गोविंद भास्कर कुलकर्णी
भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाणारे ‘तेजस’ हे हलके लढाऊ विमान दुबई येथील ‘एअर शो’दरम्यान कोसळले आणि भारताचे लढाऊ वैमानिक विंग कमांडर नमांश स्याल यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश हवाई दलाने दिले आहेत. या विमानाची निर्मिती करणाऱ्या ‘हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) या घटनेला अपवादात्मक परिस्थितीत घडलेली एकल (आयसोलेटेड) घटना म्हटले आहे. लढाऊ विमाने, त्यांची निर्मिती, हवाई शक्ती या बाबी/ संकल्पना दिसतात, वाटतात तितक्या सामान्य नाहीत, याची जाणीव यानिमित्ताने झाली, हे महत्त्वाचे आहे. या साऱ्याला भूराजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचीही जोड असते. अत्यंत गुंतागुंतीच्या या विषयाला अनेक पदर असतात. पण सर्वसामान्यांना दिसते, ते फक्त लढाऊ विमान आणि त्याचे उड्डाण!

या घटनेचे पडसाद भारतासह साऱ्या जगात उमटले. भारतासाठी तर ही अतिशय गंभीर घटना. अपघातानंतर हवाई दलाला आवश्यक विमानांची गरज, तेजस हा हलक्या लढाऊ विमानाचा प्रकल्प आणि १९८०च्या दशकापासूनचा त्याचा प्रवास, इंजिननिर्मितीतील अपयश, अमेरिकेकडून भारताला ‘तेजस’साठी इंजिन वेळेवर मिळण्यात झालेला उशीर आणि त्याचा एकूणच हवाई दलाच्या क्षमतेवर होणारा परिणाम अशा साऱ्या मुद्द्यांची चर्चा सामरिक जगतात झाली, होत आहे.

‘एअर शो’चे साऱ्या जगात, अगदी भारतातही आयोजन केले जाते. या परंपरेला १०० वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे. देशाची हवाई क्षमता अभिमानाने प्रदर्शित करणे आणि व्यावसायिक स्तरावर विविध देशांशी करारमदार करणे यासाठी प्रामुख्याने ‘एअर शो’ ओळखले जातात. हवाई कसरतींच्या माध्यमातून विमानाचे वेगळेपण आणि प्रगत क्षमता दाखविण्याचा उद्देश असतो. अशा प्रात्यक्षिकांत भाग घेणारे वैमानिक अतिशय अनुभवी आणि विशेष नैपुण्य सिद्ध केलेले असतात. विशेष म्हणजे, अशा ‘एअर शो’साठी वैमानिक कसून तयारी करतात. ‘एअर शो’दरम्यान वैमानिकांचे युद्धप्रावीण्य, विमानाचे उड्डाण आणि व्यूहात्मक क्षमतेची परिसीमाही सिद्ध केली जाते.

‘तेजस’ विमानाची रचना हवाई युद्धात अत्यंत वेगवान, चपळ हालचाली करून शत्रूपेक्षा वरचढ होण्याच्या दृष्टिकोनातून केली गेली आहे. अशा प्रकारचे विमान हाताळण्यासाठी वैमानिक अनुभवी आणि त्या विमानावर प्रशिक्षित असणे गरजेचे असते. उपलब्ध माहितीनुसार, ‘तेजस’च्या प्रशिक्षण विमानांची संख्या फक्त दोन किंवा चार आहे, याचीही नोंद घेण्याची गरज आहे. हवाई दलामध्ये अपघात ही बाब सर्वांत गांभीर्याने घेतली जाते. कुठल्याही देशात वैमानिक हाच सर्वांत मूल्यवान घटक असतो.

प्रत्येक देशात लढाऊ विमानांच्या अपघातांच्या बाबतीत मोजणीचे प्रमाण वेगवेगळे आहे. भारतीय हवाई दलात ‘प्रत्येक दहा हजार तास हवाई उड्डाणांमागे किती अपघात झाले,’ याची नोंद ठेवली जाते. ‘तेजस’च्या बाबतीत, २००१ मध्ये त्याची पहिली हवाई झेप ते २०२५, या काळात फक्त दोनच अपघात झाले आहेत. त्यापैकी दुसरा अपघात दुबईमधील आहे. विमान अपघातग्रस्त होणार आहे, याचा थोडा जरी अंदाज वैमानिकाला उड्डाणानंतर आला तर ‘बेल-आउट’चा (विमानाबाहेर पडण्याचा) निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक वैमानिकाला असते; कारण नेहमीच वैमानिक हा विमानापेक्षाही अधिक महत्त्वाचा असतो. दुबईच्या अपघातात वैमानिकाला ‘बेल-आउट’ची संधी मिळाली नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अर्थात चौकशीअंती साऱ्या बाबी स्पष्ट होतील.

