एका अतिशय दीर्घ आणि संपन्न अशा भारतीय सांगीतिक संस्कृतीचा जगातल्या अनेक संस्कृतींना हेवा का वाटत आला आहे, याच्या नेक कारणांमध्ये ‘आशा भोसले’ हे गेल्या साठ-सत्तर वर्षांतलं एक महत्त्वाचं कारण! संगीताच्या क्षेत्रात सुखद अपघात घडून येण्याला फार फार महत्त्व असतं. आशा भोसले या कलावतीच्या बाबतीत असा सुखी अपघात घडून आला आणि हे जग एका आतुर, संवेदनशील, तरतरीत, टवटवीत, मधाळ आणि खट्याळ अशा स्वरांच्या मिठीत अलगदपणे जाऊन कधी विसावलं, ते कळलंही नाही. या देशातील प्रत्येकाच्या कानामनात सतत रुंजी घालत राहणार्या त्यांच्या गीतांनी त्यांच्या आयुष्यात जगण्याचे सगळे रंग उधळले गेले आणि त्यामुळे त्यांच्या चित्तवृत्ती सतत त्या स्वराच्या मिठीत राहण्याचाच प्रयत्न करत राहिल्या. आशा भोसले यांच्या स्वरसान्निध्यात राहण्याचं समाधान ज्याचं त्याला यापुढे मिळतही राहील; पण आता त्या नाहीत, ही जाणीवही छळत राहील.
सारं आयुष्य सतत उभ्या ठाकलेल्या संकटांच्या पर्वतांना परतवून लावण्यात व्यतीत करताना, त्याचा लवलेशही आपल्या कलात्मक जीवनात दिसू न देण्याचं कमालीचं सामर्थ्य हे आशाताईंच्या जगण्याचं श्रेयस आणि प्रेयस होतं. आपली प्रत्येक कलाकृती अजरामर होणार आहे, याचं कमालीचं भान आशाताईंना बहुतेक जन्मत:च आलं असावं. जीवनातले सगळे रंग उधळून टाकण्यासाठी जीवनाकडे कमालीच्या आश्वासकतेनं पाहण्याची किमया त्यांना कशी लाभली असेल, हे कोडं सोडवणं खरोखरच अवघड. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचं हे, की या जगातल्या कित्येकांना जगण्याचं, जीवनातल्या दु:खाला, आनंदाला, कैवल्याच्या आनंदाला कवटाळण्याचं सामर्थ्य या स्वरांच्या अमीट अपूर्वाईमुळे मिळत गेलं. वयाच्या नव्वदीतही ही अपूर्वाई त्या टिकवून होत्या, हे आपल्या सगळ्यांसाठी आता समाधानाचं. त्यांच्या या प्रदीर्घ आणि अतिशय रसरशीत अशा कारकीर्दीचे साक्षीदार असलेल्या कोट्यवधी मराठी रसिकांचे ऊर भरून येणं अगदी स्वाभाविक. सुरेल आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या या जगातल्या प्रत्येकाला ‘आशा भोसले’ का व्हायचं असतं आणि का होता येत नाही, याचा शोध घ्यायचा झाला, तर त्याचं उत्तर त्यांच्या नवनिर्मितीच्या ध्यासात सापडेल. त्या गायला लागल्या, तेव्हा भारतीय चित्रपटाचं पार्श्वसंगीत चांगलंच बाळसं धरू लागलं होतं. शमशाद बेगम, गीता दत्त आणि थोरली बहीण लता मंगेशकर यांनी ललित संगीताचा सारा आसमंत व्यापून टाकला होता. अशात आपली नाममुद्रा तयार करून त्याचं सुवर्ण मोहरेत रूपांतर करण्यासाठी केवळ हिंमत असून चालणार नव्हतं, तर त्याच्या बरोबरीने आपल्यातील सर्जनाची मशागत करण्याची तयारीही लागणार होती. आशाताईंकडे ती होती, म्हणूनच त्यांना प्रदीर्घ काळ आपल्या स्वरांची जादू पसरवता आली. आयुष्यात येणार्या सुखदु:खाच्या अनेकविध घटनांमध्ये आशाताईंचा आश्वासक स्वर सगळ्या मराठीजनांना सतत जगण्याची प्रेरणा देत राहिला आणि हे जग किती सुंदर आहे, याची पुन:पुन्हा प्रचीती देत राहिला.
