मितेश अर्चना सोनवणे
हृदयविकाराचा झटका असो, सर्पदंश वा बाळंतपण रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे आजही खेड्यापाड्यांत अनेकांना जीव गमावावा लागतो. हे टाळण्यासाठी एका अभियंत्याने सुचवलेले प्रारूप…
“माफ करा, यांना रुग्णालयात आणायला थोडा उशीर झाला. तुम्ही अर्धा तास आधी यांना आणलं असतं ना, तर नक्कीच आम्ही यांचे प्राण वाचवू शकलो असतो…!” महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांतील दऱ्याखोऱ्यांत आणि पालघर, गडचिरोली नंदूरबार – धुळे जिल्ह्यांतील ग्रामीण आणि दुर्गम भागांत कित्येक कुटुंबांच्या नशिबी हे शब्द ऐकण्याची वेळ येते.
विज्ञानाने आणि आधुनिकतेने आज कितीही गगनभरारी घेतली असावी, तरी आजही आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागात ‘विलंब’ हेच मृत्यूचे सर्वांत मोठे कारण ठरत आहे. एखादा गंभीर अपघात, एखादा हृदयविकाराचा तीव्र झटका किंवा सर्पदंशासारख्या आरोग्य आणीबाणीच्या वेळी उपचारांचा जो पहिला तास असतो- ज्याला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हणतात- त्या पहिल्या तासात महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागांत मदत मिळणे आजही एक कठीण आहे.
वेळेवर ‘ऑटॉनॉमस ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट’ रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, रस्ते व्यवस्थित नसणे, संपर्क तुटणे आणि ग्रामीण आणि दुर्गम भागांत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव यामुळे शेकडो निष्पाप जीव आजही रुग्णालयाची पायरी चढण्याआधीच रस्त्यातच जीव सोडतात. आणि या विषयाकडे मी केवळ एक तंत्रज्ञानाचा अभ्यासक म्हणून पाहत नाही, तर यामागची एक भीषण वेदना मी स्वतः सोसली आहे. कारण मी चौथीत शिकत होतो, तेव्हा वडिलांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. कारण आमच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात वेळेवर कोणतीही रुग्णवाहिका आली नाही आणि रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांना गमावल्याची ती तीव्र झळ, ते लहान वयातील अश्रू आणि ती असहाय्यता मनात घेऊनच मी मोठा झालो.
पुढे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना मोठ्या शहरांमध्ये दहा मिनिटांत पिझ्झा, बर्गर, किराणा सामान किंवा चैनीच्या वस्तू घरपोच पोहोचवणारे आधुनिक प्लॅटफॉर्म मी पाहू लागलो. तेव्हा मी स्वतःला एक अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला की, जर शहरात एका क्लिकवर माणसाच्या सुखा समाधानाचे साधन अवघ्या दहा मिनिटांत आपल्या दारात येऊ शकते, तर मग माझ्या ग्रामीण आणि दुर्गम गावामध्ये आमच्या बांधवांच्या दाराशी अत्यंत कठीण प्रसंगाच्या वेळी एखादी जीवनरक्षक रुग्णवाहिका दहा मिनिटांत का पोहोचू शकत नाही? तंत्रज्ञान हे फक्त शहरांमधील चकचकीत कॉर्पोरेट कार्यालयांची शोभा वाढवण्यासाठीच आहे का, की त्याचा वापर गरिबांचे प्राण वाचवण्यासाठी सुद्धा होणार आहे? याच जिद्दीतून आणि वैयक्तिक वेदनेतून एका स्वप्नाचा जन्म झाला, ज्याला मी नाव दिले- ‘ऑटॉनॉमस ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट ईव्ही ॲम्ब्युलन्स’ अर्थात स्वायत्त प्रगत जीवन रक्षक ईव्ही रुग्णवाहिका.
म्हणजे अशी यंत्रणा जी कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज सेन्सर्सच्या मदतीने चालते. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील कच्च्या रस्त्यांवरून मार्ग काढत, ही रुग्णवाहिका थेट रुग्णापर्यंत पोहोचू शकते. ही केवळ एक साधी रुग्णवाहिका नसून एक चालता फिरता ‘हाय-टेक स्टॅबिलायझेशन सुट’ आहे. ही एखाद्या ‘मोबाईल आयसीयू’ प्रमाणे कार्य करते. केवळ एक ‘स्वायत्त प्रगत जीवन रक्षक ईव्ही रुग्णवाहिका’ नसून एका अनुभवी शास्त्रज्ञांच्या मेंदूसारखे काम करणारी एक चालती फिरती ‘डिजिटल संजीवनी’ आहे.
अत्यंत ग्रामीण आणि दुर्गम भागांत, जिथे व्यवस्थित रस्ते उपलब्ध नसतात, तिथे फाइव्ह जी जीपीएस सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आणि एआय अल्गोरिदमचा वापर करून ही स्वायत्त रुग्णवाहिका अचूकपणे पोहोचू शकते. ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांत किंवा वाटेत स्पेशलिस्ट डॉक्टर नसताना, या रुग्णवाहिकेतील एआय-आधारित ‘रिमोट मेडिकल मॉनिटरिंग’ पोर्टेबल मशिन्सने क्ष-किरण किंवा ईसीजीचे विश्लेषण अवघ्या काही सेकंदात होते. इतकेच नव्हे, तर ही रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन शहराकडे नेत असताना, आतील ‘ॲक्टिव्ह सस्पेन्शन’ एआय सिस्टीम रुग्णाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून असते.