या ठिकाणी तेजस विमानाचे २००१ पासून अपघात कमी झाले, हा मुद्दा नसून, दुबई येथील अपघातानंतर ज्या इतर अनेक बाबींवर चर्चा झाली, त्यावर मंथन होण्याची गरज आहे. भारताच्या तेजस या हलक्या लढाऊ विमान प्रकल्पाचा एकूण आढावा घेतला, तर आत्मनिर्भरतेचा अभिमानही वाटतो. मात्र त्याच वेळी या प्रकल्पाला लागलेला वेळ आणि प्रत्यक्षात हवाई दलामध्ये दाखल झालेली विमाने पाहता चिंताही वाटते. या प्रकल्पाला १९८०च्या दशकात अधिकृतपणे सुरुवात झाली. या प्रकल्पाची चर्चा त्याही पूर्वीपासून होत होती. रशियाच्या मिग विमानांची जागा हे विमान घेणार होते. मात्र या प्रकल्पाला अनेक कारणांनी वेळ लागला आणि मिग विमानांचा वापरही हवाई दलात अगदी आता-आतापर्यंत कायम राहिला.

या साऱ्या घडामोडींचा परिणाम हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या संख्येवर झाला. हवाई दलासाठी अधिकृत ४२ स्क्वाड्रन्सना मंजुरी असताना २९ ते ३० स्क्वाड्रनपर्यंत संख्या खाली आहे. पुरेशी तेजस विमाने प्रत्यक्षात हवाई दलात अद्याप दाखल झालेली नाहीत. या विमानांसाठी सुरुवातीला कावेरी इंजिनाचा प्रयोग करण्यात आला. मात्र तो फसला. आता अमेरिकेबरोबर इंजिनासाठी करार करण्यात आला आहे. अमेरिकेकडून इंजिन मिळण्यात उशीर होत असल्याने भारताच्या हवाई शक्तीवरच त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ‘तेजस’च्या प्रगतीबाबत, फेब्रुवारी २०२५ बेंगळूरु ‘एअर शो’दरम्यान भारताच्या हवाई दल प्रमुखांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. दुबई येथील तेजस विमानाच्या अपघातानंतर या साऱ्या बाबी विविध तज्ज्ञांनी अधोरेखित केल्या. तसेच भारतातच हवाई दलाला विमानांची गरज असताना तेजस लढाऊ विमानांच्या निर्यातीचा विचार तरी का करायचा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला.

तेजस विमानांचा विचार करतानाच जगातील लढाऊ विमाने तयार करण्याचा इतिहास आणि प्रक्रिया थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय, यातील गुंतागुंत स्पष्ट होणार नाही. लढाऊ विमाने दोन प्रकारांत मोडतात : ‘सामरिक उपयोगिता’ आणि प्रत्यक्ष हवाई युद्धादरम्यान ‘हल्ला आणि बचावाची व्यूहात्मक गरज’. त्याही पुढे जाऊन, ताफ्यातील विमानांचा सर्वसाधारण एकूण प्रकार हा कुठलाही देश त्याचा भूराजकीय दृष्टिकोन आणि सर्वंकष सामरिक विचारांवर आधारित करतो. या सर्व बाबींचा विचार करून विमानाची रचना अंतिम केली जाते. रशियासारख्या देशात मिग, सुखोईसारखे एकापेक्षा अधिक ‘डिझाईन ब्यूरो’ आहेत. विमानाची गरजेनुसार प्रारंभिक रचना ठरवली गेल्यानंतर मुद्दा निर्माण होतो, तो विमानाच्या उद्देशाला अनुकूल शक्ती प्रदान करणाऱ्या इंजिनाचा.