संगीताला भाषा नसते, ते सातासमुद्रापार सहज पोहोचू शकतं, हे खरंच. परंतु संगीताची निर्मिती ज्या मातीतून होते, त्या मातीशी त्याची असलेली नाळही सुटत नाही. आशाताईंनी ही नाळ अधिक दृढ केली आणि आपल्या सगळ्यांना एका स्वरसुंदर जगाची ओळख करून दिली. दिवसाच्या सगळ्या प्रहरांत त्यांच्या कितीतरी गाण्यांनी प्रत्येकाला समृद्ध केलं. मग ते लडिवाळपणे गायलेलं ‘दादा मला एक वहिनी आण’ किंवा खोडकर आवाजातलं ‘झुकझुक झुकझुक आगीन गाडी’ असो, की ‘ पान खायो सैंय्या हमार’… ही गाणी घरातल्या प्रत्येक खोलीतल्या प्रत्येकाशी संवाद साधत होती. कुणाची बहीण, कुणाची सखी, कुणाची प्रियतमा, कुणासाठी झुरणारी विरहिणी, कुणाच्या देवघरातील मंदपणे तेवत राहणारी समईची ज्योत, तर कुणाबरोबर अल्लडपणे खेळणारी परकरी पोर. आशाताईंच्या स्वरांत हे सारे भाव अतिशय तरलपणे व्यक्त होतात आणि त्या स्वत:च ते गीत बनून जातात. हे असं गाण्यात पूर्ण विरघळून गेल्याशिवाय ‘नाच रे मोरा’तला मोर होता येत नाही आणि जिवाच्या आकांताने कुणा लाडक्याच्या आठवणींनी व्याकूळ होऊन ‘जिवलगा’ला साद घालता येत नाही. किती हे रंग आणि त्याच्या किती रंगबिरंगी छटा! त्यातल्या प्रत्येकाला न्याय द्यायचा, तर ते गीत हृदयात झिरपायला हवं. ते आकळून यायला हवं. केवळ संगीतकाराने सांगितलेली स्वररचना त्याला हवी तशी गाऊन हे साध्य होणारं नाहीच, हे आजकालच्या चित्रवाणी वाहिन्यांवरल्या अनेक कार्यक्रमांमुळे सहज कळू शकतं. आशाताईंनी स्वररचना जशाच्या तशा गायल्या नाहीत, त्याला जीव लावला. त्या रचनांना काय सांगायचंय, कसं सांगायचंय, हे समजून घेतलं. त्यात आपली प्रतिभा पुरेपूर ओतली, तेव्हा कुठे त्या रचनेला भावाचे आणि अर्थाचे अनेक पदर सुटले. हे असंच त्यांच्या प्रत्येक हिंदी चित्रपट गीतांत, गझलेत सहजपणे दिसतं. त्यामुळेच त्यांचा आवाज हे प्रत्येक संगीतकारासाठी आव्हान होतं. आपल्याला सुचणारी कितीही अवघड स्वररचना आशाताईंच्या गळ्यातून सहजसुंदर होऊन मिळणं, हा त्यांच्यासाठी दुग्धशर्करा योग होता. मग ते भक्तिगीत असो की कॅब्रेसाठीचे गीत. आपली रचना त्या मधाळ आवाजात सहज विरघळून जात थेट रसिकांच्या हृदयात पोहोचवण्याचं काम त्यांचा आवाज करू शकेल, असा आत्मविश्वास आशाताईंमुळे संगीतकारांना आला.
