खुशी राजाणे
एकविसाव्या शतकात, आजच्या विज्ञानयुगात आपण एकीकडे प्रगतीच्या गप्पा मारतो. तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अभिमान बाळगतो पण दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धा, भोंदूपणा आणि त्यातून होणारे स्त्रियांचे शोषण आजही थांबलेले नाही. भोंदू बाबांच्या कथित चमत्कारांवर विश्वास ठेवणाऱ्या समाजात, स्त्रियांच्या शोषणाच्या घटना पुन्हा पुन्हा समोर येत आहेत. अशोक खरातवर ज्या प्रमाणात लैंगिक शोषणाचे आरोप होत आहेत, ते पाहता ही वस्तुस्थिती अधोरेखित होते. अंधश्रद्धा आणि सामाजिक असुरक्षितता यांच्या गुंतागुंतीत अडकलेल्या अनेक स्त्रिया अशा लोकांच्या जाळ्यात अडकतात. पण नंतर दोष मात्र त्यांच्यावरच टाकला जातो. ही विसंगती केवळ लाजिरवाणी नाही, तर धोकादायकही आहे.
हे केवळ एका प्रकरणापुरते मर्यादित नाही. भारतात याआधीही अनेक भोंदू बाबांचे प्रताप उघड झाले आहेत. आसाराम बापू असो वा गुरमीत राम रहीम सिंह या प्रकरणांतही स्त्रियांचे लैंगिक शोषण झाल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. या सर्व घटनांमध्ये एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे सत्तेचा, श्रद्धेचा आणि भीतीचा गैर. अशोक खरातसारख्या भोंदू बाबांनी उपचार, आशीर्वाद, समस्या निवारणाच्या नावाखाली स्त्रियांच्या भावनिक आणि मानसिक गरजांचा गैरफायदा घेतला. अनेक वेळा या स्त्रिया घरगुती ताणतणाव, आर्थिक अडचणी, अपत्यप्राप्तीची चिंता किंवा कौटुंबिक दडपण यामुळे अशा बाबा-बुवांकडे जातात. पण समाज त्यांच्या या परिस्थितीकडे पाहण्याऐवजी, त्या तिथे गेल्याच का? असा प्रश्न विचारून त्यांनाच दोषी ठरवतो.
अशा बाबांना समाजात इतकी मोकळीक का मिळते, याचे उत्तर आपल्या सामाजिक रचनेत दडले आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे स्त्रियांना अनेकदा स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते. त्यांच्या आयुष्यातील मोठे निर्णय जसे लग्न, अपत्य, करिअर हे इतरांच्या अपेक्षांवर ठरतात. जेव्हा त्या या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून जातात तेव्हा आधार शोधू लागतात आणि हाच तो क्षण असतो, जिथे भोंदू बाबा त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात. खरात प्रकरणातही हेच झाल्याचे दिसते.
खरात सारखे भोंदू बाबा स्त्रियांच्या श्रद्धेचा, असुरक्षिततेचा, त्यांच्या आयुष्यातील पोकळीचा गैरफायदा घेतात पण दोष मात्र त्या स्त्रियांनाच दिला जातो. ‘तूच तुझ्या शोषणाला जबाबदार’ हा पुरुषी शिक्का एकदा का ‘स्त्री’च्या कपाळावर मारला, की सगळे मोकळे. पण घरात सुरक्षितता, विश्वास, सन्मान मिळाला असता, तर कोण गेले असते अशा बुवा-बाबांकडे? हा प्रश्न ‘पुरुषी’ अहंकाराला पचत नाही.
घरात दबाव असतो. वंशाचा दिवा हवा, पणती नको म्हणून गर्भपात करवून घेणारे असतात. सारे काही सहन कर, गप्प बस कारण तू स्त्री आहेस आणि हे सारे सुरू असताना, बाहेर कुणाचा ‘आधार’ मिळत असेल तर चूक त्या स्त्रीची कशी, ती परिस्थितीची बळी आहे. चूक त्या निर्लज्ज समाजाची आहे ज्याने तिला इथवर येण्यास भाग पाडले. बाईच्या पोटी जन्म घेऊन, तिलाच कमी लेखणे, खरा गुन्हेगार समोर असेल तरी तिलाच दोष देणे अशा या ढोंगी समाजाच्या वर्तनाची कीव करावी तेवढी थोडीच आहे.
या पीडित स्त्रिया केवळ भोळ्या नव्हत्या, तर त्यापैकी अनेकजणी या व्यवस्थेच्या बळी होत्या. त्या अशा परिस्थितीत होत्या जिथे त्यांना कोणीतरी ऐकून घेणारा, मदत करणारा माणूस हवा होता तिथे त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात, तेव्हा समाजाची प्रतिक्रिया बदलत नाही. गुन्हेगाराला प्रश्न विचारण्याऐवजी, पीडित स्त्रीच्या चारित्र्यावर बोट ठेवले जाते. तिच्या कपड्यांवर, वागण्यावर, तिच्या निर्णयांवर बोट ठेवले जाते. आणि तीच मूर्ख होती हा सोयीस्कर निष्कर्ष काढला जातो.
हे बदलण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि स्त्रियांच्या सशक्तीकरणावर भर देणे आवश्यक आहे. घरापासूनच मुलांना समज दिली पाहिजे की, स्त्री ही वस्तू नाही. काहीही ठोस कारण नसताना तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. तसेच, अशा प्रकरणांमध्ये पीडितांना आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना दोष देण्याऐवजी, त्यांचे ऐकून घेणे, त्यांना न्याय मिळवून देणे आणि त्यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणे ही समाजाची जबाबदारी आहे.
अशोक खरातसारखी प्रकरणे आपल्याला केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्याची जाणीव करून देत नाहीत, तर आपल्या समाजात खोलवर रुजलेल्या समस्याही दाखवतात. जोपर्यंत आपण या समस्यांकडे प्रामाणिकपणे पाहत नाही, त्यांचे अस्तित्त्व स्वीकारत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. शेवटी, एक गोष्ट स्पष्ट आहे, जेव्हा आपण पीडितेला दोष देतो, तेव्हा आपण गुन्हेगाराला मोकळे रान दिलेले असते. एकविसाव्या शतकात जगताना आपण जर अजूनही अशा भोंदूपणाला बळी पडत असू, आणि त्याहूनही वाईट म्हणजे पीडितेलाच दोष देत असू, तर हे केवळ सामाजिक अपयशाचे नव्हे, तर मानवी संवेदनशीलतेच्या पराभवाचेही लक्षण आहे.
advertising1382@gmail.com
