कोणे एके काळी सुजलाम सुफलाम ,सोन्याचा धूर वगैरे असलेल्या देशातले आपण दिवसेंदिवस कृतघ्न होत चाललो आहोत का? हा प्रश्न किमान २०२६ च्या सुरुवातीला तरी स्वतःला विचारणे गरजेचे आहे. एकविसाव्या शतकाची पहिली २५ वर्षे उलटून गेली, गेल्या काही दशकात होतच असलेल्या सुधारणांचा वेग साधारण २००५ पासून प्रचंड वाढला , हे आपण अनेक उदाहरणे देऊन सिद्ध करू शकतो. अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐंशी नव्वदी कडे झुकलेली माणसे आपल्यात आहेत. तीही या प्रगतीने थक्क झाली, सुखावली. पण त्या प्रत्येकाचे हेच म्हणणे असते,“तो लळा जिव्हाळा आता राहिला नाही.तशी माया ममता आता कुठे दिसत नाही.माणसे एकमेकांना विचारीत नाहीत..कुणी कुणाची चिंता करीत नाही.कुणाला कुणाशी काही देणे घेणे राहिलेले नाही”.
माणसे कृतघ्न नसतील झाली, पण स्वार्थी झाली आहेत. फक्त स्वतःचा विचार. एकूणच आपल्या वैचारिक,भावनिक त्रिज्येचे वर्तुळ अधिकाधिक संकुचित होत चालले आहे. हे अवतीभवती प्रकर्षाने दिसते आहे.
साधे आभार मानणे हाही एक नाटकी उपचार झाला आहे.शिंक आली की आपण चटकन सॉरी किंवा एक्सक्यूज मी म्हणतो, तसा तो पाश्चात्य कोरडा व्यवहार झाला आहे.
मुळातच मानवजात ही एकमेकांच्या सहकाऱ्याने जगणारी, वाढणारी संस्कृती आहे. जनावरे एकमेकावर आपल्या इतकी अवलंबून नसतात. प्रत्येक वाघाला आपली शिकार स्वतःच शोधावी लागते. प्रत्येक पक्ष्याला आपले दाणापाणी स्वतःच आणावे लागते. आपण मात्र एकमेकांवर अवलंबून आहोत. आपले अन्न,आपले कपडे हे तयार करण्यात, आपल्यापर्यंत पोहोचण्यात कितीतरी माणसांचा हातभार लागलेला असतो. ज्या तंत्रज्ञानाचे आपण इतके गोडवे गातो ते विकसित करण्यात आतापर्यंत अनेक देशातील अनेक विद्वान शास्त्रज्ञांचा हातभार लागलेला असतो. एक उद्योग विकसित करायचा तर शेकडो माणसे दिवस रात्र परिश्रम करतात.
पण या सर्वां विषयी कृतज्ञ राहावे, त्यांचे मनोमन आभार मानावे असे आपल्याला कधी वाटत नाही.त्यांचे प्रातस्मरण करावे असे कधी आपल्याला वाटत नाही.
शाळेत असताना एक तरी शिक्षक शिक्षिका असतेच जिने आपल्यावर चांगले संस्कार केले असतात. एखादा विषय उत्तम शिकवला असतो.एखाद्या अडीअडचणी च्या प्रसंगी आपली मदत केली असते.आपल्याला धीर दिला असतो. आपल्या पैकी किती जण मोठे झाल्यावर त्या शिक्षकांचा शोध घेतात; त्यांच्या विषयी कृतज्ञता,आभार प्रगट करतात? अनेक मित्र मैत्रिणी असतात.ज्यांच्याशी आपले जीव भावाचे भावनिक नाते जुळले असते. आपण लहानपणी खूप काही शेअर केले असते.पण मोठेपणी वाटा वेगळ्या होतात.क्वचितच एखाद दुसरे मित्र संबंध टिकून राहतात. एरवी बहुतांशी आपण आपल्या विश्वात इतके रमून जातो की आपल्याला त्यांची आठवणही येत नाही. मग कृतार्थ भाव,आभार वगैरे राहिले दूर.