नवनिर्मितीचा ध्यास असणार्या प्रत्येकाला आपल्या कलाकृतीसाठी देखणं कोंदण हवं असतं. संगीत रचनाकारांसाठी तर अशी रेखीव महिरप अधिकच मोहाची. केवळ हार्मोनिअमवर चाल म्हणून दाखवायची आणि ती म्हणायला लावायची, अशा मार्गात काहीतरी हातचं सुटून जातं. ते पकडून ठेवण्यासाठी गायक कलावंतालाही निर्मितीची ओढ असावी लागते. आशाताईंसाठी गाणी स्वरबद्ध करणारे एकजात सगळे संगीतकार एवढे नशीबवान की, त्यांच्या मनातलं गाणं ओळखून गाऊ शकणारी एक अपूर्व अशी कलावती त्यांच्या परिसरात होती. गीतांचं असं झळाळतं सोनं होताना पाहणं, ऐकणं यापरते दुसरे समाधान असूच शकत नाही. हे सारे संगीतकार म्हणूनच आशाताईंच्या ऋणात राहणं पसंत करतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील बुजुर्गापासून ते अगदी नवख्या संगीतकारांचा एक अतिशय विस्तीर्ण पट आशाताईंनी पाहिला आहे. त्या गातात तेव्हा त्या सुधीर फडके होतात आणि हृदयनाथ मंगेशकरही होतात. आवाजावर हुकूमत अशी की, कोणत्याही गीताचं आव्हान लीलया पेलता येईल. त्यामुळेच पिताश्री मा. दीनानाथ यांच्यासारख्या पेचदार कलावंताने अजरामर करून ठेवलेल्या नाट्यसंगीताचाही मोह त्यांना आवरता येत नाही. ‘विलोपले मधु मीलनात या’, ‘शूरा मी वंदिले’, ‘चंद्रिका ही जणू’ यांसारख्या नाट्यपदांच्या वाटेला जाण्यासाठी आयुष्यभराची तालीमही कमी पडेल. मात्र आशाताईंनी हे आव्हान स्वीकारलं. अभिजात संगीताचं रीतसर शिक्षण मिळणं दुरापास्त असताना त्यांनी केलेलं हे धाडस, त्यांच्या स्वभावाचं दर्शन घडवणारं.
जगण्याच्या स्पर्धेत कल्पनाही करता येणार नाही, अशा दु:स्वप्नांशी दोन हात करता करता, आशाताईंनी आपल्या जगण्याचा तोराच असा काही बदलला की, जीवनातील आर्तता, कारुण्य, भय, चिंता यांसारख्या भावनांवर विजय मिळवत बिनधास्त, क्वचित छचोर आणि अवखळ बनण्याचं सामर्थ्य हस्तगत केलं. त्यामुळेच ’रेशमांच्या रेघांनी’ या गाण्यातल्या त्यांच्या थिरकणार्या स्वरांना जमिनीपासून उंच उडता येतं. ‘केव्हा तरी पहाटे, उलटून रात्र गेली’ या गीतातील कातर हुरहुर, ‘मलमली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे’ या गीतातील धगधगती ज्वानी, ‘प्रभाते सूर नभी रंगती’ या गीतातील भक्ती, चांदणे शिंपण्यातला लयदार तोरा आणि वागेश्वरीला अभिवादन करतानाचा आर्ष भाव जगण्याचे हे सारे रंग अतिशय उत्कटपणे जगण्याची त्यांची ऊर्मी त्यांच्या प्रत्येक गाण्यात पुरेपूर उतरलेली दिसते. कष्ट, वेदना, दु:ख, क्लेश हे तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात. त्याने विदीर्ण होता होता, त्याचंच सौंदर्यात रूपांतर करता येणं सगळ्यांनाच कसं जमेल? चराचर व्यापून टाकणार्या आपल्या रेशीमगर्भी आवाजामुळे आशाताईंना मात्र ही अपूर्वाई शक्य झाली. त्यामुळे समस्त रसिकजनांच्या मनांना कैवल्याचा आनंद प्राप्त झाला आणि या विश्वातील दैन्य हरण करण्याची जिद्द निर्माण झाली. जगण्यातलं सारं श्रेयस आणि प्रेयस ज्या स्वरांच्या मदतीनं हृदयाशी घट्ट कवटाळता यावं, असा हा लावण्यमयी स्वर. प्रत्येक गाण्याचं असं अतीव सुंदर लेणं घडवणार्या आशा भोसले निवर्तल्या. त्यांनी व्यापलेल्या स्वरावकाशात आपलं सुख, समाधान असल्याच्या आनंदात डुंबत राहणं महत्त्वाचं, ही जाणीव मात्र उरली!