रुग्णाची स्थिती पुढच्या दहा मिनिटांत बिघडणार आहे का, याचा अचूक अंदाज लावून हा डेटा आधीच मुख्य रुग्णालयातील डॉक्टरांना पोहोचवला जातो, जेणेकरून रुग्ण पोहोचण्यापूर्वीच तिथले ऑपरेशन थिएटर सर्व तयारीसह सुसज्ज ठेवता येते. एखाद्या मोठ्या अपघाताच्या वेळी कोणावर आधी कोणत्या रुग्णावर उपचार करायचे हे ठरवणे कठीण असते, अशा वेळी ही ‘पेशंट-लेव्हलिंग सस्पेन्शन एआय सिस्टीम’ रुग्णांच्या जखमांची आणि लक्षणांची माहिती देते. कोणता रुग्ण सर्वांत जास्त गंभीर आहे हे त्वरित सांगते, ज्यामुळे मर्यादित वेळेत जास्तीत जास्त जीव वाचवता येतात.
या तंत्रज्ञानाचा मानवी चेहरा इथेच संपत नाही, तर तो भाषेचे कुंपणही तोडतो. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील अनेक बांधव आपली लक्षणे मराठी किंवा हिंदीत सांगू शकत नाहीत, ते त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत बोलतात. अशा वेळी एआय-आधारित ‘व्हॉइस ट्रान्सलेशन टूल्स सिस्टीम’ रुग्णाचे बोलणे ताबडतोब डॉक्टरांना समजणाऱ्या भाषेत अनुवादित करतात, ज्यामुळे भाषेअभावी होणारे चुकीचे उपचार कायमचे टळतात. तसेच, जेव्हा रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असते आणि त्याला तातडीने शहरात हलवणे अशक्य असते, तेव्हा ही रुग्णवाहिका ‘एआय-आधारित टेली मेडिसिन – आयसीयू’ म्हणून काम करू लागते.
आतील सेन्सर्स रुग्णाच्या ऑक्सिजन पातळीत किंवा हृदयाच्या ठोक्यांत होणारा सूक्ष्म बदल टिपून थेट शहरात बसलेल्या मोठ्या तज्ज्ञ डॉक्टरांना आपत्कालीन अलर्ट पाठवतात. ते फाइव्ह जी आणि सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीमुळे जिल्हा रुग्णालयांतील व्हिडिओ कॉलद्वारे रुग्णाची ‘व्हर्च्युअल तपासणी’ करून तेथील स्थानिक आरोग्य सेवकांना पुढील उपचारांचे अचूक मार्गदर्शन करतात. समजा पावसाळ्यात रस्ता प्रचंड खराब असेल किंवा पुरामुळे संपर्क तुटला असेल, तर यात ऑल-टेरेन ‘हाय ग्राउंड क्लिअरन्स’ आणि सक्रिय ‘सस्पेन्शन सिस्टीम’ आहे. तर ही सिस्टीम स्वतःहून स्वयंचलित जीवनरक्षक ड्रोनला आदेश देते. हे ड्रोन ढग, वारे आणि डोंगराळ भागांतील अडथळे पार करून अवघ्या काही मिनिटांत ‘अँटी-व्हेनम’ (सर्पदंश प्रतिबंधक लस) किंवा रक्ताच्या पिशव्या थेट रुग्णाच्या वस्तीपर्यंत अचूकपणे पोहोचवतात, जे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जीवनदान ठरते.
हे केवळ स्वप्न नसून ते भविष्यातील वास्तव आहे, जे ग्रामीण आरोग्याची नवी व्याख्या लिहील. हे केवळ संगणकाचे एक कोडिंग नसून, महाराष्ट्रातल्या अगदी शेवटच्या टोकावर राहणाऱ्या नागरिकासाठी ती एक ‘डिजिटल संजीवनी’ ठरू शकते. मानवी मर्यादा संपतात, तिथे एआयची क्षमता सुरू होते. तंत्रज्ञानाचा हा मानवी चेहरा जर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या आरोग्य सेवेत संपूर्णपणे ताकदीने रुजवला, तर महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागांत राहणाऱ्या प्रत्येक बांधवाला आपण खऱ्या अर्थाने त्याच्या आरोग्याचा हक्क देऊ शकू.
तंत्रज्ञान तेव्हाच सार्थक ठरते, जेव्हा ते एखाद्या गरिबाचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्या दारापर्यंत पोहोचते. एआय ही मानवतेची सेवा करणारी एक ‘डिजिटल संजीवनी’ही आहे. आणि माझी ही संपूर्ण धडपड आणि माझा हा प्रकल्प याच एका ध्येयासाठी आहे, की जेणेकरून भविष्यात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि दुर्गम भागांत केवळ रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे कोणाचा अकाली मृत्यू होणार नाही आणि कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला असे दु:ख येणार नाही.
(लेखक संगणक अभियंता आणि तंत्रज्ञान संशोधक आहेत)
ms7282099@gmail.com
