म्हणजे दिनांक १ सप्टेंबर १८९६ रोजी कृष्णाजींचा हा पहिलावहिला लेख टिळकांनी थेट अग्रलेख म्हणूनच प्रसिद्ध केला! पहिल्याच भेटीतल्या पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. या लेखापासूनच ते टिळकांच्या संपादक वर्गात दाखल झाले. त्याकाळी पत्रकारिता म्हणजे त्याग, ब्रिटिश सरकारचा रोष, यात अर्थ प्राप्ती आणि ऐहिक वैभव कुठले? परंतु लोकमान्य टिळकांच्या साथीने मातृभूमीच्या सेवेची ही संधी त्यांनी शूर वृत्तीने स्वीकारली!

इसवी सन १८९७ मध्ये महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळी भागातल्या शेतकरी आणि सामान्य जनतेच्या सहाय्यासाठी टिळकांनी महाराष्ट्रभर कार्यकर्ते पाठवले त्यात सोलापूर व विजापूर या अत्यंत दुष्काळी जिल्ह्यात कार्य करण्याची जबाबदारी कृष्णाजी खाडिलकरांवरती सोपवली. कृष्णाजींनी दोन्ही जिल्हे, खेडोपाडी पिंजून काढली. जनतेच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि सरकारी कचेरीत त्यासाठी दाद मागण्यासाठी त्यांनी अनेक सभा घेतल्या. त्या दौऱ्यातच विजापूरचा मोडकळीस आलेला उदध्वस्त किल्ला पाहून त्यांच्या कवी मनाला वेदना झाल्या आणि त्या वेदनांमधून प्रसवलं विरश्रीपूर्ण नवं नाटक, ‘कांचनगडीची मोहना.’ दिनांक २२ जून १८९७. पुण्यात एक अत्यंत खळबळजनक घटना घडली. गव्हर्नरच्या बंगल्यावर मेजवानी झोडून परतणारा गोरा अधिकारी रॅंड व त्याचा सहकारी आयस्र्ट यांच्यावर चाफेकर बंधूंनी गोळय़ा घातल्या! यामुळे ब्रिटिश सरकार पिसाळले. दडपशाहीला सुरुवात झाली. चिथावणीखोर, प्रक्षोभक लेख लिहिले म्हणून राजद्रोहाच्या आरोपाखाली २७ जुलै रोजी टिळकांना अटक झाली. वास्तविक ते लेख खाडिलकरांनी लिहिले होते. पण वृत्तपत्राचे संस्थापक मालक म्हणून लोकमान्य टिळकांनी ती शिक्षा आपल्या शिरावर घेतली! मात्र तेव्हापासूनच प्रखर देशभक्तीला सशस्त्र क्रांतीची जोड हवी या दृष्टीने टिळक-खाडिलकर विचार करू लागले आणि ब्रिटिशांच्या तोडीची शस्त्रे निर्माण करता येतील का या दिशेने संशोधन सुरू झाले, आणि सुरू झाले हिंदूस्तान आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील एक रहस्यमय प्रकरण.

१९०१ सालच्या कलकत्ता अधिवेशनाला गेलेल्या लोकमान्य टिळकांनी  नेपाळच्या ‘स्वतंत्र’ भूमीवर पिस्तुलांचा कारखाना काढण्याची एक गुप्त योजना बनवली आणि पुण्यात परत आल्यावर सर्व हकिकत सांगून क्रांतिकारी विचारास अनुरूप असणाऱ्या कृष्णाजी खाडिलकरांची नेपाळ मोहिमेसाठी नियुक्ती केली. लोकमान्य टिळकांच्या या ‘बहिर्जी’ला ‘कौलांच्या कारखान्याचा तज्ज्ञ’ या नावाखाली नेपाळमध्ये पिस्तुलांचा कारखाना काढायचा होता, म्हणून नेपाळला जाताना वाटेत जबलपूरला थांबून कृष्णाजींनी कौलाच्या कारखान्यात काम करून कौले बनवण्याच्या कलेचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात केले. त्याकाळी पशुपती नाथाच्या यात्रेवेळी नेपाळमध्ये प्रवेश करण्यासाठी परवाना किंवा विसा लागत नसे म्हणून या यात्रेदरम्यानच कृष्णाजी नेपाळमध्ये घुसले. लोकमान्य टिळकांच्या योजनाबद्ध प्रयत्नातील पहिल्याच प्रयत्नाचा मान आपल्याला मिळाला आहे व हे कार्य आपल्याला तडीस नेलेच पाहिजे या विचाराने त्यांचे मन भारावले होते! पशुपतिनाथाच्या एका पुजाऱ्याकडे दक्षिणात्य ब्राह्मण के. कृष्णराव असे नाव घेऊन त्यांनी मुक्काम ठोकला आणि कौले बनवण्याच्या उद्योगाला सुरुवात केली. बाहेर जाताना कृष्णाजी अंगात सुरवार, कोट, टोपी, बूट असे वेशांतर करीत. काठमांडू गावातले लोक आणि नेपाळ नरेशचे दरबारी त्यांना ‘टाइल भट’ या नावाने ओळखत. दरम्यान, जर्मनीच्या क्रप्स कंपनीचे पिस्तुले बनवण्याचे मशीन हिंदूस्तानपर्यंत पोहोचून नेपाळची वाट चालू लागले होते. पण पशुपतिनाथाच्या दर्शनाला महाराष्ट्रातून आलेल्या एका व्यक्तीने कृष्णाजींना ओळखले आणि हिंदूस्थानात परतल्यावर ब्रिटिशांना ही वार्ता सांगितली. चौकशी व तपासाची यंत्रणा जोरात फिरू लागली. नेपाळ सरकारकडे ब्रिटिश अधिकारी पोहोचले पण दरम्यान नेपाळ सरकारने क्रप्स कंपनीचे यंत्र जर्मनीला परत पाठवले होते. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्याबद्दल विचारणा केली असता नेपाळ दरबाराने या नावाच्या कोणाही व्यक्तीला ओळखत नसल्याचे सांगितले. पण के. कृष्णराव नावाच्या एका सभ्य सज्जन दाक्षिणात्य व्यक्तीचा कौलांचा कारखाना होता असे सांगितले. बाकी काठमांडूच्या  नागरिकांना तर ‘स्टाइल भट’च माहिती होता. खाडिलकर विनापरवाना नेपाळला गेल्यामुळे काही कागदपत्रेही जमा केली नव्हती! १९०२ ला नेपाळला गेलेले कृष्णाजी १९०४ ला गनिमी काव्याने पुण्यात परत आले. तरीसुद्धा पुढे १९१० पर्यंत ब्रिटिश पोलीस अधिकारी के. कृष्णरावचा शोध घेत होते!

 आपल्या अग्रलेखातून आणि गद्य व संगीत नाटकातून समाज प्रबोधन करणारे, समाजाला पारतंत्र आणि गुलामगिरीची जाणीव करून देऊन समाज मन पेटवून देणारे, देशभक्तीचा अंगार फुलवणारे, आणि केवळ राष्ट्र उभारणीसाठीच सर्व लेखन करणारे प्रखर देशभक्त नाटय़ाचार्य खाडिलकरांना शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जन्म वर्षांनिमित्ताने त्रिवार वंदन करून एवढेच म्हणावेसे वाटते.

शूरा मी वंदिले!