अरविंद सावंत
दैत्य मातला की मर्यादा ओलांडतो. ती मर्यादा दानपेटीला हात घालत भाजपने ओलांडली आहे, असे टीकास्त्र सोडणारा आणि ‘उद्धवरावांची उपरती काय कामाची?’ या ‘पहिली बाजू’चा (लोकसत्ता- ७ जुलै) प्रतिवाद करणारा लेख… केशव उपध्ये यांचा ‘उद्धवरावांची उपरती काय कामाची?’ हा लेख वाचून ते रामायणातून काही शिकले आहेत की नाहीत, असा प्रश्न पडतो. प्रभू रामचंद्र हे मर्यादापुरुषोत्तम, आदर्श राजपुत्र, निर्मोही म्हणून ओळखले जातात. त्यातला एकही गुण भाजपच्या आचरणात, वर्तनात दिसत नाही. प्रभू रामचंद्र पित्याचा आदेश शिरसावंद्य मानून वनवासात गेले. त्या १४ वर्षांत दोन लढाया जिंकल्यानंतरही ते म्हणाले नाहीत, की मी आता लंकेचा किंवा किष्किंधा नगरीचा राजा आहे. उलट बिभीषण आणि सुग्रीव यांना अनुक्रमे लंका व किष्किंधेच्या गादीवर बसवले. हा आदर्श भाजपने केराच्या टोपलीत टाकला.

खरेतर भाजपने हिंदुत्ववादी म्हणून मिरवूच नये. त्यांचा पितृपक्ष भारतीय जनसंघ व मातृसंघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग काहीच नाही. त्यांची पाळेमुळे पितृपक्ष असलेल्या ‘हिंदू महासभा’ आणि ‘भारतीय जनसंघ’ यांच्यात आहेत. पंतप्रधान मोदींनी या पक्षाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त लिहिलेला विशेष लेख (लोकसत्ता- ६ जुलै) आवर्जून वाचा. हिंदू महासभेने मोहम्मद अली जिना यांच्या मुस्लीम लीगबरोबर सिंध, उत्तर-पश्चिम सरहद्द प्रांत आणि बंगालमध्ये युतीची सरकारे चालवली, हा इतिहास आहे. मग हे कसले हो मूळ हिंदुत्ववादी?

याउलट शिवसेनेची स्थापनाच मुळी महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या रक्षणासाठी झाली, आम्ही ‘रिजनल’ आहोत आणि ‘ओरिजनल’ सुद्धा! सोयीस्कर स्थित्यंतरे शिवसेनेला कधीच करावी लागली नाहीत, कारण आमच्या पक्षाचा मूळ गाभाच ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ आहे. १९८७ साली मुंबईतील विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात झालेली पोटनिवडणूक ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला हिंदुत्वाची नवी दिशा देणारी ठरली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनाप्रमुखांनी ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा दिली.

महाराष्ट्राच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच जाहीरपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मते मागितली जात होती. त्याकाळी भाजपनेही धर्म आणि राजकारणाची गल्लत होऊ नये, असे मत मांडले होते. या निवडणुकीत शिवसेनेला अधिकृत मान्यता नसल्याने अपक्ष म्हणून लढलेल्या डॉ. रमेश प्रभू यांनी मोठा विजय मिळवला. या निकालाने संपूर्ण देशाचे राजकीय गणित बदलले. निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला जाणीव झाली की, काँग्रेसला हरवायचे असेल तर ‘हिंदुत्व’ हाच प्रभावी मुद्दा ठरू शकतो. त्यानंतर भाजपचे नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. या ऐतिहासिक भेटीतूनच पुढे १९८९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपा युतीची अधिकृत पायाभरणी झाली. 

आज भाजपला हवी आहे ती फक्त हिंदुत्वाची मक्तेदारी! ‘एक देश, एक निवडणूक’च्या आडून ‘एक देश, एकच पक्ष’ आणून लोकशाही संपविण्याचा त्यांचा डाव आहे. हिंदुत्वावरून राजकारण करताना त्यात कोणाचीच स्पर्धा नको, म्हणून भाजपने एकामागून एक हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना संपवण्याचा विडा उचलला आहे. हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यांना भाजपने सक्रिय समाजकारणातून बाजूला सारले आणि पडद्यामागून सूत्रे स्वत:च्या हाती ठेवली. शिवसेना संपविणे, हे याच आसुरी महत्त्वाकांक्षेतील सर्वात मोठे पाऊल आहे, जे भाजपला उचलता आले नाही. कारण महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम होण्याच्या प्रक्रियेत ‘ठाकरे’ या गुलामी विरोधात ठामपणे उभे राहिले.

