कोकणातल्या निसर्गाबद्दल अनेकजण भरभरून बोलत असतात. तो टिकवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असंही म्हणत असतात. पण याबाबत केवळ सभा-परिसंवादांमधून गळा काढत न बसता लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य समजावून सांगण्यासाठी आपल्या आयुष्याचा काही काळ खर्ची घालायला कोणी फार पुढे येताना दिसत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील नरवण या लहानशा गावातला आशुतोष जोशी हा तरुण मात्र परदेशातलं उच्च शिक्षण, आर्थिक लाभ आणि त्यातून आलेलं सुखासीन आयुष्य दूर ढकलून सध्या या मोहिमेवर बाहेर पडला आहे. कोकणच्या किनारपट्टीवरील निसर्ग आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आशुतोषने रायगड जिल्ह्यातील रेवस इथून पदयात्रेला गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी सुरुवात केली आहे. या जिल्ह्याच्या सागरी भागातून निरनिराळ्या गाव, वाड्या-वस्त्यांमध्ये फिरत स्थानिक लोकांशी चर्चा करून माहिती घेत तो जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी जिल्ह्यात पोहोचला असून सध्या राजापूर तालुक्यात आहे.

रायगड जिल्ह्यात फिरत असताना गेल्या काही वर्षांमध्ये या जिल्ह्याचं स्वरूप किती झपाट्याने बदलत गेलं आहे, याची जाणीव आशुतोषला तीव्रतेने झाली. कोकणच्या प्रवेशद्वारावरील या जिल्ह्यासाठी मुंबईशी जवळीक एका परीने शाप ठरला आहे. ‘भाताचं कोठार’ म्हणून रायगड एकेकाळी नावाजला जात असे. पण गेल्या सुमारे तीन दशकांपासून रासायनिक उद्याोग, औद्याोगिक वसाहती, आधुनिकीकरणाच्या रेट्याखाली बांधलेली अवाढव्य बंदरं व विमानतळ आणि राजकारण्यांच्या हस्तकांनी गिळलेल्या शेकडो एकरांच्या भूप्रदेशामुळे या जिल्ह्याचं पारंपरिक रुपडं पार नष्ट झालं आहे.

592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
Cancer , positive thinking ,
प्रवास : असाध्यतेकडून साध्यतेकडे
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?

सपाट जमिनी सोडाच, इथले डोंगरसुद्धा राजकारण्यांच्या हस्तकांनी केव्हाच खरेदी करून टाकले आहेत. मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन यासारखी काही पर्यटनामुळे बचावलेली गावं सोडली तर सायगाव, बागमांडला, श्रीवर्धन यासारख्या टापूमध्ये बॉक्साईटच्या खाणींनी रायगड उजाड करून टाकला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर दापोली तालुक्यात आशुतोषला दिसलेली दृश्यं आणि कानावर आलेल्या कथा रायगडच्या अवस्थेपेक्षा फार वेगळ्या नाहीत. तो सांगत होता की, सध्याच्या महायुती सरकारमध्ये असलेल्या मुंबईच्या एका बलवान, धनवान मंत्र्याच्या मुलाने दापोली तालुक्यात त्याच्या मूळ गावाजवळची संपूर्ण टेकडीच खरेदी केली आहे. त्याला इथे लवासाच्या धर्तीवर एक आख्खं शहर वसवायचं आहे! आजूबाजूच्या अनेक गावांना पाणी पुरवणाऱ्या पंचनदीवरच्या धरणातून या प्रकल्पासाठी पाणी उपसायचं होतं. पण परिसरातल्या इथल्या शेतकऱ्यांचं उत्पन्नाचं महत्त्वाचं साधन असलेल्या सुपारीच्या बागांसाठी या धरणातलं पाणी, हाच मुख्य आधार आहे. गावकऱ्यांच्या दीर्घकाळच्या आंदोलनामुळे त्या मुलाला तिथून माघार घ्यावी लागली. पण त्याने हार मानली नाही. धरणाजवळची जमीन विकत घेतली आणि तिथं बांधलेल्या विहिरीतून सातत्याने भूजल उपसलं जात आहे . आता फक्त धरण गावकऱ्यांच्या हातून जाण्याची वेळ कधी येईल, हा प्रश्न आहे.