जगातील सर्वांत पहिले जेट इंजिन संचालित लढाऊ विमान १९४४ मध्ये नाझी जर्मनीने रणांगणावर उतरवले होते. इंजिन हा अतिशय क्लिष्ट, किचकट आणि सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण जगात अगदी बोटावर मोजण्याइतक्या कंपन्या विमानाच्या इंजिननिर्मितीत आघाडीवर आहेत. नावांची साधारण यादी पुढीलप्रमाणे – जनरल इलेक्ट्रिक, रोल्स-रॉइस, प्रॅट अँड व्हिटनी, हनीवेल एरोस्पेस, एमटीयू एरो इंजिन्स, सॅफ्रान, जॅपनीज एरो इंजिन कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, होंडा इत्यादी.

विमानांच्या मागच्या शतकापासूनचा संपूर्ण इतिहास बघितला तर या कंपन्या सुरुवातीपासून या क्षेत्रात अग्रेसर आहेत. रशिया त्यांच्या विमानांच्या इंजिन्ससाठी अगदी सुरुवातीपासून स्वयंपूर्ण आहे. अमेरिका आणि रशियासारख्या देशात एकाच वेळी अनेक खासगी आणि सरकारी कंपन्या विमाननिर्मितीच्या क्षेत्रात उत्पादन करत असतात. देशांतर्गतच स्पर्धा असल्याने प्रगत देशात लढाऊ विमानांच्या बाबतीत शोध, नावीन्य, आणि उत्तम प्रत यांना सतत चालना मिळते. लढाऊ विमाने तयार करणाऱ्या खासगी कंपन्यांची नावे लिहायची झाली, तर सुखोई, मिग, तुपालेव, जनरल डायनॅमिक्स, बोइंग, नॉथ्रॉप, लॉकहीड मार्टिन, दासॉल्ट एव्हिएशन, एसएएबी ही नावे प्रकर्षाने समोर येतात.

भारतात ऐरोनॉटिकल डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (ADA) प्रगत विमानांची रचना तयार करण्यासाठी संस्थपित आणि कार्यरत आहे. ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) विमानाचे उत्पादन करते. आतापर्यंत, भारताला स्वत:चे लढाऊ विमानासाठी इंजिन बनवण्यात यश आलेले नाही. त्यामुळे विमानाची रचना अर्थात सांगाडा भारतातील तंत्रज्ञांनी कितीही उत्तम बनवला तरी त्याला अनुकूल इंजिन नसेल, तर ते विमान कधीच त्याची अपेक्षित कामगिरी करू शकत नाही. भारताला तेजस विमानांच्याही आधी ‘एचएफ २४ मरुत’चा इतिहास आहे. भारताचे संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या लढाऊ विमानाचे स्वप्नभंग झाले, ते इंजिनच्या मुद्द्यामुळेच. अनुकूल इंजिनअभावी ‘मरुत’ची झेप शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेच्या कमी राहिली.

जागतिक स्तरावर संरक्षण क्षेत्रात भारताचे उद्दिष्ट आत्मनिर्भर होण्याकडे असले, तरी त्यात अनेक आव्हाने आहेत. लढाऊ विमानाचे इंजिन हा त्यातीलच एक महत्त्वाचा घटक. भारताने यापूर्वीही अशा आव्हानांचा सामना केला आहे. अवकाश तंत्रज्ञानामध्ये क्रायोजेनिक इंजिनासह अनेक बाबतींतील उल्लेखनीय यश, क्षेपणास्त्र प्रणालीमधील आत्मनिर्भरता दुर्लक्षून चालणार नाही. दुबई येथील अपघातानंतर लढाऊ विमानांचे इंजिन स्वदेशात तयार करण्यासाठी भारतातील सर्व शास्त्रज्ञ, हवाई दलातील तज्ज्ञ हातात हात घालून एकत्र काम करावे आणि लढाऊ विमानांच्या निर्मितीत भारताला स्वयंपूर्ण करावे, हीच साऱ्या देशवासीयांची अपेक्षा असेल. दुबई येथील अपघातात मृत्युमुखी पडलेले विंग कमांडर नमांश स्याल यांना तीच खरी श्रद्धांजली ठरेल!

संरक्षण तसेच सामरिकशास्त्राचे अभ्यासक

kgb2120@gmail.com