उपाध्ये प्रभू श्रीरामांचे दाखले देतात, पण प्रभू रामांनी कुणा भ्रष्टाचार्‍यांना मांडीवर वा बाजूला बसविले का? भाजपने तर स्वत:च आरोपांची राळ उडवून तमाम भ्रष्टाचार्‍यांना स्वत:च्या कुशीत सामावून घेतले. सहसंपत्ती आणि सहपाप! ‘क्लीनचिट’ देण्यापूर्वी कोणत्या अग्निदिव्यातून गेले होते हे ‘भ्रष्टाचारी जमाव पार्टी’मधील लोक? प्रभू श्रीराम म्हणजे ‘एकवचनी’! भाजपची बदलती रूपे पाहून तर सरडाही लाजेल. हिंदुहृदयसम्राटांनी भाजपला पकडायला करंगळी दिली, म्हणून त्यांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रवेश करता आला. पण भाजप स्वत:ला इतका मोठा समजू लागला की, प्रभू श्रीराम मोदीजींची करंगळी धरून मंदिरात जात आहेत, असे भयंकर चित्र उभे केले. मोदीजी प्रभू श्रीरामांपेक्षा मोठे? हा सत्तेचा माज आहे!

बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंना खिंडीत गाठून शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू झाले. म्हणूनच २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला बरोबर घेतले पण केंद्रात सत्ता येताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी भाजपने युती तोडलीत. एकाकी पडलेल्या उद्धव ठाकरेंनी तब्बल ६३ आमदार निवडून आणले. सत्तालोलुप तर भाजप आहे, सत्तेसाठी पुन्हा शिवसेनेच्या दारी आला आणि युती केली. आताचे लाडके ‘गद्दारनाथ’ तेव्हा जाहीर व्यासपीठावर राजीनामा देण्यास निघाले होते, कारण तुमचा छळ असह्य झाला होता. तेव्हा ‘उपमुख्यमंत्री’ असे पदच संविधानात नाही, असे तत्त्वज्ञान पाजळून शिवसेनेला ते पद नाकारले गेले, पण १९९५ साली युतीचे सरकार असताना उपमुख्यमंत्रीपद भाजपाने घेतले होते. 

शिवसेनेच्या सोबतीची राजकीय अनिवार्यता ध्यानात आल्यामुळे २०१९ साली अमित शाह स्वत: मातोश्रीवर आले. चर्चेत समान जागावाटप आणि समान सत्तावाटप निश्चित झाले होते. मुख्यमंत्री पदाचाही शब्द दिला गेला होता. आजही ती व्हिडीओ क्लिप उपलब्ध आहे. जाहीर व्यासपीठावर ‘मुख्यमंत्री’ असा उल्लेख न करता ‘सत्तेत समसमान वाटा’ म्हणणे सोयीचे आहे, असे सांगितल्यावर उद्धवजींनी त्याला मान्यता दिली.

या समान वाटपात कोण किती जागा जिंकेल, असा हिशोब नव्हता. परंतु भाजपने निकालानंतर शब्द फिरवलाच! आज जे ‘आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललो आहोत,’ म्हणतात ते तेव्हा सत्तेत सहभागी का झाले? उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले आणि आदित्यजींना  मंत्रिपद दिले याचा केवढा पोटशूळ भाजपला आहे हे त्यांच्या लिखाणात दिसले. शिवसेनाप्रमुखांनी सत्तेचे कोणतेही पद ते घेणार नाहीत असे जरूर म्हटले होते, परंतु पुढे आपली मुलेही घेणार नाहीत, असे कधीच म्हटलेले नाही. उपाध्ये यांच्या पक्षात आणि त्यांच्या मित्रपक्षांत तर घराणेशाहीची माळच आहे, त्याचे काय? उद्धवजींमुळे कोविडकाळात महाराष्ट्राला कुटुंबप्रमुखाप्रमाणे सांभाळणारा मुख्यमंत्री लाभला, अन्यथा गंगेप्रमाणे गोदावरीपासून मिठी नदीपर्यंत सर्वत्र मृतदेह तरंगताना दिसले असते.

