अन्वर राजन
मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंबईहून समीरचा फोन आला; ‘‘आपला मित्र आनंद गेला’’ बातमी धक्कादायक व दु:खद होती. आनंद करंदीकर या विषयावर आम्ही दोघे बराच वेळ बोलत राहिलो. आनंद हा ‘युक्रांद’चा कार्यकर्ता. महाराष्ट्रात त्याच्या मित्रांची आणि चाहत्यांची संख्या भरपूर. माझा त्याचा जवळपास ४८ वर्षांचा संबंध होता. आनंद पुण्यात आल्यावर आमच्या भेटीगाठी वाढल्या. आनंदची प्रकृती गेले काही दिवस बिघडत चालली होती. फुप्फुसांची क्षमता जेमतेम २० टक्के उरली होती. त्याचे जाणे हे अगदीच अनपेक्षित नव्हते, पण तरीही हे वृत्त ऐकण्याची मनाची तयारी झाली नव्हती.

युवक क्रांती दलाची स्थापना १९६७ साली पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर लोकमान्य टिळकांच्या बंगल्यात झाली. डॉ. कुमार सप्तर्षी आणि डॉ. अनिल अवचट यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत उपस्थितांमध्ये आनंद होता. १९६७ ते १९७५ हा काळ महाराष्ट्रामध्ये युवक क्रांती दलाने केलेल्या विविध आंदोलनांमुळे लक्षात राहिला. याच काळात दलित पँथर, मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांसारख्या चळवळी उभ्या राहिल्या. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभर व काही प्रमाणामध्ये जगात तरुणांच्या विविध आंदोलनांनी ठिकठिकाणचा समाज ढवळून निघाला होता.

राशिनमध्ये सरंजामी व्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी कम्युनसहित अनेक प्रयोग झाले. राशिनच्या प्रयोगात मुंबईचे काही जण सहभागी झाले होते. मुंबई युक्रांदचा प्रामुख्याने डाव्या विचारावर आधारित एक स्वतंत्र चेहरा होता. तिथे कोणत्याही विषयावर सखोल चर्चा व्हायची, तावातावाने मुद्दे मांडणारे तरुण पाहून कोणाला वाटावे की इथे मोठे भांडण चालू आहे. मुंबईच्या या युनिटमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग होता. आनंद करंदीकर हा आयआयटीचा विद्यार्थी, विजय नाईक, हेमंत गोखले, भालचंद्र मुणगेकर यांसारखे अभ्यासू तरुण यात असायचे. तर तळागाळात काम आणि संपर्क असलेले शांताराम पंदेरे, उत्तम गाडे यांसारखे लोक असायचे.

शिवाजी पार्कजवळ राजू पाटीलच्या बंगल्याच्या गच्चीवर या बैठका होत. आणीबाणीच्या काळात या गोष्टी जरा थंडावल्यासारख्या झाल्या होत्या. जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर यातील अनेक कार्यकर्ते पुन्हा सक्रिय झाले. आणीबाणीच्या काळात जमेल तसे काम करत होते. तर अनिश्चितता असल्याने अटक व तुरुंगवास ओढवून घेणे चुकीचे आहे असे अनेकांना वाटत होते. तरी त्या काळात, डॉ. कुमार सप्तर्षी, अरुण लिमये, व्यंकप्पा पतकी, डॉ. रत्नाकर महाजन, अजित सरदार, अन्वर राजन, अजित सरकार यांसारखे अनेक कार्यकर्ते ‘मिसा’खाली स्थानबद्ध होते. लातूरचे दिलीप अरळीकर तर बायको व दोन लहान मुलांसह तुरुंगात होते.

आनंद व नीलम यांनी काही काळासाठी मराठवाड्यात जायचा निर्णय घेतला. उदगीर हे युक्रांदचे सक्रिय केंद्र होते. प्रा. डॉ. ना. य. डोळे हे उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. युक्रांद आणि डोळे सर हे अभेद्या नाते होते. त्या काळात युक्रांदचे कार्यकर्ते उदगीरमध्ये, रिक्षाचालक संघटना, खादी-ग्रामोद्याोग कामगार संघटना, हॉटेल कामगार संघटना आणि शेतमजुरांची संघटना चालवत होते. डॉ. ना. य. डोळे त्या युनियनचे अध्यक्ष होते. रंगा राचुरे हा त्या युनियनचा सेक्रेटरी होता. आनंद उदगीरमध्ये या सर्वहारा संघटनांच्या कामात सहभागी झाला.

मुंबईतून सुखवस्तू वातावरणातून येऊन मराठवाड्यासारख्या उष्ण प्रदेशात त्याने काम केले. शेतमजुरांना संघटित करण्यासाठी तो उन्हातान्हात शेतावर फिरत असे. आयआयटी व आयआयएमसारख्या संस्थांमधून पदवी मिळवलेला, पीएच.डी. केलेला हा तरुण पूर्णपणे डी क्लास झाला होता. भारतात तेव्हा अनेक शहरांतून उच्चशिक्षित व सुखवस्तू घरातील तरुण मुले-मुली डाव्या चळवळीत सक्रिय होण्याची एक लाटच आली होती. आनंदने काही काळ मराठवाड्यात काम केले. नंतर तो साधारण १९८० साली पुण्यात स्थायिक झाला.

सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीतर्फे विचारवेध संमेलन भरवले जात असे. साताऱ्यातील लोकांनी तो उपक्रम थांबवल्यावर आनंदने तो पुन्हा सुरू केला आणि दरवर्षी विचारवेध संमेलन भरवले. २०१७ पासून मागच्या वर्षीपर्यंत सहा संमेलने भरवण्यात आली. मागच्या वर्षीच्या विचारवेध संमेलनमध्ये आंतरजातीय विवाह हा विषय घेतला गेला होता. असे विवाह करणाऱ्या तरुणांची संख्या वाढली पाहिजे यासाठी तो प्रयत्नशील होता. दोन्ही घरांतून विरोध असणाऱ्या जोडप्यांना काही काळ राहण्याची व्यवस्था करता यावी यासाठी त्याने पुण्याजवळ फ्लॅट घेतला होता. तिथे अनेकांना आधार मिळाला.

मार्केटिंगच्या क्षेत्रात त्याचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. टाटा तसेच अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्याोग समूहांसाठी त्याने वेगवेगळ्या विषयांवर सल्लागार म्हणून काम केले. आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करता येईल या विषयाचा त्याने अभ्यास केला आणि उपक्रम राबवले.

त्याने विचारवेध संमेलन भरवण्याची परंपरा केवळ चालू ठेवली असे नाही तर त्याला एक वेगळ्या प्रकारच्या उपक्रमाची जोड दिली. विचारवेध नावाचे यूट्यूबवर पाहता येईल असे वेबपोर्टल सुरू केले. त्यात साधारणत: १० ते १२ मिनिटांत एखाद्या विषयाची मांडणी करणारा व्हिडीओ तयार करून तो लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा असा हा उपक्रम. यात जवळपास ७५० व्हिडीओ तयार केले. या व्हिडीओमध्ये राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, इतिहास, संस्कृती, तरुणांना भेडसावणारे प्रश्न असे विविध विषय आहेत. त्यात राम पुनियानी, अ. का. मुकादम, अन्वर राजन, सरिता आव्हाड, योगेंद्र यादव, मोहन आघाशे, अच्युत गोडबोले, भालचंद्र मुणगेकर, सुदर्शन चखाले यांच्यासारख्या अनेकांचा समावेश आहे. स्वत: आनंद करंदीकर यांनीही काही विषयांवर केलेले व्हिडीओ आहेत. हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे आणि हे व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे.

विचारवेध संमेलन आणि विचारवेध या उपक्रमातून अनेक तरुण आनंदच्या संपर्कात आले. त्यांच्याबरोबर आनंद सहज संवाद करीत असे. २००१ साली ‘युक्रांद’ पुन्हा निर्माण झाल्यावर जे नवीन युवक जोडले गेले त्यांच्यापैकी अनेक तरुणांचा आनंदशी मैत्रिभाव जुळला होता. एका अर्थाने जुन्या आणि नव्या युक्रांदमध्ये पुलाचे (Bridge) काम आनंदाने केले असे म्हणायला हरकत नाही.

व्यवसाय आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच त्याच्या नातेसंबंधांत अनेक ताणतणाव आले. सुप्रसिद्ध कवी विंदा करंदीकर यांचा मुलगा असल्याचे भांडवल त्याने कधी केले नाही. जोडीदाराच्या बाबतीत काही पेचप्रसंग निर्माण झाले तेव्हा त्यात कडवटपणा येऊ न देता ते प्रश्न संयमाने हाताळले. युक्रांदमध्ये जवळपास ५४ प्रेमविवाह झाले होते, त्यातील काही आंतरजातीय व आंतरधर्मीयही होते. या सर्व जोडप्यांचे वर्तन प्रगल्भतेची ओळख करून देणारे होते. गेली सुमारे १२ वर्षे सुरू असलेले आनंद आणि सरिता आव्हाड यांचे सहजीवन अत्यंत समृद्ध होते. सरिताने एकट्या राहणाऱ्या या वृद्ध स्त्री-पुरुषांना सहजीवनासाठी मार्गदर्शन केले, लिखाण केले.

आनंदची चार पुस्तके प्रकाशित झाली असून चार प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेत आहे. सरिताचेही पुस्तक प्रकाशित झाले आणि गाजले. गेली काही वर्षे आनंद आजारी होता. त्याचे फुप्फुस अचानकपणे काम करेनासे झाले होते. त्याला ऑक्सिजनचे उपकरण सोबत ठेवून काम करावे लागे. अनेकदा तो थकून जात असे. पण तो शेवटपर्यंत कार्यरत राहिला. अगदी मृत्यूच्या आदल्या दिवशीही एम.के.सी.एल. या संस्थेमध्ये त्याने ‘युवकांच्या वाढत्या आत्महत्या’ या विषयावर मांडणी आणि चर्चा केली. अशा पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहण्याचे भाग्य फार थोड्यांना मिळते. शारीरिक व्याधीची पर्वा न करता तो कार्यरत राहिला. त्याचे जाणे हे दु:खद आहे. पण शेवटपर्यंत कार्यरत राहण्याची प्रेरणा देणारे आहे. तो समृद्ध जीवन जगला. जवळपास सर्व संघटनांमध्ये त्याचे चाहते होते, आहेत. त्याचा मृत्यूदेखील योद्ध्याला शोभणारा आहे. आमच्या या कॉम्रेडला नम्र अभिवादन.

mgsnidhi@gmail.com