सुधीर गाडगीळ
आशाताईंच्या जिद्दीपणाची एक आठवण माझ्या मनात आहे. पुण्यातल्या रमणबाग शाळेच्या पटांगणात ‘मी… आशा’ कार्यक्रम सुरू होता. अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आशाताई चिंब भिजू लागल्या. मी आणि नाना पाटेकरनं पटकन त्यांच्या डोक्यावर एक छत्री धरली. तशी पटांगणातल्या हजारो रसिकांसमोर येत त्या वेळी पंचाहत्तरीत असलेल्या आशाताई रसिकांना उद्देशून म्हणाल्या, ‘मी आजवर अनेक संकटांना सामोरी गेलीय. पाऊस तर काही क्षणांचा आहे. मी त्याला भीत नाही. तुम्ही मंडळी पावसाला भिऊन घरी जाणार की गाणं ऐकणार?’  समूह कोरसमध्ये किंचाळला ्र ‘गाणं… गाणं ऐकणार…’  बाईंनी पदर खोचला. छत्री बाजूला करायला सांगितली. पाऊस कोसळतच होता. आशाताईंनी नखशिखान्त भिजत तब्बल बावीस गाणी गायली.

वाद्यं पावसासाठी झाकावी लागलेली. एका पेटीच्या साथीवर बाईंचं गाणं चालूच. भिजत-भिजत ऐकणार्‍या श्रोत्यांचे सामूहिक अखंड चित्कार आणि टाळ्या. प्रेक्षक आणि आशाताईंच्या परस्पर प्रेमाचं दर्शन घडवणारा आणि त्यांचा जिद्द दाखवणारा हा अविस्मरणीय अनुभव. आम्ही त्याचे साक्षीदार होतो. आशाताईंच्या स्वरांचा, उत्साहाचा, जिद्दीचा तो चैतन्यदायी आविष्कार होता. मरगळ झटकणारा. नवी उभारी देणारा. आपल्या दैनंदिनीत श्वासाइतकाच सहजतेनं एकरूप झालेला. सळसळत्या स्वरांचा खळाळता झरा असलेला प्रार्थनीय सूर म्हणजे आशा भोसले! 

मास्टर दीनानाथांसारख्या पित्याकडून लाभलेलं स्वरांचं अनमोल धन आणि विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पार्श्वगायनाच्या प्रांतात पाऊल टाकलं होतं. नाटकाचा विषय काढताच त्या थेट बाबांच्या (मा. दीनानाथ) काळात जात. उंचेपुरे, धोतरातले दीनानाथबाबा भरदार ताना घेत रियाज करत बसलेले… गंधर्वांनी त्यांची गायकी जाणून गोव्यातून फुलांच्या पायघड्या घालत आमंत्रित केलेले… विनामाईक ऑपेरा हाऊसमधला आवाज गिरगाव नाक्यापर्यंत पोहोचवणारे… सारे सारे ‘बाबा’ त्यांना आठवत. माईंच्या मांडीवर बसून विंगेतून त्यांचं काम बघितल्याचं आशाताईंना आठवे. नाट्यगीत आणि नाटक ही म्हणूनच त्यांच्या मर्मबंधातली ठेव … ‘सन्यस्त खङ्ग’,‘मानापमान’ ते ‘भावबंधन’ मधली पदं त्यांना म्हणायला फार फार आवडत.

आशाताई सोळा-सतरा भाषांतून गाणी गायल्या. त्यांच्या मते, भाषा समजून घेणं अवघड आहे, पण गाण्याचे शब्द नीट कळले तर ते गाणं त्या भावासकट म्हणणं सोपं जातं. भाषा आणि केवळ शब्द नव्हेत. ते व्यक्त करणार्‍या लोकांची संस्कृती- ती समजून घ्यावी लागते. संगीतकारानं शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आळवून घ्यायला हवं, हे नव्या गायकांनी शिकायला हवं असं आशाताईंना वाटे. नुसती चाल पाठ करून चालणार नाही. मुळात गाण्याचा अर्थ व त्यातला भाव समजावून घ्यायला हवा. शब्द कसा म्हटला जातो, हे ध्यानात ठेवायला हवं. बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे उच्चारण आणि भाव व्यक्त करणं नेमकं समजावून देत, असं आशाताईंचं मत. र्‍हस्व-दीर्घ उच्चार नेमके येण्यावर त्यांचा कटाक्ष असे. ‘जाळ्यात गावलाय मासा’ हे बाबूजींकडे म्हटलेलं आशाताईचं पहिलं गाणं.

मोठ्या मुलाची म्हणजे हेमंत भोसलेची रचना ‘शारद सुंदर चंदेरी राती’ समजावून घेताना त्यांना सर्वात जास्त आनंद झाला होता. आनंद मोडकची ‘लाल पैठणी’ गाताना आई आणि लेक दोघींचे आवाज एकाच गाण्यात काढण्याची कमालही आशाताईंनी केली. वसंत पवारांच्या काळात पुण्यातल्या पहिल्या ट्रॅक मशिनवर एका दिवसात सात गाणी त्या गायल्यात. रेकॉर्डिंगच्या मधल्या वेळात जादूचे प्रयोग करणारे वसंत पवार आशाताईंना आठवतात. दत्ता डावजेकर हे आशाताईंचे पहिले संगीतकार. ‘चला चला नवबाला’ ही पहिली रचना. पन्नासच्या दशकाच्या आरंभी वैदर्भींय कवी राजा बढे यांची ‘चांदणे शिंपित जाशी’ आशाताई गायल्या. त्यांचे आवडते कवीही विदर्भातलेच – सुरेश भट!