आता तर कुटुंब देखील अगदीच लहान झाले आहे.सणासुदीला एकत्र जमणे कमी झाले आहे. लग्ना सारख्या प्रसंगीही बिझी शेड्यूल मधून वेळ काढणे कठीण झाले आहेत. त्यामुळे आपल्याच नातेवाईकातील दुसऱ्या तिसऱ्या पिढीतील मुला मुलींची नावे आपल्याला सांगता येत नाहीत.ते काय करतात हे आपल्याला माहिती नाही.ते जाणून घेण्याची इच्छा, फुरसत देखील नाही.आपणच असे कोरडे,निरिच्छ तर मग आपल्या पुढच्या पिढी बद्दल तर बोलायलाच नको!
कुटुंबातच असा कोरडा व्यवहार असेल तर बाहेर समाजात,कामाच्या ठिकाणी, रोजच्या व्यवहारात तरी तो कुठून येणार? तिथे तर आपण जाती धर्माच्या,वर्ण भेदाच्या पोलादी भिंती उभारल्या आहेत.स्पर्धेपोटी ईर्ष्या,मत्सर,वेळ प्रसंगी संघर्ष,अत्याचार असे भयावह वातावरण आहे.त्यात पुन्हा सगळीकडे पसरलेले गलिच्छ राजकारण.तिथे कुठेच दयामाया नाही. समभाव नाही.आपुलकी नाही.मग सहकार्य, कृतार्थ भाव वगैरे राहिले दूर!
समाजातील परस्पर विश्वासाचे वातावरण देखील राहिले नाही आता.कुटुंबातही एक दुसऱ्याकडे संशयाने बघतो.अगदी जवळची नाती देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहेत.प्रत्येक जण दुसऱ्यात आधी स्वतःचा फायदा शोधतो.त्याप्रमाणे त्याचे वागण्या बोलण्याचे आराखडे ठरतात.प्रत्येकाला आपापल्या शिखरावर चढायची घाई झाली आहे.त्यासाठी कुठलीही अनैतिक पातळी गाठण्याची तयारी आहे.जिथे स्वार्थ आहे तिथेच लाळ घोटेपणा आहे.हाजी हाजी आहे.काम संपले की दोर कापून टाकायचे.माणसांना विसरून जायचे.असा सगळा हिशेबी व्यवहार आहे.
पूर्वी आपण पाश्चात्य संस्कृतीच्या नावे बोटे मोडत होतो. आपले संस्कार,आपली वेद पुराणातील धर्म ग्रंथातील शिकवण याचा सार्थ अभिमान बाळगत होतो. त्यात तेव्हा तथ्यही होते. आता पारडे पालटले आहे. आपल्या संस्कृतीचा उदोउदो आपण उठताबसता करतच असतो, पण तिची मूल्ये आचरणात आणण्याचे मात्र स्वत:पुरते विसरतो. दीडशे देश आनंदी जगण्याच्या वाटेवर आपल्या पुढे आहेत. म्हणजे त्यांना जगण्याचे मर्म आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे उमगले… अन् आपण?
खरे तर अनेक आपदा, संघर्ष, लढाया, अपयश हे शिकण्यासाठी, धडा घेण्यासाठीच असते. चार वर्षापूर्वी ती संधी सगळ्या जगाला करोना या विपदेने आपल्याला दिली. तेवढ्यापुरते आपण भांबावलो. स्तब्ध झालो. पण त्यापासून काही शिकलो का? काही धडा घेतला का? आपण नाती जोपासू लागलो का? समाजात समभाव, लळा जिव्हाळा, प्रेमभाव, सहृदयता वाढले का?
नाही…. परिस्थिती आहे तशीच आहे.उलट बिघडत चालली आहे.
कुटुंब व्यवस्था ढासळत चालली आहे. घटस्फोट वाढले आहेत. अत्याचार वाढले… जग तर तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्यासारखेच. सिम्पथी, एम्पथी, लव्ह, माया ममता, जिव्हाळा… हे शब्द पुन्हा शब्दकोशातून बाहेर काढावे लागणार आहेत.आचरणात आणावे लागणार आहेत…
नाहीतर हेही वर्ष आपल्याच कृतघ्नतेने नात्यांना कृत्रिम करून टाकणारे ठरेल!
लेखक बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
vijaympande@yahoo.com