दापोलीहून आशुतोष गुहागर तालुक्यातील त्याच्या नरवण या गावी आला. तिथे काही दिवस गावच्या परिसरातल्या ग्रामस्थांच्या छोट्या छोट्या सभा किंवा बैठका किंवा व्यक्तिगत भेटीगाठी करून त्याने फेरी बोटीतून रत्नागिरी तालुक्यातलं जयगड बंदर गाठलं. जिंदाल कंपनीच्या कारखान्यातून सातत्याने होणाऱ्या प्रदूषणामुळे हा परिसर नेहमीच चर्चेत राहिला आहे. अगदी गेल्या महिन्यातसुद्धा, १२ डिसेंबर रोजी इथल्या शाळेतल्या मुलांना वायुगळतीमुळे रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. ही गळती कशामुळे झाली, याचा शोध घेण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तसंच कंपनीच्या बंदर विभागातील चार अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून कारवाई करण्यात आली आहे. खरं तर ही तात्पुरती मलमपट्टी आहे. आशुतोषबरोबर इथं या पदयात्रेत सहभागी होऊन स्थानिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी चर्चा केली असता जिंदाल कंपनी इथली कायमची डोकेदुखी झाली असल्याची प्रतिक्रिया एकमुखाने व्यक्त केली गेली. विशेषत: नांदिवडे या गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी प्रदूषणामुळे पूर्णपणे बाद झाल्या आहेत. इथल्या ग्रामस्थांना कंपनीतर्फे नियमितपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण विहिरीच्या पाण्याची सर या पाण्याला येऊ शकत नाही. शिवाय त्याच्या पुरवठ्यालाही मर्यादा असतात. मनोज दामले यांच्या घराच्या परिसरात तर आंबा आणि केळीच्या झाडांच्या पानांवर कंपनीतून बाहेर पडणाऱ्या राखेचा आणि कोळशाचा गडद काळा थर पाहायला मिळाला. त्याचा फटका इथल्या आंब्याच्या बागांमधल्या उत्पन्नाला बसला आहे. या परिसरातल्या पारंपरिक मच्छीमारांवरही संक्रांत ओढवली आहे. कंपनीतून समुद्रात थेट सोडल्या जाणाऱ्या प्रदूषणयुक्त पाण्यामुळे इथली मासेमारी पूर्णत: नष्ट झाली आहे. वायुगळतीसारखी काही गंभीर घटना घडली की जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाचे अधिकारी लक्ष घालतात. बाधितांना कंपनीतर्फे काहीतरी नुकसानभरपाई दिली जाते आणि पडदा टाकला जातो. त्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. ज्यांना पर्याय उपलब्ध आहेत अशा ग्रामस्थांनी इथला जमीनजुमला, घरदार विकून अन्यत्र स्थलांतर केलं आहे. काहीजण पर्याय नाही म्हणून अजून तिथेच राहत आहेत. प्रदूषण किंवा अन्य गैरसोयींमुळे तेही संधी मिळेल तेव्हा सोडून जातील अशी परिस्थिती आहे. थोडक्यात, नांदिवडे म्हणजे संपत चाललेलं गाव आहे आणि कंपनीचे कर्ते-धर्ते त्याचीच वाट पाहात आहेत!

खंडाळा हे या परिसरातलं एक महत्त्वाचं गाव. वाटद खंडाळा येथील माध्यमिक विद्यालय वरवडे भागशाळा व श्रीमती पार्वती शं. बापट कनिष्ठ महाविद्यालयात आशुतोषने विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांना मुंबईला जाण्याची फारशी ओढ नाही. पण इथे गावात राहण्यामागे कंपनीमध्ये नोकरी मिळेल, अशी आशा आहे. जमलेल्या तीन-चारशे विद्यार्थ्यांपैकी फक्त एका विद्यार्थ्याने आपल्याला शेतकरी व्हायचं आहे, असं सांगितलं. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीही तीच आहे आणि ती परंपरा तो पुढे चालवणार आहे. आशुतोषने त्याचं आवर्जून कौतुक केलं. त्याला यापूर्वीही एका शाळेत हाच अनुभव आला होता. पण त्यात त्या मुलांचा फार दोष नाही. त्यांना कोणी स्थानिक पातळीवरच्या अन्य पर्यायांबाबत समजावून सांगत नाही किंवा ते उभे करण्यासाठी मदतीचा हात पुढे येत नाही. त्यामुळे ‘धोपट मार्गा सोडू नको’, या उक्तीनुसार ते मुंबईची वाट धरतात.

संध्याकाळी नांदिवड्याहून रीळकडे येत असताना जयगड- रत्नागिरी रस्त्यावर काही महिला चालल्या होत्या. अशा तऱ्हेने जाणाऱ्या लोकांशी सहज संवाद साधण्याची हातोटी आशुतोषकडे आहे. इथेही त्याने त्या महिलांचं राहणीमान, मिळणारा पगार, आर्थिक अडचणी याबाबत चालतच चालता चालता गप्पा मारल्या. त्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूने चालत होत्या. पण त्यामुळे गप्पांमध्ये अडथळा आला नाही . अन्य काही पर्याय नसल्यामुळे प्रदूषणाचा त्रास झाला तरी या कंपनीत काम करणं भाग पडल्याचं त्या महिलांनी बोलून दाखवलं.

रीळच्या मुक्कामात रात्री मनोज काणे यांच्या पुढाकारामुळे स्थानिक ग्रामस्थांची बैठक झाली. तरुणांची उपस्थिती त्या मानाने लक्षणीय होती. या गावाला लाभलेल्या सुंदर समुद्र किनाऱ्याचा पर्यटनासाठी उपयोग करून उपजीविकेचे साधन चांगल्या प्रकारे निर्माण करता येऊ शकतात, हे आशुतोषने त्याच्या मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला. बैठकीनंतर त्याबाबत एक-दोन जणांनी उत्सुकताही दाखवली. अशा प्रकारे काही विचार तरी सुरू व्हावा, हा या पदयात्रेद्वारे स्थानिक ग्रामस्थांशी बोलण्याचा आशुतोषचा हेतू असतो. एका गावाहून दुसऱ्या गावी वाहनाने जाण्याऐवजी अशा पद्धतीने जास्त चांगल्या प्रकारे संवाद साधला जातो, असा त्याचा अनुभव आहे. त्याचा एक वेगळा प्रभावही पडतो.

रत्नागिरी शहरात आशुतोषने शाळा-महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांशी संवाद साधला. राजापूर तालुक्यातून आणखी काही दिवसांनी तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तिथेही दक्षिणेकडून अतिक्रमण सुरू झालं असलं तरी रायगड आणि रत्नागिरीपेक्षा परिस्थिती बरी आहे. त्या जिल्ह्यातील रेड्डी इथं या पदयात्रेची मार्च महिन्यात सांगता होणार आहे.

अशा प्रकारे गावोगावी एकट्याने फिरून फारसं काय साधणार, असा प्रश्न काही जण विचारतात. शिवाय, लढाईही खूप विषम आहे. सत्ताधारी आणि धनदांडग्यांकडून स्वार्थी हेतूंसाठी या निसर्गरम्य प्रदेशाची चाललेली लचकेतोड रोखण्याचं मोठं आव्हान आहे. पण गेल्या सुमारे दीड महिन्याच्या वाटचालीत आशुतोषला काही समविचारीही भेटले आहेत. काही ठिकाणी स्थानिक नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करून पर्यावरणस्नेही उपजीविकेचे पर्याय उभे केलेले दिसत आहेत. भवताली प्रदूषण व्यापलेलं असतानाही सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवणारे शेतकरी भेटत आहेत. पदयात्रा पूर्ण झाल्यानंतर या विखुरलेल्या कृतिशील बिंदूंना एकत्र गुंफलं तर त्यातून कोकणात स्थानिक पातळीवर शाश्वत विकासाची मुहूर्तमेढ रोवली जाऊ शकेल, असा आशुतोषला विश्वास आहे.

‘कौन कहता है आसमान में सुराख नही होता…’ हे कवी दुष्यंतकुमार यांचं म्हणणं खरं करणारी माणसं आपल्या आसपास आहेत, ती फक्त बघता यायला हवीत, हेच खरं.

उच्च शिक्षण आणि नोकरी असूनही मायदेशात…

छायाचित्र कला या विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर इंग्लंडमधील ग्लॉस्टरशायर विद्यापीठात व्हिज्युअल आर्ट या विषयामध्ये आशुतोषने पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यानंतर सुमारे साडेचार वर्षे त्याने इंग्लंडमध्ये या क्षेत्रात कामही केले. पण भारतातील आर्थिक-सामाजिक समस्या, तसेच कोकणच्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे व्यथित होऊन आशुतोषने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. इथं आल्यानंतर त्याने २०२२ मध्ये नरवण ते विशाखापट्टणम अशी सुमारे १८०० किलोमीटर पदयात्रा केली. या पदयात्रेत महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ, तसेच आंध्र प्रदेशच्या काही भागांतील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांचा धांडोळा स्थानिक जनतेशी संवाद साधत आशुतोषने घेतला. त्यातील अनुभवांवर आधारित ‘जर्नी टू द ईस्ट’ हे पुस्तक त्याने स्वत:च प्रसिद्ध केलं आहे.

कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचा वाक्प्रयोग गेली अनेक वर्षे अनेक पातळ्यांवरून केला जात आहे. त्यावर कडाडून टीका करताना आशुतोष म्हणतो की, सध्याचा कॅलिफोर्निया घडताना तिथल्या पारंपरिक स्थानिकांना विस्थापित व्हावं लागलं. कॅलिफोर्निया राज्य एकेकाळी पर्यावरणाचं आदर्श होतं. तेच आज दरवर्षी लागणाऱ्या जंगलांच्या आगींचं भक्ष्य झालं आहे. अगदी तसंच आमच्याही बाबतीत घडणार आहे. ही किंमत भयावह आहे. प्रत्येक विकासाची काहीतरी किंमत चुकवावी लागते. इथे ती किंमत कोकणातील गावकऱ्यांच्या जीवनाची आणि पर्यावरणाची आहे.
pemsatish. kamat@gmail.com

Story img Loader