परदेशी चित्रपटांतील गाणी, ऑपेराजच्या सुरांची गोडी त्यांना सी. रामचंद्रनी लावली आणि आशाताईंचा गाण्याचा ढंगच बदलून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. आशाताई म्हण्ल्या होत्या, ‘‘अण्णा उत्तम गाऊन शिकवत. नोटेशनला ते पक्के होते. ‘शब्द चावू नका, हृदयापासून मोकळं गा…’ म्हणत.’’

ओ. पी. नय्यर पेटीवर चाल बांधत. त्यांचं ऑर्केस्ट्रेशन पियानोवर वर्कआऊट करत. ओ. पीं. च्या मते, आशाताईंच्या आवाजातला व्हॉल्युम आणि फोकस कमाल होता. ‘नया दौर’ पासून या जोडीची सर्वच गाणी गाजली. आशाताईंना त्यांचं ‘आईये मेहेरबाँ’फार आवडायचं.

आर. डी. बर्मनदांसमवेत ‘दी ट्रेन’मध्ये पहिलं गाणं आशाताईंनी गायलं. ताईंच्या मते, पंचमदांसाठी उंच आवाज लावावा लागे. ते कधी ताल बदलत, कधी सूर. ते नीट लक्ष देऊन ऐकावं लागे.

‘लेकिन’च्या वेळी मला गुलजारसाहेबांनी आशाताईंबद्दल एक छान गंमत सांगितली होती. ते म्हणाले, ‘‘गाना गाने से पहले वो फिल्म के कॅरेक्टर के बारे में पूछती है. ॲक्ट्रेस कौन है, ये पता करती है. नतीजा ये के पर्देपर उनकी आवाज फिल्म का हिस्सा बन जाती है.’’ हिरॉइनचं ‘वय’ही त्या विचारून घ्यायच्या… हे विशेष. रिहर्सलच्या वेळी आशाताई चहा मागवत… चहा येईतो मोठमोठी अक्षरं काढून गाणं स्वत:च्या हाताने लिहून काढत… त्यावर नाना खुणा करत… हे सांगताना गुलजार म्हणाले होते, ‘‘गाणं पूर्ण होईस्तोवर ते गाण्याच्या कागदाचं पान म्हणजे  ‘ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग’ बनलेलं असतं.’’

नवनवी आव्हानं स्वीकारत, वादळांना तोंड देत, त्या-त्या पिढीचे ढंग समजावून घेत अनेक शब्दकार-संगीतकारांच्या स्वरांना आशाताईंनी आपल्या सुरांनी ताजा गंध दिला. लावणी ते अभंग अन् पॉप ते भावगीत असं सारं वैविध्य त्यांनी आजवर मांडलं. हसता हसता गाणं आणि गाता गाता हसणं – इतक्या सहजतेनं आशाताईंनी अकरा हजारांहून अधिक गाण्यांचा उच्चांक प्रस्थापित केला.

आशाताईंनीच ‘उठा श्रीरामा’ सारख्या भूपाळीतून आपली पहाट प्रसन्न केली. ‘पंढरीनाथा झडकरी आता’, ‘ये गं ये गं विठाबाई’सारख्या लालितत्यपूर्ण भक्तिगीतांनी दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केला. ‘नाच रे मोरा’ नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिला. ‘विचारल्यावीन हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा’ म्हणत आलेल्या आशाताईंच्या तानेनं अचानक आलेल्या वळवाच्या प्रसन्न सरीचा आनंद दिला. ‘सुवासिनी’तल्या ‘जिवलगा, कधी रे येशील तू’ या बाबूजींनी स्वरबद्ध केलेल्या गाण्यात आशाबाईंनी ‘दिवसामागून…’ हा शब्द वर चढवत नेला की बापा माणसाच्या पोटातही खड्डा पडावा.‘का रे दुरावा’तलं आर्जव असो किंवा ‘आ… आ… आजा’मधला खळाळ,‘केव्हातरी पहाटे’ मधला भाव तरलपणे व्यक्त करणं असो किंवा ‘रेशमाच्या रेघांनी’ही लावणी असो- तांबड्या मातीतल्या मर्‍हाठमोळ्या साध्या माणसांना जगण्याचं बळ आशाताईंचे सूर देत राहिले!

मी आशाताईंना विचारलं होतं, ‘‘तुम्हाला कधी ताण येतच नाही का? आणि जर येत असेल, तर तुम्ही कायम हसतमुख कशा असता?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘समोर जमणारी माणसं आपले प्रश्न, आपल्या अडचणी, आपली संकटं सोडवू शकत नाहीत. आपल्या प्रश्नांना आपल्यालाच सामोरं जावं लागतं. मग त्यांना अडचणींचं रडगाणं ऐकवण्यापेक्षा ते आपुलकीने भोवती जमलेत, तर गाणं गाऊन, गप्पा मारून त्यांना घटकाभर आनंद तरी द्यावा.’’ आशाताईचं हे वक्तव्य पुलंच्या विचारसरणीशी जवळ जाणारं आहे. पुलं म्हणत, ‘‘जन्म आणि मृत्यू – दोन्हीच्या तावडीत सापडून नियतीनं चालवलेली आपली फसवणूक पाहिली की चार घटका आपुलकीने भोवती जमणार्‍यांची हसवणूक करण्यापलीकडे आपल्या हाती काय उरतं?’’

शेवटी जाता जाता-माझ्या त्यांच्यासमवेतच्या कार्यक्रमांच्या अनुभवानंतर मी एवढंच म्हणेन, की मरगळ झटकणारा, परस्परांतला अबोला पुसून टाकणारा, आपल्यासारख्या रसिकांची संगीत संस्कृती आकाराला आणणारा, सुरांचा चैतन्यदायी झंझावात म्हणजे आशा भोसले!

‘लोकसत्ता’तील पूर्वप्रकाशित लेखाचा संपादित अंश