‘शिवसेना’ प्रखर हिंदुत्ववादी संघटना आहे. ती तमाम देशप्रेमी जनतेस एकदिलाने राहण्याचा आणि खर्‍या विकासाचा मार्ग दाखवत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुशासनाला मिळणारी पसंती पाहून भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे पित्त खवळले नसते तरच नवल! भाजपला मध्येच राज ठाकरे यांचा पुळका आला आहे कारण आज हे दोन्ही भाऊ सारे विसरून एकत्र आले आहेत. ‘घरफोडी’ हा भाजपचा मूळ स्वभाव आहे. भाजपने आज महाराष्ट्रात जातीपातींत, घरा-घरांत वाद निर्माण केले आहेत.

मंदिर उभारणीच्या जाहिराती करून हिंदूंना भ्रमजालात ठेवणारा भाजप, मंदिराच्या देणगीत भ्रष्टाचार करतो? परक्याच्या संपत्तीला आपली म्हणण्याची परंपरा कोणत्या हिंदुत्वात बसते? आज अनेक मंदिरांतील देणग्यांतील आणि जमिनींच्या व्यवहारांतील भ्रष्टाचार समोर येत आहे. उद्धवजी मंदिरातील चोरीवर कडाडले, कारण त्या मंदिरासाठी शिवसेनेचे मोठे योगदान आहे. आम्ही धार्मिक आहोत पण धर्मांध नाही. पण त्या भ्रष्टाचारावर उपाध्येंच्या लेखात एकही शब्द नाही, धिक्कार. भाजप जे काही करतो, ते केवळ अमर्याद पाशवी शक्तीसाठी!हे कसले हिंदुत्ववादी? बाळासाहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्यात अडकलेले नाही, आम्हाला मंदिरात घंटा बडवणारा नाही, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे.’

भाजपचे हिंदुत्व हे पूर्णपणे सत्ताधार्जिणे आहे. भले एखाद्याकडे प्रभू श्रीरामांचा आदर्श नसेल, पण सत्ता मिळवण्यासाठी तो कामाचा असेल, तर तो त्यांचा! त्यांना प्रभू श्रीरामाचा आदर्श सांगण्याचा मुळात नैतिक अधिकारच नाही. त्यांना लोकशाहीतील सर्वांत महत्त्वाच्या घटकाचा विसर पडला आहे, तो म्हणजे ‘लोक’! पैसे फेकून भाजप आमदार खरेदी करू शकेल, पण लोकांचे काय? ‘तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही’ अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. ज्या दिवशी या देशातील प्रभू श्रीरामांच्या आदर्शांना मानणारा खरा हिंदू जागा होईल, त्या दिवशी भाजपच्या अस्ताची सुरुवात होईल. दैत्य मातला की मर्यादा ओलांडतो. ती मर्यादा प्रत्यक्ष देवाच्या दानपेटीला आणि देवळाच्या जमिनीला हात घालत भाजपने ओलांडली आहे. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा पळपुटेपणा करणारा भाजप कुठे आणि ‘तो ढाचा जर माझ्या शिवसैनिकाने पाडला असेल तर मला त्याचा गर्व आहे’ असे म्हणत हिंदुत्वाला

प्रचंड बळ देणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कुठे. त्यांची ही स्वाभिमानी शिवसेना उद्धव ठाकरे पुढे नेत आहेत, हे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही म्हणत राजीनाम्याचे नाटक करत परत त्यांच्याच मांडीवर बसणार्‍यांची लक्षात ठेवावे.

भाजपने एकच गोष्ट कायम लक्षात ठेवावी, हिंदू जागा होत आहे! तो दिवस दूर नाही, जेव्हा प्रत्येक राष्ट्रप्रेमी व्यक्ती ठणकावून भाजपला सांगेल, ‘अब हिंदू माफ नहीं करेगा!’

खासदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष