प्रश्न – अतुल तू शिवाजी पार्कला जेन झी आंदोलनामध्ये गेलास… काय विचार होता? आयकर खात्याची धाड पडेल किंवा आणखी काही भीती वाटली नाही का?
उत्तर – खरं तर आपल्याला हा प्रश्न विचारावा लागतोय हेच दुर्दैव आज आपलं आहे. पण माझ्या आयुष्यामध्ये अभिनय, नाटक वगैरे हे खूप उशिरा म्हणजे २३-२४ व्या वर्षी आलं. पण सामाजिक, राजकीय हे वातावरण माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यापेक्षा खूप आधी आलं आहे. माझा जन्म १९६५ सालाचा आहे, १९७५ साली आणिबाणी आली त्यावेळेला १० वर्षांचा होतो. त्याच्यानंतर असं वाटलं की आता बदलला आपला देश… पण अडीच वर्षात इंदिरा गांधी परत निवडून आल्या, परत निष्पक्ष निवडणुका. ते सगळं माझ्यासाठी अत्यंत जादुई प्रकरण होतं. सांगण्याचा मुद्दा हा की त्यावेळेला राजकारणाबद्दल, समाजकारणाबद्दल जे आकर्षण निर्माण झालं, ते आजही कायम आहे. १९७७ च्या त्या निवडणुकीपासून आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीचा निकाल मी अगदी वेळात वेळ काढून, टीव्ही समोर बसून ऐकला आहे. कधीही चुकवलेला नाही.

प्रश्न – अभिनयासारख्या धगधगत्या क्षेत्रात असूनही ‘राजकारण मला आवडतं आणि मी त्याकडे अगदी जवळून त्याकडे बघतो’ असं म्हणणं हे जरा धैर्याचं नाही का?

उत्तर – आपल्याकडे घराघरांमध्ये अशी समजूत करून दिली आहे की राजकारण हे आपलं क्षेत्र नाहीये वगैरे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं समाज म्हणून फार मोठं नुकसान झालं आहे. २००९ साली मी ‘लोकसत्ता’बरोबर ‘पहिले ते राजकारण’ नावाचं एका महिन्याचं एक कॅम्पेन केलं होतं. त्यात आम्ही काहीजणांनी महाविद्यालयांमध्ये जाऊन राजकारणाबद्दल उदासीन राहू नका हेच सांगितलं होतं. राजकारणात रस घ्या, याचा अर्थ लगेच निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही पडलं पाहिजे असं नसतं, तुम्ही माणूस आहात म्हणजे राजकारण आलं. ‘पर्सनल इज पोलिटिकल’ हे सुप्रसिद्ध वाक्य सगळ्यांना माहीत असतं. दोन माणसं एकत्र आली की राजकारण असणारच. कुटुंब नावाची व्यवस्था त्यातल्या राजकारणाशिवाय टिकूच शकत नाही. मग देश चालवणारं राजकारण नाही, नको तो आपला प्रांत नाही असं कसं म्हणणार? तर मला ते कधीच पटलेलं नाहीये. राजकारण नको असं तथाकथित मध्यमवर्गीय घरांमध्ये सांगून आपण राजकारणाची आजची स्थिती ओढवून घेतलेली आहे. मराठी समाजामध्ये त्या काळात जे दिग्गज होते त्यांनी त्या काळातल्या राजकारणाबाबत पोटतिडिकीने त्या काळात भूमिका घेतल्या असत्या किंवा सडेतोडपणे बोलले असते, तर मराठी जनमानसावर परिणाम झाला असता आणि आपल्याला नको राजकारण, ही वृत्ती तयार झाली नसती.

प्रश्न – पण राजकारण आता लोकांच्या घरांमध्ये शिरलं आहे आणि कुटुंबांमध्ये त्यामुळे मतभेद होताहेत…

उत्तर – समाजाने हे समजून घेणं फार गरजेचं आहे की राजकारण आपल्या घरात किती आतमध्ये यावं, याची काहीतरी मर्यादा ठेवली पाहिजे. राजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे, पण रोज तुमच्या घरात येतंय राजकारण, याचा अर्थ काहीतरी चुकलं आहे. कारण राजकारणाचं मुळात कामच हे आहे की त्याची सतत तुमच्या आयुष्यात लुडबुड होता कामा नये. पण ती होत असेल आणि तुम्ही ती करू देत असाल, तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये आणि मित्रांमध्ये जर राजकारण येत असेल, तर मग तुमच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. कारण तुम्ही समोरच्याला केवळ या पृथ्वीवरचा एक सहयात्री म्हणून बघत नाही आहात. ते तुम्ही हरवून बसला आहात आणि माझी आयडेंटिटी, माझं ब्रँडिंग किंवा माझं अमुकतमुक हे खूप महत्त्वाचं होऊन बसलेलं आहे. त्याच्या आड येणारी सख्खी मुलगी, सख्खा मुलगा किंवा इतर कुणी तुम्ही नाकारत आहात. मला असं वाटतं की हा सगळा टप्पा थोड्या काळापुरता असणार आहे. आपण जिथनं सुरुवात केली तिथे आपण परत यायला हवं.

प्रश्न – तू जंतर-मंतरवरच्या आंदोलनाने फारच प्रभावित झालेला होतास…

उत्तर – समाजामध्ये सतत पिढ्या बदलत असतात. नवीन पिढ्या येत असतात. पूर्वी वर्षांच्या अंतराने पिढ्या वेगळ्या ठरायच्या, आजकाल दोन भावंडं असली आणि त्यांच्यामध्ये दोन-तीन वर्षांचा अंतर असलं तरी वेगळी पिढी होते. हा सगळा तंत्रज्ञानाचा प्रभाव आहे. सांगायचा मुद्दा हा की आपल्या लक्षातच आलं नाही, की अशी पिढी जी एक वर येते आहे, ज्यांनी २०१४ नंतरचाच काळ फक्त बघितलेला आहे. त्यांच्यासाठीचं वास्तव वेगळं आहे. तंत्रज्ञानामुळे हे झालेलं आहे. दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक आणि राजकीय अंगाने अभ्यास करण्याची पद्धत नाही. पण या आंदोलनातनं चार-पाच पीएच.डी. होतील, एवढा आशय आहे. काय त्यांची भाषा! काय सुंदर प्रतिक्रिया देत होते ते. आणि त्यातही मुलींनी पुढे येणं आहे, हे खूपच कौतुकास्पद होतं. या मुलांना जो आत्मविश्वास आहे, जी स्पष्टता आहे, ते सगळं फार वेगळं आहे. काय आहे, की निवडणूकप्रधान राजकीय व्यवस्थेला एक प्रकारचं जडत्व असतं. आपल्याकडेच नाही, जगभरात असं आहे. या व्यवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी वयाचा एक टप्पा यावा लागतो. ते चार किंवा पाच वर्षांनीच बदललं जाऊ शकतं पण प्रत्यक्षात समाजात पाच-पाच, सहा-सहा महिन्यांनी गोष्टी बदलतात. राजकीय व्यवस्थेमधलं जडत्व आणि समाजामधलं बदलणारं वास्तव ही तफावत जगभरात सगळीकडेच प्रचंड वाढते आहे. आणि जगभरातल्या सत्तेत बसलेल्या, त्या वयाच्या माणसांना समाजात काय चाललंय याचा अंदाजच येत नाहीये. अमेरिकेत हीच भानगड आहे. मला ही प्रचंड तफावत दिसते आहे. आणि त्यामुळे मी खूश आहे की समाजात एकदम काहीतरी खडबडून जागं झालं आहे. आपल्या समाजात एक उतरंड आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला ती स्पष्ट दिसावी लागते. त्याशिवाय आपण जागचे हलत नाही.

मला या पोरांचं यासाठी कौतुक वाटतं की त्यांनी गांधी आणि आंबेडकर या दोघांचंही महत्त्व आपल्याला पुन्हा ठासून सांगितलं. ही माणसं मोठी आहेतच. आपल्या पिढीने एवढी माती खाऊनसुद्धा ती पोहोचली या तरुण पिढीपर्यंत, हे मला फार महत्त्वाचं वाटतं. भारत हा आंदोलनांचा देश आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी श्रमण आंदोलनं जी सुरू झाली, ती काय होती? ती वैदिक, ब्राह्मणी श्रेष्ठत्वाच्या भावनेविरुद्धचीच आंदोलनं होती. संतांचं काम हे आंदोलनंच होतं, सुफी आंदोलनं होती, स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलन होतं, जेपी आंदोलन, अण्णा आंदोलन… हा देश मध्ये मध्ये तो इकडेतिकडे जातो, त्याची घुसळण व्हावी लागते. इथे एका देशामध्ये २५-३० देश आहेत. अशी घुसळण झाल्याशिवाय इथे परत रांगेवर येत नाहीत गोष्टी.

प्रश्न – पहलगाम हल्ला झाल्यानंतर तुला एकदम उठून काश्मीरला जावं असं का वाटलं?

उत्तर – मी पुण्यात होतो पहलगाम झालं त्यावेळेला. त्या घटनेचा अर्थातच धक्का मलाही बसला. मी समाजमाध्यमांवरच्या प्रतिक्रिया वाचत होतो, तर तिथे लगेच ‘बॅन काश्मीर’सुरू झालं. त्याच्यानंतर इकडे-तिकडे असलेल्या काश्मिरींना मारणं वगैरे सुरू झालं. विद्यापीठांमधून काश्मिरी मुलांना त्रास देणं सुरू झालं. ते बघून मला एकदम धक्का बसल्यासारखा झालं की अरे, असं वागून अतिरेक्यांना जे हवं आहे तेच आपण करतोय! त्यांनी पर्यटकांना का मारलं? कारण आधीच्या काही वर्षांमध्ये सरकारने जे वातावरण तयार केलेलं होतं, त्याच्यामुळे पर्यटन प्रचंड वाढलेलं होतं. काश्मिरी लोकांची तुटलेपणाची भावना बदलत होती. हे त्या अतिरेक्यांना खटकलं. म्हणून त्यांनी वेचून वेचून पर्यटकांना मारलं… आणि आपण काय करत होतो, तर काश्मिरींना लक्ष्य करून अतिरेक्यांना हवं तेच करत होतो. मग मी आधी गीतांजलीला, माझ्या बायकोला फोन केला आणि म्हटलं, ‘पहलगामला जाऊ या का? इथे बसून काहीतरी म्हणत राहणं चुकीचं आहे. मला जे म्हणायचं आहे ते तिथे जाऊन म्हणायचं आहे.’ तिचं काहीतरी काम होतं, ती येऊ शकत नव्हती. मग माझ्या ट्रॅव्हल एजंटने बुकिंग वगैरे करून दिलं आणि मी तिथे गेलो. तिथल्या लोकांना भेटलो. ते लोक म्हणत होते की, ‘साहेब, तुम्हाला माहित आहे का? आमच्या इथे टीव्ही कॅमेरे आहेत, तरीही आम्ही घराबाहेर आलो आणि म्हणालो की अशा पद्धतीने पर्यटकांवर हल्ला होणं चुकीचे आहे. आम्ही हा खूप मोठा धोका पत्करला होता, असं आम्ही यापूर्वी कधीच केलं नव्हतं, हे तुम्हाला कदाचित समजणार नाही. कारण आता आमचे चेहरे उघड झाले आहेत, आता या सर्व दहशतवाद्यांना माहीत आहे की आम्ही त्यांच्या विरोधात आलो आहोत. त्यांना आमचे पत्ते माहीत आहेत. पण पर्यटकांवर हल्ले करणं आम्हाला अजिबात आवडलेलं नाही.’’

प्रश्न – आता थोडं तुझ्या क्षेत्राविषयी… अभिनयाच्या क्षेत्रामध्ये नुसतं असणं आणि या क्षेत्रामध्ये काही एक मूल्यविवेक ठेवून असणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. तो संघर्ष कसा असतो?

उत्तर – हे खूप वैयक्तिक आहे असं माझं मत आहे आणि त्याला कुठल्याही पद्धतीने दोष देत नाही. किंवा त्याचं अतिमूल्यमापन करत नाही. कारण फक्त आमच्याच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये, आपल्याला कोणत्या मूल्यव्यवस्थेसह जगायचं आहे, हे प्रत्येक माणसाने त्याचं त्याचं ठरवायचं असतं. ते त्याच्या व्यवसायामध्ये प्रतिबिंबित होत असतं. आता आपण एवढ्यातवेढ्यावरून त्याचं मूल्यमापन कसं करणार? कारण त्या माणसाची परिस्थिती काय, त्याचं जडणघडण कशी झालेली आहे, हे आपल्याला माहीत नाहीये. त्याला काय अडचणी आलेल्या आहेत, नाहीत, हे आपल्याला माहीत नाहीये. तर आपण त्याचं वागणं बरोबर की चूक हे कसं ठरवणार? तुम्ही छंदाचं व्यवसायात रुपांतर करायचं ठरवता, त्याच्यावर जगायचं ठरवता, त्यावेळेला काय करायला हवं? आमच्या क्षेत्राबाबत सांगतो. मी इथे नवीन येणार्‍यांना नेहमी सांगतो की, अभिनयाची आवड असणं, अभिनय येणं आणि अभिनयाचा व्यवसाय करणं या तीन वेगळ्या, स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि त्यांचा एकमेकांशी संबंध नाही. एखादी गोष्ट मला आवडते म्हणजे मला ती येईल असं नाही. अर्थात अभिनय येणं आणि चांगल्या अभिनयाची काहीही व्याख्या नाही, पण उत्तम अभिनय येतो पण त्याचा व्यवसाय करता अजिबात येत नाही, किंवा काही लोकांच्या दृष्टीने बरा अभिनय नाहीये पण व्यवसाय मात्र खूप चांगला करता येतो, असं काहीही असू शकतं. या अर्थाने ते एकमेकांवर अवलंबून नाहीये. तुम्ही तुमचं पोट या क्षेत्रावर अवलंबून असणार आहे असं ठरवता, तेव्हा तुम्हाला काय मिळतं यावर खूप गोष्टी अवलंबून असतात, म्हणूनच मी म्हटलं की आमच्या क्षेत्रामध्ये ‘गाजणं’ या गोष्टीला फार महत्त्व आहे, कारण त्याशिवाय आमचे दर वर जात नाहीत. मध्ये मला कोणीतरी कोणाचं तरी नाव घेऊन म्हणाला, ‘अरे त्या नटाचं काय फार झालं नाही.’ मी म्हटलं, ‘तो माणूस स्वत:चं गाव सोडून मुंबईसारख्या शहरामध्ये आला आणि इथे केवळ अभिनय करून जगला, त्याने स्वत:चं कुटुंब जगवलं, माझ्या दृष्टीने तो स्टार आहे. नका त्याला असं घालून-पाडून बोलू, खूप अवघड क्षेत्र आहे आमचं.’ एकदा तुम्ही हा व्यवसाय करायचं ठरवल्यानंतर खूप अवघड असतं अनेक निर्णय घेणं. तुम्हाला एखादं क्षेत्र व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर जे निर्णय घ्यावे लागतात, त्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला नाही म्हणणं किंवा तुमच्या मूल्यव्यवस्थेप्रमाणे वागणं शक्य होतंच असं नाही. नटांच्या बाबतीत त्यांना जे सांगितलं गेलेलं असतं, तसंच होईल याचीही बर्‍याच वेळेला खात्री नसते. अनेक गोष्टी बर्‍याच वेळेला तुमच्या हातात नसतात. म्हणजे मुद्दाम फसवलं जातं असं मी म्हणत नाही,पण एखादी गोष्ट करता करता काहीतरी वेगळं होऊन जातं. तुम्हाला आधी सांगितलेला नसतो असा एखादा असा सीन करावा लागतो वगैरे. म्हणून मी असं म्हणतो की मी कधीच कुणाला त्याच्या निर्णयांबद्दल दोष द्यायला किंवा मूल्यमापन करायला जात नाही.

प्रश्न – मग अतुल कुलकर्णीचा अभिनय हा छंद आणि त्याचं जगणं, यात परत काही अडचणी येतच असतील ना?

उत्तर – त्याची सगळ्यात मुख्य अडचण ही आहे की तुमच्या छंदाचा व्यवसाय होतो, तेव्हा तुम्हाला छंद उरत नाही. ही फार मोठी पोकळी निर्माण होते आणि ती बर्‍याच वेळेला लक्षात येत नाही. ती नंतर तुमचं नुकसान करते. कारण छंद हाच व्यवसाय म्हणून स्वीकारल्यानंतर मी आत्ता म्हटलं तसं फार वेगळे निर्णय घ्यायला लागतात. त्यामुळे कोणत्याही कलाकाराने ही एक पोकळीची जाणीव ठेवणं आणि त्याच्यामध्ये काहीतरी करणं… म्हणजे तुमचा छंद हा तुमचा व्यवसाय झाला आहे, तर आता त्यापेक्षा वेगळं काहीतरी छंद म्हणून करायला हवं. मी सतत जाहीरपणे सांगत आलो आहे, की माझा व्यवसाय हे माझं आयुष्य नव्हे. तो माझ्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे, पण ते माझं आयुष्य नव्हे. मी एकच काम करत मेलो तर उलट मला तो माझा तो माझा पराभव वाटेल. तुमचा व्यवसाय हे तुमच्या चरितार्थाचं साधन असतं. पण ते साध्य नाहीये तुमचं. पण आपण आपण जे साधन आहे त्यालाच साध्य करून ठेवलेलं आहे. व्यवसायावरून त्या व्यक्तीला जोखणं यामुळे आपलं प्रचंड नुकसान झालं आहे.

प्रश्न – गांधी करण्याआधी तू ते कसे समजून घेतलेस?

उत्तर – स्वत: गांधी करत गांधी समजावून घेणं हे जगामध्ये हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच लोकांच्या नशिबी आलं, असं आपण म्हणूया. मला तो माणूस स्टेजवर घडवायचा होता, लोकांच्या डोळ्यासमोर आणायचा होता. त्यामुळे गांधी समजावून घेणं हे माझ्यासाठी एक वेगळी प्रक्रिया झाली. पण एरवीसुद्धा मी गांधींकडे निश्चित आकर्षित झालो असतो. पण ज्या पद्धतीने आणि ज्या एका कॅप्सूलमध्ये मला ते भावले त्याचा मला उपयोग नक्कीच झाला. नंतर मला गांधीच्या भूमिकेसाठी बर्‍याच वेळा विचारणा झाली. पण मी पक्कं ठरवलेलं होतं की मी परत गांधी करणार नाही. कारण अभिनय हा तुम्ही व्यवसाय म्हणून एकदा स्वीकारलात की तुमच्या शब्दकोशामधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द ‘नाही’ हा असतो. तुम्ही ‘नाही’ कशाला म्हणताय, हे खूप महत्त्वाचं असतं. आणि तुमच्या पहिल्याच भूमिकेला एवढा प्रतिसाद मिळतो तेव्हा तर याचा दबाव जास्त असतो. कदाचित दोन-चार वर्षांत मला प्रचंड पैसा आणि काम मिळालं असतं आणि मग नंतर कोणी कुठल्या कशाहीसाठी विचारलं नसतं. तर त्यामुळे एक तो व्यावसायिक निर्णय होता.

प्रश्न – पण हीच भूमिका समजा नथुरामची असती, तर?

उत्तर – केली ना, ‘हे राम’मध्ये! त्यात मी श्रीराम अभ्यंकर होतो. तो नथुरामच होता. फार तर अपयशी नथुराम होता, इतकाच त्याच्यातला मुद्दा. कमल हासननी मला का घेतलं? त्यांनी ‘गांधी विरुद्ध गांधी’बद्दल ऐकलेलं होतं आणि मी गांधी केलाय, हे त्यांना माहीत होतं. त्यांनी मला श्रीराम अभ्यंकरची भूमिका देण्याचं कारण मला असं वाटतं, की त्यांना हे नीट कळलं होतं की अभ्यंकर हा माणूस ज्याला विरोध करतोय, तो माणूस त्याला पक्का माहितीये. आणि मला एका अर्थी सोपं गेलं श्रीराम अभ्यंकर करणं, कारण हे पात्र ज्याला विरोध करत होतं ते माझं ते करून झालं होतं.